प्राण्यांनी जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेतला, तर काय होऊ शकेल, याची झलक दर्शविणारे काल्पनिक टिपण…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अवतीभवती म्हणजे जंगलाच्या बाहेरील जगात कृत्रिम बुध्दिमत्तेची चर्चा असताना, जंगल मंगल विद्यापीठ स्वस्थ बसणे अशक्यच होते. आपापसातील सत्ता संघर्षामुळे प्रशासनात अस्थिरता निर्माण झाली होती खरी. सिंह अन् वाघ यांच्यात सत्ता शेअर करण्याचा करार झाला असला, त्यांचे विविध प्राधिकरणांत जागा वाटप ठरले असले, तरी अधून मधून धुसफूस सुरू होतीच. अनेक निर्णय प्रलंबित राहत होते. प्रत्येक प्राणी वर्गात कळप निर्माण झाले होते. एकमेकांच्या कळपात हेर पेरले जात होते. इकडची माहिती तिकडे, तिकडची माणसे इकडे अशी सारखी जा ये सुरू असल्याने कोण कुठल्या कळपात हे सांगणे कठीण झाले होते. कुणाचा कुणावर विश्वास राहिलेला नव्हता. त्यातही काही बुध्दिजीवी प्राण्यांचे म्हणणे असे होते की, बाहेरच्या मानवी जगाची हवा आपल्या जंगलालादेखील लागली आहे. व्हायरस पसरतो तशी! आपणही माहिती जालात फसत चाललो आहोत. आपले आपल्यावर नियंत्रण राहिले नाही. कुणीतरी अदृश्य शक्ती आपला ताबा घेऊ पाहतेय. आपल्यावर नियंत्रण ठेवू पाहतेय. आपल्याला ती शक्ती दिसत नाही. तरीही आपले आपल्यावरील नियंत्रण कमी होत चालले आहे.
हे प्रथम कुत्र्याच्या, अन् कोल्ह्याच्या लक्षात आले. ही मंडळी माणसाच्या जगात रात्री बेरात्री फिरत होती. त्यांच्याही लक्षात आलं. जे माणसाच्या समाजात सुरू आहे, ते हळूहळू प्राण्यांच्या कळपात शिरते आहे. आपल्यातील पूर्वीसारखी एकी कमी होत चालली आहे. पूर्वी सहकाराची भावना होती. मिळून मिसळून कामे व्हायची. एक जण दुसऱ्यावर अवलंबून होता. भांडणाने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. ते सामंजस्याने,बोलून चर्चा करूनच सुटतात. यावर सर्वांचा विश्वास होता.आता माणसे एकमेकाकडे संशयाने बघतात. वर चढायचे तर दुसऱ्याचे एक तर पाय ओढले पाहिजे, त्याला खाली खेचले पाहिजे, मग त्याच्या खांद्यावर चढून आपली उंची वाढवली पाहिजे. यासाठी वाटेल ते छळ कपट करावे लागले तरी हरकत नाही. माणूस पुस्तकातील मंत्रांकडून संगणकाच्या तंत्राकडे वळला. त्याला जाणवले, संगणक म्हणजे कमाल आहे. आपल्या बुध्दीपेक्षाही वरचढ आहे. ज्या गुंतागुंतीच्या कामाला माणसाला महिने, वर्ष लागतात, ते काम हा संगणक त्याला शिकवलेल्या भाषेत पटकन करतो! शिवाय या प्रचंड माहितीचे हा संगणक अचूक विश्लेषणदेखील करतो.
मानवी समाजातील, वैज्ञानिकांच्या टोळीतील या चर्चा आता जंगल मंगल विद्यापीठात पोहोचल्या होत्या. तेव्हा काही बुद्धिजीवी प्राण्यांनी ठरवले. आपण मागे राहायला नको. आपणही हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रकरण समजून घेतले पाहिजे. त्यांनी हा विषय कुलगुरू सिंहाला समजावून सांगितला. उपकुलगुरू वाघांनी तो शिक्षण परिषदेत मांडला. मग तातडीची सिनेट बैठक बोलवून एआय या विषयावर चर्चा करण्यासाठी एक परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी कोल्हा, कुत्रा, माकड, जिराफ, उंट, गरुड, अजगर अशा निवडक मंडळींनी चर्चेसाठी विषय निवडीचे काम हाती घेतले. सर्वांचे म्हणणे असे होते की बुध्दी, विवेक, शहाणपण, विज्ञान, तंत्रज्ञान याचा ठेका आपणच घेतला आहे, अशी मानव जातीची (चुकीची) समजूत झालेली आहे. सर्व प्रथम तिला छेद दिला पाहिजे. आम्ही जंगलातले प्राणी काही कमी नाही हे दाखवून दिले पाहिजे. आपल्या कृतीने, कर्तृत्वाने सिध्द केले पाहिजे.
खरे तर या माणसांनीच आपल्या जंगलावर, निसर्गावर, आपल्या जगण्यावर अतिक्रमण केले. सुरुवातीला आपली शिकार करून तो पोट भरायचा इथपर्यंत ठीक आहे. पण शेती करायला,धान्य,भाजीपाला उगवायला शिकल्यानंतरही तो आपल्याला मारून जगतो. आपले जगणे मुश्कील करून सोडतो. नद्या,समुद्र,पर्वत सगळीकडे यांनी प्रदूषण माजवले आहे. आपले जिणे मुश्कील करून सोडले आहे. आता माणसाने आपली बुध्दी सोशल मीडिया कडे, संगणक, इंटरनेट, गुगल, फेसबुककडे गहाण टाकली आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ॲपच्या जाळ्यात तो पुरेपूर फसत चाललाय. हीच ती वेळ. आपणही असे काही नवे ॲप, अल्गोरिदम् शोधून काढू की त्याचेही जिणे कठीण होऊन बसेल. म्हणजे त्याने काउंटर मेजर केले तर आपण काउंटर काउंटर मेजर करू.
कागदापासून इमारतीपर्यंत, फर्निचर, किचन… अशा सर्व ठिकाणी आपली जंगले ओरबाडून, आपल्या रम्य निसर्गाचा सत्यानाश करून ही मानव जात शेफारली आहे. आता त्यांची मस्ती उतरविण्याची वेळ आली आहे. माणसाच्या बुध्दीला आव्हान देणे ही आपल्या तंत्रपरिषदेची थीम असली पाहिजे.
आपल्या अवतीभवती वाढलेले उद्योग, आकाशाला भिडणाऱ्या इमारती, त्यामुळे निर्माण होणारा कचरा, वायू, जल प्रदूषण या सगळ्यांवर आपण आताच मात केली नाही तर उद्या जंगलात प्राणी, आकाशात पक्षी, नद्यांत जलचर शिल्लक राहणार नाहीत. हा फार मोठा धोका आहे. आपण आता असे आगळे वेगळे नेटवर्क तयार करायला हवे जे अशा मानवी संहारक प्रवृत्तींना भेदून छेद देतील. त्यावर वेळीच, खरे तर वेळे पूर्वीच मात करतील. या विषयावर आपल्याला एक सत्र घेता येईल.
माणसाच्या संवेदना आता बधीर झाल्या आहेत. एआयसारख्या नव्या नशेने हळूहळू त्याचा ताबा घेतला आहे. तो आळशी, निरुपयोगी होत चालला आहे. अशा जाती काही काळात निरर्थक ठरतात. हीच ती वेळ,माणसाला धडा शिकवण्याची. त्याची जागा त्याला दाखवून देण्याची! माणूस स्वतः निशस्त्र होत चालला आहे. सगळे क्षमता संगणकाने स्वतःकडे घेतले आहे. एआय सारखे तंत्रज्ञान असे आहे जिथे रिव्हर्स गियर नाही. म्हणजे परतीचा मार्ग नाही. अशा हतबल, निष्क्रिय माणसाला कोंडीत पकडणे सोपे राहील. कुस्ती सारख्या खेळात अशाच धोबीपछाड ट्रिक्स वापरतात. आपण यासाठी एखादे तंत्रज्ञान सहज शोधू शकतो.
जुन्या काळात आपणच यांचे सर्व दळण वळण सांभाळले आहे. इथून तिथे संदेश पोहोचविण्याचे काम पक्षानी केले आहे. हत्ती, घोडे, उंट, गाढव, बैल यांचाच वापर माल वाहतुकीसाठी झाला आहे. गाय, बैल यांनी शेती सांभाळली आहे, पण आज जिथेतिथे तंत्र, यंत्र त्यामुळे हे आपल्याला विसरले. एकूणच माणूस कृतज्ञता भाव विसरला आहे. त्याने अफाट प्रगती केली. तो आकाशात, चंद्रावर जाऊन पोहोचला, त्याने आश्चर्य कारक शोध लावले. हे सारे खरे. पण आता तो परमेश्वराच्या नैसर्गिक निर्मिती प्रक्रियेत दखल देतो आहे. आपण ईश्वराच्या वरचढ आहो हे दाखवण्याचा, सिध्द करण्याचा त्याचा अट्टहास आहे. तो मात्र त्याच्याच अंगावर उलटणार आहे. हे त्याला कळत नाहीय. इथे आपण त्याच्यावर मात करू शकतो. आपण या परिषदेत हे सिध्द करू शकतो की माणूस शिकला, मोठा झाला, प्रगत झाला. पण शहाणा झाला नाही.
आपण या परिषदेत चर्चा करू या की ज्या चुका माणसाने केल्या, करतो आहे, त्या चुका आपण करायच्या नाहीत. आपण वेळीच सावध व्हायचे. शहाणे व्हायचे. एआय वापरायचे, पण त्या तंत्रज्ञानाला आपल्यावर अतिक्रमण करू द्यायचे नाही! दोऱ्या आपल्या हातात ठेवायच्या. कारण आपल्याला काय हवे ते फक्त आपल्यालाच चांगले समजते. माणसाच्या बाबतीत त्याला काय हवे, त्याने काय करायचे हे एआय ठरवत आहे! त्यामुळे माणसाच्या हातात करण्यासारखे काहीच उरणार नाही. आपल्याला असे निष्क्रिय व्हायचे नाही. कठपुतळ्या व्हायचे नाही. हीच आपल्या एआय परिषदेची थीम, टॅग लाईन असली पाहिजे.
सर्वांना हे पटले. सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या गेल्या. जंगल मंगल विद्यापीठात उत्साहाचे वारे वाहू लागले. नव्या वर्षाच्या प्रारंभी परिषद घ्यायचा ठराव एकमताने पास झाला. वाघ सिंहाच्या युतीचे प्रशासन कामाला लागले!
—–
vijaympande@yahoo.com