शांता रंगास्वामी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्या २१ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत- म्हणजे सन १९७३ पासून ते १९९४ पर्यंत भारतीय महिला संघासाठी खेळतानासुद्धा- मी एक पैसाही कमावला नाही. म्हणूनच, वाटते की, २७ ऑक्टोबर २०२२ हा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी अगदी सुवर्णाक्षरांमध्ये नोंदवला जाईल. अखेर यंदाच, भारताच्या केंद्रीय-कंत्राटित महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणेच ‘सामना शुल्क’ मिळेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे.

पुरुषांपेक्षा महिला क्रिकेटपटूंना खेळाची आवड जास्त असोशीने असते, असे मी नेहमीच म्हणते. आम्ही खेळाच्या निखळ प्रेमासाठी खेळलो, कारण आम्ही कधी पैसे कमावण्याचा प्रश्नच नव्हता! आर्थिक आणि अन्य प्रकारच्या पाठिंब्यासाठी आम्ही बहुतेकजणी नेहमीच आमच्या कुटुंबांवर अवलंबून होतो. आमच्यापैकी कुणाहीसाठी क्रिकेट हा ‘व्यवसाय’ कधीच नव्हता.

त्यामुळेच, भारताची माजी कर्णधार म्हणून मी या निर्णयावर समाधानी आहे, कारण मुळात भारतीय महिलांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानंतर ५० ते ६० वर्षांनी खेळायला सुरुवात केली. तरीही आज आम्ही न्यूझीलंड नंतर फक्त दुसरा देश आहोत जिथे क्रिकेटच्या किमान ‘सामना शुल्का’च्या बाबतीत तरी महिला आणि पुरुष यांच्यात वेतन समानता आहे. न्यूझीलंडमध्ये असा निर्णय याच वर्षीच्या जुलैमध्ये झाला होता.

ही फक्त पहिली पायरी आहे. मला वाटते की अजून बरीच क्षेत्रे पादाक्रांत करायची आहेत. फक्त ‘सामना शुल्का’चा विषय घेतला तरी, हे शुल्क देशांतर्गत क्रिकेटमध्येही वाढवण्याची गरज आहे जेणेकरून महिला क्रिकेटपटूंच्या मोठ्या वर्गाला योग्य मोबदला मिळेल. सध्या, वरिष्ठ अशा २० ते २५ करारबद्ध खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांपुरतीच ही वेतन-समानता लाभणार आहे. हा मुद्दा मी २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सर्वोच्च परिषदेच्या (बीसीसीआय गव्हर्निंग कौन्सिलच्या) बैठकीत उपस्थित केला होता. मला खात्री आहे की मंडळ योग्य वेळी आवश्यक ती कारवाई करेल.

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सरचिटणीस जय शाह यांनी मला सांगितले, “शांता, आपण हे टप्प्याटप्प्याने करू”. अर्थात त्यासाठी निधी द्यावा लागेल; तो कुठून- कसा उभारायचा याचे अंदाजपत्रकीय नियोजन लागेल. पण मंडळाने तसे केल्यास ते एक मोठे पाऊल ठरेल.

भारतीय महिला क्रिकेटसाठी गेले काही महिने उल्लेखनीय ठरलेले आहेत. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये आम्ही रौप्यपदक जिंकले, आम्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लिश संघाचा पराभव केला. त्यानंतर, ज्याची सारेचजण आतुरतेने वाट पाहात होते त्या ‘महिला इंडियन प्रीमियर लीग’ (विमेन्स आयपीएल) ची घोषणा आपल्या क्रिकेट नियामक मंडळाने केली! ही महिला आयपीएल पुढील वर्षी होणार आहे.

‘वार्षिक करार-रकमे’चा मुद्दा

माझ्या मते, महिला आयपीएलमुळे क्रिकेटपटूंच्या मोठ्या गटाला फायदा होईल कारण त्या स्पर्धेत किमान ५० भारतीय महिला खेळाडू खेळतील. त्यामुळे, याचा फायदा केवळ भारताकडून खेळणाऱ्यांनाच नाही तर अधिकाधिक देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंना होईल.

महिला खेळाडूंसाठी बीसीसीआयच्या ‘वार्षिक करार-रकमे’चा (ॲन्युअल रीटेनर अमाउंट) विचार केला तर पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत ती काहीच नाही. पाहा ना : विराट कोहली सात कोटी रुपये घरी नेतो आहे, तर आपल्या हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांना ५० लाख रुपये मिळतात.

पण मंडळाने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे आणि आपण त्याचे कौतुक करू या, कारण यामागचा विचार महत्त्वाचा आहे – त्यांना महिला क्रिकेटला अधिक उंचीवर नेण्याची इच्छा आहे. आपण सर्वांनी एकदिलाने या पुढाकाराचे स्वागतच केले पाहिजे.

बहु-दिवसीय सामने पाहिजेत

होय, हे खरेच आहे की आम्ही पुरुष संघाच्या तुलनेत जास्त क्रिकेट खेळत नाही. आम्ही महिला क्रिकेटमध्ये जास्त कसोटी सामने खेळत नाही हेही खरे आहे. पण हेही चित्र येत्या काही काळात नक्की बदलेल… तुम्हाला माहीत आहे का? बीसीसीआयची ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ आणि ‘इंग्लंड क्रिकेट बोर्ड’ या दोघांशी अलीकडेच अशी सहमती झालेली आहे की जेव्हा-जेव्हा आमचा संघ तिथे जाईल किंवा ते इथे येतील, तेव्हा त्या प्रत्येक दौऱ्यात किमान एक कसोटी सामना असेल.

पण आपण कसोटी क्रिकेटबद्दल बोलण्यापूर्वी, आपले देशांतर्गत बहु-दिवसीय स्वरूपाचे सामने पुन्हा सुरू केले पाहिजेत. मला वाटते की आपण क्रिकेटच्या दीर्घ स्वरूपाचा पुन्हा परिचय करून दिला पाहिजे कारण तिथूनच आपल्या खेळाडू आपापली तांत्रिक कौशल्ये वाढवू शकतात. झटपट सामन्यांमुळे कधी उलटा परिणाम असाही होतो की खेळाडूंच्या तंत्रात काही त्रुटी विकसित होऊ शकतात. मला वाटते की आपण युवा महिला क्रिकेटपटूंना बहु-दिवसीय सामने खेळण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, विशेषतः १९ वर्षांखालच्या वयोगटातील खेळाडूंसाठी तरी बहु-दिवसीय सामने असलेच पाहिजेत.

बीसीसीआयने काही सकारात्मक पावले उचलली आहेत : एकदिवसीय आणि ‘टी-ट्वेन्टी’ दोन्हीमध्ये वरिष्ठांसाठी आंतर-विभागीय सामन्यांची मालिका पुन्हा सुरू केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी ‘१५ वर्षांखालील’ विभाग सुरू केला, तो तर उद्याच्या ताऱ्यांचा आधार ठरेल! महिला क्रिकेटपटूंच्या ‘सामना शुल्का’मध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळे स्पर्धाही वाढणार आहे. लक्षात घ्या, गेल्या दशकभरात, अगदी बारा-तेरा वर्षांचा मुलगाही खेळाचा व्यवसाय म्हणून विचार करू लागतो हे आपण पाहिलेले आहे. आता यापुढे देशात मुलींसाठी आणखी अधिक संख्येने क्रिकेट अकादमी असतील. आपल्या मुलींना क्रिकेट खेळू देण्यास पालक मागेपुढे पाहणार नाहीत. या छोट्या गोष्टी दीर्घकालीन महत्त्वाच्या असतात.

हा नक्कीच एक लांबचा प्रवास आहे… पण एवढे तरी निश्चितपणे म्हणू शकते की, भारतीय महिला क्रिकेटमध्ये ही एक नवीन पहाट आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांचे हे मनोगत इंडियन एक्स्प्रेसचे क्रीडा-पत्रकार प्रत्युष राज यांनी टिपून घेतले आहे.

प्रत्युष राज यांचे ट्विटर : @pratyush93_raj

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Equal pay for men and women cricketers long way ahead asj
Show comments