रा. स्व. संघाचा गांधीहत्येशी काहीही संबंध नव्हता. गुप्तहेर खात्यांनी कसून केलेल्या शोधानंतरही संघ त्यात कुठेही आढळला नाही. मात्र हे विसरून गांधीहत्येचा संबंध आजही संघाशी जोडला जातो. गांधीहत्येचे भूत संघाच्या मानगुटीवरून अजूनही उतरावयास तयार होत नाही. हे असे का व्हावे? अनेकांच्या आठवणीत आजही असे आहे की गांधीहत्येची बातमी आली त्याचक्षणी गोळवलकर गुरुजी म्हणाले होते, ‘संघ आज पन्नास वर्षांनी मागे गेला!’

अनेक ठिकाणी उपलब्ध असलेल्या लिखाणावरून हाती माहिती येते ती अशी- ‘३० जानेवारी १९४८ रोजी गोडसे व नारायण आपटे गांधी राहत असलेल्या बिर्ला हाऊसला गेले. गोडसेकडे ‘बेरेटा ९ एमएम’ पिस्तूल होते. (‘जुगलबंदी : मोदींपूर्वीचा भारत’, ले. विनय सीतापती, पृ. ५५) ग्वाल्हेरच्या महाराजांकडे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडील हे पिस्तूल होते. तर ‘नथुरामला मिळालेले पिस्तूल नानाजी देशमुख यांच्यामार्फत मिळाले आहे, असे सांगून गुप्तचर संस्थेने त्यांना कलम ३०२ खाली अटक करून त्यावेळी तुरुंगात ठेवले होते’ असा उल्लेख एका ठिकाणी आढळतो. (‘संघ समजून घेताना’, दत्तप्रसाद दाभोळकर, पृ. १२).

३० जानेवारी रोजी सायंकाळी ५च्या सुमारास गांधीजी दोन मुलींच्या खांद्यावर हात टेकवून शांतपणे चालत येताना दिसत होते. त्यांनी अभिवादनासाठी हात जोडले. इतक्यात गोडसे एक पाऊल पुढे आला. त्याने गांधीजींच्या उजवीकडील मुलीला ढकलले आणि त्यांच्यासमोर उभे राहून सलग तीन वेळा गोळ्या झाडल्या. ‘हे राम’ हे गांधींचे अखेरचे शब्द होते. गोडसेला इतर नऊ जणांसह अटक झाली. यामध्ये नारायण आपटे व नारायण बडगे यांचाही समावेश होता. बडगे माफीचा साक्षीदार झाला. न्यायाधीशांनी गोडसे व आपटे यांना दोषी ठरवून देहदंडाची शिक्षा सुनावली. इतरांना जन्मठेप झाली.

गोडसेने गांधींची हत्या करण्यामागे त्याचा ‘हिंदू राष्ट्रवाद’ हा मुद्दा होता याबद्दल काहीही संशय नाही. पण यापेक्षा अधिक वादग्रस्त आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, गोडसेला गांधींचा खून करण्यासाठी कोणाची मदत झाली? ही मदत करणाऱ्यांमध्ये रा.स्व. संघ, हिंदू महासभा आणि सावरकर यांचा समावेश होता का?

संघनेतृत्व आणि गोडसे यांच्यात काही संबंध असल्याचे तपासातून निष्पन्न झाले नाही. गोडसे एकेकाळी संघाचा कार्यकर्ता होता, मात्र त्याने गांधींचा खून केला त्यावेळी तो संघाचा कार्यकर्ता होता का, याबाबत पुरेशी स्पष्टता नाही. २५ मार्च १९९८ रोजी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत नथुरामचे बंधू गोपाळ गोडसे म्हणतात की, ‘‘तांत्रिक आणि सैद्धांतिक दृष्टीने ते (नथुराम गोडसे) संघाचे सदस्य होते. परंतु नंतर त्यांनी संघात काम करणे बंद केले होते… … संघापासून स्वत:ला वेगळे केल्याने संघाच्या कार्यकर्त्यांचा फायदा होईल असे त्यांना वाटत होते.’’ १४ ऑक्टोबर २०१६ च्या ‘फ्रंटलाईन’मध्येही हाच मजकूर आलेला आहे. एकूण गांधींचा खून करताना गोडसेचे रा.स्व. संघाशी कोणत्या प्रकारचे संबंध होते, हा मुद्दा कायमच विवाद्या राहील.

गांधींच्या खुनामुळे देशाची अपरिमित हानी झाली. सारा देश अक्षरश: हळहळला. मात्र संघवर्तुळात या घटनेमुळे आनंदाचे वातावरण होते. त्यांपैकी अनेकांनी मिठाईचे वाटप केले. ‘संघ समजून घेताना’ या पुस्तकात दत्तप्रसाद दाभोळकर लिहितात, ‘‘३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी म. गांधींचा खून झाल्याची बातमी आली. सारे शहर शोकाकुल झाले. बातमी आल्यावर प्रथमच संघशाखा मध्यावरच सोडण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी एक स्वयंसेवक घरी आला आणि हातात पेढ्याचा तुकडा ठेवून ‘कोणाला न सांगता गुपचूप खाऊन टाक’ असे सांगून परत गेला. हे त्यावेळी भारतभर सर्वत्र झालेले असणार. कारण ६ मे १९४८ रोजी सरदार पटेल यांनी शामाप्रसाद मुखर्जी यांना पत्र पाठवून सांगितले, ‘गांधीजींचा खून संघाने कट करून केला की नाही हे आपणाला कदाचित कधीच कळणार नाही. मात्र संघाने या देशात जे विषारी वातावरण निर्माण केले, त्यातून हा खून झाला हे उघड आहे आणि माझ्याकडे आलेल्या अहवालाप्रमाणे भारतभर मिठाई वाटून संघाच्या स्वयंसेवकांनी तो साजरा केला. (पृ. ११). ११ ऑगस्ट १९४८ रोजी गोळवलकरांना लिहिलेल्या उत्तरात सरदारांनी लिहिले आहे, ‘‘आरएसएसच्या नेत्यांनी पसरवलेल्या विषाची अंतिम परिणती म्हणून देशाला म. गांधींचे अमूल्य जीवन बलिदान करावे लागले आहे. हत्येनंतर आरएसएसच्या लोकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि मिठाई सुद्धा वाटली.’’

गांधीहत्या आणि संघ यांच्या संबंधाबाबत विचार केल्यानंतर गांधीहत्या आणि सावरकर यांच्याही संबंधाबाबत येथे थोडा विचार करू. सावरकरांविरोधात गांधीहत्येबाबत ‘आरोपपत्र’ दाखल करण्यात आले. म्हणजे त्यांच्या विरोधात खटला उभा राहण्याइतका पुरावा आहे असे पोलीस व दंडाधिकाऱ्यांना वाटले. फिर्यादी पक्षाच्या वतीने ‘माफीचा साक्षीदार’ झालेला दिगंबर बडगे याने न्यायालयाला सांगितले की, २० जानेवारीलाही गांधींच्या खुनाचा प्रयत्न झाला. त्याच्या तीन दिवस आधी आपटे व गोडसे सावरकरांना भेटले होते आणि त्यांना निरोप देताना सावरकर ‘यशस्वी होऊन या’ असेही म्हणाले होते.

सावरकरांचे १९६६ साली निधन झाल्यानंतर एका सरकारनियुक्त आयोगाने गांधीहत्येचा पुनर्तपास केला. या तपासात मूळ खटल्यात सुनावणी न झालेल्या अनेक गोष्टी उघड झाल्या. गांधींचा खून होण्याच्या थोडेच आधी सावरकर गोडसे व आपटे यांना भेटले होते, अशी साक्ष सावरकरांच्या सचिवाने व अंगरक्षकाने दिली होती. ‘सावरकर व त्यांच्या गटाने म. गांधींच्या खुनाचे कारस्थान रचले होते’ असा निष्कर्ष त्या आयोगाने काढला आहे. नेहरूंना २७ फेब्रुवारी, १९४८ रोजी लिहिलेल्या पत्रात तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी लिहिले होते की, ‘‘साक्षीदारांच्या साक्षींमधून हे स्पष्टपणे समोर येते की सावरकरांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेच्या एका कट्टरपंथी गटाने गांधीहेत्येचे षडयंत्र रचले आणि ते पार पडले.’’ केवळ पुराव्यांच्या अभावी सावरकरांची मुक्तता झाली होती. आश्चर्याची गोष्ट अशी की, गांधींच्या खुनानंतर त्या वेळच्या सरकारने हिंदुमहासभेवर बंदी घातली नाही, मात्र रा. स्व. संघावर ती घातली.

गांधींच्या हत्येची महत्त्वाची पण अनेकांना समजत नसलेली बाजू या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे. मुळात गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या वैयक्तिक वैराची ही हकीकत नाहीच. गांधी हे सत्य, अहिंसा, सत्याग्रह, सर्वधर्मसमभाव इत्यादींचे पुजारी होते. ते इतके मोठे, असामान्य पुरुष होते की उघड आणि परिणामकारक रीतीने त्यांना विरोध करणे शक्य नव्हते आणि तशी कुणाची हिंमतही नव्हती. म्हणून नथुरामकरवी गांधींनाच संपवण्याचे षडयंत्र रचण्यात आले. एका अर्थी प्रत्यक्ष खून करणाऱ्या त्या धाडसी इसमापेक्षाही त्याचे हात बळकट करणाऱ्या त्या विचारसरणीचे लोकच अधिक दोषार्ह आहेत. जनसमुदायात अहर्निश मोकळेपणाने वावरणाऱ्या एका शांत, नि:शस्त्र आणि कृश वृद्धाला बंदुकीच्या गोळीने संपवणे यात काहीच कठीण नव्हते आणि मर्दुमकीही नव्हती. त्यामुळेच नथुरामाच्या मागे असलेल्या शक्तींच्या भ्याडपणाचा अधिकच तिरस्कार येतो. या धर्मांध शक्तींना हाही संदेश द्यायचा होता की आम्हाला भारत हे धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र हवे आहे. धर्मनिरपेक्षता किंवा सर्वधर्मसमभाव वगैरेंवर आमचा विश्वास नाही. ‘फाळणी’ला गांधी जबाबदार होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. हे ‘नॅरेटिव्ह’ तथ्यहीन आहे. फाळणी काही गांधींमुळे झालेली नाही. पण त्याची चर्चा नंतर कधीतरी! गांधीहत्येचा आनंद मिठाई वाटून साजरा करणाऱ्यांनी गांधींना प्रात:स्मरणीयत्वाचा दर्जा देणे ही कृती या पार्श्वभूमीवर हास्यास्पद आणि ढोंगी वाटते. पण यामागेही एक सुप्त हेतू आहे. त्यांना प्रात:स्मरणी स्मरण गांधींचे करावयाचे नसून नथुरामचेच करावयाचे असते. गांधीहत्या हा शब्द कानावर येताच गांधी कमी आणि नथुरामच जास्त आठवतो. त्यामुळे गांधींच्या नावावर नथुरामाचेच प्रात:स्मरण करण्याचा हा एक डाव असतो. गांधीविरोधी शक्तींकडून गांधींच्या हत्येला ‘हत्या’ असे न संबोधता ‘वध’ असे संबोधले गेले. नथुरामाला ‘खुनी’ न म्हणता ‘हुतात्म्या’चा दर्जा देण्यात आला. आज तर त्याला जाहीरपणे ‘देशभक्त’ म्हटले जात आहे, ‘देशाला अनेक नाथुरामांची आवश्यकता आहे’ असे म्हटले जात आहे. परंतु या लोकांना हे कळत नाही की असे कितीही नथुराम आले तरी ते गांधींना कधीही संपवू शकत नाहीत, नष्ट करू शकत नाहीत. कारण गांधी कधीही मरत नसतात.

Story img Loader