पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील परिस्थिती स्फोटक आहे. बलोच कार्यकर्त्यांची आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात येत आहे. अनेक तरुणांची हत्या करण्यात आली आहे. बलोच लोकांच्या अधिकारांबद्दल बोलणाऱ्या लोकांना पकडण्यात येत आहे. पाकिस्तानची स्थापना झाली तेव्हापासून स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी आंदोलन होत आहे. बलुचिस्तान प्रांत वायू, खनिज इत्यादींनी संपन्न असला तरी त्याचा फायदा स्थानिक लोकांना होत नाही. सर्वात कमी लोकसंख्या असलेला आणि सर्वात गरीब अशी या प्रांताची ओळख आहे. आजही स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे अनेक गट तिथे आहेत. काही पक्ष प्रांताला अधिक स्वायत्ततेची मागणी करत आहेत.
काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बलोच यक-जेहती (एकता) कमिटीच्या (बीवायसी) अलीकडच्या आंदोलनाने पाकिस्तान आणि बलुचिस्तान सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संघटनेचं नेतृत्व प्रामुख्याने महिला करत आहेत. ३१ जुलै रोजी कराची प्रेस क्लबमध्ये जात असताना या संघटनेच्या पाच महिलांसह ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडलं. बलोच प्रश्नांवर ते कार्यकर्ते पत्रकार-परिषद घेणार होते. बीवायसीच्या कार्यकर्त्यांनी परिसंवाद घेऊ नये म्हणून मे महिन्यात पोलिसांनी क्वेटा प्रेस क्लबला टाळं ठोकलं होतं. क्वेटा प्रेस क्लब आणि बलुचिस्तान युनियन ऑफ जर्नालिस्ट्सनी पोलीस आणि प्रशासनाचा निषेध करून आरोप केला होता की पोलिसांनी राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन केलं आहे. बलुचिस्तानात नेमकं काय चाललं आहे, याची लोकांना व्यवस्थित माहिती मिळत नाही. त्याला कारण म्हणजे वर्तमानपत्रात त्यासंबंधी लिहिण्यावर आणि वृत्तवाहिन्यांनी ते दाखवण्यावर ‘बंदी’ आहे.
हेही वाचा – तंत्रज्ञानाधारित उद्योगांसाठीचे धोरण शिक्षणापासून ठरवावे लागेल…
ग्वादर हे बलुचिस्तानचं महत्वाचं बंदर. चीनचा प्रतिष्ठित चायना-पाकिस्तान इकॉनोमिक कॉरिडोर (सीपीईसी) ग्वादर ते चीनच्या क्षिनजियांग प्रांतातील कासघरपर्यंत आहे. चीनने त्यात जवळपास ६५ अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक केली आहे. आता ग्वादर हे प्रचंड मोठं बंदर झाल्यामुळे तिथले पारंपरिक बलोच मच्छिमार उद्ध्वस्त झाले आहेत. स्थानिक बलोच लोकांना बंदराचा किंवा त्यामुळे झालेल्या ‘विकासा’चा फारसा फायदा होत नाही. ग्वादरच्या विकासाची फळं, प्रामुख्याने, पंजाबी लोकांना मिळत आहे. ग्वादर येथे काही अतिरेकी संघटना चीनहून तसंच बाहेरून आलेल्या लोकांवर सतत हल्ले करतात.
२८ जुलै रोजी बीवायसीने ग्वादर इथं जाहीर सभा आयोजित केली होती. पण लोकांनी या सभेसाठी जाऊ नये म्हणून पोलिसांनी प्रचंड अत्याचार केले. गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. या अत्याचाराच्या विरोधात दक्षिण बलुचिस्तानातील मस्तुंग, कलात, खुझदर, पस्नी यासारख्या शहरांमध्ये लोकांनी आंदोलनं केली. अशा परिस्थितीतही डॉ. माहरंग बलोच या महिला नेत्याने ग्वादर इथं घेतलेल्या सभेस हजारो लोक उपस्थित होते. बलुचिस्तान नॅशनल पार्टी (मेंगल) आणि नॅशनल पार्टीने आंदोलनाला पाठिंबा दिला होता. प्रांताची राजधानी क्वेटानंतर ग्वादर हे आंदोलनाचं महत्त्वाचे केंद्र झालं आहे.
अचानक ‘गायब’ होणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांबद्दल आणि बलोच लोकांच्या लोकशाही अधिकाराबद्दल सभेत सांगण्यात आलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग आहे. बीवायसी या संघटनेचं नेतृत्व महिला करत आहेत. त्यातल्या बहुतेक महिलांच्या घरातल्या कोणाचं तरी अपहरण करण्यात आलं आहे किंवा हत्या करण्यात आली आहे. माहरंग व्यावसायिक डॉक्टर आहे. अपहरण करण्यात आलेल्या तरुणांचे मृतदेह काही महिन्यानंतर कुठेतरी जंगलात किंवा गावाच्या बाहेर सापडतात. एका इंग्रजी वर्तमानपत्रात पत्रकार असलेला माझा एक मित्र मध्यंतरी तिथली परिस्थिती समजून घेण्यासाठी एक आठवडा बलुचिस्तानात फिरून आला. बलुचिस्तानची परिस्थिती त्याने त्याच्या संपादकांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याला ‘बलुचिस्तानबद्दल तू काहीही लिहू नकोस’ असं सांगितलं. पाकिस्तान सरकारच्या विरोधात बलुचिस्तानात प्रचंड असंतोष असल्याची माहिती मला त्यानेच दिली होती.
फाळणीच्या आधी आजच्या बलुचिस्तानात कलात नावाचं मोठं संस्थान होतं. १९४७ च्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या एका बैठकीत कलातचे प्रतिनिधी, मोहम्मद अली जिना, लियाकत अली, माउंटबॅटन इत्यादी उपस्थित होते. त्यात कलातला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून पाकिस्तानने मान्यता दिली होती. त्या बैठकीतल्या निर्णयाप्रमाणे १५ ऑगस्टपासून स्वतंत्र कलात अस्तित्वात येईल, असं १२ ऑगस्टला कलातच्या अहमद यार खान यांनी जाहीर केलं. पण, २७ मार्च १९४८ ला पाकिस्तानी लष्कराने कलातवर आक्रमण केलं. खान यांना शरणागती पत्करावी लागली आणि सामिलीकरणाच्या करारावर सही करावी लागली. त्यासोबत कलातचं २२७ दिवसाचं स्वातंत्र्य संपलं. अहमद यार खान यांचा भाऊ करीम खान याला हे मान्य नव्हतं. त्याने बंड केलं. आपल्याला अफगाणिस्तानची मदत मिळेल, अशी करीम खान यांना आशा होती. बलोच आणि पश्तुन (पठाण) विभागाचा पाकिस्तानात समावेश करणं या गोष्टीला अफगाणिस्तानने विरोध केला होता. संयुक्त राष्ट्रांतही पाकिस्तानला सभासद बनवायला अफगाणिस्तानचा विरोध होता. बलोच बंडाची सुरुवात करीमखान यांच्यापासून झाली आणि त्यानंतरही अनेकदा तिथं बंड झालं. १९७३ ते १९७७ या काळात लोक मोठ्या प्रमाणात बंडात सामील झाले होते. १९७४ मध्ये जनरल टिक्का खान यांनी बलोच स्वातंत्र्य आंदोलन चिरडून टाकलं. टिक्का खान यांनी त्यापूर्वी १९७१ मध्ये तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानच्या ढाका येथे बंगाली लोकांची मोठ्या प्रमाणात हत्या केली होती.
सध्या बीवायसीचं नेतृत्व प्रामुख्याने महिला करतात. माहरंग बलोच ठिकठिकाणी फिरून बलोच प्रश्नांबद्दल आणि त्यांच्या अधिकाराबद्दल बोलतात. १२ डिसेंबर २००९ मध्ये माहरंग यांचे वडील अब्दुल गफूर यांचं सुरक्षा जवानांनी अपहरण केलं होतं. माहरंग तेव्हा १६ वर्षाच्या होत्या. वडिलांना शोधण्याच्या प्रक्रियेत त्या राजकीय कार्यकर्त्या झाल्या. २०२२ च्या जुलै महिन्यात अब्दुल गफूर यांचा मृतदेह सापडला. त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आल्याचं दिसत होतं. २०१७ मध्ये माहरंगच्या भावाचं अपहरण करण्यात आलं. तीन महिने त्याला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. माहरंग क्वेटा येथील बोलान मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाल्या आहेत. २०१७ मध्ये बलुचिस्तानात लांब राहणाऱ्या लोकांसाठी मेडिकल कॉलेजात ठेवण्यात आलेलं आरक्षण दूर करण्यात आलं. माहरंग यांनी त्याला विरोध केला होता. शेवटी सरकारला आरक्षण परत सुरू करावं लागलं.
सामी बलोच (२६) हिचे वडील डॉ. मोहम्मद बलोच यांचं १०-१२ वर्षांपूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अपहरण केलं होतं. २०१४ मध्ये मामा कादीर यांच्यासोबत सामी हिने क्वेटा ते इस्लामाबाद पदयात्रा केली होती. अपहरण करण्यात आलेल्या लोकांना मुक्त करा आणि पोलीस किंवा आयएसआयकडून होणारे अपहरण थांबवा अशी त्यांची मागणी होती. तेव्हा मुंबईच्या मीना मेनन यांच्यासह दोन भारतीय पत्रकार पाकिस्तानातून भारतीय वर्तमानपत्र आणि न्यूज एजन्सीचं काम करत होते. मामा कादीर यांची मुलाखत आणि त्यांच्या लाँग मार्च संबंधित बातम्या दिल्याबद्दल पाकिस्तानने त्या दोघांची हकालपट्टी केली होती. आपल्या वडिलांना पाकिस्तानने मुक्त करावं, अशी आजही सामींची मागणी आहे.
हेही वाचा – विद्यावेतन हा ‘विद्ये’ला पर्याय आहे का?
बलोच लोकांच्या नरसंहाराच्या विरोधात बीवायसीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बलुचिस्तान ते इस्लामाबाद लाँग मार्च काढला होता. त्यातही माहरंग पुढे होत्या. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मोला बक्ष नावाच्या बलोच तरुणाच्या हत्येनंतर हा लाँग मार्च काढण्यात आला होता. मोला बक्ष याला २० नोव्हेंबरला पोलिसांनी अटक केली होती. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. २३ तारखेला एका चकमकीत मोला बक्ष याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी म्हटलं. पण त्यावर बलोच लोकांचा विश्वास नव्हता. मोला बक्ष यांच्या घरच्या लोकांचं म्हणणं होतं की पोलिसांनी त्याला ऑक्टोबर महिन्यात पकडलं. बलुचिस्तान प्रांतातील पाकिस्तान पीपल्स पार्टीचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुग्टी यांनी आरोप केला आहे की बलोच समाजातील काही लोकांचं आंदोलन हे चीन-पाकिस्तान इकॉनाॅमिक कॉरिडोरच्या विरुद्धचं षड्यंत्र आहे.
बलोच महिलांच्या या आंदोलनाला बलुचिस्तानात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने पाकिस्तान सरकार, आयएसआय आणि लष्करासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अत्याचाराने आंदोलन संपवता येत नाही. बलोच समाजात आधीपासूनच पाकिस्तानच्या विरोधात तीव्र भावना आहे. आज माहरंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सगळे बलोच आहेत. पाकिस्तानने बलोच आणि पश्तुन तरुणांचं अपहरण करण्याचं धोरण थांबवून त्यांच्याशी संवाद केला पाहिजे.
jatindesai123@gmail.com
© The Indian Express (P) Ltd