चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरसह विदर्भ अलीकडच्या काही वर्षांत शहरी भागात उद्भवणाऱ्या पूरस्थितीसाठीही ओळखला जाऊ लागला आहे. यासाठी कारणीभूत ठरली आहे ती नियोजन धाब्यावर बसवून केलेली विकासकामे. विदर्भातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन नसल्याने ते शेतात शिरते, सिमेंट रस्त्यालगत नाला नसल्याने नागपुरात दरवर्षी हजारो घरात पाणी जाते, चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींतून निघालेल्या मातीच्या ढिगाऱ्यांना अडून नदीचे पाणी गावांना पुराचा फटका बसतो. कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती विदर्भातील छोट्या शहरांमध्येही आहे.

उपराजधानी दरवर्षी पाण्यात

गरज नसताना बांधले जात असलेले सिमेंट रस्ते, नदी असूनही नाल्याचे स्वरूप आलेल्या नागनदीच्या पात्रात सर्व नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेली बांधकामे यामुळे नागपूर शहराला दरवर्षी पुराचा फटका बसतो. यंदा २० जुलैला झालेल्या तीन तासांच्या पावसात नागपूरच्या सर्व प्रमुख वस्त्यांमधील सुमारे दहा हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचे खुद्द महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी जाहीर केले. त्यापूर्वी २३ सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या पावसात तर तब्बल एक हजार कोटींची हानी झाली होती आणि ४० हजारांवर घरात पाणी शिरले होते. पावसाळ्यात पाऊस येणारच मग दरवर्षी परिस्थिती का यावी, याचे उत्तर विकासकामांच्या अतिरेकात सापडते.

हेही वाचा >>> चंद्रपूर : जिल्हाधिकारी, सीईओंची भरपावसात धानशेतात रोवणी, पदाचा अभिनिवेश न बाळगता थेट चिखलात…

प्रत्येक रस्ता सिमेंटचाच करण्याचा आग्रह, तो करताना त्यावर साचलेल्या पाण्याच्या निचऱ्याची न केलेली व्यवस्था, त्यामुळे तासभर पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचते आणि पाण्याचा प्रवाह अधिक असेल तर लोकांच्या घरात दोन-दोन फूट पाणी जाते. अंबाझरी लेआऊट परिसरात नागपूर सुधार प्रन्यास या सरकारी यंत्रणेनेच नदी व्यापाऱ्याला भाडेपट्ट्यावर दिली व त्याने थेट नदीवरच अतिक्रमण करून तिचे पात्र अवरुद्ध केले. परिणामी नदीला पूर आला की मग मिळेल त्या जागेतून मार्ग काढत पाणी परिसरातील शेकडो घरांमध्ये शिरते. याच भागात नदीवर स्लॅब टाकून ती जागा वाहनतळासाठी वापरली गेली आहे. नागपूच्या अंबाझरी तलावाला खेटून सौंदर्यीकरणाच्या नावाखाली पुतळा उभारण्यात आला आहे. आजूबाजूला बांधकाम करण्यात आले आहे. तलाव ओव्हरफ्लो झाला की तेथील पाणी या बांधकामाला अडून रस्त्यावर येते. हे सर्व बेकायदेशीर आहे हे सरकारी यंत्रणा मान्य करते, पण ती पुतळा हटवायला तयार नाही. असाच प्रकार फुटाळा तलावाच्या बाबतीतही घडला आहे. तलावाच्या मध्यभागीच रंगीत कारंजी उभारण्यासाठी बांधकाम करण्यात आले आहे. शहरात मागील दहा वर्षांत अनेक उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले. या कामांमुळे रस्त्यालगतचे नाले बुजले. त्यामुळे पावसाचे पाणीच जायला मार्ग उरला नाही. नागपुरात महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामेट्रो यांची एकाच वेळी बांधकामे सुरू आहेत. यांच्यात कुठलाही समन्वय नाही, बांधकाम साहित्य घेऊन येणाऱ्या जड वाहनांने रस्त्यांची चाळणी झाली, आता रस्ता शोधत नागपूरकरांना जावे लागते, इतकी वाईट स्थिती निर्माण झाली आहे. विकासाला विरोध असण्याचे काहीच कारण नाही, पण तो जिवावर उठायला नको. नागपूरमध्ये नेमके हेच झाल्याने संताप वाढला आहे.

समृद्धीचे पाणी शेतात

हीच परिस्थिती समृद्धी महामार्गाची झाली आहे. विदर्भाच्या समृद्धीचा हा मार्ग ठरेल, असे स्वप्न विदर्भातून ज्या भागातून हा रस्ता जातो तेथील शेतकऱ्यांना दाखवून त्यांच्या शेतजमिनी घेण्यात आल्या. आता याच महामार्गावरील पाणी त्यांच्या उर्वरित शेतात साचू लागले आहे. नागपूरमधून सुरू झालेला हा मार्ग वर्धा, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांतून पुढे जातो. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गोंदापूर, कान्हापूर, मोहनापूर, इटाळा, महाबळा, आमगाव, खडकी, सेलडोह, महाकाळ, बाबुळगाव या गावातील शेतात समृद्धी महामार्गाचे पाणी साचते. कारण रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थाच नाही. ते शेतात शिरते व शेताला तलावाचे स्वरूप येते. या महामार्गासाठी अनेक नाले बुजवण्यात आले, काहींचा मार्ग बदलण्यात आला. पावसाळा आला की पुन्हा या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. खुद्द या भागातील आमदाराने प्रयत्न करून ही समस्या दूर झाली नाही. यंदाही पुन्हा हाच प्रकार घडला. असाच प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा, चिंचोली, विटाळा, कळाशी, निंभोरा राज, निंभोरा बोडखा, झाडा, झाडगाव, तळणी, आसेगाव, सावला, नारगावंडी, मलातपूर, वाढोणा, शेंदुर्जना खुर्द, शमशेरपूर, गणेशपूर गावातील शेतकऱ्यांसाठी हा महामार्ग वरील कारणामुळेच डोकेदुखी ठरला आहे. या भागात कंत्राटदाराने रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी केलेल्या उपाययोजना कोलमडल्या. पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांची चिंता वाढते. रस्त्यावरील पाण्यामुळे फक्त शेतात तळेच साचत नाही तर प्रवाहासोबत जमीन खरडून जाते. पेरणी वाया जाते. नियोजनाच्या अभावातूनही ही स्थिती ओढवल्याचे स्पष्ट होते.

कोळसा खाणींमुळे पूर

चंद्रपूर जिल्ह्यात वेस्टर्न कोलफिल्ड लि.च्या सुमारे ४० कोळसा खाणी आहेत. त्यापैकी काही नदीजवळ आहेत. खाणीतून काढलेली माती नजीकच्या खुल्या जागेवर टाकली जाते. त्याचे आता ठिकठिकाणी डोंगर उभे झाले आहेत. नदीला पूर आला की पाणी या ढिगाऱ्यांना अडून गावात शिरते. राजुरा तालुक्यातील राजुरा शहर, सास्ती, पवनी, गोवरी, चिंचोली, कोलगाव, वरोरा तालुक्यातील माजरी व अन्य गावांत ही समस्या आहे. याच कारणामुळे वर्धा नदीचे पाणी गावांमध्ये शिरते. कोळशाचे उत्खनन करता यावे म्हणून इरई नदीचा प्रवाह वळवण्यात आला आहे. या भागातील पूरसमस्येचे हेच प्रमुख कारण असल्याचे गावकरी सांगतात.

chandrashekhar.bobade@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flooding in vidarbha along with nagpur due to development works zws
Show comments