परराष्ट्र सेवा, मुत्सद्देगिरी या क्षेत्रांतील इतरांसारखा नीरसपणा किसिंजर यांच्यापासून दूर होता, म्हणून त्यांनी लिहिलेली पुस्तके-आणि त्यांची चरित्रेसुद्धा- कधीही वाचनीय!

हेन्री किसिंजर यांचे वर्णन करायचे तर सर्वाधिक लिहिते आणि ज्यांच्यावर सर्वाधिक लिहिले गेले असे आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी असे करणे रास्त. वास्तविक त्यांच्या नंतर अमेरिकेच्या अध्यक्षांचे संरक्षण सल्लागार राहिलेले झिबिग्न्यु ब्रेझंस्की वा बिल क्लिंटन यांचे सँडी बर्गर वा तत्कालीन सोव्हिएत रशियाचे एडवर्ड शेवर्दनात्झे ही नावेही तशी चर्चेत राहिली. त्या त्या वेळी होती. ब्रेझंस्की यांनीही ग्रंथलेखन केले. तथापि किसिंजर यांना जितका माध्यम-पैस मिळाला तितका अन्य कोणालाही नाही, हे मान्य करावे लागेल. किसिंजर यांनी विपुल लेखन केले आणि त्यांच्यावरही विपुल लेखन केले गेले. माझ्या घरच्या संग्रहातच किसिंजर यांची पाच-सहा पुस्तके तरी असतील.

MIT suspends Indian-origin PhD student
MIT Suspends PhD Student : पॅलेस्टिनवर लेख लिहिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेतील MIT मधून हकालपट्टी; हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

त्यांच्याविषयी वाचनाचा लळा लागण्याचे श्रेय गोविंदराव तळवलकर यांचे. त्यांच्या ‘वाचता वाचता’त दोनचारदा तरी त्यांनी किसिंजर यांच्याविषयी लिहिले असावे. त्यापैकी एक लेख किसिंजर यांच्या चरित्रग्रंथाविषयी होता. कोणा काल्ब बंधूंनी किसिंजर यांची राजकीय चरित्रगाथा लिहिली होती आणि तिचा परिचय गोविंदरावांनी करून दिला होता. हाच काळ वॉटरगेट इत्यादी प्रकरणांचा. त्या वाचनाची गोडी निर्माण झाल्याने प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर किसिंजर ग्रंथरूपाने भेटत राहिले आणि त्यांची तसेच त्यांच्यावरील पुस्तके समाधान देत गेली.

हेही वाचा >>>शि‌वप्रसादला शाळेत जायला मिळेल? कधी?

त्यांच्यावरील पुस्तकांत अव्वल दर्जाचे ठरते ते वॉल्टर आयझॅक्शन यांचे लेखन. हे आयझॅक्शन ‘सीएनएन’ वाहिनीचे उच्चपदस्थ आहेत. माझे आवडते चरित्रलेखक. आईन्स्टाईन यांचे सर्वोत्कृष्ट चरित्र आयझॅक्शन  यांनीच लिहिलेले आहे. अ‍ॅपलचा स्टीव्ह जॉब्स ते लिओनार्दो द विंचीपर्यंत अनेकांची उत्तमोत्तम चरित्रे आयझॅक्शन यांनी लिहिलेली आहेत. सगळी भव्य. यावरून खरे तर आयझॅक्शन यांच्या दमसासाचा अंदाज येतो. सगळी तशीच रसरशीत. खुद्द आयझॅक्शन यांना तुमचे तुम्ही लिहिलेले सर्वात आवडते चरित्र कोणाचे असे विचारले असता ते किसिंजर यांचा दाखला देतात.

याचे कारण किसिंजर यांच्या व्यक्तिमत्त्वास असलेले कंगोरे. त्यांच्याविषयी कोणी तटस्थ असू शकेल असे वाटत नाही. त्यांच्या निधनानंतर ज्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या त्यावरूनही हे कळावे. ज्येष्ठ मुत्सद्दी ते क्रूर युद्ध गुन्हेगार अशी विविध विशेषणे त्यांच्याबाबत वापरली गेली. ती सर्व तितकीच खरी ठरतात. म्हणून किसिंजर यांस एका कोनाडय़ात बसवता येत नाहीत. आयझॅक्शन तसे करतही नाहीत. स्वत: पत्रकार असल्याने आयझॅक्शन यांस वाचकांस काय भावेल याचा अंदाज आहे आणि जे भावणार नाही ते कोणत्या प्रकारे दिले तर स्वीकारले जाते याची खात्री आहे. त्यामुळे कोठेही पाल्हाळीक न होता जितके बोलावे तितकेच आयझॅक्शन आपल्या कथानायकाविषयी बोलतात. पुस्तकात माझ्या मते सर्वाधिक रोचक भाग आहे तो किसिंजर यांचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांस वॉटरगेट प्रकरणात पायउतार व्हावे लागते तो. त्यावर ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ पुस्तक वाचलेले आणि नंतर चित्रपट पाहिलेला असल्याने हा भाग अधिक मनात उतरतो.

या पुस्तकाची अधिक विस्तृत, अधिक विस्तारित आवृत्ती म्हणजे नील फर्गसन यांनी लिहिलेले किसिंजर यांचे चरित्र. चांगल्या हजारभर पानांचा हा जाडजूड ग्रंथ किसिंजर यांच्या आयुष्यातील १९२३ ते १९६८ इतकाच कालखंड शब्दबद्ध करतो. म्हणजे जन्मापासून ते किसिंजर यांच्या हार्वर्ड विद्यापीठीय कारकीर्दीपर्यंत. यावरून ते किती तपशिलात्मक असेल हे कळेल. फर्गसन हे लेखक म्हणून ‘अ‍ॅसेंट ऑफ मनी’ या पुस्तकामुळेच तोवर माहीत असल्याने चरित्रकार फर्गसन तसे अपरिचित होते. पाश्चात्त्य लेखक किती तपशील मिळवतात, किती सखोल लिखाण करतात याचा हा उत्कृष्ट नमुना. हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिकी धनाढय़ रॉकफेलर, जागतिक राजकारणातील अमेरिकेचे उद्योग इत्यादींबाबत कुतूहल असणाऱ्यांस हे पुस्तक खिळवून ठेवेल. किंबहुना यात रस असणाऱ्यांनी ही दोन पुस्तके वाचणे अत्यावश्यक.

किसिंजर यांच्या ऐतिहासिक कामगिरीत पहिल्या क्रमांकावर चीन आहे. अध्यक्ष निक्सन यांच्या सरकारात दाखल झाल्या झाल्या त्यांनी चीनशी संधान बांधण्यास सुरुवात केली. या काळात ते गुप्तपणे चीनला जाऊन माओंची भेट घेऊन आले. एक भेट त्यांची पाकिस्तानमार्गे होती. पण पाकिस्तानात असताना दुसऱ्या दिवशी ते चीनकडे रवाना होणार असल्याचे यजमानांस माहीत नव्हते. त्यांना ते कळलेही नाही. तथापि विमानतळावर त्यांना बेग नावाच्या पाकिस्तानी पत्रकाराने पाहिले. विमानतळ अधिकाऱ्यांस विचारता त्यांनी किसिंजर चीनकडे रवाना होत असल्याचे बेग यांस सांगितले. हे बेग त्या वेळी लंडनच्या ‘द टेलिग्राफ’ दैनिकासाठी काम करत. त्यांनी किसिंजर चीनकडे रवाना होत असल्याची तार आपल्या कार्यालयास केली. पण लंडनस्थित कार्यालयातील संपादकवर्गाचा काही त्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी ही बातमी छापण्यास नकार दिला. दोन दिवसांनी किसिंजर यांची चीन दौऱ्याबाबत पत्रकार परिषद झाली असता ही बाब उघड झाली. किसिंजर यांचा हा दौरा अनेकार्थी फलदायी ठरला. अशा दौऱ्यांतून अध्यक्ष निक्सन यांच्या चीन भेटीची राजकीय पेरणी होत गेली. आज या घटनेचे महत्त्व जाणवणार नाही. पण अमेरिका आणि चीन यांच्यातील कित्येक दशकांचा राजनैतिक अबोला किसिंजर यांच्या प्रयत्नांनी सुटला. त्यानंतर जवळपास ६० वेळा किसिंजर यांनी चीनला भेट दिली. त्याचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन किसिंजर यांच्याच ‘ऑन चायना’ या पुस्तकात आढळते. (लोकसत्ताच्या ‘लोकरंग’ या रविवार पुरवणीत ‘ओ हेन्री’ या शीर्षकाने २६ जून २०११ या दिवशी सदर पुस्तकाचे परीक्षण प्रकाशित झाले होते.) अमेरिका आणि चीन या विषयांत ज्यांस रुची आहे त्यांनी तर हे पुस्तक वाचायलाच हवे. राजनैतिक मुत्सद्देगिरीत एकमेकांची भलामण करण्यास महत्त्व फार. नेते काही अन्य जमले न जमले तरी परस्परांविषयी बरे बोलत राहतात. त्याचाच एक भाग म्हणून निक्सन यांनी आपल्या चीन भेटीत माओंची तोंड फाटेतोवर स्तुती केली. माओंच्या दूरदृष्टीमुळे चीन किती बदलला इत्यादी. त्यावर प्रतिक्रिया देताना माओ इतकेच म्हणाले : तुम्ही म्हणता तितके काही जमलेले नाही.. बीजिंगच्या आसपास काही करता आले इतकेच.

हेही वाचा >>>मतदारांना सारे कळते, म्हणूनच भाजपबद्दल शंका वाढते…

किसिंजर यांचे हे पुस्तक म्हणजे चीनविषयीचा, अभ्यासक्रमात नसलेला (आणि म्हणून चांगला) धडा ठरतो. माओंच्या नंतर डेंग शियाओिपग यांना संघर्ष करावा लागला पण अखेर हाती सत्ता आली. नंतर डेंग अमेरिकेच्या दौऱ्यावर आले असता उद्योगांच्या भव्यतेने कमालीचे अचंबित झाले आणि नंतर काही दिवसांनी किसिंजर यांना म्हणाले : तुमच्या देशाची भव्यता पाहून मला नंतर आठवडाभर झोप आली नाही. चीनने हे स्वप्न पाहायला हवे.

पुढे ते स्वप्न त्यांनी किती सत्यात आणले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. किसिंजर या सगळय़ाचे प्रत्यक्ष आणि सक्रिय साक्षीदार होते. म्हणून या पुस्तकाचे महत्त्व अधिक.

माझे किसिंजर यांचे वैयक्तिक आवडते पुस्तक म्हणजे ‘द लीडरशीप: सिक्स स्टडीज इन वल्र्ड स्टट्रेजीज’. हे पुस्तक अगदी अलीकडचे. गेल्या २०२२ साली प्रकाशित झालेले. त्या वेळी किसिंजर ९९ वर्षांचे होते. वयाच्या या टप्यावर असे काही लिहावेसे वाटणे आणि ते आधीच्या पुस्तकांइतकेच वाचनीय असणे याचे मला अप्रूप अधिक. आपल्याकडे साधारण ८० नंतचे वृद्ध सामाजिक जीवनात बऱ्याचदा डोके उठवतात. किसिंजर शंभरीच्या उंबरठय़ावर असतानाही कालबाह्य वाटत नाहीत, ही बाब कमालीची कौतुकास्पद. या पुस्तकात किसिंजर जगातील सहा महत्त्वाच्या नेत्यांविषयी लिहितात. या सहा व्यक्तींमुळे जग निर्णायकरित्या बदलले, असा त्यांचा निष्कर्ष. तो पटेल वा न पटेल. पण त्यानिमित्ताने किसिंजर जगाकडे आणि आसपासच्या बदलांकडे कशा तऱ्हेने पाहतात हे आपल्याला कळते. दुसऱ्या महायुद्धानंतर कफल्लक जर्मनीला खाईतून बाहेर काढणारे कॉन्रॅड अ‍ॅडेन्यूर, फ्रान्सचे चार्ल्स द गॉल, अमेरिकेचे निक्सन, इजिप्तचे अन्वर सादात, सिंगापूरचे ली क्वान यू आणि इंग्लंडच्या मार्गारेट थॅचर या नेत्यांविषयी किसिंजर या पुस्तकात आपणास न दिसलेले बरेच काही दाखवतात. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने ‘नम्रतेचे धोरण’ (स्ट्रॅटेजी ऑफ ह्युमिलिटी) अंगीकारले हे किसिंजर यांचे निरीक्षण आपणास चकित करते. यातील प्रत्येकाविषयी किसिंजर असेच काही ना काही स्वतंत्रपणे नमूद करतात. याखेरीज किसिंजर यांचे स्वत:चे ‘डिप्लोमसी’, किसिंजर-निक्सन या द्वयीवरचे ‘निक्सन-किसिंजर इयर्स’ इत्यादी अन्य काही ग्रंथ वाचनात आणि संग्रहात आहेत.

या सगळय़ातून या व्यक्तीचा संस्थात्मक व्यापक दृष्टिकोन अधिकाधिक अधोरेखित होतो. एक व्यक्ती एका आयुष्यात काय काय करू शकते याचा हा नमुना. इतके असूनही आपल्या स्वत:च्या लिखाणाविषयी, विद्वत्तेविषयी त्यांना फार अभिमान होता, त्यांनी तो मिरवला असे नाही. त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे कौतुक होऊ लागले तेव्हा ते करणाऱ्यांस किसिंजर म्हणाले : टॉयनबी यांची पुस्तके न वाचताच कौतुक करणारे खूप आहेत.. तसेच हे! आईन्स्टाईन यांच्याप्रमाणेच किसिंजर यांना लष्करी अधिकाऱ्यांविषयी कमालीचा संताप होता. ‘हे गणवेशातील वीर बिनडोक असतात आणि त्यांस मुत्सद्देगिरीत कधीही सामील करून घेतले जाऊ नये. यांचा उपयोग केवळ प्यादी म्हणूनच करावा’ असे ते बिनदिक्कतपणे म्हणाले. आता पुढील आठवडय़ात काय वाढून ठेवले आहे असे विचारता किसिंजर उत्तरले : येत्या आठवडय़ात कोणतेही नवे संकट येणार नाही.. माझी डायरी आधीच फुल आहे.

परराष्ट्र सेवा, मुत्सद्देगिरी वगैरे क्षेत्रांतली मंडळी नीरस आणि अतिसावध असतात. त्यांच्या लिखाणातून फारसे काही हाती लागत नाही. किसिंजर तसे नव्हते. म्हणून त्यांचे महत्त्व.

girish.kuber@expressindia.com

Story img Loader