-डॉ. दीपक प्रल्हाद सांजुरे

भारतात हिंदू समाज बहुसंख्याक असला तरी भारतीयांची मनो-सामाजिक जडणघडण करण्याचे काम धार्मिक ग्रंथ, सांस्कृतिक उपक्रम, वैचारिक साहित्य इत्यादींद्वारा अविरत चालू असते. मागील अनेक शतकापासून चालत आलेल्या कथा, रूढी-परंपरा तसेच अनेक प्रसिद्ध काव्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे. रामायण, महाभारत ही महाकाव्ये हा तर सर्व भारतीयांचा सांस्कृतिक परिपोष करणारा अनमोल ठेवा, असे मानले जाते. रामायणातील- आणि महाभारतातीलही अनेक पात्रे, प्रतीके, घटना, प्रसंग मानव समुदायास सदैव प्रेरित करतात. असा सार्वजनिक समज आहे.

भारतीय मनोभूमिकेच्या जडणघडणीमध्ये या महाकाव्यांतील फक्त आदर्शवादी, सकारात्मक पात्रांचाच प्रभाव पडतो, असे नाही. नकारात्मक पात्रांचाही फक्त बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीनेच- म्हणजे विवेकबुद्धी आणि तरतम भाव जागृत ठेवून विचार होणे क्रमप्राप्त ठरते. राम, कृष्ण यांचा व्यक्तिगत व सार्वजनिक मानसिकतेवर सकारात्मक प्रभाव पडतो. तसाच रामायणातले रावण, कुंभकर्ण; महाभारतातले दुर्योधन, दु:शासन यांचाही नकारात्मक प्रभाव पडतो. या महाकाव्यांमधल्या सर्वच सकारात्मक पात्रांचा आपण व्यक्तिगत मर्यादेत आदर्श घेण्याचा प्रयत्न केला, तरी किमान समाजहित साधणे शक्य होईल. कुणी म्हणेल, म्हणून तर आम्ही राम-कृष्णाची मंदिरे बांधली, तिथे अविरत पूजापाठ होतात. तरीही समाज म्हणून आपण त्या दैवतांमागच्या सकारात्मकतेचे पुरेशा प्रमाणात अनुकरण करू शकलो, असे दिसून येत नाही. या सर्वमान्य आदर्शांचाही आपण सोयीसोयीने विचार करतो, गरजेनुरूप (स्वार्थानुरूप) वापर करतो. असे असताना रावण, कुंभकर्ण, दुर्योधन या नकारात्मक मानल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्वातून व्यक्त झालेल्या मानवी स्वभावदोषांचा आपण त्याग करू शकत आहेत का?

हेही वाचा…‘बॉम्बे हॉरर’च्या खोलात…

प्रत्यक्षात आपण या नकारात्मक प्रतिकांचा, त्यामागल्या नकारात्मक प्रवृत्तींचा त्याग करण्याऐवजी स्वीकारच सार्वजनिकरीत्या केलेला आहे की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती वारंवार दिसते. केवळ एखादा अत्याचार झाला म्हणूनच नव्हे तर सामाजिक जीवनात सामूहिक स्वरूपात आपण या प्रवृत्ती अनुभवतो आहेत.

रामाने एकपत्नी, एकवचनी व एकबाणीपणाचा म्हणजेच उच्च नैतिकत्वाचा आदर्श उभा केला. कृष्णाने चांगल्यांच्या रक्षणाचा व वाईटांच्या संहाराचा आदर्श उभा केला. पण रावण आणि दुर्योधन कोण होते?

रामायणातला खलनायक समजल्या जाणाऱ्या रावणानेही (सीतेला साधूचे रूप घेऊन अपहरण करणे सोडता) चांगल्या गोष्टींचाही आदर्श उभा केला. जसे की, सीतेच्या संरक्षणाची व्यवस्था केली. सीतेच्या निवासाच्या ठिकाणी एकांत राहील, असेही पाहिले. माझ्यासोबत लग्न कर, असे सुचविले; पण आपल्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत. वास्तविकता रावण सुद्धा एक विद्वान, बलशाली, देवभक्त (शिवभक्त)तसेच सामर्थ्यवान राजा होता. यामुळे तो हवे ते हवे त्या प्रकारे मिळवू शकत होता. पण त्याने स्वतःच्या मर्यादांचे भान कधीच सोडले नाही. या गुणांमुळेच रावणाच्या अंतिम समयी, रामाने लक्ष्मणाला त्याच्या पायाजवळ बसून उपदेश ऐकण्याचे सुचविले होते अशीही उपकथा रामायणात आहे. थोडक्यात काय तर, रावणानेही आपल्या मर्यादांचे भान कायम पाळले.

हेही वाचा…‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ केवळ घोषणेपुरतेच?

महाभारताले दुर्योधनाचे पात्र अधिक खलप्रवृत्तीचे आहे. पांडवांना द्यूतात हरवण्यासाठी शकुनीच्या सल्ल्याने कट रचणारा, द्रौपदीची भरसभेत बेअब्रू करू पाहणारा दुर्योधन ही प्रतिमा लोकांवर ठसली आहे. हा दरबार धृतराष्ट्राचा आहे आणि राजापेक्षाही वडील या नात्याने ते आपल्याबाबत पक्षपात करणार, हे या दुर्योधनाला माहीत आहे. कर्णासारख्या वीराशी त्याने केलेली मैत्रीसुद्धा नि:स्वार्थ, निष्कपट मानता येत नाही. अशा दुर्योधनापासून द्रौपदीचे लज्जारक्षण करण्यासाठी कृष्ण होता, तसा कृष्ण आता नाही हेही ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो…’ या कवितेतून पुष्यमित्र उपाध्याय यांनी सांगितल्याचे अनेकांना माहीत असते. हीच ती, आजची सामाजिक परिस्थिती.

समाजाची आजची स्थिती चिंतामय बनली आहे. याची पडछाया व्यक्तिगत जीवनावर पडत आहे. स्त्री समुदायाचा सुरक्षित जीवनाचा हक्क नाकारला जातो आहे. एकीकडे दीर्घ कायदेशीर लढाईतून अयोध्येत श्रीरामाची पुन्हा प्रतिष्ठापना झाली. दुसरीकडे खलप्रवृत्ती समाजामध्ये बळावत चालली आहे. रावणाने पाळलेले मर्यादांचे भान हरवत चालल्याचे निदर्शनास येते. निर्भया, कोपर्डी, कोलकाता इ. प्रकरणातून मानवी विकृतीचे दर्शन होते. ही बाब राम हरपल्याची सूचक जशी आहे, तशीच ती नकारात्मक- परंतु सभ्य असे ‘रावण’ हे प्रतीकसुद्धा कालबाह्य झाल्याची निदर्शक आहे.

हेही वाचा…‘चीन प्लस वन’ हे धोरण भारतासाठी फायद्याचे कसे आहे?

न्यायव्यवस्थेद्वारे रामाची अयोध्येत पुनर्स्थापना शक्य झाली. पण अमर्याद हिंसा, पाशवी प्रवृत्तींना आवर घालणे; केवळ न्यायव्यवस्थेला शक्य होईल? कारण न्यायव्यवस्था मर्यादांचे बंधन काटेकोर पाळते. ‘न्यायदेवते’च्या डोळ्यांवर गांधारीसारखी पट्टीच असते. म्हणून सर्वांनी मिळून समाज भान पाळून, अमर्याद होऊ पाहत असलेल्या, अवतीभोवतीच्या अमानुष प्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी पाऊल पुढे टाकणे, भूमिका घेणे गरजेचे ठरते. तर आणि तरच रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना होऊ शकेल.

लेखक एका कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करतात. dipaksanjure81@gmail.com

Story img Loader