उस्ताद झाकीर हुसेन, बासरीवादक राकेश चौरसिया, शंकर महादेवन, सेल्वागणेश विनायकराम आणि गणेश राजगोपालन या पाच भारतीय कलाकारांनी यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये आपली मोहोर उमटवली… जगात सर्वांत दीर्घकाळ अस्तित्वात असलेल्या भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांना ग्रॅमी पुरस्कारात यंदा मिळालेले भरीव स्थान कौतुकास्पद असले, तरीही ज्या कारणासाठी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत, ते भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताच्या अनोख्या संमिश्रणासाठी आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. ग्रॅमी पुरस्कारांमध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांना तीन व सर्वोत्कृष्ट बासरीवादक राकेश चौरसिया यांना दोन पुरस्कार मिळाले तर शंकर महादेवन, सेल्वागणेश विनायकराम आणि गणेश राजगोपालन यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘शक्ती’ या बँडने प्रसिद्ध केलेल्या ‘धिस मोमेंट’ या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. त्यामध्ये सहभागी झालेल्या भारतीय संगीतकारांचाही या पुरस्कारात समावेश आहे. भारतीय संगीतात हिंदुस्तानी आणि कर्नाटक अशा दोन पूर्ण भिन्न वाटतील अशा संगीत संस्कृती आहेत. मात्र त्या दोन्हींचे मूळ ‘मेलडी’ याच तत्त्वावर आधारित आहे. ‘धिस मोमेंट’ या अल्बममध्ये या दोन्ही संगीतशैलींचा संकर पाश्चात्त्य संगीतातील ‘झॅज’ या ‘हार्मनी’ तत्त्वावर आधारित असलेल्या शैलीशी घडवून आणण्याची सर्जनशीलता या बँडचे प्रमुख जॉन मॅक्लुलिन यांनी सिद्ध केली. त्यांचे अभिनंदन अशासाठी करायचे, की त्यांच्या या अल्बममध्ये या तीन संगीत शैलींचा अतिशय सुंदर मिलाफ झाला आहे.
भारतीय संगीताची ओळख घडवून आणण्याचे श्रेय पंडित रविशंकर या सिद्ध सतारवादकाकडे जाते. त्यांचे तबल्याचे संगतकार उस्ताद अल्लारखा यांच्या साह्याने जगाला भारतीय संगीताची नुसती ओळखच नव्हे, तर त्या संगीताच्या प्रेमात पाडण्याचे सामर्थ्य रविशंकर यांच्या सर्जनात होते. ते अमेरिकेतच स्थायिक झाले आणि त्यांनी तेथील संगीतशैलीबरोबर नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि एका नव्या ‘फ्युजन’चा जन्म झाला. त्यानंतर उस्ताद अली अकबर खाँ हे सरोदवादक हेही अमेरिकावासी झाले. पाठोपाठ उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासारखे सिद्धहस्त तबलावादकही त्या देशात आपले बस्तान बसवू लागले. यहुदी मेन्युहिन यांच्यासारख्या पाश्चात्य प्रतिभावानाने म्युझिक कंडक्टर म्हणून जी जागतिक मान्यता मिळवली, ती केवळ कष्टसाध्य नव्हती. त्याला सर्जनाची जोड होती. भारतीय संगीतकारांबरोबर परिचय झाल्यानंतर त्यांनी केलेला भारतीय संगीताचा अभ्यास अधिक महत्त्वाचा ठरला. या सगळ्या कलावंतांनी भारतीय संगीताची नाळ तुटू न देता, सातत्याने नवे प्रयोग केले. त्याचा एक चांगला परिणाम असा झाला, की भारतीय संगीताच्या दीर्घ परंपरेची ओळख जगाला झाली. वास्तविक ‘मेलडी’ आणि ‘हार्मनी’ या दोन भिन्न पद्धतींचा संकर कलात्मकतेने घडवून आणण्यासाठी दोन्ही शैलीतील प्रतिभावानांनी एकत्र येण्याची गरज होती. ती या कलावंतांनी साध्य केली आणि त्यामुळेच ‘फ्युजन’ या संगीत प्रकारालाही जगन्मान्यता मिळत गेली.
हेही वाचा : इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे शिल्पकार
ग्रॅमी पुरस्कार मिळालेले शंकर महादेवन हे कर्नाटक संगीत शैलीचे कलावंत. त्यांनी या शैलीचा हिंदुस्थानी संगीत शैलीबरोबर जो कलात्मक प्रयोग केला, तो फारच महत्त्वाचा होता. बॉलिवूडच्या संगीतात त्यांनी केलेले प्रयोग रसिकांनी डोक्यावर घेतले. याचे कारण या प्रयोगात भारतीयत्व भरून राहिलेले होते. संगीतकार आणि गायक म्हणून शंकर महादेवन यांनी आपली वेगळी छाप उमटवली, हे खरेच. परंतु ए. आर. रहमान यांच्यासारख्या सर्जनशील संगीतकाराने त्यापूर्वीच या दोन्ही शैलींना एकत्र आणून अतिशय महत्त्वाचे प्रयोग केले. त्यांच्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील गीताला ऑस्कर पुरस्कार मिळाला, तोही अशाच ‘फ्युजन’ संगीताबद्दल. सेल्वागणेश विनायकराम हे कर्नाटक संगीतातील तालवादक आहेत. हिंदुस्थानी संगीतात पखावज, तबला ही वाद्ये प्रामुख्याने संगत करत असली, तरी कर्नाटक संगीतातील तालवाद्ये निराळी आहेत. घटम्, मृदुंगम् यांसारख्या वाद्यांना त्या संगीतात संगत करण्यासाठी उपयोगात आणले जाते. सेल्वागणेश विनायकराम यांचे ‘कांजिरा’ (दक्षिण भारतीय संगीतातील तालवाद्य) या वाद्यावर विशेष प्रभुत्व आहे. गणेश गोपालन हे तालवाद्यवादक (पर्कशनिस्ट) म्हणून ख्यातकीर्त आहेत. ताल निर्माण करण्यासाठी एकाचवेळी अनेक वाद्यांचा आणि साधनांचा उपयोग करत संगीतातील एका नव्या नादाला जन्म देणारी ही कला गेल्या काही वर्षांत जगभर लोकप्रिय होत चालली आहे. राकेश चौरसिया हे बासरीवादक म्हणून आजच्या पिढीचे बिनीचे कलावंत आहेत. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे असलेल्या राकेश यांनी भारतीय संगीतातील या आद्यवाद्याची परंपरा अधिक प्रशस्त केली आहे.
हेही वाचा : राजकारण्यांच्या दृष्टीने जे नवप्रबोधन ती प्रत्यक्षात वैचारिक अधोगतीही असू शकते!
बँड म्हणजे कलावंतांच्या समूहाने निर्माण केलेली सामूहिक सांगीतिक कलाकृती. त्यामध्ये प्रत्येकच कलावंताला महत्त्व. भारतीय चित्रपट संगीत हेही एक प्रकारचे बँड संगीतच. मात्र त्यामध्ये सर्वांत अधिक महत्त्व गायक कलावंतांना. ती संगीत रचना गायकांच्या आणि संगीतकारांच्या नावाने परिचित होते. बँडमध्ये सगळ्या प्रतिभावंतांचा संगम असतो. त्यात प्रत्येकजण आपल्या सर्जनातून संगीतरचनेला समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ती रचना एखाद्या गीतासारखी बनते. धून या प्रकारात केवळ एखादेच सांगीतिक वाक्य असते. बँडमधील रचना म्हणजे त्या वाक्याचा परिच्छेद असतो. जगातील सगळ्या संगीतात बँड या कल्पनेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे, याचे कारण त्यातील प्रायोगिकता. सारे जग सतत नव्या नादाच्या (साऊंड) शोधात असल्याने बँडच्या माध्यमातून त्यासाठीचे प्रयोग सातत्याने होत असतात.
हेही वाचा : पुण्यामधल्या ललित कला केंद्रात नेमकं काय झालं? ‘नाटका’नंतरच्या ‘नाटकां’चं काय करायचं?
भवतालातील संगीताचे भान मिळवण्याची गरज गेल्या काही दशकांत अधिक प्रमाणात निर्माण झाली. जग जवळ येत गेले, तसे संगीताचा प्रवासही सुकर झाला. ध्वनिमुद्रणाच्या तंत्राने त्यात मोठीच भर घातली आणि आंतरजालाच्या शोधानंतर ते जगभर सहज पोहोचू लागले. प्रत्येक संगीताची परंपरा असते. कायदे-कानून असतात, सौंदर्य निर्माण करण्याच्या वेगवेगळ्या क्षमता असतात. त्या क्षमतांचा विकास करत सतत नव्याचा ध्यास घेणारे कलावंत ही आताच्या जागतिक संगीताची सर्वांत मोठी गुंतवणूक. ग्रॅमी पुरस्कारांमध्ये एवढ्या कलावंतांना स्थान मिळणे, ही म्हणूनच कौतुकाची आणि अभिनंदनाची बाब.
mukundsangoram@expressindia.com