सागर अत्रे

तरुणाईला वेगाने कचाटय़ात घेणारे अमली पदार्थ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या ही जगातील बहुतांश देशांपुढची डोकेदुखी आहे. पण हा प्रश्न मानवी दृष्टिकोनातून आणि संवेदनशीलतेने हाताळणे अधिक प्रभावी ठरते, असे पोर्तुगालसारख्या काही देशांचा अनुभव सांगतो आहे.

Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र

अमली पदार्थाचे सेवन, त्याबद्दलचे कायदे आणि नैतिकता हा एक सामाजिक आणि ऐतिहासिक गुंतागुंत असणारा किचकट विषय आहे. डॉ. अनिरुद्ध काला या प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञांनी त्यांच्या नवीन पुस्तकात, संवेदनशीलतेने, परखडपणे आणि सत्याकडे डोळेझाक न करता त्यांचे मत मांडले आहे. डॉ. काला हे लुधियानामधील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत, आणि त्यांनी मानसोपचाराशी निगडित अनेक महत्त्वाच्या विषयांवर कार्य आणि लिखाण केले आहे. माणूस शेती करायला लागला आणि अगदी सुरुवातीलाच त्याला अमली पदार्थाचा शोध लागला. सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी जॉर्डनच्या खोऱ्यात पहिल्यांदा माणसाने अफूच्या झाडाची लागवड केली, आणि त्याच सुमारास मध्यपूर्वेत मद्याची निर्मिती सुरू झाली. भारतामध्येही ऐतिहासिक नोंदींमध्ये चरस आणि त्यासदृश पदार्थाचा वापर समाजात अगदी उघडपणे झालेला आढळतो. आर्य काळापासूनच चरस, भांग या पदार्थाचा वापर होत असल्याच्या नोंदी आहेत, आजही उत्तरेत होळीमध्ये भांग घेणे निषिद्ध मानले जात नाही. अथर्ववेदांत आणि सुश्रुत संहितेमध्येही चरस किंवा त्यापासून निर्माण होत असणारी औषधे ही चिंता विकारांवरील उपचार म्हणून नोंदवलेली आहेत, असे निरीक्षण डॉ. काला नोंदवतात.

हेही वाचा >>>‘त्या’ समितीत कोण आहे पाहा… मग कळेलच अहवाल कसा असेल ते!

साधारणत: १५ ते १९व्या शतकापर्यंत या पदार्थाचा वापर आणि व्यापार वाढला. परंतु साम्राज्यवादाचा अंत, दुसरे महायुद्ध आणि त्यानंतरची जागतिक अर्थव्यवस्था यामुळे अमली पदार्थाच्या उद्योगाला चाप लागला. वसाहतीतून मिळणारा नफा बंद होताच इंग्लंड आणि मुख्यत: अमेरिकेने जगभरातील देशांना अमली पदार्थ हद्दपार करायला लावून त्यांच्याविरुद्ध कडक र्निबध लादले. पण डॉ. काला असे नोंदवतात की या प्रयत्नात अमली पदार्थ कुठल्याही पद्धतीने कमी झाल्याचे दिसत नाहीत, तर त्याविरोधातील लढाईत अनेक पिढय़ा आणि माणसांची वाताहात झाली.

राज्यकर्तेच कारणीभूत..

भारतामध्ये पंजाब हे राज्य अमली पदार्थाच्या सेवनाच्या गर्तेत सगळय़ात खोलवर बुडाले आहे, असे मानले जाते. पंजाबमधील सुमारे २८% पुरुष मद्यसेवन करतात. हे प्रमाण इतर राज्यांपेक्षा बरेच जास्त आहे. त्याचबरोबर तिथे हेरोईन, कोकेनसारखे घातक अमली पदार्थही युवकांच्या हाती सहजपणे लागतात. डॉ. काला म्हणतात की ही काही अमली पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांची ‘चूक’ किंवा दुर्बलता नाही, तर आजूबाजूला निर्माण झालेल्या बिकट सामाजिक परिस्थितीचे ते प्रतिबिंब आहे. पंजाब हे राज्य हरितक्रांतीच्या काळापासून भारताचे धान्य कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु तिथे मागच्या चार दशकात अनेक राजकीय संकटे येऊन गेली आहेत. पाण्याच्या आणि खतांच्या बेसुमार वापरामुळे नापीक होणाऱ्या जमिनीमध्ये आज शेती करणे कठीण झाले आहे. वारसाहक्काने जमिनीच्या वाटणीमुळे आज प्रत्येक कुटुंबाकडे येणारी तुटपुंजी जमीन किफायतशीरपणे कसणेही अवघड ठरते आहे. गेली कित्येक दशके शासनाने इतर उद्योगांना फारसा वाव न दिल्यामुळे पंजाबमधील तरुण हतबल झाला आहे.

हेही वाचा >>>‘एक देश, एक निवडणूक’ व्यापक राष्ट्रीय चर्चेशिवाय निर्णय घेणे चुकीचे! 

डॉ. काला यांच्या मते पंजाबमध्ये ही समस्या उद्भवण्याचे एक कारण म्हणजे तेथील शासनकर्त्यांचे या समस्येला योग्य तऱ्हेने तोंड देण्याबद्दलचे अज्ञान तसेच त्यांनी अवलंबलेले मार्ग आणि कायदे. वितरण आणि विक्रीला आळा न घालता सेवन करणाऱ्या तरुणांवरच तिथे कायद्याचा बडगा उगारला जातो. जगातील अनेक देश अलीकडच्या काळात या समस्येकडे गुन्हेगारी दृष्टीने न पाहता आरोग्य समस्या म्हणून पाहतात. पण आपले शासन हे मान्य करण्यास तयार नाही. शास्त्रोक्त उपचार करण्यास आणि परिस्थिती सुधारायला हातभार लावण्यास अनेक तज्ज्ञ तयार उत्सुक आहेत. पण त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी कागदी घोडे नाचवणारी, लालफितीच्या कारभाराला प्राधान्य देणारी आणि रुग्णांची बदनामी आणि कुचंबणा होऊ शकेल अशीच व्यवस्था असल्याने व्यसनांचा विळखा सोडवणे कठीण झाले आहे. मानसोपचारतज्ज्ञाने ठरावीक व्यसनमुक्ती केंद्रात बसूनच उपचार करायचे, प्रत्येक रुग्णाचे आधार कार्ड ठरावीक संकेतस्थळावर अपलोड करायचे, शस्त्रक्रिया असेल तरीही १४ दिवसांवर व्यसन निवारक गोळय़ा लिहून द्यायच्या नाहीत, रुग्णांनी स्वत: येऊन पुढचे औषध घेऊन जायचे, अशा कारभारात हा प्रश्न फसलेलाच राहिला आहे! काही वर्षांपूर्वी तर पंजाब पोलिसांनी सर्व रुग्णांची वैयक्तिक माहिती मागितली. त्याची ‘अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टोळय़ांचा पर्दाफाश करायला मदत होईल’, असे सांगितले!

मानवी भूमिकेतून हाताळणी

हेरोईन आणि त्यासम असणारे कृत्रिम पदार्थ, अफू, चरस, दारू, सिगारेट यांच्या व्यसनांवर अत्यंत संयतपणे उपचार करता येतात हे आता सिद्ध झाले आहे. चोरून, गुणवत्तेची खात्री नसलेले भेसळयुक्त पदार्थ प्रमाणाबाहेर वापरून लाखो लोकांचे मृत्यू होतात. एकच सुई अनेकांनी वापरून एड्स, हेपटायटीससारखे रोग ओढवतात. त्यापेक्षा ही समस्या अधिक परिपक्व पद्धतीने हाताळायचे असे पोर्तुगाल, नेदरलँड्ससारख्या देशांनी ठरवले. लेखक म्हणतात की ही समस्या मानवी मेंदूशी आणि त्यातील विशेष रासायनिक प्रक्रियांशी निगडित आहे. बऱ्याचदा व्यसनाधीन व्यक्ती इच्छा असली तरी अमली पदार्थाशिवाय राहू शकत नाही, ती न मिळाल्यास अत्यंत गंभीर शारीरिक दुष्परिणाम होतात. हे मूलभूत सत्य स्वीकारल्यावर अनेक देशांनी या उपचारांकडे नैतिक-अनैतिकतेच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यावर उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून पाहणे सुरू केले. या व्यसनी लोकांना ठरलेल्या वेळी, वैद्यकीय देखरेखीखाली हे अमली पदार्थ दिले जातात, त्यांचे समुपदेशन केले जाते, आणि त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाते. या देशांतील अनेक प्रयोगांनी हेच दिसून आलेले आहे की पूर्णत: व्यसनांच्या आहारी गेलेले रुग्णही या गर्तेतून बाहेर येतात, आणि आपणहून व्यसनांचे प्रमाण कमी-कमी (taper) करत जाऊन व्यसनमुक्त होतात.

एक लक्षात घेणे महत्त्वाचे, की यातील कुठल्याही नियंत्रण प्रणालीमध्ये अमली पदार्थाच्या सेवनाचे समर्थन अथवा प्रसार करण्याचा कोणत्याही देशाचा इरादा नाही, तर एका निराशाजनक वास्तवावर काढलेला हा एक संयत उपाय आहे.

शास्त्रीय पद्धत

पोर्तुगालने अमली सेवनावर धोका निवरणाचा हा कार्यक्रम १९८० च्या दशकात सुरू केला. त्यानंतर अनेक देशांनी हा प्रयत्न करून पाहिला. ‘यामुळे देश पूर्णत: व्यसनांच्या आहारी जाऊन वाया जाईल!’ अशी भाकीते करणाऱ्या अनेक तज्ज्ञांना या देशांनी चुकीचे ठरवले. आजूबाजूचा समाज, कुटुंब, मित्र-मंडळी, शासन या सगळय़ांनीच या रुग्णांवर ‘वाया गेलेले’, ‘व्यसनी’, असे शिक्के मारले की ही समस्या अधिक बिकट होत जाते. करुणेच्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून रुग्णांना साहाय्य केल्यास आणि समाजातील इतर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्यांचे निवारण करूनच या समस्येला आटोक्यात आणता येते. समाजात अमली पदार्थ उपलब्ध असले तरी मित्र, कुटुंब, शिक्षण, रोजगार, क्रीडा, कला या सगळय़ांसाठी पोषक वातावरण असेल तर व्यसनांच्या आहारी जाणाऱ्यांचे प्रमाण कमी राहते! अगदी पौगंडावस्थेसारख्या वयातही मुलांना चांगल्या छंदांमध्ये गुंतवले, आणि व्यसनी पदार्थाच्या उपलब्धतेबद्दल काही कायदे अमलात आणले तर मुले व्यसनांच्या मार्गी जात नाहीत. त्यातून कोणी त्या विळख्यात सापडलेच तर समाज त्याला झिडकारत नाही, तर पुन्हा मार्गावर यायला मदत करतो. यामध्ये भारताला शिकण्यासारखे काय आहे? आपल्याकडे कदाचित समाजातील अमली पदार्थाबद्दलचे पूर्वग्रह सहज संपवणे शक्य नाही, परंतु किमान त्या व्यक्तीला फक्त कायदेशीर आणि गुन्हेगारीच्या पिंजऱ्यात उभे न करता वैद्यकीय आणि शास्त्रीय पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे.

लष्करी आणि हिंसेच्या मार्गाने अमली पदार्थाच्या वितरणावर चाप लावायला जिथे जिथे प्रयत्न झाले आहेत, ते देश आज संपूर्णत: विनाशाकडे चालले आहेत. मेक्सिकोमधील अमली पदार्थाचे वितरण करणाऱ्या अमानुष टोळय़ा, कोलंबियामधील फार्क (FARC), अफगाणिस्तानमधील तालिबान यांसारख्या अनेक गरीब देशातील टोळय़ा या पदार्थाची विक्री आणि तस्करी करताना आढळतात. हा उद्योग सहज न संपण्याचे कारण म्हणजे अमली पदार्थाच्या व्यवसायात खेळणारा अमर्याद पैसा (जागतिक आकडा ६५२ अब्ज डॉलर्स आहे असा अंदाज आहे), त्याच्यामुळे आधीच गरिबी भरपूर असलेल्या या देशांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनाही सहज मिळणारा पैसा अधिक मोहक वाटतो. हिंसेच्या आणि दंडुकेशाहीच्या मार्गाने या प्रश्नाला संपवण्याचा प्रयत्न केल्यास काय होते याची अनेक उदाहरणे आहेत, त्यातील एकाही उदाहरणात हा प्रश्न नियंत्रणात आल्याचे दिसत नाही, उलट तो अधिक चिघळलेलाच आढळतो.

काही कमतरता

या पुस्तकात एका महत्त्वाच्या बाबीवर मात्र ऊहापोह झालेला नाही. सिगारेट आणि दारू सहज उपलब्ध असूनही जगभरात बहुतांश लोकांना त्याचे व्यसन लागत नाही, हे लेखकाचे म्हणणे खरे असले, तरी त्याची कारणे येथे नमूद केली पाहिजेत. त्या उत्पादनांवर लादले जाणारे कर, जाहिरातींवरील बंदी, उपलब्धतेवर असलेले र्निबध, आणि त्यासाठी जगभर सामाजिक आणि आरोग्यतज्ज्ञांना कंपन्यांविरुद्ध द्यावी लागलेली कडवी झुंज याविषयी पुस्तकात ऊहापोह केलेला नाही. आज विकसित देशांमध्ये कायदे कडक झाल्यामुळे, आणि तुलनेने विकसनशील देशांमध्ये विपणनाबद्दलचे कायदे शिथिल असल्यामुळे सिगारेट, दारूसारखे अमली पदार्थ विकणाऱ्या कंपन्या विकसनशील देशात लक्ष केंद्रित करत आहेत. ही ‘वैधानिक चेतावणी’ आपण विसरता कामा नये. व्यसनी पदार्थाच्या आरोग्य परिणामांकडे दुर्लक्ष करून अनेक कंपन्या ही उत्पादने जास्तीत जास्त खपावीत या प्रयत्नात आहेत. अमेरिकेत तर अगदी अफू आणि मॉरफीनपेक्षाही शक्तिशाली औषधे सहज कोणालाही क्षुल्लक कारणांसाठी उपलब्ध व्हावीत म्हणून परडय़ू फार्मा या कंपनीने अनेक नैतिक आणि कायदेशीर मर्यादा ओलांडल्या. सामाजिक आणि शासकीय पातळीवर या समस्येच्या योग्य निवारणाबरोबरच त्यामागचे विश्वव्यापी अर्थकारण आणि राजकारण या पुस्तकात थोडे चर्चिले जाणे संयुक्तिक ठरले असते.

पुस्तकातील अजून एका प्रकरणाचा उल्लेख इथे केला पाहिजे. मानवी विवेकाला आणि संयमाला सहज बगल देणारी समाजमाध्यमे, इंटरनेट, तंत्रज्ञान आणि इतर अनेक व्यसने आता जन्माला आलेली आहेत, आणि या व्यसनांमधला आणि अमली पदार्थाच्या व्यसनांमध्ये समान असलेला ‘केमिकल लोचा’ डॉ. काला छान समजावून सांगतात. त्यांचा या पुस्तकातील मुख्य सल्ला हाच, की जगात व्यसनांची कमतरता कधीच नसेल, दैनंदिन अनुभवांच्या पलीकडचे ‘काहीतरी’ अनुभव शोधणे आणि त्यातून व्यसनांकडे वळणे ही मानवी मेंदूची एक गरजच आहे, पण त्या व्यसनांना आपण समाज, शासन आणि माणूस म्हणून कसे हाताळतो हेच त्या समस्येचे खरे आयाम आणि परिणाम निश्चित करते.

मोस्ट ऑफ व्हॉट यू नो अबाऊट अ‍ॅडिक्शन इज राँग
लेखक : डॉ. अनिरुद्ध काला
प्रकाशक : स्पीकिंग टायगर पब्लिशिंग
पृष्ठे : २४८ ; किंमत : ३५९ रु.

Story img Loader