डॉ. मुरारी पु. तपस्वी
कार्यसुलभता आणण्यासाठी केलेले प्रयत्न हे केव्हाही चांगलेच. पण भारतात या विचारातून गेल्या दशकात एकाच छापाच्या नव्या नव्या घोषवाक्यांना जन्म देण्याची चढाओढ मात्र दिसून येत आहे. ‘एक राष्ट्र एक निवडणूक’, ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’, ‘…एक बाजारपेठ’, ‘…एक विधानमंडळ’ ही काही उदाहरणे. घोषवाक्ये चटपटीत असली तरी त्यातून किती प्रमाणात कार्यसुलभता आलेली आहे हा वादाचा आणि अभ्यासाचा मुद्दा होऊ शकतो. याच छापाच्या घोषवाक्यात आणखी एकाची भर नव्या वर्षापासून पडली आहे. ते घोषवाक्य म्हणजे ‘एक राष्ट्र एक वर्गणी’. या घोषणेच्या जन्माचे मूळ कारण तसे २०१८ सालचे. गेल्या शतकाच्या शेवटाला विकसित देशांमध्ये एक चळवळ उभी राहिली. जगभर चाललेले संशोधन प्रबंध/लेख कोणाही वाचकाला मुक्तपणे वाचायला मिळावेत ही चळवळीची संकल्पना. याचे कारण असे की संशोधन नियतकालिकांचे प्रकाशन करणारे काही खासगी क्षेत्रातले मोजकेच प्रकाशक असून त्यांच्या नियतकालिकांची भरमसाठ वर्गणी विकसित देशांच्या ग्रंथालयांनाही देणे अवघड व्हावे. पण उत्तम संशोधन करायचे असेल तर पूर्वी त्या क्षेत्रात काय झाले हे कळण्यासाठी या नियतकालिकांतील लेखांचे वाचन, अभ्यास आवश्यक ठरतो. गेल्या शतकाच्या शेवटाला इंटरनेटचा वापरही जगभर वाढला. याचा उपयोग करून घेत संशोधकांनी असे ठरवले की त्यांनीच एकत्र येऊन, इंटरनेटवर नवी मुक्तद्वार नियतकालिके निर्माण करून त्यात त्यांचे संशोधन प्रकाशित करावे. काही प्रमाणात हा विचार गेल्या तीन दशकात यशस्वी झालाही. पण तरी त्यामुळे खासगी क्षेत्रातील प्रकाशकांची मक्तेदारी मात्र अद्यापही कमी झाली नाही. कारण संशोधकांची त्यांच्या लेखांना खासगी प्रकाशकांच्या दर्जेदार नियतकालिकात प्रसिद्धी मिळावी ही सुप्त इच्छा. मग २०१८ साली काही युरोपीय देशांनी पुढाकार घेऊन या प्रकाशकांसमोर नवा प्रस्ताव मांडून बदल घडवून आणावा असा विचार केला. त्यांनी प्रकाशकांना सुचवले की तुम्ही फक्त ‘प्रकाशना’चे काम करा आणि त्यासाठी प्रत्येक लेखाच्या प्रकाशनामागे ठरावीक रक्कम दिली जाईल. मात्र सगळे संशोधनलेख वाचकाला मुक्तपणे वाचायला मिळाले पाहिजेत. या प्रस्तावाला त्यांनी ‘प्लॅन एस’ (एस = शॉक, धक्का) असे गोंडस नावही दिले. इतर देशांनी या प्रस्तावाला पाठबळ द्यावे असे आवाहनही केले. सुरुवातीला या आवाहनाचे भारतानेही समर्थन केले. तोवर भारत संशोधन लेखन प्रकाशित करण्यात अमेरिका आणि चीननंतर, इतर विकसित देशांना मागे टाकत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला होता! त्यामुळे लगेचच भारत सरकारच्या लक्षात आले की असे केले तर, संशोधन प्रकाशित करायला प्रचंड मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा करावा लागेल, जो त्याच्या आवाक्याबाहेरचा असेल आणि दुसरे म्हणजे, भारतीय नियतकालिकांमध्ये कोणीही प्रकाशन करणार नाही. या भीतीपोटी भारताने या चळवळीतून आपले अंग काढून घेऊन याबाबत वेगळे धोरण असेल असे जाहीर केले. ते धोरण असे की भारत त्याच्या संशोधकांना मुक्तद्वार नियतकालिकांमध्ये प्रकाशन करायला उद्युक्त करेलच पण जी नियतकालिके वर्गणी देऊन घ्यावी लागताहेत त्यांच्यासाठी देशपातळीवर एकच वर्गणी भरली जाईल. त्यातून ‘एक राष्ट्र एक वर्गणी’ या संकल्पनेचा जन्म झाला. गेली अनेक वर्षे यावर विचार होऊन अखेरीस २०२५ च्या १ जानेवारीपासून तीन वर्षांसाठीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवात तर झाली. मला वाटले, चला, या निमित्ताने का होईना आता माझ्यासारख्या निवृत्त संशोधकाला हवा तो लेख वाचता येईल. पण या योजनेबाबतची माहिती वाचायला मिळाली तेव्हा भ्रमनिरास झाला. कारण हा ठेवा पहिल्या टप्प्यात तरी भारतातल्या फक्त ६,३८० संस्थांनाच उपलब्ध होणार आहे म्हणे! यात ९५९ संशोधन संस्थांव्यतिरिक्त, केवळ ५५७ विद्यापीठे (विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर एकूण १,१९१ विद्यापीठांची यादी दिली आहे), ४,८६४ महाविद्यालये (आयोगाच्या संकेतस्थळावर हजारो स्वायत्त महाविद्यालयांखेरीज १४,४२२ अनुदानित महाविद्यालयांची यादी, तर उच्च शिक्षण विभागाच्या एआयएसएचई नुसार एकूण ४५,४७३) या शिक्षण संस्थांनाच सहभागी करून घेण्यात आल्याचे कळते. म्हणजे म्हणायचे ‘एक राष्ट्र (भारत)’ पण गरज भागवायची ‘निवडक भारताची’! मोठी घोषवाक्ये वापरायची आणि निवडक हितसंबंधीयांचीच त्याखाली सोय करायची असा हा अजब कारभार!

संस्थांची निवड आणि निकष

या संस्थांमध्ये कोणाचा सहभाग आहे याबद्दल काही पारदर्शकता नाहीये. असे कळते की या टप्प्यात फक्त शासकीय संस्थांनाच सहभागी करून घेतले आहे. पण संकेतस्थळावरील सहभागी संस्थांची यादी चाळल्यावर हेही खरे नसल्याचे दिसून येते. तुरळकरित्या काही खाजगी संस्थांची नावेही दिसतात. वस्तुत: जर निवडक संस्थांनाच पहिल्या टप्प्यात सहभागी करून घ्यायचे धोरण होते तर निदान काही चांगले निकष तरी वापरायला हवे होते. फक्त शासकीय शिक्षण संस्थांनाच यात सहभागी करून घेणे म्हणजे ‘घरजावयाला तेवढे आमंत्रण’ असे झाले. भारतात ‘नॅक’ या आद्याक्षरी शब्दाने ओळख असलेले उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन ठरवणारे प्रशासकीय मंडळ आहे. त्याच्यातर्फे उच्चतम स्तर असलेल्या संस्थांना ‘ए++’ (ए प्लस प्लस) हा दर्जा दिला जातो. त्या खालोखाल ‘ए+’(ए प्लस), ‘ए+’ (ए प्लस) अशी ‘सी’ पर्यंत उतरंड लागते. हा दर्जा ठरवताना त्या शिक्षण संस्थेच्या संशोधन योगदानालाही भरीव प्रमाणात महत्त्व दिले जाते. म्हणजे असे की जी संस्था उच्चतम दर्जा मिळवते ती संस्था संशोधनातही अव्वल आहे. पण वरील निकषानुसार या संस्थांना नियतकालिके उपलब्ध न करता केवळ ‘शासकीय संस्था’च असा निकष लावला गेला आहे. हे कितपत योग्य ते आपण महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संचालनालयाने त्यांच्या संकेतस्थळावरील या संबंधी जाहीर केलेली २०२४ ची आकडेवारी पाहून ठरवू या. महाराष्ट्रात एकूण कला, वाणिज्य, विज्ञान आणि शिक्षण शाखांच्या अभ्यासासाठी शासकीय महाविद्यालये २८. यापैकी फक्त १२ महाविद्यालयांचे मानांकन सक्रिय अवस्थेत आहे. विशिष्ट कालावधीनंतर कराव्या लागणाऱ्या पुनर्मानांकनासाठी १४ महाविद्यालयांनी कार्यवाहीच केलेली नाही. तर दोन महाविद्यालयांनी कधी मानांकनासाठी अर्जच केलेला नाही! आता १४ महाविद्यालयांपैकी केवळ दोनच शासकीय महाविद्यालये ‘ए+’ (ए प्लस) या दर्जाची आहेत. वरील निकषानुसार या अशा सगळ्या महाविद्यालयांना ही महागडी नियतकालिके उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या यादीमध्ये अनुदानित (खाजगी) महाविद्यालयांपैकी एकूण चार ‘ए++’ (ए प्लस प्लस) आणि ३४ ‘ए+’ (ए प्लस) दर्जा मिळवणारी आहेत. या खासगी महाविद्यालयांचे दुर्दैव असे की त्यांनी चांगले काम करूनही त्यांना या नियतकालिकांच्या उपलब्धतेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. आणखी पुढे पाहू या. ही नियतकालिके १ जानेवारी २०२५ पासून एका वर्षासाठी वर्गणी भरून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. जानेवारी अखेर या शासकीय महाविद्यालयांपैकी केवळ दोन महाविद्यालयांनी या नियतकालिकांच्या उपलब्धतेसाठी नोंदणी केल्याचे दिसते (देशपातळीवरील ६,३८० शासकीय संस्थांपैकी केवळ २,०४१ संस्थांनी). म्हणजे या शासकीय संस्थांना यात किती रस आहे पहा!! खरं म्हणजे सगळ्या ‘ए+’ (ए प्लस) दर्जा मिळवणाऱ्या महाविद्यालयांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ही सोय उपलब्ध करून द्यायला हवी होती.

नियतकालिकांची उपलब्धता

ही योजना राबवणारी शिखर संस्था आंतरविद्याशाखीय संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘सगळ्या वाचकांसाठी सगळीच नियतकालिके’ उपलब्ध करून देत असल्याचा डांगोरा पिटते. म्हणजे असे की सामाजिक शास्त्राच्या संशोधकाला विज्ञान शाखेतील नियतकालिकेही उपलब्ध आहेत आणि कारण काय तर म्हणे त्याने आंतरविद्याशाखीय संशोधन करावे! समाजोपयोगी, आंतरविद्याशाखीय संशोधन व्हावे ही बाब तर खरीच. पण आपण आज तज्ज्ञांच्या जगात राहतो. वेगवेगळ्या विशिष्ट विषयातले तज्ज्ञ एकत्र येऊन जेव्हा एखाद्या प्रश्नाची उकल करतात त्याला आंतरविद्याशाखीय संशोधन म्हणतात. असे कधीच होत नाही की एका विषयातला तज्ज्ञ दुसऱ्या विषयावरही अधिकाराने भाष्य करू शकतो. एखाद्या विषयातला तज्ज्ञ केवळ त्याच्या विषयाचीच नियतकालिके वाचतो. त्यामुळे सगळीच नियतकालिके सगळ्यांनाच उपलब्ध करून देणे हे धोरण हे मर्यादित निधीचा अपव्यय आहे. यात प्रकाशकांनी भरपूर पैसा केला असणार कारण संभाव्य वाचकागणिक ऑनलाइन नियतकालिकाच्या वर्गणीची किंमत वाढते. हे धोरण करदात्यांवर अनावश्यक बोजा घालणारे आहे. एवढ्याच रकमेत विशिष्ट विषयातील नियतकालिके त्या विषयाच्या तज्ज्ञालाच उपलब्ध करून दिली असती तर ही सोय आणखी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचली असती आणि परताव्यात वाढ झालेली दिसली असती.

प्रकाशकांशी याबाबत वाटाघाटी होतात त्या वेळी वाचकाच्या दृष्टीने काय-काय पदरात पाडून घेता येते हे पहिले जाते. १ जानेवारी २०२५ पासून नियतकालिके उपलब्ध केली गेली आहेत हे ठीक. पण नियतकालिकांच्या गत वर्षांच्या अधिकाधिक खंडांनाही याच वर्गणीचा भाग म्हणून वाटाघाटी दरम्यान पदरात पाडून घ्यावे लागते. कारण संशोधकाला गेल्या अनेक वर्षांचे झालेले संशोधन लेख उपलब्ध असणे गरजेचे असते. या योजनेच्या संकेतस्थळावर याबाबतचा कुठेही उल्लेख नाहीये. त्यामुळे याद्वारे केवळ २०२५ या साली प्रसिद्ध होणारे संशोधन लेखच उपलब्ध होणार की काय असा दाट संशय येतो. असे असेल तर ‘कोहळा देऊन आवळा घेतला’ असे प्रचलित म्हणीतील शब्द फिरवून म्हणावे लागेल.

दिशाभूल

योजनेच्या संकेतस्थळावर प्रवेश पानावरच दिशाभूल करणारी आकडेवारी आपल्याला वाचायला मिळते. या योजनेची सभासद संख्या, उपलब्ध नियतकालिके, २०२४ साली संशोधकांनी किती लेख वाचले ही माहिती दिली आहे. वस्तुत: एका बाजूला पत्रकारांच्या संमेलनात ६,३८० संस्था भाग घेतील असे सांगितलेले असताना संकेतस्थळावर ६५०० + आकडा लिहिणे चुकीचे आहे. नियतकालिकांचे प्रकाशक वाढीव आकड्यावरून योजनेला आणखी किंमत मोजायला लावतील! शिवाय ही योजनाच मुळात १ जानेवारी २०२५ पासून अंमलात आली आहे तर २०२४ साली किती लेख वाचले गेले, वगैरे माहिती हास्यास्पद आणि खोटीच म्हणावी लागेल. अशा प्रकारच्या महितीला ‘डॅशबोर्ड’ म्हणतात. यावर १ जानेवारी २०२५ पासून किती सभासद नोंदणी झाली आहे, त्यांनी किती लेखांचे वाचन केले अशी दर दिवशी वाढ (असल्यास) होत असलेली माहिती प्रसृत करायला हवी.

गुंतवणूक परताव्यासाठी प्रयत्नांची शिकस्त आवश्यक

गेल्या वर्षापावेतो संशोधनात रस असलेल्या २,३६० संस्थांनी एकूण १० संघ (कंसॉर्टियम) बनवून स्वतंत्रपणे याच प्रकाशकांशी त्यांच्या वाचकांना आवश्यक ठरणाऱ्या नियतकालिकांसाठी वाटाघाटी करून उत्तम आणि आवश्यक ते पदरात पाडून घेण्याचा प्रघात होता. त्याकरता सुमारे १५०० कोटी रुपये यासाठी खर्च होत. डॅशबोर्डवर म्हटल्याप्रमाणे त्याचा बऱ्यापैकी वापरही होत असे. पण या रुजलेल्या सोयीला नख लावून आता ‘एक भारत एक वर्गणी’ योजनेत तीन वर्षांसाठी सुमारे ६,३८० संस्थांसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली असल्याचे म्हटले आहे. म्हणजे सुमारे दोन हजार कोटी दरवर्षाला. वर नमूद केल्याप्रमाणे जानेवारी महिना सरला तरी अद्याप केवळ २,०४१ संस्थांनीच यावर नोंदणी केली आहे. दिनदर्शिकेची पाने झपाट्याने उलटली जातील. अपेक्षित संस्थांनी नोंदणी केली नाही, आणि उपलब्ध नियतकालिके वापरली नाहीत तर सगळी गुंतवणूक वाया जाणार आहे. अशा नव्या सोयी दिल्या जातात त्या वेळी मोठ्या प्रमाणात जागरूकता कार्यक्रम राबवावा लागतो. याचा विचार झालेला दिसत नाहीये. म्हणूनच केवळ एक तृतीयांश संस्थांचीच नोंदणी झाली आहे. आता तरी जागरूकता वाढवण्याचे काम युद्ध-पातळीवर करणे आवश्यक आहे. पण यासाठी योजनाकारांना जाग येईल तोवर कदाचित वर्ष संपलेले असेल! पण हीच आम्हा भारतीयांची मानसिकता आहे. काय करणार?

भारतातील एका संशोधन संस्थेचे निवृत्त ग्रंथपाल

tapaswimurari@gmail.com