भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. ती ठेचली पाहिजे. असे सर्वच राजकीय पक्ष म्हणत असतात. ही घासून गुळगुळीत झालेली टेप ऐकून लोकांना वैताग आला आहे. भ्रष्टाचार करणारेच प्रिय आहेत असा संदेश यापूर्वी वेळोवेळी देशात पोहोचत राहिला आहे. त्यामुळे प्रामाणिक लोकांनी कोणाकडे पाहायचे हा प्रश्न आहे ?
महागाईच्या दिवसांत कुटुंबातील मंडळींचे पोषण करण्यासाठी सामान्य माणूस अथक मेहनत करत आहे. मुलांचे शिक्षण, वैयक्तिक अथवा कुटुंबातील सदस्यांचे आजारपण. यांवर होणारा खर्च कमी होण्याऐवजी वाढत असतो. या सर्व उलाढालीत अवतीभवती काय चालू आहे ? याकडे लक्ष देण्यास लोकांना वेळ नाही. जीव जगवण्यासाठी राबत राहणे हेच जीवनाचे ध्येय झाले आहे. त्याप्रमाणे वागणे चालू आहे, असे वाटते. मात्र भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्ट लोकांची तर चंगळच असते असे म्हणावे लागेल.
हेही वाचा – जम्मू काश्मीरमधील आरक्षण प्रस्तावामागे समाजकारण की राजकारण?
आधी साधी सेकंडहँड सायकल घेण्याची पात्रता नसणारा माणूस लोकप्रतिनिधी झाल्यावर लाखो – करोडो रुपयांच्या गाड्यांतून फिरू लागतो. अशी कोणती मेहनत त्याने केलेली असते? हे काही कळत नाही. पाच वर्षांत ज्या वेगाने आर्थिक घोडदौड होते ती तर डोळे विस्फारणारी असते. यांना जे मासिक वेतन मिळते त्यात तर मोठी आर्थिक झेप घेणे अशक्य आहे. मग ही झेप की झडप कशावर टाकली जाते? की जिथे यांना खजिनाच मिळतो आणि ते मालामाल होतात? झटपट मालामाल होण्याचा हा फॉर्म्युला गुपितच ठेवला जातो. जनाची नाही मनाची नाही तर कसलीच लाज न बाळगता भ्रष्टाचार करणारे ताठ मानेने समाजात फिरू तरी कसे शकतात ? सामान्य माणसाने बँकेतून रीतसर कर्ज घेतलेले असले तरी ते फेडून पूर्ण होइपर्यंत त्याला चैन पडत नाही. आपण कोणाचे तरी देणे लागतो ही जाणीव त्याला कायम बेचैन करत असते. भ्रष्टाचारी माणसाला केवळ लुबाडणेच ठाऊक असल्याने देण्याचा आणि त्याचा विचार करण्याचा प्रश्नच नसतो. मेहनत न घेता सर्व मलाच मिळावे आणि विलासी जीवन जगावे हेच त्याला पक्के ज्ञात असते.
अर्थात दुसरीकडे हेही दिसते की, विकासाची नवनवीन स्वप्ने दाखवून विनाविलंब ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास करून चोख नियोजन केले जाते आणि पुढे मग थाटामाटात याचे उद्घाटन सोहळे पार पडतात. असे करत विकासाच्या दिशेने वाटचाल ठेवली जाते आणि त्याला कुठे अटकाव होणार नाही याची काळजी घेतली जाते. असे आहे तर मग भ्रष्टाचार निर्मुलन गांभीर्याने का घेतले जात नाही ? अवकाशझेप घेणारा, सूर्य – चंद्र यांच्या दिशेने झेपावणारा भारत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करणारे यांच्यावर कारवाई करण्यात पुष्कळ मागे आहे, असे चित्र आहे, ते का?
भ्रष्टाचारीच शक्तिशाली होतात…
भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचा भक्कम राजकीय आधार होणे जोपर्यंत पूर्णतः थांबत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार करणारे ताठ मानेने फिरतच राहाणार. तुमच्यामुळे कोणाचेही अडत नाही आणि अडणार नाही. उलट तुम्हीच कधीही तुमच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली कधीही अडकू शकता. हा संदेश भ्रष्टाचाराने बरबटलेल्या भ्रष्ट मंडळींपर्यंत गेला पाहिजे. पण यात सोयीस्कर खेळी नसावी. स्थानिक स्वराज्य संस्था – लोकसभा – विधानसभा यांच्या निवडणुका घोषित झाल्यावर इतरांप्रमाणे आपणही सुरक्षित पैलतीर गाठू शकतो हा फाजील आत्मविश्वास भ्रष्टाचारी मंडळींचे बलस्थान आहे. असे वाटते. आज जरी वातावरण आपल्याला अनुकूल असे नसले तरी निवडणुका घोषित झाल्यावर प्रतिकूल वातावरण आपसूकच अनुकूल होईल आणि सर्वकाही आपल्याला अनुकूल असेच घडेल अशी स्वप्ने पाहत घुडघ्याला बाशिंग बांधून असणारे कित्येक जण असतील. हा आत्मविश्वास यांच्यात कोणामुळे आला ? याचे उत्तर जनतेला ज्ञात आहे. आधी भ्रष्टाचारी म्हणून आरोप करायचे. मग पहाटेचे शपथविधी काय आणि मग ते फिसकटल्यावर काही कालावधीने पुढे सत्तेत बसण्याचा मान काय. अहो, लोकांच्या तोंडाला किती पाने पुसणार ? लोकसेवा करण्यासाठी राजकारणात आहात की लोकांना असलेला त्रास कमी म्हणून त्यात भर टाकत राहून राजकीय चिखल करण्यासाठी राजकारणात आहात. नक्की स्वतःची उपयुक्तता तरी काय ?
‘तुम्ही तुमच्या कारकिर्दीत अमुक यांना जवळ केले मग आम्ही जर अमुक यांना जवळ केले तर का झोंबते?’ असले वाक्यांचे शेलके खेळ बिनकामाचे आहेत. याने भ्रष्टाचाराचे निर्मुलन होणार नाही. तर भ्रष्टाचार करणारे अधिक शक्तिशाली होतील. यांना शक्तिहीन झालेले जनतेला पाहायचे आहे. पुन्हा मंत्री म्हणून भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना लोकांवर लादने म्हणजे प्रामाणिकपणाचा गळा घोटणे होय. अशी निर्दय कामे करून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे दुष्कर्म करणे लांछनास्पद आहे.
‘ईडी’ तरी किती स्वच्छ?
ईडीच्या अंकित तिवारी या अधिकाऱ्याला २० लाख रुपयांची खंडणी घेताना तमिळनाडू पोलिसांनी ताब्यात घेणे त्या संस्थेच्या कार्यपद्धतीवर कैक प्रश्न निर्माण करते. असे किती भ्रष्ट अधिकारी त्या संस्थेत असतील ? आणि त्यांनी आतापर्यंत किती जणांकडून पैसे गोळा करण्याचे म्हणजे भ्रष्टाचार करण्याचे काम केले असेल ? हे समोर आले पाहिजे. लोकांना याची उत्सुकता आहे. सुरक्षित पैलतीर गाठण्यासाठी ईडी नावाच्या नौकेचा उपयोग झाला. मात्र तिचा एक नावाडीच लाचखोर आहे. हे जगजाहीर झाले आहे. त्यामुळे या संस्थेची पूर्ती बदनामी तर झालीच. पण यांनी आधी केलेल्या कारवाया कशा केल्या असतील ? याविषयी दाट संशय आहे. कुंपणच शेत खात आहे. त्यामुळेच भ्रष्टाचार करणारे मोकाट आहेत असे समजायचे का ? म्हणजे त्यांना ईडीचे भयच राहिलेले नाही. विरोधक या संस्थेच्या नावे आधीपासूनच बोंबा मारत आहेत. त्या सत्यच म्हणाव्या लागतील.
हेही वाचा – विरोधी पक्षांची रणनीती आता काय असणार?
अमृतकाळात तरी हे थांबेल असे कुठेतरी वाटत होते. पण कसले काय ? इकडचे भ्रष्टाचारी तिकडे जाऊन निवांत विश्रांती घेत चिंतामुक्त जीवनाचा मनमुराद आस्वाद घेत आहेत. राजकीय गणिते जुळवण्यासाठी विरोधकांवर कशाप्रकारे कुरघोड्या केल्या जाऊ शकतात हे दाखवण्यासाठी भ्रष्टाचारी नेत्यांना पायघड्या घालून त्यांच्या समोर माना तुकवणारे कधीतरी लोकांना स्वच्छ कारभार करणारे प्रामाणिक लोकप्रतिनिधी मिळवून देऊ शकतील का ? हा सामान्य जनतेचा रोकडा प्रश्न आहे. आधीच्या सत्ताधारी मंडळींनी काय केले ? त्यामुळे कारभाराचा गाडा हाकण्यासाठी नाईलाजाने जनतेत नाराजी असलेल्या लोकप्रतिनिधींनाही आपलेसे करावे लागणे. इतकी कोणती नामुष्की आली होती का?
नवाब मलिक यांच्या निमित्ताने भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा चर्चेत आलेले असताना या प्रश्नांचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे.
jayeshsrane1@gmail.com