प्रसाद माधव कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऐन तारुण्यामध्ये म्हणजे वयाच्या पंचविशीत ज्यांना भारत स्वतंत्र होताना पाहता आला, त्या स्वातंत्र्य आंदोलनात सर्वस्व झोकून देऊन सहभाग घेता आला ती पिढी स्वातंत्र्य समराच्या धगधगत्या इतिहासाची अखेरची साक्षीदार पिढी आहे. त्यातील एक तेज:पुंज तारा म्हणजे ‘क्रांतिअग्रणी जी. डी.बापू लाड’. स्वातंत्र्यसैनिकांच्या पिढीचे शिलेदार असलेले बापू आजच्या सांगली पण तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानचा तालुका असणाऱ्या कुंडल या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात ४ डिसेंबर १९२२ रोजी जन्मले. त्यांच्या आईचे नाव सारजाबाई होते. तर वडिलांचे नाव दादा रामजी लाड होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष आपण नुकतेच साजरे केले. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू यांच्या जन्मशताब्दीची सांगता रविवार ४ डिसेंबर २०२२ रोजी होत आहे. एका संघर्षनायकाची ही जन्मशताब्दी आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या अखेरच्या पिढीचे अग्रणी शिलेदार असलेले बापू सोमवार ता. १४ नोव्हेंबर २०११ रोजी कालवश झाले. एक संघर्षशाली जीवन बापू जगले. एक धगधगता इतिहास त्यांनी निर्माण केला. क्रांतीच्या मशालीने साम्राज्यवादी अंधार दूर करण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत अग्रणीपणे ते करत राहिले. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची पर्वा न करता सहभागी झालेल्या बापूंची ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या मालिकेतही आदराने नोंद घेतली जाते. त्यांचे जीवन व कार्य याची नोंद घेणारा प्राचार्य डॉ. विलास पोवार लिखित ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने २०१७ साली प्रकाशित केला आहे.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात १९२० चे दशक अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. १८८५ च्या राष्ट्रसभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्य लढा बहुआयामी होत गेला. बाळ गंगाधर टिळक हे राष्ट्रीय नेते म्हणून लोकमान्य झाले. १९२० साली लोकमान्यांचे निधन झाले. महात्मा गांधींचे युग सुरू झाले. गांधीजींनी या लढ्याचे दरबारी स्वरूप बदलून त्याला मैदानी लढ्याचे रूप दिले. लढाईचे नवे मार्ग आणि नवी मूल्ये दिली. याच काळात जी. डी. बापू लाड लहानाचे मोठे होत होते. असहकार चळवळीपासून ते ‘सायमन परत जा’पर्यंतची आंदोलने हे बालक पाहत होते. भवताल आणि परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवत असते. जीडी बापूही या काळात घडत होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कुंडल, निपाणी, औंध येथे झाले.
वयाच्या विशीमध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पण दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी १९४२ च्या आंदोलनात उडी घेतली. आणि क्रांतिदिनादिवशीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत राहण्याची शपथ घेतली. आपल्या परिसरातील लढा संघटित करण्याच्या कार्यात जी. डी. बापू अग्रणी राहिले. या आंदोलनाला नवी प्रेरणा, नवा आयाम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.१९४३ ते १९४६ या काळामध्ये प्रतिसरकारच्या चळवळीत क्रांतिअग्रणी जीडी बापूंनी मोठे योगदान दिले. याच काळात ते ग. दि. माडगूळकर यांच्या सहवासात आले. गदिमांच्या ‘बळवंत’ या नाटकात बापूंनी नायकाची भूमिकाही केली. पण स्वातंत्र्य समराचा रंगमंचही त्यांना महत्त्वाच्या भूमिकेसाठी खुणावत होता. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या मदतीसाठी कुंडल बँक लूट, शेणोली येथे पे स्पेशल रेल्वेची लूट, धुळे खजिना लूट यात सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिश सरकारने त्यांना राजकीय गुन्हेगार म्हणून जाहीर केले. त्याच काळात बापूंनी कुंडल येथे लष्करी प्रशिक्षण केंद्र व जनता कोर्ट स्थापन केले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रतिसरकारच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. प्रतिसरकारची खरी ताकद असलेल्या तुफान सेनेचे ते फील्ड मार्शल होते. प्रतिसरकारच्या स्थापनेपासूनच सर्व उपक्रमात ते अग्रभागी होते. भूमिगतांची केंद्रे, मध्यवर्ती युद्ध मंडळ, न्यायदान मंडळ, लष्करी प्रशिक्षण केंद्र, जनता कोर्ट, आघातदल आदी आघाड्यांवर ते कार्यरत राहिले. प्रतिसरकारच्या माध्यमातून दारूबंदी कार्यक्रम आखले गेले. गांधीवादी पद्धतीने सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले गेले. जीडी बापू आणि क्रांती वीरांगना विजयाताई यांचा विवाह याच पद्धतीने २५ मे १९४५ रोजी झाला. एकमेकांना रक्ताचे टिळे लावून गांधीवादी पद्धतीने हे लग्न झाले. तसेच गावोगावी ग्रंथालये काढण्यापासून ते रात्रशाळा चालवण्यापर्यंतच्या विविध कार्यांत जीडी बापू सक्रिय राहिले. त्यांनी आझाद गोमंतक दलाला सहकार्य केले. गोव्यातील म्हापसा येथे सरकारी कचेरीवर बॉम्ब टाकला. तसेच मराठवाड्यात जाऊन रझाकारविरोधी सशस्त्र लढ्याची उभारणी कऱण्यात पुढाकार घेतला. नाशिकच्या शेतकरी लढयात सहभाग घेतला. एकूण काय तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जे जे करता येईल ते ते बापू करत होते.
जीडी बापूंनी कॅप्टन रामभाऊ लाड यांना १९९० साली दिलेल्या अनेक मुलाखतींच्या आधारे ‘जी.डी.बापू लाड : आत्मकथन – एक संघर्षयात्रा’ हे पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकात जीडी बापूंची ब्रिटिश साम्राज्यशाहीकडे बघण्याची भूमिका स्पष्ट होते. ते म्हणतात ‘इंग्रजी साम्राज्यशाही सत्ता म्हणजे सिकंदराची, अहमदशहा अब्दालीची किंवा हिटलरची सत्ता नव्हती. तिचा पाया औद्योगिक भांडवलदारी होता. आणि त्या औद्योगिक भांडवलदारीचे सूत्र असे होते की, ते आपल्या श्रमिकांना जे देतात त्याच्यापेक्षा उत्पादन जास्त होतं. ते जास्त झालेले उत्पादन त्यांच्या राष्ट्रातील लोक खरेदी करू शकत नाहीत. तेव्हा गिऱ्हाईक शोधण्याकरिता ते जगभर गेले. म्हणजे प्रदेश जिंकण्याकरिता ते जगभर गेलेले नाहीत. इंग्रजी सत्तेचे हे वैशिष्ट्य आहे.’ याचा अर्थ बाजारपेठेवर आधारलेल्या साम्राज्यवाद हा ब्रिटिश साम्राज्यवाद होता हे जीडी बापूंचे निरीक्षण होते. तसेच १९८६ च्या क्रांतीदिनी बापूंच्या ‘पेटलेले पारतंत्र्य व धुमसते स्वातंत्र्य’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची प्रस्तावना आहे. त्यामधूनही बापूंची धगधगती संघर्षमय कहाणी आणि समाजवादी समाजरचनेची आस असलेली विचारधारा स्पष्ट दिसते.
वयाच्या विशीमध्ये राजकीय-सामाजिक आकलन असणं आणि ते करून घेणं त्याबद्दलची जिज्ञासा असणं हे फार महत्त्वाचं होतं. बापूंच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहताना लक्षात येतं की, वैद्यकीय शिक्षण सोडून ते स्वातंत्र्याच्या आंदोलनात गांधीजींच्या प्रेरणेने आले. एका अहिंसावादी व्यक्तिमत्त्वाच्या महान प्रेरणेतून त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. त्यानंतर तुरुंगवसातील अभ्यासात मार्क्स – लेनिन यांच्या डाव्या तत्त्वज्ञानाचा पगडा त्यांच्यावर पडला. तसेच येथील जातीय उतरंडीबाबत काही प्रश्न त्यांना भेडसावत होते. त्या काळात बापूंनी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांना काही प्रश्न विचारलेले होते. भारतीय जाती व्यवस्था नेमकी काय आहे हे आंबेडकरी विचारातून समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे गांधी, मार्क्स आणि आंबेडकर या तिघांचा मोठा प्रभाव बापूंच्या जडणघडणीवर होता हे स्पष्ट होते. नेहरू, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचाही प्रभाव त्यांच्यावर होता. समाजवाद हा भारतामध्ये भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या विकासक्रमातून आला आहे हे जीडी बापूंचे ठाम मत होते.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बापूंवर मराठवाड्यातील लढ्यात हत्यारे पुरविली व सहभाग घेतला म्हणून खटला दाखल केला गेला. नोव्हेंवर १९४८ ते नोव्हेंबर १९५० अशी दोन वर्षे बापू येरवडा, सांगली, नाशिक आदी तुरुंगांत राहिले. तेथे त्यांना कॉ. श्रीपाद अमृत डांगे, शाहीर अमर शेख यांच्यासह अनेक मंडळी भेटली. बापूंना तुरुंगवासातील वाचनातून मार्क्सवाद समजला. समाजाकडे डोळसपणे बघताना त्यांनी तो कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. शास्त्रीय समाजवादाकडे ते सूक्ष्मपणे बघू लागले. जीडी बापू ज्या मार्क्सवादाकडे आकर्षित झाले, तो मार्क्सवाद म्हणजे पोथी नाही तर कालसुसंगत असे तत्त्वज्ञान आहे. नव्या आर्थिक धोरणाबाबतची जीडी बापूंची भूमिका होती. ते म्हणतात, जागतिकी – करणाच्या ढाच्यामध्येच अंतर्विरोध आहे. आपल्याला जो नवा भारत घडवायचा आहे तो शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना पूर्ण संधी देणारा घडवायचा आहे. घटनेत समाजवाद समाविष्ट केला गेला पण तो अमलात येणार नाही याची दक्षता घेतली गेली. मार्क्स सांगत होता की, सारे अनर्थ तत्त्वज्ञानाच्या दारिद्र्यामुळे निर्माण झालेले आहेत. दारिद्र्याचे तत्त्वज्ञान आपल्याला नको आहे तर तत्त्वज्ञानाचे दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जगाची निर्मिती कशी झाली हे सांगत बसू नका, तर मुद्दा आहे हे जग बदलायचे कसे हा. ही व्यवस्था चुकीची आहे. ती सर्वांना न्याय देत नाही. ती विषमतावादी आहे. म्हणून ती बदलण्याची गरज आहे. राज्यव्यवस्थेचा बदलण्याचा मुद्दा म्हणजेच राज्य व्यवस्थेने आपले कार्यक्रम बदलण्याचा मुद्दा आहे. जीडी बापूंची भूमिका ही अशी होती.
इंग्रजांची अमानुष सत्ता खिळखिळी करण्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते ते सर्व प्राणाची बाजी लावून क्रांतिअग्रणी जी. डी. बापू करत राहिले. १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून तासगाव मतदारसंघातून निवडून आले. ते शेकापचे सरचिटणीस झाले. आणि पक्षातर्फे १९६२ ला ते विधान परिषदेत निवडून गेले. त्यांनी सभागृहात मंत्र्यांच्या वाढीव पगारापासून ते शेतकऱ्यांच्या पिकाला किमान हमीभावापर्यंत अनेक प्रश्नांना वाचा फोडली. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. अखेरच्या घटकेपर्यंत वयाच्या नव्वदीतही ते शेतकरी कष्टकरी जनतेच्या लढ्यात अग्रणी होते. जीडी बापू हे सर्वार्थाने एक झुंजार वादळ होते. भारतीय स्वातंत्र्याला साडेसात दशके आता होत आहेत. चार पिढ्या आपण पुढे आलो आहोत. पण त्या ऐतिहासिक लढ्याचे भान आपण प्रत्येकाने ठेवलेच पाहिजे. भारताला स्वातंत्र्य सर्व जाती, धर्म, पंथातील हजारोंच्या बलिदानाने मिळाले आहे. क्रांतिअग्रणी जीडी बापूंसारख्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारच्या नरकयातना, हालअपेष्टा, कारावास भोगले आहेत, लढे दिले आहेत, चळवळी उभारल्या आहेत. म्हणून तर आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. ज्या विचारधारेचे स्वातंत्र्य आंदोलनात कोणीच नव्हते त्या विचारधारांचे लोक स्वातंत्र्यलढ्याला बदनाम करत आहेत. भारतीय स्वातंत्र्य हे भीक होते असे वक्तव्य करून स्वातंत्र्यसैनिकांचा, शहिदांचा अपमान करत आहेत. सत्ताधारी वर्ग व त्यांचे समर्थक त्यावर सोयीस्कर मौन बाळगून आहेत. हे आजचे वर्तमान आहे.
९ ऑगस्ट १९४२ रोजी ‘ब्रिटिशांनो चालते’ व्हा हा आदेश जननायक महात्मा गांधींनी दिला. लोकपातळीवरून सर्वंकष असहकाराशिवाय साम्राज्यवादाचा बिमोड होणार नाही हे ओळखून जनतेला ‘करा किंवा मरा’ हा आदेश दिला. आपापल्या भागामध्ये क्रांतिअग्रणी जीडी बापूंसारखे तेजस्वी तरुण या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले आणि त्यामुळे आपण १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालो. स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षांमध्ये राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी चळवळीत क्रांतिअग्रणी जीडी बापूंनी फार मोठे योगदान दिले. स्वातंत्र्य कुणासाठी मिळवले आणि कशासाठी मिळवले ही भूमिका पक्की असल्याने जीडी बापू सर्व क्षेत्रांत वसा घेऊन व्रतस्थपणे कार्यरत राहिले. क्रांती सहकारी साखर कारखाना, नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह, गांधी एज्युकेशन सोसायटी, क्रांती दूध संघ, क्रांती गार्मेंट यांसह अनेक पाणीपुरवठा संस्था त्यांनी उभ्या केल्या. या सर्व संस्थांना समर्थ नेतृत्व दिले. त्या सांभाळण्याची ताकद नव्या पिढीत त्यांनी निर्माण केली. शब्दश: हजारो माणसे त्यांनी उभी केली. आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.
एवढे सगळे कृतकृत्य वाटावं असं भव्य दिव्य कार्य करूनही जीडी बापू शेवटपर्यंत अस्वस्थ होते. कारण सर्व क्षेत्रांना येऊ लागलेले बाजारू स्वरूप त्यांना भावत नव्हते. यासाठी आम्ही स्वातंत्र्य मिळवले नव्हते असे ते ठासून सांगत. भ्रष्टाचारापासून ते विषमतेपर्यंतच्या सर्व प्रश्नावर त्यांनी लढा दिला. ते सतत लोकांशी चर्चा करत असत. विचारांचे आदानप्रदान करत असत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने ते शेकडो वेळा अनुभवले आहे. लोकप्रबोधनाचा ध्यास घेतलेल्या क्रांतिअग्रणींना प्रबोधनानेच परिवर्तन घडून येईल असा सार्थ विश्वास होता. जवळजवळ २५ वर्षे मी त्यांचे काम जवळून बघितले आहे. मला जीडी बापूंशी अनेकदा संवाद साधता आला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी आणि त्याचे आजच्या काळात महत्त्व सांगणारी अनेक व्याख्याने मी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बेळगाव आदी जिल्ह्यांत दिली आहेत. अजूनही ती होत राहतील. समाजवादी प्रबोधिनीच्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचा ‘क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड जन्मशताब्दी विशेषांक’ मी संपादित केला तो अनेकांना आवडला. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने झालेल्या विविध बैठका व उपक्रमांत मला सहभागी होता आले हा मी माझा बहुमान समजतो.
समाजाचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या कामात सातत्याने व्यग्र असलेले क्रांतिअग्रणी हे आफलातून व्यक्तिमत्त्व होते. क्रांतिअग्रणी जीडी बापूंना त्यांच्या अनमोल कार्याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने ‘डी.लिट्.’ ही सन्माननीय पदवी २०११ साली प्रदान केली होती. मेडिकलमधील डॉक्टरकीचे स्वातंत्र्यासाठी शिक्षण सोडून देणाऱ्या जीडी बापूंना आपल्या अतुलनीय कार्यामुळे विद्यापीठाकडून अशी डॉक्टरेट पदवी मिळणं हा योग्य असा मोठा सन्मानच होता. स्वातंत्र्य आंदोलनात वैद्यकीय शिक्षण सोडून देऊन सहभागी झालेल्या जीडी बापूंना त्यांच्या कार्यातून डॉक्टरेट मिळणं हे अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे.
आज आपले थोरपण समाजावर लादण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात. पण क्रांतिअग्रणी जीडी बापूंसारखी सर्वार्थाने थोर माणसेच समाजाला पुढे नेत असतात. आज अनेक थोरपणाच्या महावस्त्राचे अस्तर मांजरपाटाचे निघताना दिसते. तसेच काहींच्या चिंध्याआड त्यांच्या मनाचे मोठेपण मखमलीसारखे प्रत्ययाला येते. जीडी बापूंचे मोठेपण आणि अस्वस्थताही अशीच मखमली होती. मृत्यूने गाठण्यापूर्वी कृतार्थ जीवनाचा आदर्श जीडी बापूंनी उभा केला आहे. जीडी बापू यांचे उभे आयुष्य एक संघर्ष यात्रा होती. अर्थात तो संघर्ष आजही संपलेला नाही. कारण तो विचारांचा लढा आहे. जी मूल्यव्यवस्था घेऊन जीडी बापूंसारखी माणसे जगली, लढली, जे विचार त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या मूल्यव्यवस्थेला चूड लावण्याचं काम आज अत्यंत वेगाने होत आहे. त्या विरोधी आवाज उठवणे आणि सक्रिय राहणे हीच क्रांतिअग्रणी जीडी बापूंना जन्मशताब्दीची खरी आदरांजली ठरेल. जीडी बापूंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन…!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत. तसेच गेली ३३ वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक आहेत.)
prasad.kulkarni65@gmail.com