के. चंद्रकांत
नव्या पार्लमेण्ट इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्यामुळे ‘‘वंदे भारत’ रेल्वेगाडीच्या प्रत्येक सेवेचेही उद्घाटन मोदीच करतात, तेव्हा रेल्वेमंत्री कोण असा प्रश्न पडतो!’- अशी टीका होते आहे आणि त्यात एवढे मात्र तथ्य नक्की आहे की, आजतागायत ज्या १८ ‘वंदे भारत’ रुळांवर धावल्या, त्या सर्वांना मोदी यांनीच हिरवा झेंडा दाखवला होता. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ‘आजादी का अमृत महोत्सव’ संपण्याच्या आत ७५ ‘वंदे भारत’ द्रुतगती गाड्या विविध मार्गांवर सुरू व्हाव्यात, अशी योजना आहे आणि त्या सर्व गाड्यांनाही कदाचित पंतप्रधानच हिरवा झेंडा दाखवतील, पण मुद्दा तो नाही. मुद्दा आहे- या ७५ पैकी पुढल्या ५७ ‘वंदे भारत’ गाड्या पुढल्या अवघ्या ८१ दिवसांत तयार होणार कशा?
‘वंदे भारत एक्स्प्रेस’ अर्थात ‘ट्रेन-१८’ चा प्रकल्प २०१७ पासून सुरू झाला आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली गाडी पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून नवी दिल्लीपर्यंत धावली. त्यानंतर अहमदाबादसाठी मुंबईहून ‘वंदे भारत’ सुरू झाली, तर पुढे हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ आदी राज्यांतही ‘वंदे भारत’ गाड्या धावू लागल्या. या गाड्यांमध्ये शयनयान नाही, त्यांचा प्रवास फार तर साडेआठ तासांचा आहे. मात्र १६ युनिटच्या या गाडीत मोटरमन केबिनसह एकंदर १४ डबे ‘चेअर कार’, तर दोन डबे विमानप्रवासाचा अनुभव देणाऱ्या ‘एग्झिक्युटिव्ह क्लास’चे असतात… सध्या गाड्यांची मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्यामुळे १६ ऐवजी अवघ्या आठ डब्यांची – म्हणजे निम्मीच- ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ काही मार्गांवर धावते आहे. संपूर्णत: विजेवर चालणाऱ्या पण ताशी १६० कि.मी. पर्यंतचा वेग असणाऱ्या या गाड्यांचा सध्याचा वेग कमी पडतो, या तक्रारीचे एक कारण म्हणजे डब्यांची ही कमी असलेली संख्या. अर्थात यामागचे राजकारण हे ‘वचनपूर्तीचे राजकारण’ आहे, असाही दावा करता येईल.
पंतप्रधानांनी गुरुवारी, २५ मे रोजी दिल्लीतून कळ दाबून जिचे उद्घाटन केले, ती ‘दिल्ली- डेहराडून वंदे भारत’देखील १६ ऐवजी आठच डब्यांची आहे. तिचा प्रवास सुमारे पावणेपाच तासांचा असेल, परंतु साडेआठ तासांचा प्रवास करणारी ‘सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत’ ही गाडीसुद्धा सुमारे महिनाभर आठच डब्यांनिशी धावत होती. याच प्रवासासाठी गाडीत आणखी आठ डबे गेल्या बुधवारी वाढवण्यात आल्याने ती अपेक्षित १६ डब्यांची झाली आणि ती १५ मिनिटे आधी पोहोचू लागली! असे का झाले?
‘इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल ॲण्ड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग’(आयआरआयएमईई) चे प्रा. शीलभद्र दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक ‘वंदे भारत’ गाडीची रचना ही ‘दोन ड्रायव्हिंग ट्रेलर कोच, आठ मोटर कोच, चार ट्रेलर कोच आणि दोन नॉन-ड्रायव्हिंग ट्रेलर कोच’ अशी असते. यापैकी ‘ड्रायव्हिंग ट्रेलर कोच’ म्हणजे मोटरमनची केबिन अधिक ४४ प्रवाशांना बसण्यासाठी जागा असलेले डबे, तर ‘मोटर कोच’ आणि ‘ट्रेलर कोच’ हे दोन्ही प्रकार जरी ७८ प्रवाशांसाठी असले तरी त्यातील मुख्य फरक म्हणजे, ‘ट्रेलर कोच’ला विजेच्या तारांशी संपर्क ठेवणारा पेन्टोग्राफ असतो, तर ‘मोटर कोच’मध्ये गतीसाठी आवश्यक असलेले ट्रॅक्शन मोटर, ट्रॅक्शन कन्व्हर्टर आणि गतिसुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेला ब्रेक चॉपर रेझिस्टर हे भाग असतात. यापैकी काहीही नसलेल्या ‘नॉन ड्रायव्हिंग ट्रेलर कोच’चे रूपांतर प्रत्येकी ५२ आसनांच्या ‘एग्झिक्युटिव्ह क्लास’मध्ये करण्यात आले आहे.
गाडी १६ ऐवजी आठच डब्यांची झाल्यावर तिच्यामधील दोन ‘ड्रायव्हिंग कोच’ वगळता अन्य १४ मधील प्रत्येक प्रकारचे डबे संख्येने निम्मेच झाले. विशेषत: मोटर कोचची संख्या आठवरून चारच झाल्यामुळे वेग कमी होऊ लागला, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘आयआरआयएमईई’ आणि ‘रेल अग्रदूत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आरडीएसओ’ या संस्थांच्या मूळ रचनेप्रमाणे १६ डब्यांचीच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावणे इष्ट ठरते. मात्र लवकरात लवकर देशभर ‘वंदे भारत’चे जाळे तयार करण्याच्या घाईमुळे सध्या निम्म्याच आकाराच्या गाड्या सोडल्या जात आहेत आणि ‘प्रवाशांकडून मागणी वाढल्यावर आणखी डबे जोडले जातात’ असे त्याचे समर्थन अनेक प्रसारमाध्यमे करीत आहेत! वास्तविक, सिकंदराबाद ते तिरुपतीसारख्या मार्गावर मागणी आधीपासूनच अधिक होती, तिथे ११२८ ऐवजी ६०८ प्रवासी क्षमता ठेवण्यात काहीच हशील नव्हते.
‘लवकरच आपण दर तीन दिवसांत एक ‘वंदे भारत’ रेल्वेगाडी तयार करण्याइतपत क्षमता गाठू शकू’ असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्याच आठवड्यात ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाच्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात सांगितले होते. आजघडीला गणिती हिशेब मांडून पाहिला, तर “पुढल्या ५७ ‘वंदे भारत’ गाड्या पुढल्या अवघ्या ८१ दिवसांत तयार होणार कशा?” याचे उत्तर या दाव्यामधून मिळत नाही. दोन वंदे भारत गाड्या- १६ किंवा आठ डब्यांनिशी- तयारच असतील असे जरी मानले तरी ८१ दिवसांत उरलेल्या ५५ गाड्या धावू लागण्यासाठी दर दीड दिवसाला एक गाडी, असा उत्पादनाचा वेग ठेवावा लागेल! नाहीतर १५ ऑगस्टपर्यंत आपण एकंदर ५० ‘वंदे भारत’ गाड्याच रुळांवर आणू शकू!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षीचा (२०२२-२३) अर्थसंकल्प मांडताना, पुढल्या तीन वर्षांत ४०० ‘वंदे भारत’ तयार होणार असल्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. ती मुदत मार्च २०२५ अखेर संपेल. प्रत्येक गाडीचा किमान ९७ कोटी रु. उत्पादनखर्च गृहीत धरता ते आर्थिकदृष्ट्याही अशक्यच आहे. मात्र निवडणुकीपूर्वी सर्व राज्यांत किमान एकेक ‘वंदे भारत’ उद्घाटन घडवून आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न राहील… मग गाडी १६ डब्यांची असो की निम्मीच… आठ डब्यांची!