अन्वर राजन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या काही वर्षात धार्मिक द्वेषाचे वातावरण सर्वदूर निर्माण करण्यात आले आहे. तसेच जातींच्या तीव्र अस्मिता राजकरणा पलिकडे समाजातील सर्व स्तरांवर हानी पोचवताना दिसत आहे. त्याचबरोबर महात्मा गांधींच्या बदनामीची मोहीम धडाक्यात सुरू आहे. पुस्तके, समाजमाध्यमांचे जाळे इत्यादी मार्गाने गांधीजीची हेटाळणी करणे, शिव्या देणे हे प्रकार सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गांधींचे विचार पुन्हा एकदा ऐरणीवर आणावेत असे तीव्रतेने वाटते.
दक्षिण अफ्रिकेत गेलेल्या महात्मा गांधींनी १८९३ ते १९१५ या काळात अफ्रिकेतील भारतीय आणि गोरेतर लोकांच्या अधिकारासाठी दिलेल्या लढ्याने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. पोटापाण्यासाठी गेलेल्या बॅ. गांधींना रेल्वेच्या पहिल्या दर्जाच्या डब्यातून, ते गोरेतर असल्याच्या कारणावरून खाली ढकलून देण्यात आले. त्यांच्यावर झालेला हा अन्याय वैयक्तिक न्हवता, तो प्रातिनिधिक होता. तसेच भारतीयांना वर्क परमिटसाठी बोटांचे ठसे द्यावे लागणे, वार्षिक तीन पौंड कर द्यावा लागणे, इ. अन्यायाविरोधात गांधीजींनी आवाज उठवला. भारतीय पद्धतीने झालेले विवाह बेकायदेशीर ठरवल्याचा अफ्रिकेच्या सरकारचा निर्णयाविरोधात गांधींनी यशस्वी लढा दिला. या भूमीवरच बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधीचे रूपांतर महात्मा गांधींमध्ये झाले. भारतीयांच्या अधिकारासाठी दिलेला लढा, अहिंसक मार्गाने होता. त्यात सरकारशी संवाद, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आपली बाजू मांडणे, कायदेशीर लढाई करणे याबरोबरच एक नवीन प्रणाली त्यांनी जगासमोर ठेवली. ‘सत्याग्रह’ हा शब्द आणि हे शास्त्र दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींच्या लढ्यातले एक महत्वाचे शस्त्र होते. कोणताही अन्याय सहन करायचा नाही; त्या विरोधात लढा दयायचा पण त्यात हिंसा करायची नाही, रस्त्यावर येऊन आपली मागणी मांडायची ही पद्धत या शास्त्रात महत्वाची होती. सर्वसामान्य लोकांचा सहभाग ही त्यातली ताकद होती, तर प्रतिपक्षाशी संवाद साधून त्यांना आपली बाजू पटवून देणे यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
१९१५ साली गांधी भारतात आल्यानंतर चंपारण येथील शेतकऱ्यांचा लढा यशस्वीपणे पार पाडला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसचे आणि स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व म. गांधींनी केले. हा काळ भारताच्या इतिहासात अतिशय महत्वाचा होता. देशभर चैतन्य संचारले होते. इंग्रजाच्या विरोधात शांततामय मार्गाने लढणाऱ्या भारतीय जनतेचे आधुनिक राष्ट्र कसे असावे या विषयी देखील मोठया प्रमाणात चिंतन होत होते. महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारणापासून सुरू झालेला विचार जाती अंताच्या निर्धारापर्यंत पोचला होता.
आंदोलनात सहभागी झालेल्या स्त्रिया समाजाला नवीन दिशा देण्यासाठी योगदान देत होत्या. महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इ. नेते आणि विचारवंत समाज प्रबोधनाची आघाडी सांभाळत होते. जात, वंश व लिंगावर आधारित विषमता नाकारण्यासाठी मानसिकता घडविण्याचा सर्वदूर प्रयत्न होत होता. विविध धर्मातील लोकांना इंग्रजी शासनाविरोधातील लढ्यात एकत्र गुंफण्यात महात्मा गांधींना यश आले होते. गांधींचे जीवन व गांधींचे नेतृत्व सर्वधर्मीयांना आकर्षित करत होते. गांधीच्या आश्रमात कर्मकांड नव्हते, उलट सर्वधर्म प्रार्थना होत असे. संकुचित व अस्मितेचे राजकारण करू पाहणाऱ्यांना हे पटत नव्हते. पण त्यांना समाजमान्यता नव्हती, सर्वसामान्य जनता गांधी आणि काँग्रेसबरोबर राहिली. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रयत्नांना यश येता येता देशाची फाळणी झाली, भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, लाखो निरपराध माणसे मारली गेली. धार्मिक द्वेषाच्या विषारी वातावरणात महात्मा गांधींची हत्या झाली. हिंदुत्ववादी शक्तींनी रचलेला हत्येचा कट यशस्वी झाला. महात्मा गांधींची हत्या हा भारतीय जनतेसाठी फार मोठा धक्का होता. देशातले पूर्ण वातावरण बदलले. सर्वसामान्य जनतेमध्ये गांधींच्या हत्येविषयी नाराजी होती, राग होता. गांधींची हत्या करणाऱ्याचे नाव लगेच कळाले म्हणून मोठा अनर्थ टळला. नथुराम गोडसेने हत्या करताना दाढी वाढवली होती आणि सुंता करून घेतली होती. त्याचे नाव कळेपर्यंत काही काळ गेला.
त्यावेळी काही ठिकाणी मुस्लिमांच्या घरांवर हल्ले झाले. मात्र नंतर नथुराम गोडसे हे नाव कळाल्यावर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या परिसरामध्ये काही ब्राह्मणांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, आगी लावण्यात आल्या. तो हिंसाचारही थांबला. पण देशभरात शोककळा पसरली होती.
भारतीय स्वातंत्र्य लढा आणि महात्मा गांधी यांची जीवनशैली, नेतृत्व जगभरातल्या विचारवंतांना आकर्षित करत होते. जगातल्या अनेक भागात गांधींवर लिखाण झाले. भारताच्या विविध भाषिक साहित्यात गांधींच्या विचारांचा प्रभाव दिसतो. मराठी साहित्यात मात्र गांधींची दखल पुरेशा प्रमाणात घेतली गेली नाही. किंबहुना, त्यांच्या विरोधातील लिखाणच जास्त दिसते. तथापि, जुन्या प्रस्थापित साहित्यिकांत वि.स. खांडेकर यांच्या लिखाणात गांधी व स्वातंत्र्य आंदोलनाचा प्रभाव जाणवतो. साने गुरूजी आणि पु.ल देशपांडे यांनी गांधींविषयी लिखाण केले आहे. बाकी फारशी नावे डोळयांसमोर येत नाहीत. अलीकडच्या काळात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, सुरेश द्वादशीवार, चंद्रकांत वानखेडे, चंद्रकांत झटाले, न्या. नरेंद्र चपळगांवकर, निशा शिऊरकर यांची गांधींविषयीची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
गांधींवरच्या काही चांगल्या पुस्तकांचा मराठीत अनुवाद प्रकाशित झाला आहे. त्यात गिरीराज किशोर यांच्या ‘पहिला गिरमिटिया’ आणि ‘बा’ या दोन कांदबऱ्या आहेत. लुई फिशर यांच्या गांधींवरच्या पुस्तकाचा अनुवाद साधनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. ‘लेट अस किल गांधी’ आणि ‘कस्तुरबा यांची डायरी’ ही तुषार गांधी यांची दोन पुस्तके मराठीत आली आहेत.
आज महाराष्ट्रात परभणी व बीड जिल्हयात हिंसाचार आणि जातींच्या अस्मितेतून निर्माण झालेले विषारी वातावरण चिंता निर्माण करणारे आहे. विशाळगड, त्र्यंबकेश्वर, मढी व इतर अनेक ठिकाणी मुस्लिमांवर होणारे जीवघेणे व आर्थिक हल्ले वाढत आहेत. ख्रिश्चनांच्या चर्च आणि शाळा यांना लक्ष्य करण्यात येत आहे. या सर्वांचे समर्थन करणारा एक मध्यमवर्गीय गट समाजमाध्यमात आक्रमकतेने कार्यरत आहे. हे सर्व चिंता निर्माण करणारे आहे.
समतेवर आधारित संविधानाच्या मार्गदर्शनाने सर्वसमावेशक समाज व आधुनिक भारत निर्माण करण्याच्या दिशेने आपला प्रवास व्हायला हवा. आज नेमके उलटे होताना दिसत आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांच्या आधारानेच आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल. ‘गांधी विचार साहित्य संमेलन’ हा त्यासाठी केलेल्या प्रयत्नातला एक छोटा भाग होय.