वसंत व्ही. बंग

आलिशान बंगला, त्याच्या दारात महागडी वाहने आणि बँक खात्यातील गडगंज रक्कम यापलीकडे गेल्यानंतर सामाजिक संपत्तीचीखरी व्याख्या सुरू होते. साधन आणि साध्य यांच्यात गल्लत केल्यामुळे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही की पैसा हे साध्य नसूनमानवी आणि सामाजिक गरजांची पूर्तता हे साध्य आहे…

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?

संपत्ती या शब्दाचा प्रचलित अर्थ म्हणजे पैसा, जमीन-जुमला, महागड्या वस्तू व तत्सम. पण संपत्तीचा खरा अर्थ आहे, एखाद्या व्यक्ती व समाजाच्या गरजा भागविण्याचे माध्यम. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, संभाषण, दळणवळण, ऊर्जा, सुरक्षा, मैत्री, नातेसंबंध, आत्मसन्मान, आदर, आत्मबोध, आपल्या क्षमतेचा वापर या माणसाच्या मूलभूत गरजा ज्या माध्यमांतून पूर्ण होऊ शकतात, ती माध्यमे म्हणजे संपत्ती. एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असूनसुद्धा त्याच्या अशा गरजा पूर्ण होत नसतील, तर तो पैसा फक्त कागदाचा साठा म्हणून उरतो. याविरुद्ध काही गरजा या पैसे नसतानासुद्धा पूर्ण होतात, उदाहरणार्थ नातेसंबंध, सन्मान, आदर वगैरे. म्हणून पैसा ही संपत्तीची अत्यंत संकुचित व्याख्या आहे.

हेही वाचा >>> मग करून दाखवा पुष्पक विमानाची निर्मिती, पाठवा सूक्ष्म देह चंद्र-मंगळावर!

मुळात संपत्तीची संकल्पना फक्त वैयक्तिक नसून सामाजिक आहे. कामाची विभागणी केल्याने समाजाच्या गरजा जास्त चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकतात, हे प्रख्यात अर्थतज्ज्ञ अॅडम स्मिथने निदर्शनात आणून द्यायच्या आधीपासून माणसाने ओळखले होते. हीच समज व्यवसाय या संकल्पनेच्या मुळाशी आहे. जो कोणी समाजाला लागणाऱ्या वस्तू व सेवा पुरवितो तो पैसे कमविण्याच्या पलीकडे जाऊन समाजाच्या गरजा भागविण्याचे काम करत असतो. याव्यतिरिक्त तो रोजगार पुरवितो व सरकारी तिजोरीत कराच्या रूपानेसुद्धा आपला वाटा उचलत असतो. म्हणून प्रत्येक व्यवसाय हा समाजासाठी संपत्तीची निर्मिती करत असतो.

परंतु भारतासारख्या आपल्या देशात एक खूप मोठा घटक असा आहे ज्याच्याकडे बाजाराच्या अर्थव्यवस्थेत सहभागी होण्याची क्षमता नगण्य आहे. असे नसते तर सरकारला कोट्यवधी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवण्याची गरजच पडली नसती. समाजातील काही व्यक्ती अशा वंचित वर्गाच्या विभिन्न गरजा भागविण्यासाठी स्वत:चे काम झोकून देऊन करताना दिसतात. अशी अनेक स्तुत्य उदाहरणे देता येतील. मदर टेरेसा, बाबा आमटे, त्यांचे सुपुत्र, डॉ. अभय व राणी बंग, डॉ. रवींद्र कोल्हे, चेतना गाला सिन्हा व इतर बरीच मंडळी हे काम हिरिरीने करत आहेत. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अभय आणि राणी बंग, डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे जेव्हा गडचिरोली किंवा मेळघाटसारख्या दुर्गम भागांत आदिवासी व इतर उपेक्षित, वंचित घटकांना वैद्याकीय सेवा पुरवतात तेव्हा मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसारख्या मोठ्या शहरांमध्ये वैद्याकीय व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याची संधी त्यांनी स्वत:हून सोडून दिलेली असते. संपत्तीचा ‘वैयक्तिक पैसा’ अशा दृष्टिकोनातून विचार केला, तर या व्यक्तींकडे नगण्य संपत्ती आहे, असे वाटू शकते, परंतु संपत्ती म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक गरजा भागविण्याचे माध्यम म्हणून जर बघितले तर या व्यक्तींनी खूप मोठी संपत्ती निर्माण केली आहे, हे लक्षात येईल. ही संपत्ती त्यांची स्वत:ची क्षमता वापरण्याची किंवा स्वत: आंतरिक आनंद प्राप्त करण्याची गरजा तर भागवत असतेच, पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, ती समाजातील वंचित वर्गाच्या गरजा भागविण्यासाठीही उपयुक्त ठरते. अशा संपत्तीकडे आपण सामाजिक संपत्ती म्हणून बघणे उचित ठरेल.

पैसा हे केवळ एक साधन

साधन आणि साध्य यांच्यात गल्लत केल्यामुळे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही की पैसा हे साध्य नसून मानवी आणि सामाजिक गरजांची पूर्तता हे साध्य आहे. पैसा हे एक साधन आहे, परंतु गरजा पूर्ण करण्याचे ते एकमेव साधन नक्कीच नाही. असे नसते तर महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्यासारखी माणसे अत्यंत समर्पक जीवन जगू शकली असती का? गरजा पूर्ण करण्याच्या माध्यमांना संपत्ती का बरे म्हणावे, असे प्रश्न आपल्याला पडू शकतात. याचे साधे उत्तर असे की एखाद्या गोष्टीचा अपेक्षित अर्थ लावण्यात शब्दांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जंगलात उभे आयुष्य व्यतीत करणाऱ्यांना आदिवासी म्हणावे की वनवासी या विषययावरील मतमतांतरे शब्दांच्या महत्तेची द्याोतक आहेत.

संपत्तीची व्याख्या व्यापक हवीे

संपत्ती हा शब्द संपन्नतेशी निगडित असला तरी सामान्य माणूस संपन्नता ही फक्त पैशांतच मोजत असतो. म्हणूनच आजकाल महाविद्यालयांची निवड करताना किती पगाराची नोकरी मिळू शकेल, हा निकष सर्वांत महत्त्वाचा ठरतो. नोकरीचे स्वरूप काय असेल, शिकण्याच्या संधी काय असतील, काम आनंददायी असेल का, परिवारासाठी वेळ देऊ शकणार का वगैरे मुद्दे बहुतांश लोकांसाठी नोकरी व व्यवसाय निवडताना दुय्यम ठरतात. लग्न जुळवतानासुद्धा मुलगा किंवा मुलगी किती कमावतो/ कमावते याला, आजकालच्या भाषेतला ‘पॅकेज’ला अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झाले आहे. ही मानसिकता बदलायची असल्यास संपत्तीची व्याख्या परिपूर्ण आणि व्यापक करणे महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा >>> बिहारची जातीय जनगणना राजकीय बदल घडवू शकेल ?

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय आणि राणी बंग व चेतना गाला सिन्हा यांच्या पुढच्या पिढीनेसुद्धा समाजकार्याचा वसा पुढे चालविला आहे. डॉ. आनंद व अमृत बंग आणि प्रभात सिन्हांसारखे तरुण उच्चशिक्षित असून, परदेशात उपलब्ध असलेल्या संधी सोडून गडचिरोली व म्हसवड- सातारा यांसारख्या ग्रामीण भागांत जेव्हा समाजकार्यात स्वत:ला वाहून घेतात तेव्हा त्यांच्या संपन्नेतेचे मोजमाप पैशांत करू पाहणारे स्वत:चीच फसगत करून घेत असतात. त्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक संपत्तीचे मोजमाप केल्यास ते अत्यंत संपन्न आयुष्य जगत आहेत, असे आपल्या लक्षात येईल.

सामाजिक संपत्ती ही कल्पना नसून समाजाच्या जगण्यासाठीची आवश्यक बाब आहे. प्रत्येक मनुष्य हा फक्त आपले शरीर म्हणजे दोन हात, दोन पाय, एक डोके, एक हृदय व एक पाठीचा कणा घेऊनच जन्माला येतो. जमीन, हवा, पाणी हे निसर्गाने कुठल्या विशिष्ट व्यक्तीच्या नावे लिहून ठेवलेले नव्हते. या निसर्गाच्या देणगीवर सगळ्यांचा हक्क आहे. जर एखाद्याला आलिशान बंगला हवा असेल, मोठी मोटारगाडी चालवायला मोठाले रस्ते हवे असतील, प्यायला शीतपेये हवी असतील, वातानुकूलित थंडगार हवा असेल, तर तो या निसर्गाने संपूर्ण समाजाला दिलेल्या देणगीतूनच हे सारे मिळवणार असतो आणि याचे भान त्याला असायलाच हवे. निसर्गाच्या देणगीच्या दृष्टीने समाजात माणसांपलीकडे पशू-पक्षीच नव्हे तर फुले-झाडेसुद्धा आहेत. त्यांच्यातील काही घटक एखाद्या विशिष्ट कालखंडात बाजार व्यवस्थेत मागे पडले तरी त्यांच्याशी आपले काही घेणे-देणे नाही, असा समज जर कोणाचा असेल, तर तो चुकीचा आहे. निसर्गाच्या देणगीच्या त्यांच्या वाटेवर कोणी डल्ला मारला नसेलच, असे समजणे शुद्ध भाबडेपणाचे ठरते. म्हणून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना फुकटचे प्रयत्न म्हणून संबोधणे कितपत योग्य आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. समाजाच्या, विशेष करून वंचित वर्गाच्या गरजा जो पूर्ण करतो मग ते सरकार असेल किंवा सामाजिक संस्था किंवा जागरूक नागरिक ते या प्रयत्नांद्वारे सामाजिक संपत्तीचीच निर्मिती करतात.

लेखक पुणेस्थित शिक्षण व व्यस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.

vasantvbang@gmail.com