शिशिर सिंदेकर
गेल्या तीस वर्षांपासून असे म्हणण्याची पद्धत आहे की पारंपरिक शिक्षण पद्धती व त्यातून निर्माण होणारे पदवीधर तरुण (बी.ए., बी कॉम., बी.एस्सी.) हे प्रत्यक्षात रोजच्या जीवनात काम करताना अयशस्वी ठरतात, म्हणून बेरोजगारांची मोठी फौज निर्माण होत गेली. बदलत्या तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदललेल्या उद्योग, सेवा क्षेत्राला ज्या ज्ञानाची आणि कौशल्यांची गरज आहे ते वेळीच न ओळखल्याने हे शिक्षण कालबाह्य ठरत गेले. १९८०-८५ या काळातदेखील या विषयावर उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचार करून पुनर्रचित अभ्यासक्रम राबविण्याच्या शिफारशी विद्यापीठांना, महाविद्यालयांना केल्या होत्या, त्यानुसार काही महाविद्यालयांनी त्या स्वीकारल्या आणि हा प्रयोग त्याला मिळालेल्या यशामुळे आज ४० वर्षांनंतर आदर्श ठरला आहे.
नाशिकमध्ये पुणे विद्यापीठाअंतर्गत एका महाविद्यालयाने बी. कॉम. या पदवीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम स्वीकारला, यशस्वीरीत्या राबविला आणि त्यामुळे ‘नॅक’द्वारा मूल्यांकनात सातत्याने तीन वेळा ‘ए’ श्रेणी महाविद्यालयाला मिळाली. पुनर्रचित अभ्यासक्रमात प्रथमच ३० टक्के स्वायत्तता महाविद्यालयाला देण्यात आली. विषयांचे चार भागांत वर्गीकरण करण्यात आले. कॉमर्स क्षेत्रात अकौंटंसी, अर्थशास्त्र, कायदे यासारखे अत्यंत महत्त्वाचे विषय बी. कॉम. पदवीच्या तीनही वर्षांसाठी अनिवार्य होते, तर प्रत्यक्ष अकाऊंट्स रायटिंग, मार्केटिंग, सेल्समनशिप, कॉम्प्युटर ओळख यासारखे अनेक विषय प्रथम वर्षासाठी ऐच्छिक निवडीचे ठरविण्यात आले. (बी. एस्सी.साठी रेडिओ, टीव्ही सर्व्हिसिंग असेही विषय १९८० च्या दशकात होते.) या पुनर्रचित अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मिळणारी बी. कॉम. पदवी ही वैशिष्ट्यपूर्ण होती. बी. कॉम. पदवीच्या दुसऱ्या वर्षी विद्यार्थी कॉस्टिंग, बँकिंग-फायनान्स, ग्रामीण विकास, उद्योजकता विकास, उद्योग रचना, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सिस्टीम मॅनेजमेंट, उपयोजित संख्याशास्त्र, पब्लिक रिलेशन्स यापैकी एका विषयाची (स्पेशल सब्जेकट म्हणून) निवड करून त्यामध्ये सखोल ज्ञान कौशल्य प्राप्त करून पदवी मिळवतो. १९८५ पासून ग्रामीण विकास किंवा पब्लिक रिलेशन्स यांसारख्या विषयात बी. कॉम. पदवी देणारे हे महाविद्यालय आहे. या विषयांचे अभ्यासक्रम त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती आणि प्राध्यापक, विद्यापीठातील मार्गदर्शक दर तीन वर्षांनी निश्चित करतात. काळानुसार त्यात बदल केले जात असतात. हे विषय थिअरी, प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट या माध्यमातून शिकवले जातात. आठवड्यातील तीन दिवस यासाठी राखीव असतात. एक दिवस थिअरी, तर दोन दिवस प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट यासाठी दिलेले असतात. यातील थिअरी हा भाग प्राध्यापक शिकवतात, तर प्रॅक्टिकल्स हे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती शिकवतात. त्यांना मुद्दाम आमंत्रित केले जाते. या पार्श्वभूमीवर, नवीन शैक्षणिक धोरणातील ‘तज्ज्ञ प्राध्यापक’ नेमण्याची शिफारस अजिबातच नवी ठरत नाही आणि तिच्याबद्दलच्या ‘फक्त कामाचा अनुभव पुरेसा?…’ ( विश्लेषण, लोकसत्ता, २७ ऑगस्ट) यासारख्या चर्चांनाही अर्थ उरत नाही.
पदवीच्या तिसऱ्या वर्षाला विद्यार्थ्याला प्रोजेक्ट हा एक स्वतंत्र विषय असतो, त्यामुळे एखादा विषय, प्रश्न पूर्णपणे समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली शिस्तबद्ध संशोधन वृत्ती विकसित होते. या विषयांची परीक्षा पद्धती पूर्णपणे वेगळी आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळी प्रश्नपत्रिका असते, तसेच त्याने वर्षभर केलेल्या कामाचे मूल्यमापन असते आणि मौखिक परीक्षादेखील असते. प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकल्ससाठी विद्यार्थ्याला विविध संस्थांना प्रत्यक्ष भेटी द्याव्या लागतात, मुलाखती घ्याव्या लागतात आणि माहिती गोळा करावी लागते. त्यामुळे बाहेरील जगात प्रत्यक्षात नेमके काय चालू आहे याचे ज्ञान प्राप्त होते, तसेच रोजगारासाठी नेमक्या कोणत्या कौशल्याची गरज आहे हे त्याला कळते. इतर सर्व महाविद्यालयांबरोबर महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेतली जाते, तर या विशेष निवडलेल्या विषयांची परीक्षा विद्यापीठाच्या देखरेखीखाली महाविद्यालय आयोजित करते. त्या त्या विषयातील बाहेरील तज्ज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असते. विषय शिक्षकांना त्यांच्या विषयातले ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. असे शिक्षण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण उपयोजित ज्ञानामुळे उपयुक्त ठरते. नाशिकमधील अनेक उद्योजक, प्रथितयश बँकर्स, सेवाभावी संस्थांचे संस्थाचालक, कॉस्ट अकौंटंट, जिल्हा परिषद/ ग्रामपंचायत अधिकारी यांसारख्या अनेक व्यक्ती या शिक्षण प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून सहभागी होत असतात, म्हणून असे प्रयोग यशस्वी ठरू शकले.
आजकाल महाविद्यालयांची प्रतवारी (गुणवत्ता) त्या महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू होतात का, किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो, किती लाखाचे पॅकेज मिळते, अशा काही गोष्टींवर अवलंबून असते. खरे तर महाविद्यालयाचे काम नोकरी मिळवून देण्याचे (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) असू नये. याउलट अशी कौशल्ये व ज्ञान शिक्षणातून त्याला मिळावे की ज्यामुळे त्याची गुणवत्ता वाढून, नोकरी मिळवण्यासाठी वा उद्योजक होण्यासाठी किंवा कोणत्याही क्षेत्रात धाडसाने उभे राहून यश मिळवण्यासाठी विद्यार्थी पात्र ठरेल. पुनर्रचित अभ्यासक्रमामुळे अनेक प्रथितयश कंपन्या या महाविद्यालयात येतात, कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात, आणि त्यातून अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्याही मिळतात हा भाग वेगळा. अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत लवचीकता असल्याने अनेक विद्यार्थी बी. कॉम. पदवीसोबतच सी.ए., सी.एम./ डब्ल्यू. ए., सी.एस. यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करतात. काही उद्योजक झाले आहेत. तर काही एम.बी.ए. झाले आहेत.पुनर्रचित अभ्यासक्रमाने हा विश्वास निर्माण केला, कारण महाविद्यालयानेही प्रयत्नांत सातत्य राखले. उच्च शिक्षणातील अशा वेगळ्या प्रयत्नांची दखल इतरांसाठी पथदर्शी ठरू शकते. (पुणे विद्यापीठअंतर्गत पुनर्रचित अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय नाशिकच्याच अन्य महाविद्यालयांनीही घेतला होता, पण काही काळाने त्यांनी पुन्हा पारंपरिक अभ्यासक्रम स्वीकारला. त्यांच्या अपयशाचा आणि एकंदरच पुणे विद्यापीठाचा पुनर्रचित अभ्यासक्रम जिथे कुठे यशस्वी झाला त्या महाविद्यालयांनी काय केले याचा आढावा घेतल्यास नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल हवेतल्या हवेत चालल्यासारख्या चर्चा बंद होऊन प्रयत्न कुठे आणि कसे हवे, याची दिशा मिळू शकेल.