अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, ‘वंचित बहुजन आघाडीच्या पराभवा’चे विश्लेषण करताना ‘वंचित’चे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, ‘बौद्ध, दलितांना शहाणे होण्याचा सल्ला’ दिला आहे. तशी बातमीही १८ जूनच्या ‘लोकसत्ता’मध्ये आहे. ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही की, लोकसभा निवडणुकीत शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्य समाज विशेषतः मुस्लीम समाज एकदिलाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला! एका अर्थाने या सर्वांसाठी ही निर्णायक लढाई होती. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणूक निकालानंतर ‘वंचित बहुजन आघाडी’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमांतून जे पत्रक प्रसिद्ध केले, त्यात स्पष्ट म्हटले होते की, ‘मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही!’ तरीसुद्धा, दलित (विशेषतः बौद्ध समाज) लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा राहिला नाही, हे शल्य बोचत असल्यानेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, ‘बौद्ध, दलितांना शहाणे होण्याचा सल्ला’ दिला असावा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी असेही म्हटले की, ‘तुम्ही ‘त्यांचे’ (म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार- शिवसेना उद्धव ठाकरे) पक्ष वाचवलेत!’
मुळात ही लोकसभा निवडणूक कोणाचाही पक्ष वाचविण्यासाठी नव्हती, आव्हानच वेगळे होते. थोडक्यात सांगायचे तर, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांनीही या लोकसभा निवडणुकीत जागल्याची भूमिका बजावली! अनिर्बंध एकाधिकारशाहीला मोठ्या प्रमाणात वेसण घालण्यात इथली जनता यशस्वी ठरली. जे पक्ष हे करू शकतात त्यांच्यावरच इथल्या जनतेने विश्वास दाखवला.
हेही वाचा – ब्रिटनमधल्या निवडणुकांचा माहोल… लंडनमधून!
आज महाराष्ट्रा पुरते बोलायचे तर, अनुसूचित जातींमध्ये असलेल्या ५८ जातींपैकी ८ ते १० टक्के जातींची सरकार-दरबारी नोंद ‘चर्मकार’, तर १० टक्क्यांची ‘मातंग’ अशी आहे ( हे शब्द संस्कृतप्रचुर आहेत पण त्यामुळे ‘जात’ वास्तव बदलत नाही) आणि ते स्वतःला हिंदू-दलित समजतात. पारंपरिक दृष्टीने हा भाजप-शिवसेनेचा मतदार! उरलेल्या ५५ इतर छोट्या मोठ्या अनुसूचित जातींचे प्रमाण हे २० टक्के असून या ५५ जातींची लोकसंख्या कमी आणि विखुरलेली असल्याने, त्या जातीसुद्धा राजकीय मुख्य प्रवाहासोबत जातात.
याला अपवाद बौद्ध समाजाचा! अनुसूचित जातींमध्ये यांचे प्रमाण तब्बल ६० टक्के आहे. (महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत १३ टक्के प्रमाण बौद्ध समाजाचे आहे). बौद्ध धम्माच्या स्वीकारानंतर नवे आत्मभान आलेला, जागृत, संघटित आणि राजकीयदृष्ट्या सजग तसेच शिक्षणाचा ध्यास असलेला हा बौद्ध समाज आहे. राजकीयदृष्ट्या सर्वांत कमी महत्त्व असलेल्या आणि उपेक्षित सामाजिक गटांना-जातींना एका छताखाली आणण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘वंचित’ या नव्या व्याख्येला राजकीय श्रेणीचे स्थान मिळवून दिले. निवडणुकीच्या लढाईत त्याचा वापरही केला. २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत त्याची थोडीफार चुणूकही दाखवून दिली. परंतु २०२४ साली हे सर्व मागे पडले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा खरा राग हा वर उल्लेख केलेल्या, प्रभावशाली बौद्ध समाजावर आहे. म्हणूनच ते त्यांना (म्हणजे बौद्धांना) शहाणे होण्याचा सल्ला देत आहेत. उलट ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या अभ्यासू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कौटुंबिक वारसा पुढे नेणाऱ्या नेत्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, या देशातील शेतकरी, कामगार, अल्पसंख्याक (विशेषतः मुस्लीम) आणि दलित (यात ‘बौद्ध’ही आले) या समाज घटकांनी- स्वतंत्र भारतात आतापावेतो एकमुखी व सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव असतानाही- उत्स्फूर्तपणे ‘दबाव गट’ म्हणून या लोकसभा निवडणुकीत चोख काम केले आणि भविष्यातील संभाव्य हानी टाळली!
यातील सर्व समाज घटकांतील मतदारांची उत्स्फूर्तता लक्षात घेतली पाहिजे. ही उत्स्फूर्तता अशाच वेळी येते, ज्या वेळी तुमच्या पुढे दोनच पर्याय राहतात : आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा किंवा प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा. मतदारांनी दुसरा पर्याय निवडला! या समाज घटकांनी वेळीच शहाणे होऊन योग्य निर्णय घेतला! संख्येने अधिक असलेल्या बौद्ध मतांचे विभाजन होऊ नये म्हणून, लोकसभा निवडणुकीत ४८ आंबेडकरी-बौद्ध संघटनांनी महाविकास आघाडीला मत देण्याचे आवाहन केले होते.
आंबेडकरी-बौद्ध समाजातील विचारवंत, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी यांनी मुंबईत बैठक घेऊन, ‘प्रकाश आंबेडकरांची भूमिका मोदी धार्जिणी!’ असल्याचा आरोप करत, महाविकास आघाडीस मतदान करण्याचे आवाहन केले (लोकसत्ता २८ एप्रिल). याउलट, उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसून येते की, ‘वंचित’मुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप मिळून चार मतदार संघांत फायदा झाला. अन्यथा, शिवसेना शिंदे गटाचे सातऐवजी चार आणि भाजपचे नऊऐवजी आठच खासदार निवडून आले असते. इतरत्र मात्र, प्रामुख्याने बौद्ध समाजाने मतदान करताना जो न्याय आठवले, कवाडे, कुंभारे या ‘रिपब्लिकन पक्षा’च्या इतर गटांस लावला (त्यांना जमेसही धरले नाही) तीच भूमिका ‘वंचित’ बाबत घेतली!
हेही वाचा – तैवानने मोदींचे अभिनंदन केले, चीनचे काय बिघडले?
हे वास्तव आहे की, या देशातील ‘लोकशाही’ टिकविण्याचे काम कष्टकरी, कामगार, शेतकरी, दलित, आदिवासी यांनी केले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘वंचित’चा पराभव तसेच घटलेला जनाधार (मतांची टक्केवारी) यांचे खापर इतरांच्या माथी फोडणे योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाची झालेली वाताहत, गट-तटांत विभागणी, एकमुखी- सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव या पार्श्वभूमीवर बौद्ध समाजाने इतर समाजघटकांप्रमाणेच स्वतःही लोकसभा निवडणूक हातात घेतली होती. या निर्णायक टप्प्यावर सजग बौद्ध समाजाला, जर ‘वंचित’ आणि तिचे नेतृत्त्व विश्वासार्ह वाटलं नसेल! तर त्याचा दोष मतदार म्हणून बौद्ध समाजावर कसा?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, ‘लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा हा कल तात्पुरती ‘फेज’ आहे!’ हे जरी मान्य केलं तरी त्यामुळे ‘भारत’ तरला आणि इतरही बऱ्याच गोष्टी बहुतांश साध्य झाल्या. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही मान्य केले आहे की, ‘भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला या लोकसभा निवडणुकीत चाप बसला तसेच धार्मिक राजकारण आणि संविधान बदलण्याची भाषा आता येणाऱ्या पन्नास वर्षांत कोणी करणार नाही!’ ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सारख्या ‘अभ्यासू’ नेत्याने याचे वाजवी श्रेय बौद्ध समाजाला द्यावयास काय हरकत आहे?