डॉ. गिरीश कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विकासभाऊ आमटे यांचा २७ ऑक्टोबर १९४७ हा जन्मदिन. महामानव बाबा आणि कर्मयोगिनी साधना आमटे यांचा आनंदवन स्थापण्यापूर्वीचा ‘श्रमाश्रम’ प्रयोग तेव्हा चांदा ( सध्याचा चंद्रपूर ) जिल्ह्यातील वरोरा येथे सुरू होता. आनंदवनात बाबांनी पुढे जे सेवाकार्य केले, त्याचा पाया श्रमाश्रमाच्या प्रयोगानेच घातला होता. हा साम्यवादाचा एक अनोखा प्रयोग होता. त्यापूर्वी वामनराव स्वान आणि बाबूकाका खिस्ती अशा दोन वकील मित्रांबरोबर गरीब अत्याचारित अशिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकारी तत्त्वावरचा वकिली व्यवसाय बाबांनी केला. फक्त गरीब आणि अत्याचारित लोकांचीच बाजू न्यायालयात मांडायची आणि तीसुद्धा कपर्दिक न घेता, असे त्यांचे व्रत होते.
या प्रक्रियेतून बाबा आणि साधनाताई श्रम आणि श्रमिकांशी एकरूप झाले. डोक्यावरून मैला वाहणाऱ्यांची दु:खं समजावून घेण्यासाठी बाबा पहाटे चार ते सकाळी आठ या वेळेत मेहतरी करीत. या वेळी गटारीच्या कडेला मरणाची वाट पाहणारा कुष्ठरोगी तुळशीराम बाबांना दिसला. जगण्याचा सबळ उद्देश त्यानेच बाबांना दिला. कुष्ठरुग्णांसाठीचे नंदनवन उभे करण्यासाठी १९४९ मध्ये ‘मसेस’ची (महारोगी सेवा समिती) स्थापना बाबांनी केली.
आमटे यांची मोठी पाती विकासभाऊ आणि धाकली पाती प्रकाशभाऊ यांचा जन्म आनंदवनाच्या निर्मितीच्या आधीचा. त्यामुळे बाबा आणि साधनाताईंच्या असाधारण कर्मयोगाचे, आनंदवनातील ७१ वर्षांच्या वाटचालीचे आणि विविध सामाजिक प्रयोगांचे विकासभाऊ साक्षीदार आणि साथीदार आहेत.
बाबा एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगले. कुष्ठरोगी तुळशीरामपासून सुरू झालेले बाबांचे कार्य, अंध – अपंग, आरोग्य, शिक्षण, विधवा – परित्यक्ता, ज्येष्ठ नागरिक, अनाथ मुले, बेरोजगार युवा, शेती आणि ग्रामीण समस्या, आत्महत्याग्रस्त शेतकरी, जलसंधारण, आदिवासी विकास, पर्यावरण, पर्यायी ऊर्जा अशा अनेक अंगांनी मागील सात दशकांत विस्तारत गेले.एक प्रयोग सफल होण्याआधीच बाबांना दुसऱ्याचे वेध लागलेले असत. आनंदवन – सोमनाथ- हेमलकसा- भारत जोडो अभियान- नर्मदा बचाव आंदोलन अशा अनेक स्वप्नांना ते अविरत आकार देत राहिले. आवेगाने बाबा नव्या आव्हानाकडे झेपावत, तेव्हा तेव्हा त्यांच्या मागे त्यांच्या स्वप्नांचा भार नि:शब्दपणे आणि समर्थपणे विकासभाऊ यांनी पेलला. त्यातील रचनात्मक कामांना त्यांनी गुणवत्तेची, व्यवस्थापनाची आणि अभियांत्रिकीची जोड दिली. ती परिणामकारक, व्यापक आणि सुलभ केली. १९६६ मध्ये विकास आणि प्रकाश हे दोघे भाऊ वैद्यकीय शिक्षणासाठी नागपूर येथे गेले. १९७२ मध्ये डॉक्टर झाले. तेव्हा बाबांच्या आदेशानुसार विकासभाऊ आणि त्यांचे सहकारी आनंदवनात तर प्रकाशभाऊ आणि त्यांचे सोबती हेमलकसा येथे कार्यरत झाले.
१९४७ साली डॉ. रॉबर्ट कॉक्रेन यांनी कुष्ठरोगावरील डीडीएस हे औषध प्रथम वापरले. आनंदवनात आरंभी हेच कुष्ठरुग्णांसाठी औषध वापरले जात असे. डॉ. विकास यांनी आनंदवनातील आरोग्यसेवेची जबाबदारी घेतल्यावर उपचार पद्धतीत आधुनिकता आणली. बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. भारती यांच्याशी १९७६ मध्ये विकासभाऊंचा विवाह झाला. डॉ. भारती यांनी वैद्यकीय कामाची जवाबदारी घेताली. त्यानंतर डॉ. विजय पोळ १९८४ मध्ये वैद्यकीय सेवेत भाऊंच्या सोबत आले. त्यामुळे वैद्यकीय सेवेच्या जबाबदारीतून भाऊंनी एक पाय बाहेर काढला. पर्यावरण, शेती आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातील आपले ज्ञान आणि दृष्टी विकासभाऊंनी ‘मसेस’करिता वापरली. त्याचा लाभ इतर सामाजिक संस्था, शासन यंत्रणा आणि जनसामान्यांना व्हावा, यासाठी त्यांनी आवर्जून प्रयत्न केले. संस्था मोठी आणि नामांकित करण्यापेक्षाही संपूर्ण समाज समृद्ध आणि समस्यामुक्त करण्याची विचार यामागे होता.
नावीन्य आणि सुलभता विकासभाऊंच्या समग्र कर्तृत्वाचा वेध एका लेखाचा नव्हे, तर ग्रंथाचा विषय आहे. आरंभी आनंदवनातील रहिवासी शेती आणि दुधाचा व्यवसाय करीत. डॉ. विकास यांनी येथील रोजगार उपक्रमांना आधुनिकतेची जोड दिली. त्यातून अपंगांसाठीच्या दर्जेदार तीन चाकी सायकलपासून ते एअरकंडिशनपर्यंत १४० उत्पादने आनंदवनात होऊ लागली. अंबर चरख्यापासून यंत्रमागापर्यंत प्रवास होत कापडांचे विविध प्रकार आनंदवनात निर्माण होत गेले. विकासभाऊ यांनी बाबांच्या कल्पनेतील विश्व मागील चार दशकांत प्रत्यक्षात साकारले. अर्धवर्तुळाकार छत असलेली घरे भाऊंनी १९७८ साली प्रथम आनंदवनात बांधली. ही घरे कमी खर्चात बांधली जात असली तरी दर्जाच्या दृष्टीने ती अत्यंत उत्तम होती. ओरिसा, आंध्र प्रदेश या राज्यांसह चक्रीवादळ, भूकंप यांचा धोका असलेल्या राज्यांमध्ये हीच घरे सुयोग्य ठरली.
लोखंड आणि लाकूड या महागडय़ा कच्च्या मालाशिवाय टिकाऊ आणि अल्पखर्ची, सर्व ऋतूंत पूरक तापमान देणारी अशी घरे बांधण्याचे तंत्र भाऊंनी विकसित केले. त्यासाठी इजिप्तचे हसन फाथी, लॉरी बेकर, बकमिनस्टर फुलर, माजीद जमाल यांच्याशी संवाद साधून त्यांच्या बांधणीतील अनुभवाचा सखोल अभ्यास विकासभाऊं नी केला. ज्युओडेसिक डोम, नुबियन वॉल्ट या पद्धती भारतात रुळविण्यात त्यांचे योगदान असाधारण आहे. बांधकामासाठी विटा तयार करताना ६० घमेली माती, ४० घमेली वाळू, पाच घमेली सिमेंट, एक घमेले राख आणि एक घमेले प्लास्टिक असा फॉम्र्युला भाऊंनी विकसित केला. हे प्रयोग करीत असताना, हातपाय चिखलात मळवताना निर्मितीचा आनंद त्यांनी नेहमीच भोगला.
प्लास्टिकचा विघटित न होणारा कचरा ही एक जागतिक समस्या आहे. प्लास्टिक बारीक करण्याचं यंत्र विकसित करून त्यातून बांधकामाच्या विटा, रस्ते, गाद्या, उशा बनवायला भाऊंनी सुरुवात केली. आपल्याकडे पाण्यासाठी माती किंवा सिमेंटचे बंधारे बांधले जातात. मातीचे बंधारे टिकाऊ नसतात. सिमेंटचे खूप महाग ठरतात. लोखंड गंजते किंवा चोरीस जाते. लाकूड सडते. त्यामुळे अशा बंधाऱ्यांसाठी ट्रकसारख्या मोठय़ा वाहनांचे वापरून टाकून दिलेले जुने टायर बनवलेले ‘स्पील ओव्हर डॅम’ विकासभाऊंनी विकसित आणि प्रचलित केले.
जरी – झामनी या यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त तालुक्यात या प्रकारच्या डॉ. विकास यांनी बांधलेल्या बंधाऱ्यांनी चमत्कार केले. रस्तेबांधणीसाठी प्लास्टिकचा वापर करून त्यांनी रस्ते मजबूत करण्याचे आणि कचरा प्लास्टिक उपयोगात आणण्याचे तंत्र शोधले.
घनदाट हिरवाई
डॉ. रेने हालर या स्विस पर्यावरण कार्यकर्त्यांने केनियातील मोंबासा येथील उघडय़ा सिमेंट खाणीत केलेला प्रयोग १९८४ मध्ये ‘रीडर्स डायजेस्ट’मध्ये प्रसिद्ध झाला होता. डॉ. विकास यांनी त्यातून प्रेरणा घेत आनंदवनलगतच्या दगडांच्या खाणींचे पुनर्वसन केले. त्यांनी या ठिकाणी शून्य जैवविविधतेतून ६५ एकरांत हाय डेन्सिटी जंगल निर्माण केले. गुजरातमधील कालिदास आणि विठूभाई पटेल यांनी मल्टीटीयर सिल्वीपाश्चर सिस्टीम असलेले जंगल बनवले. त्यांच्या अनुभवातून भाऊंनी आपले तंत्र अद्ययावत केले. ‘मसेस’च्या आनंद निकेतन महाविद्यालयातील वनस्पती शास्त्रज्ञ विश्वास काळपांडे यांना सोबतीला घेऊन सोमनाथ मूळगव्हाण आनंदवन इत्यादी ठिकाणी लक्षावधी झाडे लावली.
नर्मदा बचाव आंदोलनाच्या समर्थनासाठी नर्मदेच्या काठावर कसरावद येथे बाबा आणि साधनाताई राहत होते. तेथून परतल्यावर घनदाट जंगलात परिवर्तित झालेले आनंदवन पाहून त्यांना सुखद धक्का बसला. या अभयारण्यातच साधनाताई, बाबा, बाबांचे पुण्यातील मित्र डॉक्टर धैर्यशील शिरोळे, डॉ. संतदास सैनानी, डॉ. शीतल यांच्यासह आनंदवानातील शेकडो दिवंगत कार्यकर्ते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे लावलेली झाडे फुलली आहेत. याच परिसरात जपानी मियावाकी जंगलाचे यशस्वी प्रयोग भाऊंनी केले आहेत.
अपंगांना आत्मसन्मानाने आणि आनंदाने जगण्याचा हक्क आहे, हे समाजाला ठामपणे ‘स्वरानंदवन संगीत मंच’ने सांगितले. सर ऑर्थर तरनोवस्की यांच्या आग्रहाने आणि मदतीने अपंग पुनर्वसनाचे काम आनंदवनात १९७० च्या दशकात सुरू झाले. त्यात रोजगार शिक्षण देणाऱ्या ‘संधीनिकेतन’ची भर पडली. विविध क्षमता असलेल्या दिव्यांगांना व्यक्त होण्याची संधी मिळालेली नव्हती. त्यांच्यातील कलागुण, तालसुराचे भान कधीच व्यक्त झालेलं नव्हतं. त्यामुळे २००० मध्ये विकासभाऊंनी स्वरानंदवन संगीतमंच उभा करण्याचा संकल्प केला. १४ जुलै २००२ रोजी त्याचा पहिला प्रयोग झाला. त्यात स्वत: विकासभाऊ आणि डॉ. भारतीदेखील गातात. बाबांच्या कविता आणि गाणी सादर करतात. मागील २० वर्षांत भाऊंनी या प्रयोगात असंख्य बदल आणि सुधारणा केल्या. सदाशिव ताजने चाकांच्या खुर्चीवर बसून याचे संचालन करत. स्वरानंदवन प्रयोगाने देशभरातील ३०० हून अधिक संस्थांना समाजात ओळख आणि आर्थिक स्थिरता मिळवून दिली.
नवी दिशा
हेमलकसा उभारताना तेथे लागणारे सामान स्वत: भाऊ ट्रक चालवत घेऊन जायचे. झोप लागू नये म्हणून तिखट मिरच्या खायचे. कुठेही पथारी टाकून झोपायचे. मेकॅनिकपासून ते शेती आणि कृषी – जैव- तंत्रज्ञानापर्यंत सर्व अद्ययावत ज्ञान वंचितांसाठी वापरण्यात विकासभाऊंचा हातखंडा आहे. त्यांची विनोदबुद्धी तरल आहे. त्यांचे विनोद अनेकदा उशिरा लक्षात येतात एवढेच.
बाबांच्या काळात त्यांच्या प्रेरणेने अनेक तरुण कार्यकर्ते आनंदवनाकडे आकर्षित झाले. यातील काहीजण आनंदवनात कार्यरत झाले. तर अनेकांनी स्वतंत्रपणे विविध समाजघटकांसाठी कामे उभी केली. देशभर अशा सामाजिक उपक्रमांची संख्या तीन हजारांवर जाते. बाबांच्यानंतर त्याच ताकदीची नैतिक प्रेरणा आणि मार्गदर्शन डॉ. विकास यांच्याकडून सर्वाना मिळते. बाबांच्या ‘भारत जोडो अभियान’मधील सर्व सहकारी आजही कार्यप्रेरित ठेवण्यात विकासभाऊंचा सिंहाचा वाटा आहे.
सेवाकार्यात समवेदना जपत असतानाच व्यावसायिक दर्जा, व्यवस्थापनाची मूल्ये, परिणामकारकता आणि तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित कशी करावी हे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करीत असतात. बाबांसारखेच त्यांच्याकडे शब्दप्रभुत्व आहे. कामाच्या नादात ते लिखाण करत नाहीत, हीच त्यांच्याबद्दलची एक तक्रार असते.
सेवाकाम सर्वाचे
महारोगी सेवा समिती म्हणजे आमटे परिवार, हे समीकरण लोक जोडतात. पण भाऊंना ते मान्य नसते आणि नाही. ‘मसेस’ आणि आनंदवन हे येथे राबणाऱ्या प्रत्येकाचे आहे आणि राहील. येथे कोणीही येऊन काम करू आणि शिकू शकते. येथे काम करणे ही ज्यांची गरज आहे, त्यांचे येथे नेहमीच स्वागत आहे. ‘समाजाची ही संस्था शेवटी समाजच टिकवणार आहे. तिची उपयोगिता असेपर्यंत ती टिकवणे, हे बाबांनी सोपविलेले दायित्व आहे’, ही त्यांची वैचारिक स्पष्टता फारशी चर्चेत नसते.
जगण्याचे प्रयोजन शोधण्यासाठी तरुणाईला मदत, मार्गदर्शन करण्यात विकासभाऊंना धन्यता वाटते. श्रीगोंदा येथे अनंत झेंडे हा तरुण बाबा आमटे यांच्या नावाने २०० फासेपारधी मुलांचे वसतिगृह, शाळा चालवतो. संस्थेला बाबांचे नाव देऊ का असे विचारल्यावर, विकासभाऊंनी स्पष्ट सांगितले की बाबा आमटे ही व्यक्ती नसून एक विचार आणि प्रेरणा आहे. तिचा उपयोग असेल तर बिनधास्त नाव वापरा.निधीसंकलन आणि माणसे जोडण्याचे तंत्र आणि मंत्र भाऊ नवोदितांना सांगत असतात. आपले देणगीदार, कल्पना आणि कार्यकर्ते भाऊ आवर्जून इतर संस्था आणि कार्यकर्त्यांना जोडून देतात. अशी ‘ट्रेड सिक्रेट’ सांगणारे या क्षेत्रात सध्या तरी दुर्मीळच.
बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो यात्रे’तून प्रेरणा घेऊन आम्ही मागील वर्षी भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रा काढली. विकासभाऊंच्या अनुभवाचे संचित तिला जोडले गेले. अनेक संपर्क आम्हाला दिले. मुलगी डॉ. शीतल हिच्या निधनाचे दु:ख डॉ. आमटे यांनी सोसलेला प्रचंड मोठा आघात होता. त्यातून सावरून संस्था पुन्हा कार्यरत करताना भाऊंची धीरोदात्तता दिसून आली.
डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश यांच्याशिवाय मुंबईचे रमेशभाई कचोलिया हा बाबांचा मानसपुत्र. ते १९८० पासून अखेपर्यंत बाबांच्या सोबत राहिले. त्यांचे केअरिग फ्रेंड्स हे कार्यजाळे बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून काम करणाऱ्या देशातील ३०० हून अधिक संस्थांची मातृसंस्था आहे. रमेशभाई म्हणतात की, बाबांची स्वप्ने प्रत्यक्षात आणणारे डॉ. विकास म्हणजे विकासगंगा आणि माणुसकीची कामे वास्तवात आणणारे ‘भगीरथ’ आहेत.
देशातील सर्व सामाजिक संस्था सध्या शासकीय धोरणांमुळे अत्यंत अडचणीतून वाटचाल करीत आहेत. त्यांची गळचेपी आणि घुसमट दूर करण्यासाठी देशातील स्वयंसेवी क्षेत्राला भाऊंकडून अपेक्षा आहेत. येत्या आठ नोव्हेंबर रोजी आनंदवनात विकासभाऊंच्या अमृत महोत्सवानिमित्त सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचे महासंमेलन होत आहे. या वेळी पुढील पाव शतकासाठीची भाऊंची स्वप्नं आणि कल्पना ऐकण्याची सर्वाना उत्सुकता आहे.
(लेखक स्नेहालय या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आहेत.
girish@snehalaya.org