‘मुघल, ब्रिटिश, नेहरूंमुळे ज्ञान परंपरा मलीन!’ ( लोकसत्ता, १ मार्च) झाल्याचे वक्तव्य जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडीत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या परिषदेत केल्याचे वाचले. ‘भारतीय ज्ञान परंपरा : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन’ या विषयावर ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. शांतीश्री धुलीपुडी यांचे वक्तव्य वाचून नवल वगैरे अजिबात वाटले नाही, पण या प्रकारचा प्रचार अगदी वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत सातत्याने केला जात आहे. हे जे सगळे बुद्धिवंत, विदुषी आहेत ते आणि त्यांचा इतिहास मुघल काळाच्या पलीकडे सरकतच नाही. असो.
यानिमित्ताने काही प्रश्न विचारावेसे वाटतात ते म्हणजे :
मुघल, ब्रिटिश आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्वीच्या काळामध्ये अखंड हिंदुस्तानात कोणत्या प्रकारची शैक्षणिक व्यवस्था होती; जी मलीन झाली आहे? शैक्षणिक व्यवस्था मलीन झाली आहे, म्हणजे नेमके काय झाले आहे? मुघल पूर्वकाळात या देशात कोणत्या प्रकारची भारतीय ज्ञानपरंपरा होती वा होत्या? त्या ज्ञानपरंपरांचा शैक्षणिक अभ्यासक्रम कोणता होता? त्यात कोणकोणते विषय शिकविले जात होते? मुघल पूर्वकाळात अखंड भारतात कोणकोणत्या शहरांमध्ये, आटपाट नगरांमध्ये, गावांमध्ये शाळा होत्या याची यादी तर उपलब्ध असेलच! शिवाय इयत्तानिहाय, विषयनिहाय अभ्यासक्रम असतीलच. तर, त्यांचे संदर्भ देण्यास काय अडचण आहे? त्या शाळांमध्ये शिकविणारे अध्यापक आणि विद्यार्थी कुण्या वर्णाचे व जातीचे होते? त्या शाळांमध्ये हिंदू धर्मातील सर्व घटकांसाठी सरसकट प्रवेश होता काय? तिथून शिकून बाहेर पडलेल्या स्नातकांना रोजगाराच्या संधी होत्या की नव्हत्या? असतील तर ते रोजगार कोणत्या प्रकारचे होते?
संस्कृत ही भाषा फक्त ब्राह्मणांची आहे; हे भारतीय समाजाच्या मनावर शतकानूशतके कुणी बिंबविले आहे? वैदिक धर्माने ज्या वर्णाला संस्कृत शिकण्याचा अधिकार दिला, तो वर्ण आणि त्या वर्णातील लोक कोण होते, हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय. संस्कृत भाषेबद्दल सर्वसामान्य माणसांमध्ये तिरस्कार निर्माण होण्याला कारणीभूत संस्कृत न बोलणारी माणसे नसून त्याला कारणीभूत संस्कृतचा आजही उदो उदो आणि गाजावाजा करणारे अल्पसंख्य संस्कृत भाषक लोक आहेत. ते संस्कृतभाषक अल्पसंख्याक कोण आणि कोणत्या वर्णाचे लोक आहेत? सर्वसामान्य लोकांना संस्कृत कळत नाही, हा दोष सर्वसामान्य लोकांचा कसा असू शकतो? शतकानुशतके या देशातील संस्कृत ही खरी ज्ञानभाषा असेल तर, ती भारतातील जास्तीतजास्त एखादा टक्काच लोकांना का कळते? मृत झालेली भाषा तगावी म्हणून सरकार का सर्वसामान्य जनतेचा पैसा खर्च करत आहे? जर संस्कृत इतकी समृद्ध आणि ज्ञानभाषा असेल तर लोक तिच्याकडे का पाठ फिरवितात? संस्कृत ही ज्ञानभाषा सर्वसामान्य लोकांपासून अलिप्त ठेवणारे कोण आहेत? याचा अर्थ असा की ज्यांच्या ताब्यात ही ज्ञानभाषा होती त्यांनी ती इतरांना कळू नये म्हणून, जे खटाटोप केलेले आहेत ते पूर्वज जबाबदार आहेत. संस्कृतबद्दल तिरस्कार निर्माण होण्यासाठी सर्वसामान्य लोक, ब्रिटिश आणि मुघल; शिवाय नेहरू कसे काय जबाबदार असतील? संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे हे आजवर ब्राह्मणच सांगत आलेले आहेत, इतर कोणत्याही वर्णातील साक्षर लोकांनी संस्कृत ही आमची भाषा आहे असा दावा कधीही केलेला नाही. असा दावा केलेला असेल तर, द्या संदर्भ.
शाळांमधून ब्रिटिश काळात आणि नंतर काँग्रेसच्या काळात आम्ही जो इतिहास शिकलो आहोत, त्या इतिहासात कधीही औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याचे एकही उदाहरण का दिले जात नाही? मुघलांनी भारताला खाद्यसंस्कृती दिली, असे कोण सांगतात, तेही एकदा संदर्भासह सांगून का टाकत नाहीत? ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी आमच्या देशात कोणत्या प्रदेशात कोणती लोकशाही होती? त्या एखाद्या लोकशाहीची, एखाद्या प्रजासत्ताकाची एखादी राज्यघटना किंवा निदान पुस्तक तरी उदाहरण म्हणून, संदर्भ म्हणून द्यायला काय हरकत आहे? कुलगुरूंच्या नावडत्या मुघल काळात अखंड हिंदुस्तानात तरी कोणती लोकशाही होती आणि कुठे?
ता. क. : नालंदा आणि तक्षशिला यांच्याशी किंवा त्या बौद्ध कालखंडाशी विदुषी कुलगुरू आणि त्यांच्या वैचारिक मातृसंघटनेचा कसलाही संबंध नव्हता, हे या देशातील सुज्ञ लोक जाणतात! हवेत बोलण्यापेक्षा संदर्भ द्या. लोक मान्य करतील आणि चुकीचा इतिहास लिहिला गेला असेल तर त्यात दुरुस्त्याही करतील, अजूनही मोठ्या मनाची माणसे या देशात शिल्लक आहेत!
shahupatole@gmail.com