‘पेटंट’ किंवा मराठीत ‘एकस्व’ हा बौद्धिक संपदा (Intellectual Property) संरक्षणाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे, पेटंटमुळे नवकल्पनांना संरक्षण मिळते आणि अशा नवकल्पना राबवणाऱ्या निर्मात्यांना त्यांच्या कल्पनांचा व्यावसायिक लाभ मिळवता येतो. भारतासारख्या विकसनशील देशात, नवकल्पना आणि स्टार्टअप्सच्या वाढत्या संख्येमुळे पेटंटचे महत्त्व वाढले आहे. मात्र, पेटंट प्रक्रियेबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत, त्यामुळेच अनेक नवोदित उद्योजक, संशोधक, विद्यार्थी आणि सामान्य व्यक्ती त्याचा योग्य लाभ घेऊ शकत नाहीत. आजच्या ( २६ एप्रिल ) ‘जागतिक बौद्धिक संपदा दिना’ निमित्त, पेटंटबद्दलच्या काही प्रचलित गैरसमज आणि त्यामागील सत्य यांचा आढावा घेतला आहे.
गैरसमज १ : पेटंट घेण्यासाठी वस्तू (प्रोटोटाइप) बनवणे आवश्यक आहे.
हा एक अत्यंत प्रचलित पण चुकीचा समज आहे. पेटंट मिळवण्यासाठी प्रत्यक्ष वस्तू तयार करणे आवश्यक नसते. तुमच्याकडे एखादी नवीन कल्पना असेल, जी तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे आणि तिची उपयुक्तता तुम्ही समजावून सांगू शकता, तर त्या कल्पनेसाठी तुम्ही पेटंटसाठी अर्ज करू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे एखाद्या नाविन्यपूर्ण, मोठ्या आकाराच्या प्लास्टिक उत्पादनाची संकल्पना आहे, जी मोल्डशिवाय प्रत्यक्षात तयार करणे शक्य नाही आणि लागलीच मोल्ड बनवण्यासाठी मोठी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी शक्य नसेल, तरीही तुम्ही त्या कल्पनेचे पेटंट घेण्यासाठी अर्ज करू शकता.
पेटंट अर्ज दाखल करताना, तुम्हाला तुमच्या शोधाचे सविस्तर वर्णन, रेखाचित्रे (आवश्यक असल्यास) आणि तुमच्या दाव्यांची स्पष्ट नोंद करावी लागते. तुमच्या कल्पनेला तात्पुरते संरक्षण मिळवण्यासाठी ही माहिती पुरेशी असते. एकदा पेटंट मंजूर झाल्यावर, तुम्हाला तुमच्या शोधाचे उत्पादन करण्याचा आणि इतरांना त्याचे हक्क देण्याचा अधिकार मिळतो. अनेकदा, संशोधक त्यांच्या कल्पनेचे पेटंट सुरुवातीच्या टप्प्यातच घेतात आणि नंतर त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी गुंतवणूकदार किंवा भागीदार शोधतात.
गैरसमज २: सोशल मीडियावर नवीन उत्पादन टाकल्याने ते माझ्या नावावर होते.
आजकाल सोशल मीडिया हे आपल्या कल्पना आणि उत्पादने जगासमोर मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. अनेक नवउद्योजक त्यांच्या नवीन उत्पादनांची झलक किंवा माहिती सोशल मीडियावर पोस्ट करतात. मात्र, सोशल मीडियावर उत्पादन टाकणे हे तुमच्या शोधाचे कायदेशीर संरक्षण निश्चित करत नाही. बऱ्याच लोकांचे म्हणणे असते की – “मी माझं प्रॉडक्ट Facebook, Instagram किंवा YouTube वर दाखवलंय, त्यामुळे कोणीतरी कॉपी केलं तर माझीच- मी सर्वांच्या आधी केलेली – नोंद पुरावा म्हणून चालेल.”
परंतु सोशल मीडियावर कल्पना किंवा उत्पादन शेअर करणे म्हणजे ती सार्वजनिक डोमेनमध्ये (Public Domain) टाकण्यासारखे आहे. यामुळे ती कल्पना पेटंटसाठी पात्र राहत नाही, कारण पेटंटसाठी ‘नवीनता’ (Novelty) ही अट आहे. जर तुमची कल्पना आधीच सार्वजनिकरीत्या उघड झाली असेल, तर ती नवीन मानली जात नाही. याशिवाय, सोशल मीडियावर शेअर केलेली माहिती कोणीही कॉपी करू शकते, आणि तुमच्याकडे पेटंट नसेल तर तुम्ही कायदेशीर संरक्षण मिळवू शकत नाही.
त्यामुळे, जर तुमची कल्पना किंवा उत्पादन व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे असेल, तर त्याचे पेटंट मिळवण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर तुम्ही तुमच्या पेटंट केलेल्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी नक्कीच करू शकता.
गैरसमज ३: पेटंट मिळवणे हे मोठ्या कंपन्यांचे काम असते, त्यांनाच ते मिळू शकते.
हा समज पूर्णपणे निराधार आहे. कारण नाविन्यपूर्ण विचार, कल्पकता हि काही कुणाची मक्तेदारी नाही. म्हणूनच पेटंट कायदा हा लहान संशोधक, नवउद्योजक आणि मोठ्या कंपन्यांसाठी समान आहे. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था, ज्यांनी एखादा नवीन आणि उपयुक्त शोध लावला आहे, ते पेटंटसाठी अर्ज करू शकतात. खरे तर, सरकार आणि विविध संस्था लहान संशोधकांना आणि नवउद्योजकांना पेटंट मिळवण्यासाठी आर्थिक आणि कायदेशीर मदतही पुरवतात. अनेक ठिकाणी पेटंट मार्गदर्शन केंद्रे (Patent Facilitation Centers) उपलब्ध आहेत, जिथे तुम्हाला अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेबद्दल आणि इतर आवश्यक माहितीबद्दल मार्गदर्शन मिळते.
गैरसमज ४:पेटंट मिळाल्याशिवाय (Patent Grant) आपल्या नवीन वस्तूचे उत्पादन सुरू करता येत नाही. हा गैरसमज व्यावसायिक दृष्ट्या धोकादायक ठरू शकतो. पेटंट मिळवणे ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. अर्ज दाखल केल्यापासून ते मंजूर होईपर्यंत कित्येक वर्षे लागू शकतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या नवीन वस्तूचे उत्पादन पेटंट मिळेपर्यंत थांबवून ठेवावे. कारण पेटंट ग्रांट होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, तोपर्यंत केलेले संशोधन कदाचित कालबाह्यसुद्धा होऊ शकते. म्हणूनच पेटंटसाठी अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही तुमच्या उत्पादनाचे उत्पादन आणि विक्री सुरू करू शकता. पेटंट अर्जाची दाखल तारीख ही तुमच्या शोधाच्या मालकी हक्कासाठी अत्यंत महत्त्वाची असते. भविष्यात जर तुम्हाला पेटंट मंजूर झाले, तर तुमच्या शोधाचे भूतकाळातील आणि भविष्यातील व्यावसायिक हक्क याच दाखल तारखेपासून गृहीत धरले जातात. म्हणूनच, पेटंट हक्काची वीस वर्षांची मुदत ही पेटंटसाठी अर्ज केलेल्या दिवसापासून (filing date) गणली जाते, मंजुरीच्या दिवसापासून (grant date) नाही.
अर्थात, उत्पादन सुरू करण्यापूर्वी तुम्ही हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की तुमच्या उत्पादनामुळे इतर कोणत्याही विद्यमान पेटंटचे उल्लंघन होणार नाही. यासाठी पेटंट शोध (Patent Search) करणे महत्त्वाचे आहे. लहान संशोधकांनी, नवउद्योजकांनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी पेटंटच्या प्रक्रियेला गांभीर्याने घेणे आणि आपल्या बौद्धिक संपदेचे संरक्षण करणे काळाची गरज आहे. योग्य माहिती आणि मार्गदर्शनाने पेटंटची प्रक्रिया सुलभ होऊ शकते आणि त्याचा फायदा आपल्या देशाला आणि अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. त्यामुळे, गैरसमजांवर विश्वास न ठेवता, पेटंटच्या वास्तविकतेला समजून घेणे आणि त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे.
लेखक पेटंट धारक उद्योजक असून, बौद्धिक संपदा कायद्याचे अभ्यासक आहेत.
mahendra.pangarkar@rediffmail.com