शरदमणी मराठे
स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा विचार करताना स्वातंत्र्यलढा, समकालीन सामाजिक सुधारणांचे प्रयत्न, आर्थिक- वैज्ञानिक स्वावलंबनाचा आग्रह आणि प्रयत्न हे जसे आक्रमकांच्या विरुद्धचे थेट संघर्ष होते तसेच ते आक्रमकांच्या वसाहतवादी वृत्तीच्या विरोधात केलेले प्रयत्नही होते. त्यातील सामाजिक सुधारणांसाठीचा आग्रह काळाच्या ओघात स्वकीय समाजात आलेल्या दोषांच्या निराकरणासाठीदेखील होता. सामाजिक सुधारणांची मांडणी करताना काही समाजसुधारक भारतीय धार्मिक व पारंपरिक उदात्त मूल्यांची समाजाला आठवणही करून देत होते. त्या मूल्यांच्या विस्मरणामुळे वा त्या शिकवणीशी विसंगत वर्तनामुळे समाज व्यवस्थेत दोष निर्माण झाले आहेत, ही मांडणी देखील समाज सुधारक करत होते. त्यामुळे वसाहतवादविरोधी लढ्यात आत्मचिंतन आणि पाश्चात्य विरुद्ध भारतवर्षीय असे वैचारिक वाद सुरुवातीपासूनच चालत आले आहेत. त्यात काही नवीन नाही.
या संदर्भात, ‘‘वसाहतवाद-विरोधा’च्या नावाखाली नेमके काय चालले आहे?’ या लेखातील एका मुद्द्याच्या प्रतिवादासाठी लिहीत आहे. त्या लेखात एके ठिकाणी प्रताप भानू मेहता म्हणतात… “पहिले दोषस्थळ म्हणजे ‘पाश्चिमात्त्य विरुद्ध भारतवर्षीय (इंडिक)’ यांचे जणूकाही वैचारिक द्वंद्वच झाले पाहिजे, असे हे युक्तिवाद मानतात. पाश्चात्य ‘आधुनिकतावाद’ हे पाश्चात्य मध्ययुगीन विचारांविरुद्ध बंडच होते, हे सत्य इथे सोयिस्करपणे विसरले जाते!”
त्यांच्या विधानातील दुसरा मुद्दा आहे तो ‘पाश्चात्य आधुनिकतावाद हे पाश्चात्य मध्ययुगीन विचारांविरुद्ध बंड होते’ याबद्दलचा. हे विधान योग्यच आहे. वादाचा वा विरोधाचा मुद्दा निर्माण होतो कारण पाश्चात्य आधुनिकतावाद व तेथील मध्ययुगीन विचार यांतील संघर्षाच्या इतिहासाचे आकलन काही भारतीय अभ्यासकांना कसे झाले आणि तीच मांडणी भारतीय ऐतिहासिक काळावर आरोपित कशी केली यामुळे.
पाश्चात्य भागात ज्याचा ‘मध्ययुगीन कालखंड’ असा उल्लेख होतो त्या काळातील दोषांचे कारण चर्चच्या ‘रिलीजस’ आणि शासकीय सर्वंकष सत्तेत होते. ते दोष अचानक वा आपोआप निर्माण झाले का? माझ्या मते पंथविस्तार आणि राज्यविस्तार या दोनही त्या पांथिक शिकवणीच्याच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोषांबद्दल चिकित्सा करणे भारतीय अभ्यासकांनी टाळले.
‘ब्राह्मणशाही’ हे वसाहतवाद्यांचे तर्कट
चर्चची सर्वंकष सत्ता जशी होती, तेच प्रतिमान भारतालाही लावण्याचा खटाटोप करण्यात आला आणि तिथे जशी ‘चर्च-शाही’ किंवा ‘पोप-शाही’ होती तशी भारतात ‘ब्राह्मणशाही’ होती असे तर्कट मांडण्यात आले. वस्तुत: पश्चिमी वसाहतवादी काळाच्या आधीपासून भारतात बहुतांश भागात मुघल आक्रमकांचे वा त्यांच्या मांडलिकांचे राज्य होते. १७ व्या शतकानंतर पाश्चात्य वसाहतवादी राष्ट्रांनी भारताचा राजकीय ताबा घेतला. मुख्यत: इंग्रज आणि काही ठिकाणी फ्रेंच, पोर्तुगीज अशा लोकांनी. या सगळ्या धुमश्चक्रीच्या काळात अनेक ठिकाणी एतद्देशीय राजवटीदेखील काही काळ होत्या, पण त्यात ब्राह्मण राजांचे प्रमाण अत्यल्प होते, अल्प काळ होते. उलट राज्यकर्त्यांत विविध प्रकारच्या जातींचा अंतर्भाव होता. अगदी आज ज्यांचा उल्लेख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती, अन्य मागासवर्गीय (ओबीसी) असा केला जातो अशा जातींच्या राजांच्या राजवटी होत्या, असे लक्षात येते.
बाहेरून वसाहतवादी विचारानेच येणाऱ्या आक्रमक लोकांनी असे ‘ब्राह्मणशाही’ वगैरे आरोप केले त्यात त्यांचे निहित स्वार्थ होते. पण आपल्या देशातीलही अनेक अभ्यासकांनी त्यांची री ओढली आणि ब्राह्मणशाही नावाचे कल्पित इतिहास म्हणून डोक्यावर येऊन बसले. याचा अर्थ सामाजिक जीवनात दोष नव्हते असे नाही. जाती व्यवस्थेच्या उतरंडीमुळे निर्माण झालेली उच्च-नीचतेची भावना, अस्पृश्यता हे दोष होते. वसाहतवादी लोक येण्याच्या आधी व नंतर या दोषांबद्दल स्पष्ट उच्चार होत, बदलाचा आग्रह देखील होत होता. पण ब्राह्मणशाही अशा विशिष्ट नामकरणामुळे ‘समाजातील दोष हे सर्व प्रयत्नाने दूर केले पाहिजेत’ अशी एकजुटीची भावना निर्माण होण्याऐवजी एक विरुद्ध दुसरा अशी संघर्षाची व वितुष्टाची मांडणी झाली. वसाहतवादी आक्रमकांसाठी हे सोयीचेच होते. इथल्या काही अभ्यासकांनीही कळत- नकळत त्याला हातभार लावला.
युरोपात १७ व्या शतकात राष्ट्र-राज्यांची निर्मिती झाली त्याचेही तसेच आरोपण भारताच्या परिस्थितीशी करून ‘भारत नावाचा एकसंघ- एकछत्री देश कधीच नव्हता’ असे सांगितले गेले. त्यामुळे भारत किंवा इंडिया यावाची राष्ट्र कल्पना वसाहतवादाची एक प्रकारे देणगी आहे, अशी मांडणी सुरू झाली. त्यातून ‘वुई आर नेशन इन मेकिंग’ अशासारखी नकारात्मक व असत्य मांडणी होऊ लागली. त्यातून भारतवर्ष नावाच्या प्राचीन राष्ट्रकल्पनेला नाकारण्यात आले. अशा कल्पितांचा आणि भ्रमाचा सामना करणे वसाहतवादविरोधी लढ्याचे ध्येय असण्यात चूक ते काय?
म्हणून आपलाही कालखंड काळाच?
भारतातील समाज सुधारणेच्या काळाची देखील युरोपातील रेनेसाँशी तुलना करण्याचे प्रयत्न सुरुवातीला वसाहतवादी आक्रमकांनी आणि नंतर इथल्या ‘गहूवर्णी’ साहेबबहाद्दुरांनी केले. पण ज्या कृष्ण कालखंडानंतर रेनेसाँ युरोपमध्ये आला त्या अर्थी भारतातही सुधारणांच्या आधीचा काळ कृष्ण कालखंड असणारच असे गृहीत धरून मांडणी करण्यात आली. प्रत्यक्षात भारतात तर समृद्धीचा कालखंड होता. अन्यथा भारताचा शोध घेण्याचा आटापिटा पश्चिमेतील पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रांस आदि राज्यांनी करण्याचे कारण काय होते? १६०० मध्ये स्थापन झालेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ चा हेतू “भारताचा कृष्ण कालखंड संपवून भारतीयांना रेनेसाँ चा प्रकाश दाखवून त्यांचा उद्धार करावा” असा काही होता की काय?
त्यामुळे वसाहतवाद विरोधी लढा सुरूच राहणार आहे आणि भारतीयत्वाचा शोध परिपूर्ण करत केवळ भारत देशालाच नव्हे तर जगालाही अधिक मानवी आणि अधिक निसर्गानुकुल जीवनपद्धतीचा मार्ग दाखवणे ही काळाची गरज आहे.
sharadmani@gmail.com