मुकुंद संगोराम
मागील शतकापासून ते आजपर्यंत आपल्या अभिजात संगीतातील नवोन्मेषी आविष्कारांनी गंधर्व हे नामाभिधान सार्थ करणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांच्या स्वरांचा आठव समस्त रसिकांसाठी नेहमीच आनंददायी आणि उत्फुल्लित करणारा. प्रत्येक मैफिलीत रसिकांना सर्जनाचा नवा आविष्कार सादर करणाऱ्या कुमारजींच्या अद्भुत प्रज्ञाशक्तीचा तो एक खळाळता प्रवाह राहिला. त्यांच्या निधनानंतरच्या तीन दशकांतही त्यांच्या संगीताने अचंबित होणाऱ्यांची संख्या सतत वाढतेच आहे, हे त्यांच्या गायनकलेचे खरे गमक. त्यांच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून ‘लोकसत्ता’ने सादर केलेल्या ‘सुनता है गुरुग्यानी’ या खास विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमातही त्यांच्या संगीताचा आठव पुन:पुन्हा स्वरांमधूनच होत राहणे स्वाभाविकच होते. त्यांचे नातू भुवनेश कोमकली आणि प्रसिद्ध कलावंत आरती अंकलीकर यांनी या कार्यक्रमात कुमार गंधर्वाच्या गायकीची झलक सादर केली आणि कार्यक्रमासाठी आलेल्या शेकडो पुणेकर रसिकांना भरून पावल्याचा आनंद दिला.
नवरागनिर्मिती म्हणजे केवळ स्वरसमूहांची जोडणी नव्हे. त्यातील भावदर्शन, रागाचा चेहरा आणि ठेवण या सगळय़ा बाबतीत तो राग त्याचा स्वत:चा चेहरा घेऊनच जन्म घेतो. कुमारजींनी बांधलेला मधसूरजा, गांधीमल्हार यांसारख्या अनेक रागांमध्ये हे सहजपणे लक्षात येते. परंतु याबरोबरच कालसिद्ध रागांमध्येही कुमारजींनी बांधलेल्या अनेक बंदिशींमध्ये एका वेगळय़ाच अनुभूतीची जाणीव होत राहते. भुवनेश यांनी नंद रागातली ‘राजन, अब तो आ जारे’ ही बंदिश सादर केली, तेव्हा त्याचा पुनप्र्रत्यय आला. तोच अनुभव त्यांच्या ‘ले जा संदेसो’ या बंदिशीतूनही मिळाला. मधुवंतीसारखा देखणा राग अभिजात संगीतात फार कमी वेळा ऐकायला मिळतो. ‘बैरन बरखा ऋतु आयी’ ही कुमारजींची बंदिश, त्या रागाचं सगळं सौंदर्य किती आरस्पानी आहे, याची अपूर्वाई ऐकवते. भुवनेश कोमकली यांनी ती सादर केली, तेव्हा त्यांच्या तयारीची, सौंदर्यदृष्टीची एक वेगळी जाणीव श्रोत्यांना झाली.
निर्गुणी हे कुमार गंधर्व यांनी अभिजात संगीताला दिलेली महत्त्वाची देणगी आहे. नाथ संप्रदायाच्या भक्ती संगीतातून आलेली ही भजने भारतीय भक्तीपरंपरेतील अन्य संगीतापेक्षा वेगळी आणि चटकन लक्ष वेधणारी आहेत. कुमारजींना त्या निर्गुणीच्या संगीताच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता वाटली आणि त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. निर्गुणी भजन गायनासाठी स्वरांच्या लगावापासून ते शब्दोच्चारांपर्यंत जाणवणारे वेगळेपण कुमारजींनी नेमकेपणाने समजून घेतले आणि त्यामुळेच त्यांच्या रागदारी संगीतातील स्वरांच्या लगावापेक्षा निर्गुणीतील त्यांची मांडणी वेगळी असल्याचे लक्षात येते. निर्गुणी भजनांबरोबरच संत परंपरेतील संतांच्या रचनांचा धांडोळा कुमारजींनी घेतला आणि त्यातूनच ‘त्रिवेणी’, ‘तुलसीदास दर्शन’, ‘सूरदास दर्शन’ अशा खास कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. संतांच्या रचनेतील विचारांचा अभ्यास केल्याशिवाय, त्या संगीतात बांधणे अवघड असते, हे लक्षात घेऊन कुमार गंधर्वानी या सगळय़ा संतांच्या समग्र साहित्याचाच अभ्यास केला. त्यातून गूढरम्य प्रदेशांत मुशाफिरी केली आणि त्यातूनच भारतीय भजन संगीताला निराळे परिमाण मिळाले, भुवनेश यांनी या कार्यक्रमात ‘सुनता है गुरुग्यानी’ हे भजन गाताना सारे वातावरणच भारून टाकले आणि कुमारजींच्या संगीत विचारांचे सुंदर दर्शन दर्शनही घडवले. कुमार गंधर्वाचे संगीत शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे अभ्यासक कलावंत बी. आर. देवधर यांच्याकडे झाले. स्वातंत्र्यपूर्व काळातील सांगीतिक वातावरणात घराण्यांच्या भिंती अभेद्य ठेवण्यात कलावंतांची शक्ती पणाला लागत असे. अशा वातावरणात देवधर मास्तरांनी मुंबईत सुरू केलेल्या ‘स्कूल ऑफ म्युझिक’ या शिक्षण संस्थेत एक वेगळाच प्रयोग सुरू झाला. घराणेदार संगीताची तालीम देत असतानाच, त्या काळातील अनेक दिग्गज कलावंतांना आपल्या संस्थेत आमंत्रण देऊन बी. आर. देवधर त्यांना गायन करण्याची विनंती करीत. काळापुढे विचार करण्याची क्षमता असलेल्या देवधरांनी अशा अनेक कलावंतांचे गायन आपल्या शिष्यांना मुक्तहस्ते ऐकवले.
कुमारजींसारख्या बुद्धिमान कलावंताला अगदी लहान वयातच हे घराण्यांच्या शैलीचे वेगळेपण समजून घेण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच त्यांचे संगीतचिंतन पुढे जात राहिले. त्यामुळे इतर घराण्यांत गायल्या जाणाऱ्या बंदिशी सादर करताना, कुमारजी आपल्या चिंतनाची भर घालत आणि ती बंदिश अधिक समृद्ध करीत. ‘सुनता है गुरुग्यानी’ या खास विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात आजच्या घडीच्या प्रसिद्ध कलावंत आरती अंकलीकर यांनी तीच परंपरा पुढे नेण्याचे ठरवले. कुमारजींच्या स्वरविचारांनी त्यांच्या काळातील अनेक समकालीन कलावंतही लुब्ध झाले होते. आरती अंकलीकर या नंतरच्या पिढीतील परंतु लहानपणापासून कुमार गंधर्वाचे प्रत्यक्ष गायन ऐकण्याची संधी मिळालेल्या कलावंत. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमात पूरिया धनाश्री रागातील ‘कहां चला हो’ ही बंदिश सादर केली. रागस्वरूपातील बारकावे टिपत, त्याला स्वत:च्या अभ्यासाची जोड देऊन त्यांनी सादर केलेली ही बंदिश प्रभावी ठरली.
त्यानंतर त्यांनी सादर केलेला तराणा त्यांच्या संगीतकलेचा एक कलात्मक आविष्कार होता. याचे कारण कुमारजींच्या संगीताच्या प्रभावातून आरती अंकलीकर यांनी हा तराणा स्वत:च बांधला. त्यामुळे त्याचे वेगळेपण अधिक लक्षात राहणारे ठरले. केदार रागातील त्यांनी सादर केलेली ‘बैठी हूँ अकेली’ आणि ‘मुख दिखा दे मोहे’या दोन रचना कुमारजींच्या लयभानाचे खुमासदार दर्शन घडवणाऱ्या होत्या. या बंदिशींमधील सम जशी अनोखी, तशीच त्यांची मांडणीही. अंकलीकर यांनी त्यांना न्याय दिला.
लोकसंगीतातील रचनांना अभिजाततेचे रूप ल्यायला लावण्यासाठी कुमार गंधर्वासारख्या अतिशय तल्लख आणि कलात्मकतेचे अप्रतिम भान असलेल्या कलावंताने जे प्रयोग केले, त्याने आजही रसिक अचंबित होतात. त्यांनी सादर केलेली ‘सावरे अजैयो’ ही लोकसंगीतातील रचना हे त्याचे उदाहरण. या गायनावर कुमारजींची एक लफ्फेदार स्वाक्षरी आहे. त्यामुळे ती त्यांच्या पद्धतीने गायली गेली तरच रसिकांना भावते. कुमारजींचे शिष्यत्व पत्करलेले ख्यातनाम कलावंत डॉ. वसंतराव देशपांडे यांनी सादर केलेली हीच रचना सतत कुमारजींचीच आठवण करून देते आणि तरीही त्यामध्ये वसंतरावांचे वेगळेपणही स्पष्टपणे जाणवत राहते. आरती अंकलीकर यांनी आपल्या गायनाचा शेवट याच रचनेने केला आणि उपस्थितांनीही त्याला मनमुराद दाद दिली. अंकलीकर यांचा कुमारजींच्या शैलीचा अभ्यास जसा त्यातून प्रतीत झाला, तसाच, त्यातील नजाकतीची अपूर्वाईही श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. या दोन्ही कलावंतांनी या कार्यक्रमात पं. कुमार गंधर्व नावाचे सांगीतिक गारूड आजही किती कालसुसंगत आहे, याची साक्ष दिली. त्यामुळेच हा कार्यक्रम केवळ रंजक न राहता, संस्मरणीयही झाला.
- एकीकडे दर्जेदार शिक्षणाची परंपरा सुरू ठेवत असताना दुसरीकडे सांस्कृतिक क्षेत्रासाठी काय करता येईल हे, हे विद्यापीठ नेहमी पहात आले आहे. एका अतिशय महत्त्वाच्या उपक्रमामध्ये भारती विद्याापीठाला सहभागी करून घेतले, यासाठी भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांच्या वतीने मी ‘लोकसत्ता’चे आभार मानतो. कलावंत आणि विचारवंत यांचा सुरेख संगम हा कुमारजींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होता. आपल्या सर्जनाची प्रक्रिया कलावंताला उलगडून सांगता येणं ही फार कठीण गोष्ट असते. ती कुमारजींच्या ठायी होती. – प्रा. मिलिंद जोशी,भारती विद्यापीठ
- प्रतिभासंपन्न गायक पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने ‘सुनता है गुरुग्यानी’ हा विशेषांक प्रकाशित करून पं. कुमार गंधर्व यांना अभिवादन केले आहे. या प्रकाशन कार्यक्रमानिमित्त कुमारजींच्या गायकीचा वारसा पुढे नेणारे त्यांचे नातू भुवनेश कोमकली आणि ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या झालेल्या गायन मैफिलीने रसिकांना तृप्त केले. या कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीला सहभाग घेण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार. – सुशील जाधव, विभागीय प्रमुख,
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी
- पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने ‘लोकसत्ता’ने ‘सुनता है गुरुग्यानी’ हा विशेषांक प्रकाशित करून रसिकांसाठी एक मोठा ठेवा उपलब्ध करून दिला आहे. या उपक्रमामध्ये ‘कोहिनूर ग्रुप’ला सहभागी करून घेतल्याबद्दल मन:पूर्वक आभारी आहोत. – कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष, कोहिनूर ग्रुप
- पं. कुमार गंधर्वाच्या अलौकिक स्वरांचे आपण सर्वचजण चाहते आहोत. हाच सांगीतिक धागा पुढेही विणला जावा या हेतूने जन्मशताब्दी विशेषांकाला पाठबळ दिले. – पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप