रसिका शिंदे

प्रकाशात उजळलेला भला मोठा रंगमंच… लाल मखमली पडदा… संगीताचा मंद स्वर, नेपथ्याची लगबग… तिसरी घंटा… आणि कलाकारांची ही लगबग आणि नवी नाट्य कलाकृती पाहण्यासाठी नाट्यगृहात बसलेला प्रेक्षक वर्ग, हे सुखद वातावरण डोळ्यांसमोर येताच कोणत्याही रंगकर्मींच्या अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही. मराठी रंगभूमीला शतकांचा इतिहास लाभला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन आणि प्रबोधन यांची सांगड घालत नाटक संस्कृतीचा वारसा मनोरंजन विश्वात रुजत आहे. या रुजलेल्या बीजाची एक फांदी म्हणजे मराठी नाटक. नाट्यकर्मींनी जनमानसांत नाटक रुजावे, खुलावे आणि भविष्यात ती फांदी वाढत जावी यासाठी अविरत कष्ट केले. या कलाकृतींना मानवंदना देणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘मराठी रंगंभूमी दिन’.

what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra state board schools to follow cbse curriculum and schedule
विश्लेषण : राज्य शालेय शिक्षण मंडळाला ‘सीबीएसई’चाच अभ्यासक्रम का राबवायचाय? त्यावरून वाद का सुरू आहे?
mahayuti landslide victory in maharashtra vidhan sabha election 2024
महायुतीच्या महाविजयाची पाच कारणे… ‘बटेंगे..’, लाडकी बहीण, पायाभूत सुविधा, संघ आणि फडणवीस!
Eknath Shinde, Balaji Kinikar, Balaji Kinikar apologized, Balaji Kinikar latest news, Balaji Kinikar marathi news,
शिदेंच्या उमेदवाराचे विजयासाठी स्वपक्षियांसमोर लोटांगण, आमदार बालाजी किणीकर यांची शिवसैनिकांसमोर दिलगिरी
loksatta lokrang Language Pride Marathi Community Marathi Language Day
भाषागौरव कशाचा?
Eknath Shinde On Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Eknath Shinde : महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लाडक्या बहिणी…”

मराठी रंगभूमी दिनाचा इतिहास

‘मराठी रंगभूमी दिन साजरा करण्याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांनी आद्य नाटककार विष्णुदास भावेंच्या जीवनावर लिहिलेल्या ‘नाट्य क्रांतिकारक- विष्णुदास भावे’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. आणि या पुस्तकात मराठी रंगभूमी दिनाविषयी अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. तारा भवाळकर असं म्हणतात, “अलीकडे काही मंडळीचं असं म्हणणं होतं की, ५ नोव्हेंबरला विष्णुदासांनी ‘सीता स्वयंवर’ नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. मात्र हे निराधार आहे. १८४३ साली ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. मात्र त्याच्या तारखेचे कोणतेही पुरावे अस्तित्वात नाहीत. १८४३ साली जे नाटक पहिल्यांदा सादर झालं त्याला १९४३ साली शंभर वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सांगलीत ‘शताब्दी महोत्सव’ या नावाने नाट्यमहोत्सव संमेलन आयोजित केले होते. त्या वेळचे संस्थानिक राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी रंगभूमीच्या विकासासाठी आत्ताचे विष्णुदास भावे नाट्यगृह उभे आहे तो भूखंड देऊ केला होता. नाटकांचा विकास व्हावा म्हणून नाट्यसंस्था उभी राहावी असा ठराव झाला. आणि जी संस्था उभारली तिचे नाव ‘अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती’ असे ठेवण्यात आले. राजे चिंतामणराव पटवर्धनांच्या हस्ते त्यावर ५ नोव्हेंबर १९४३ रोजी रोवली गेली असे नमूद करण्यात आले. याच दिवशी कोनशिला रोवली गेल्यामुळे आणि तसा कार्यकारिणी ठराव झाल्यामुळे हा दिवस ‘रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे विष्णुदास भावे यांनी सादर केलेल्या सीता स्वयंवर या नाटकाची ही तारीख नाही याचा पुनर्उल्लेख डॉ. तारा भवाळकर यांनी केला आहे.

अनंत जगावी नाट्यकला

मनोरंजनाची कितीही नवी माध्यमे आली तरी डोळ्यांसमोर घडणाऱ्या जिवंत नाटकाची सर कशालाच येणार नाही. म्हणूनच या सजीव नाट्य कलेची कलावंतांना जितकी गरज आहे, तितकीच रसिक प्रेक्षकांनाही आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या सावटाखाली नाट्यसृष्टी दबली गेली होती. करोनाचे संकट दूर झाल्यानंतर नाट्यसृष्टीला पुन्हा उभारी येईल की नाही असा संभ्रम नाट्यकर्मींमध्ये होता. मात्र रंगकर्मींनी ही नाटकांची पालखी लीलया खांद्यावर पेलली आणि नव्या नाटकांचा ओघ प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागला. नाटकाचे विविध पैलू आहेत. त्यात प्रायोगिक, व्यावसायिक आणि संगीत नाट्यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. ही नाटके प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक लहान-मोठ्या नाट्यसंस्था, कलापथके काम करत असतात. युवकांना आणि येणाऱ्या पिढीला नाट्य वारसा मिळावा, तो जपला जावा यासाठी या संस्था अविरत कार्यरत असतात. ‘सुदर्शन रंगमंच’, ‘प्रयोगशाळा’, ‘तारपा ग्रुप’, ‘परिवर्तन’ अशा कितीतरी संस्थांची नावं घेता येतील.

पण इथे समस्याही अनेक आहेत. बऱ्याचदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लहान मुले, युवक मंडळी विविध आशयाची प्रायोगिक नाटकं बसवतात. मात्र तांत्रिक, आर्थिक आणि व्यवस्थापनाच्या अनेक अडचणी पाठीशी असल्यामुळे त्यांना नाटकांच्या प्रयोगासाठी व्यासपीठ मिळत नाही. तर अशा नाट्यकर्मींना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मुंबईतील प्रयोगशाळा ही कलासंस्था करत आहे. याविषयी प्रयोगशाळेचे संस्थापक नीलेश अडसूळ म्हणाले,“व्यावसायिक रंगभूमीवर जितक्या समस्या आहेत तितक्याच किंबहुना त्याहून अधिक समस्या प्रायोगिक रंगभूमीवर आहेत. त्यांच्यासाठी नाट्यगृह नाही, तालमींना जागा नाही आणि त्यातूनही नाटक उभे केलेच तर त्याचे किती प्रयोग होतील याची खात्री नाही. म्हणून राज्यभरात होणाऱ्या प्रायोगिक नाटकांना व्यासपीठ देण्यासाठी प्रयोगशाळेची सुरुवात केली. याअंतर्गत वर्षभरात मुंबई, कोल्हापूर, पुणे इथली नाटकं सादर झालीच शिवाय एकपात्री नाट्य प्रयोगांनाही प्राधान्य देण्यात आले. नाटकासोबतच अभिवाचन, कथा, कविता यासाठीही विविध कार्यक्रम बांधले जात आहे. तरुणांपर्यंत नाट्य विचार पोहोचावा, विचारांचं आदानप्रदान व्हावं म्हणून ‘गप्पा’ हा वेगळा उपक्रमदेखील सुरू करण्यात आला आहे. प्रयोगशाळा कलाकारांना मंच आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. वेबसीरिजच्या युगात नाटक हरवून जाऊ नये, असे वाटते म्हणून ते टिकवण्यासाठी हा अट्टहास सुरू आहे.” असे ते म्हणाले.

नाट्यसंस्था नाटक जिवंत ठेवत आहेत

एकीकडे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि ओटीटीसारखी नवी माध्यमं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा कायम राखली आहे. नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे सांगतात, “मराठी रंगभूमीवर नवे उपक्रम सुरू आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत नानाविध नाट्यसंस्था नाटकं गावागावापर्यंत पोहोचवत आहेत. कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे तर काही ठिकाणी लेखक, दिग्दर्शकांशी गावातील तरुण आणि बालकलाकारांचा संवाद घडवून दिला जातो. तसेच, ‘द बॉक्स’सारखे रंगमंच नाटकांसाठी उपलब्ध होत असून छोट्या नाटकांचे प्रयोग ‘द बॉक्स’सारख्या रंगमंचांवर सादर होत आहेत. रंगमच, नाट्य आणि कला संस्थांमुळे नाटक जिवंत आहे आणि राहील असा विश्वासही नाट्यकर्मी व्यक्त करत आहेत.

गावागावात जाऊन नाटक सादरीकरणाची आवड असणाऱ्या लहान मुलांकडून आणि युवकांकड़ून नाटक बसवून घ्यायचे, त्यांना नाटकांचे प्रशिक्षण द्यायचे असे मत अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी ‘तारपा ग्रुप’ची स्थापना केली असून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळा या गावात ही संस्था प्रामुख्याने काम करत आहे. ही संस्था युवकांना नाटक म्हणजे काय आणि ते सादर केल्यानंतरचा अनुभव भावी पिढीकडे कसा पोहोचवला पाहिजे याचा मार्ग दाखवते.“नाटक म्हणजे गोष्ट सांगणे आणि गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे नाटक ही आपली गरज आहे. आजच्या तरुण पिढीला नाटक समजण्यासाठी अनेक उपक्रम राबवणे आवश्यक आहे. केवळ स्पर्धा घेऊन काही होणार नाही. कार्यशाळाही तितक्याच घेणं गरजेचं आहे,” असे प्रामाणिक मत गीताजंली कुलकर्णी यांनी मांडले.

महाराष्ट्राची रंगभूमी ३६५ दिवस कार्यरत

महाराष्ट्रातील रंगभूमी हा एक प्रवाह आहे. “मराठी रंगभूमी ही ऊर्जाशील आहे. ललित कला केंद्र, नाटक कंपनी, ब्लॉक बॉक्स, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, आविष्कार, प्रयोगघर हे रंगमंच नाटक जोपासण्यासाठी आणि नाटकांच्या उभारणीसाठी सातत्याने काम करत आहेत. या संस्थांच्या आणि रंगमंचांच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शकांचे युवकांसोबत वर्कशॉप घेतले जातात. अनेक वृत्तपत्र स्पर्धा आयोजित करतात त्यांच्या माध्यमातून नाटकाची भावी पिढी मिळते.” तसेच, लोकसत्ता आयोजित करत असलेल्या एकांकिका स्पर्धांचा यात प्रामुख्याने उल्लेख व्हायला हवा, असेही चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले.

जुन्या नाटकांची नव्याने उभारी

नव्या नाटकांनी नाट्यगृहांत प्रेक्षकांना आणलेच. पण जुन्या नाटकाला नव्याची मखमल चढवत विविध वयोगटांतील प्रेक्षकवर्गाला एकत्रित आणण्याचे कामही रंगभूमीने केले आहे. प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’ हे ३१ वर्षांपूर्वी गाजलेले नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आले. एका बाजूला नव्या विषयांची नाटके येत असताना दुसरीकडे जुन्या नाटकांचे पुनरागमन होणे ही बाब आनंददायी आहे, असे मत दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मांडले. नाटकांच्या प्रयोगांसाठी नाट्यगृहांव्यतिरिक्त छोट्या जागाही प्रदीप वैद्य, आलोक राजवाडे यांसारखी मंडळी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे चहुबाजूंनी रंगभूमी समृद्ध करण्याचे काम सुरू असल्याचेही केंकरे म्हणाले.

विविध माध्यमांना जोडणारा धागा म्हणजे ‘नाटक’

कोणत्याही कलाकाराला आपले अभिनयकौशल्य सादर करण्यासाठी विविध व्यासपीठे उपलब्ध आहेत. यात चित्रपट, मालिका, ओटीटी, समाजमाध्यमांचा समावेश होतो. मात्र या सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवणारा धागा म्हणजे नाटक आहे. सध्या नाट्यसृष्टीत क्रॉस प्लॅटफॉर्मिंग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नाट्यसृष्टीत एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येत आहे ती अशी की एकाच वेळी एक कलाकार विविध माध्यमांवर काम करताना दिसत आहे. नाटकांचा विचार केल्यास इतर माध्यमांच्या तुलनेत आर्थिक तफावत जरी असली तरी कलाकार पुन्हा माघारी रंगभूमीवर येत आहे. आणि हीच नाटकांची ताकद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यकला जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी नाट्यकर्मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. “नाटक जोपासण्यासाठीच नाटक केले पाहिजे,” असा अट्टहास अभिनेते आणि दिग्दर्शक आलोक राजवाडे यांनी व्यक्त केला आहे.

rasika.shinde@expressindia.com