अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरमध्ये मागील सहा महिन्यांत दोन कोटी ७५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून तब्बल १७१ आरोपींना अटक केली आहे. हा आकडा मुंबईनंतर राज्यात सर्वाधिक मोठा आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी नागपुरात केवळ २ पब होते. आता ही संख्या २५ ते ३० वर गेली. पबमध्ये ड्रग्स पेडलरकडून अमली पदार्थ उपलब्ध करून दिले जातात. नायजेरियातून एमडी ड्रग्स मुंबईत पोहोचते. तेथून ड्रग्स पेडलरच्या माध्यमातून नागपुरात येते. नागपूर हे ड्रग्स विक्री आणि तस्करीचे केंद्र झाले आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने या व्यवसायात कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होते. गेल्या सहा महिन्यांत गांजा, ड्रग्स आणि पाईने या अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी १२६ गुन्हे नागपुरात दाखल करण्यात आले. तब्बल १७१ ड्रग्स तस्कर आणि पेडलर आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सहा महिन्यांत २ कोटी ७५ लाख ६० हजार रुपये किमतीचे २५६ किलो अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामध्ये दोन कोटी १७ लाखांचे एमडी तर ४७ लाखांच्या गांजाचा समावेश आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : आधी पोटच्या गोळ्याला विष पाजले, मग स्वतः घेतला गळफास; त्या मातेने का उचलले टोकाचे पाऊल?

एमडी तयार करणाऱ्यांचे जाळे

दहा वर्षांपूर्वी केवळ नायजेरियात एमडी पावडर (अमली पदार्थ) तयार केली जात होती आणि तेथून ती भारतात आणली जात होती. आता काही फार्मासिस्टनी नायजेरियन ड्रग्स निर्मात्यांकडून ड्रग्ज निर्मिती फार्म्युला (रासायनिक प्रक्रिया) तयार करण्याचे तंत्र शिकून घेतले आहे. आता ते अगदी एका खोलीत प्रयोगशाळा तयार करून घरीच एमडी तयार करायला लागले आहेत

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नागपूर पोलीस वेळोवेळी ड्रग्स तस्करांवर कारवाई करतात. मात्र, त्यांचे एवढे मोठे जाळे पसरलेले आहे की मुख्य तस्करांपर्यंत पोलीस पोहोचू शकत नाहीत. शेकडो कोटींचे ड्रग्स नागपुरात येते. परंतु, कारवाई दरम्यान केवळ काही ग्रॅम जप्त केले जाते. अर्थातच या साखळीत राजकीय नेते, काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यांच्या आशीर्वादाशिवाय स्थानिक पातळीवर ड्रग्ज तस्करांचे वर्तुळ मोडून काढणे अवघड आहे.

anil.kamble@expressindia.com