निखिल जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेन्री फोर्डच्या आधीही कार्स होत्या आणि हॉटमेलच्या आधीही ईमेल-सेवादाते होतेच. परंतु, फोर्ड मॉडेल ‘टी’ कारच्या ‘मूव्हिंग असेंब्ली लाईन’ आणि हॉटमेलच्या ‘मोफत सेवा’ या नव्या टप्प्यांमुळे कार आणि ईमेल हे तंत्रज्ञान सामान्यांच्या आवाक्यात आले. त्या तंत्रज्ञानाभोवतीचे वलय विरले.

काहीसे असेच चित्र, सर्जनशील कृत्रिमप्रज्ञा म्हणजेच जनरेटिव्ह एआयच्या टप्प्यामुळे कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञानाबाबत निर्माण झाल्याचे दिसते. संगणकीय कृत्रिमप्रज्ञा या तंत्रज्ञानाची सुरुवात तशी ८०-९० वर्षांपूर्वी झाली. संगणकांच्या निर्मितीनंतर काही दशकांतच त्याची सैद्धांतिक मांडणी करण्यात आली. परंतु, दैनंदिन आयुष्यात कृत्रिमप्रज्ञेची फारशी चर्चा नव्हती. कृत्रिमप्रज्ञेविषयी अकॅडमिक तत्त्वचर्चा आणि विज्ञानकथांची निर्मिती घडत होती, परंतु कृत्रिमप्रज्ञेच्या विकासासाठी केवळ संरक्षणखातीच लक्षणीय गुंतवणूक करीत होती. आता मात्र, प्रचंड क्षमतेची आकडेमोड करू शकणाऱ्या नव्या संगणकांमुळे आणि सर्जनशील कृत्रिमप्रज्ञा-सेवादात्यांतील स्पर्धेमुळे सर्जनशील कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले आहे. सामान्य व्यक्तींनासुद्धा ते दैनंदिन उपयोगासाठी, स्वस्तात किंवा मोफत वापरता येऊ लागले आहे. बहुतेक सर्व संकेतस्थळांवर तक्रारनिवारणाच्या पहिल्या पायरीत सर्जनशील कृत्रिमप्रज्ञेचा चॅट-बॉटच ग्राहकांशी संवाद साधतो. अनेक हौशा, नवशा आणि गवशा कंपन्यांनी या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या घोषणा केल्या आहेत. काही चहा किंवा भेळविक्रेत्यांनीही आपल्या ठेल्यांची नावे ‘चाय जीपीटी’ किंवा ‘चाट जीपीटी’ अशी ठेवली आहेत, एवढे हे तंत्रज्ञान सर्व स्तरांपर्यंत पोहोचले आहे.

हेही वाचा : मुंबईच्या रंगविश्वाची बखर

गेल्यावर्षी अमेरिकेतील अभिनेते आणि पटकथालेखकांनी संप केला होता. चित्रपट उद्योगातील तो सर्वाधिक काळ चाललेला संप ठरला. त्यांना अशी भीती होती की कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञानामुळे त्यांच्या रोजगारांवर गदा येईल. सध्या अनेक रेडिऑलॉजिस्ट डॉक्टर एकमेकांची समजूत काढू लागले आहेत की कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञानाने सरसकट सर्व रेडिऑलॉजिस्ट डॉक्टरांच्या नोकऱ्या गेल्या, असे काही घडणार नाही, परंतु कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञान वापरणाऱ्या रेडिऑलॉजिस्ट डॉक्टरांमुळे, हे तंत्रज्ञान न वापरणारे रेडिऑलॉजिस्ट डॉक्टर अडगळीत पडतील.

कोट्यवधी व्यावसायिक वाहनचालकांचे रोजगार पूर्णपणे स्वयंचलित वाहनांमुळे धोक्यात येऊ शकतील. कॉपीरायटिंग आणि कोडिंग करणाऱ्यांच्याही नोकऱ्या सर्जनशील कृत्रिमप्रज्ञेमुळे घटत आहेत. फेक न्यूज, ब्लॅकमेल किंवा निवडणुकांत हस्तक्षेप करण्यासाठीही सर्जनशील कृत्रिमप्रज्ञेचा वापर सुरू झाला आहे. सर्जनशील कृत्रिमप्रज्ञेविषयी सध्या जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या असलेल्या वातावरणाची तुलना, १९३६ सालच्या मॉडर्न टाईम्स या चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटातील, मुव्हिंग असेंब्ली लाईनविषयीच्या कलुषित दृष्टिकोनाशी (vilification) करता येईल.

हेही वाचा : द्वेषाचे सुरेल दूत..

समाजावर दूरगामी परिणाम घडवण्याची क्षमता असलेल्या या विषयाची दखल घेऊन मराठी भाषकांचे शंकानिरसन करण्यासाठी, बृहन्महाराष्ट्र मंडळाने आपल्या द्वैवार्षिक संमेलनात एक परिसंवाद आयोजित केला आहे. कृत्रिमप्रज्ञेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी शास्त्रज्ञांचा हा परिसंवाद अमेरिकेतील सॅन होजे येथे २८ जून रोजी होणार आहे.. सर्जनशील कृत्रिमप्रज्ञा तंत्राची तोंडओळख देऊन, तिच्या निर्मिती आणि प्रशिक्षणातील धोके हे शास्त्रज्ञ सोप्या भाषेत समजावून सांगतील आणि कृत्रिमप्रज्ञा तंत्राची व्याप्ती आणि मर्यादा, नजीकच्या भविष्यात तिच्यामुळे उद्भवू शकणाऱ्या औद्योगिक, आर्थिक, नैतिक, आणि सामाजिक समस्या आणि या समस्यांवरील उपाययोजना यांविषयी भाष्य करतील. ही कदाचित कृत्रिम प्रज्ञेचे तंत्रज्ञान, त्याचे फायदे आणि त्यात दडलेले धोके मराठीतून सोप्या पद्धतीने समजून घेण्याची सुरुवात ठरू शकते.

कृत्रिमप्रज्ञा स्वत:ही चुकू शकते हे स्पष्ट झाले आहे. मानव जसा स्वतःही चुकू शकतो, त्याच्या मनात जसे पूर्वग्रह असू शकतात, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही होऊ शकते, हे वापरकर्त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. या चुका कशा टाळाव्या याचे मार्गदर्शनही मिळविणे आवश्यक आहे. यंत्रवत, प्रवाहपतित आणि अंधश्रद्ध मनोवृत्ती टाकून सजग, सावध आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचा पुरस्कार या परिसंवादात कृत्रिमप्रज्ञेच्या अनुषंगाने करण्यात येईल. संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सिलिकॉन व्हॅलीत या संदर्भात मराठीत चर्चा घडणे हे विशेष आहे.

हेही वाचा : नरेंद्र मोदी एवढे चिंतातूर का झाले आहेत?

‘तुम्हाला नोकरी व्यवसायात मागे पडण्याची भीती वाटते? कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपल्याला नोकरी गमावावी लागेल, असे वाटते? मग अमुक एक अभ्यासक्रम करा आणि जीवनात पुढे जा…’ अशा आशयाच्या जाहिराती रोज आपल्या समाजमाध्यमी फिडमध्ये डोकावत असतात. नव्या संधीवर अनेकांच्या उड्या पडत आहेत, मात्र अशा जाहिरातींना न भुलता प्रमाणित प्रशिक्षकांकडूनच असे अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे.

joshi.nikhil.r@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exploring the future of generative artificial intelligence css
First published on: 27-04-2024 at 08:33 IST