अॅड. राजा देसाई
‘विनाशायच दुष्कृताम्’ या हेतूसाठीदेखील गीतेला हिंसा मान्य नाही, हे समजून घेण्यासाठी निमित्त लवकरच येणाऱ्या गीताजयंतीचं आणि न थांबणाऱ्या हिंसेचं…
अणुबॉम्ब जनक रॉबर्ट ओपेनहायमर यांच्यावरील इंग्रजी सिनेमात स्फोटाच्या क्षणी त्यांची प्रेयसी त्यांना भगवद्गीतेतील श्रीकृष्णांच्या तोंडचा पुढील श्लोक वाचायला सांगते : ‘कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो…’ (११.३२ : मी मृत्यू आहे; विश्वाचा संहारक!’) भयंकर हिंसेचं निदर्शक असलेल्या अणुबॉम्बचा संबंध भगवद्गीतेशी दाखवण्यावर भारतात टीकेचा सूर निघाला. पण या श्लोकावर अन्य भाष्येही आहेत: ‘मैं विनाश करनेवाला काल हूं, तू नही लड़ेगा तो भी ये योद्धा थोडेही अमर है?’- गांधी. ‘तरि मी काळु गा…।’ – ज्ञानेश्वर. ‘मी काळ लोकांतक वाढलेला…’ – विनोबा. ‘आय अॅम द टाइम… द डिस्ट्रक्शन, (धिस ऑल्सो इज) पार्ट ऑफ माय वर्किंग्ज (दॅट) कम्स इन द प्रोसेस ऑफ द टाइम- स्पिरिट’ – योगी अरविंद. विनाश असा अटळ म्हणून योग्य कारण/ वेळी तरी हिंसा समर्थनीय का? ते कोणी कसं ठरवायचं? ही तर हिंसेला मोकळीकच ठरेल. उलट अहिंसाही विनापवाद स्वीकारणं म्हणजे माणसातील समाजविघातक दुष्ट शक्तींना मोकळं रान सोडणं! अनेक प्रश्न. त्यांची उकल गीतेतूनच करण्याचा हा प्रयत्न, आजच्या गीताजयंतीदिनी.
पण गीता उत्तरांऐवजी मुख्यत: तिला दिसणारे निसर्गनियम देते, पटल्यास आपणच त्यांतून आपापली उत्तरं शोधावीत : ‘इति ते ज्ञानमाख्यातं… यथेच्छसि तथा कुरु’ (१८.६३): ‘अर्जुना, सर्व बाजूंनी तुला विश्वार्थ/ जीवनार्थ सांगितला, आता तू त्यावर सर्वंकष विचार करून काय करायचं ते ठरव’! गीता कर्मांची हिंसा-अहिंसा, चांगलं-वाईट अशी वर्गवारी देत नाही; चांगलं ते सारं ईश्वर व वाईट (विनाश) ते सारं सैतान (इब्लीस) असंही भारत कधीच म्हणत नाही. किंबहुना भारताच्या धर्म-शब्दकोशात, ईश्वरापासून वेगळा या अर्थानं, सैतान हा शब्द नाही.
हेही वाचा >>> काश्मीरकडे ‘नेहरूंची घोडचूक’ म्हणून पाहाणं ही बौद्धिक अपरिपक्वता…
कोणते निसर्गनियम गीता देते? प्रथमत: ‘सत्त्व, रज, तम या तीन गुणांपासून मुक्त असा पदार्थ विश्वात नाही’ (‘न तदस्ति पृथिव्यां…’ १८.४०) व प्रत्येक प्राणिमात्रातील त्या गुणांच्या कमीजास्त मिश्रणाच्या प्रमाणावरून त्या त्या कर्ता, कर्म, ज्ञान, श्रद्धा इत्यादींचं तसंच कर्माचंही स्वरूप ठरतं (१८.१९). हाच तिच्या ‘स्वधर्मा’चा पाया : आपली अंत:करण-भावस्थिती प्राप्त परिस्थितीत कोणतं कर्म (स्वधर्म) करण्यास सहजानुकूल आहे की जेणेकरून ते कर्म आपल्याकडून सृष्टिचक्राचा भाग म्हणून (‘यज्ञार्थात्कर्मण्योऽन्यत्र…’ ३.९) फलाकांक्षेविना (‘कर्मण्येवाधिकारस्ते…’ २.४७) चांगलं व आनंदी राहून घडेल हे तो ठरवण्याचं प्रमुख सूत्र. युद्धापुरतंच नव्हे; प्रत्येक कर्मासाठी लागू. अर्जुन योद्धा नाइलाजानं झाला होता का? त्याचा अंत:करणभाव ‘मला खिळे ठोकणाऱ्या अज्ञान्यांना क्षमा करा’ म्हणणाऱ्या प्रभू येशूंच्या वा छातीत गोळी शिरल्याक्षणी ‘वाचवा, वाचवा’ऐवजी शांतपणं ‘हरे राम!’ म्हणणाऱ्या महात्म्याच्या जवळपास जाणारा तरी होता का? उत्तरं स्पष्ट आहेत. म्हणून तिथे प्रश्न हिंसा-अहिंसा हा नव्हता; तो मोह-आसक्ती विरुद्ध स्वधर्म/कर्तव्य असा होता. (म्हणून शेवटी ‘नष्टो मोह: …करिष्ये…’ (१८.७३) मोजक्याच टिपांसह केलेल्या आपल्या गीता-अनुवादाला अहिंसेचा पुजारी ‘अनासक्तियोग’ नाव देतो; वरील वा इतर युद्धसंबंधी श्लोकांवरही गांधी काही वेगळी टिप्पणी देताना दिसत नाहीत. आणि एरवीही कोणतंही कर्म पूर्णत: निर्दोष असू शकत नाहीच (‘सहजं कर्म कौंतेय…’ : १८.१८) हेही गीता-मत लक्षणीयच.
मुळात हे सर्व सांगणारे श्रीकृष्ण तरी कोण? तीनएक हजार वर्षांपूर्वीच्या समाजमानसासाठी लिहिलेल्या गीतेतील त्या त्या काळाच्या भाषा/रुपकांनी आजचा ‘विवेकवाद’ गडबडतो! गीतेतील श्रीकृष्ण म्हणजे मूलत: अनंत विश्वाला व्यापून असलेलं (‘ईशावास्यमिदंसर्वं…’) तेच अविनाशी अविकारी चैतन्य-तत्त्व (‘अक्षरं बह्म परमं…’ : ८.३), पण : ‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।…’ (९.११) : ‘अज्ञ लोक मला केवळ देहधारी मानव समजतात’ (गांधी); ‘…तेविं अमानुषा मानुष। मानाल मातें।।… जे इया स्थूलदृष्टी वायां। जाइजेल गा।।’ (ज्ञानेश्वरी). ‘मज मानव-रूपांत, तुच्छत्वें मूढ देखती’ (गीताई). ‘डिल्यूडेड माइण्डस… नो नॉट माय रीअल सुप्रीम नेचर’ (योगी अरविंद); आणि तरीही ‘तो’ नामानिराळा : ‘न कर्तृत्वं न कर्माणि…’ (५.१४).
आपल्या घोर अज्ञ स्थितीतून आपण वर येण्याच्या प्रवासात मदत म्हणून भारत ज्याला जे योग्य असेल अशी मूर्तिपूजेसहित अनेक साधनं देतो (‘साहे तैसा त्यास करू उपदेश’- तुकोबा ) हे भारताचं वैशिष्ट्य; ‘सब घोडे बारा टके नाही कारण ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’! मात्र साधनालाच साध्य म्हणून कवटाळलं जाऊ नये, हेही गीता निक्षून बजावते : ‘नाहं वेदैर्न तपसा…’ (११.५३) : ‘अखेर ना तू वेदांनी माझ्याशी एकरूप होशील, ना तपानं, ना दानानं, ना यज्ञानं’!
एकीकडे महाभारत ‘अहिंसा परमो धर्म:’ सांगतं व ते ज्यावाचून होणं शक्य नाही ती भगवद्गीता ‘अद्वेष्टा सर्व भूतानां…’, ‘मत्कर्म… निर्वैर सर्वभूतेषु…’, ‘समं सर्वेषु भूतेषु…’ (सर्व प्राणिमात्रांविषयी समत्व बुद्धी, निर्वैर, द्वेषहीन भाव ठेवा) इत्यादी सारी शिकवण डझनांनी श्लोकांतून देते; पण (आपणांसहित) सर्व ‘दुरितां’तील ‘तिमिर’ पूर्णत: नष्ट होईपर्यंत न संपणाऱ्या अन्यायाला प्रतिकार होणारच हा निसर्ग- आणि गांधी कोटीकोटीत एखादाच जन्मतो हाही निसर्गच! (मात्र राजकारणही मोक्षासाठी करणारे गांधी अगदी प्रामाणिकपणंही स्वीकारताना आपलं स्वत:चंच मन नि:स्वार्थ असूनही सत्ताकारणग्रस्ततेनं अशांत-द्वेषपूर्ण असेल तर आपलं जीवन-कर्म समाजात शांती-प्रेम रुजवील? )
मुळातच मानवी कल्याणासाठीची अहिंसा/समता ज्याविना अशक्यच, त्या मानवातील सहवेदनेचा विकास किती? तर संयुक्त राष्ट्रांच्या असंख्य ठरावांना केराची टोपली दाखवीत केवळ जिवंत राहण्याच्याही मानवी भावनेच्या अण्वस्त्रधारी राष्ट्राकडून ठिकऱ्या उडवणारं दर्शन जगाला अनेक आठवडे नुकतंच ‘गाझा’त घडलं (‘आमचे तेराशे तर तुमचे तेरा हजार’!). गुन्हेगार कोण? तर आपल्याच मायभूमीत पाच पिढ्या राष्ट्रविहीन गुलामसदृश जीवन लादलं गेलेला पृथ्वीच्या पाठीवरील एकमेव (गाझासहित अर्धा कोटीचा) पॅलेस्टिनी समूह! आणि तेही कोणाच्या पाठिंब्यानं? ‘मानव अधिकारांची मक्तेदारी घेतलेल्या’ पण दहशतवादाचं जनन-पोषण करणाऱ्या प्रतिष्ठित सबळांच्या! नैतिकता ही मुखवट्यापुरती; अजूनही न्याय ‘बळी तो कान पिळी’ हाच!
प्रश्न आहे या ‘आय फॉर अॅन आय’ विषचक्रातून मानवासाठी चिरंतन सुखाचा मार्ग कोणता? गीता सांगते : ‘तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यार्पित मनोबुद्धि:…’(८.७); ‘मयी सर्वाणि… युध्यस्व विगतज्वर:’ (३.३०) : ‘अर्जुना, युद्ध करणं तुझं स्वधर्म-कर्तव्य आहे पण ते अखंडपणं माझ्या स्मरणात राहून व त्यासाठी तुझी मन-बुद्धी पूर्णत: माझ्यात विलीन करून राग-द्वेष-संतापहीन मनानं कर’!). काय होईल त्यानं? ‘त्यानं तू तुझ्या मूळ अविनाशी चैतन्याशी एकरूप झाल्यामुळं तुझी त्या विश्वशक्तीपासून वेगळेपणाची ‘मी/अहं’-जाणीवच उरलेली नसेल; (कर्म प्रकृतीकडून घडेल पण) मग ‘सुखदु:खे… नैवं पापमवाप्स्यसि।’ (२.३८) : ‘अशा युद्ध-कर्मानंसुद्धा पाप लागणार नाही.’ साऱ्याच संघर्षांमागे असलेले अहंकार- अस्मिता- द्वेष तसेच मानापमान- सूड- लोभ इत्यादी सर्व अमंगल भाव ‘मी’-जाणिवेअभावी गळून गेल्यामुळं घडणारं युद्धादी कर्तव्य-कर्म हे व्यक्तीचा आध्यात्मिक/नैतिक विकास तसंच सामाजिक शांती-सद्भाव या दोहोंसही पोषक होईल.
थोडक्यात, ‘अहिंसा परमो धर्म:’ आणि सारे महात्मे हे ध्रुवतारे : ‘परां गतिम्’! आणि म्हणून ‘धर्म-रक्षणा’साठीच नव्हे तर अगदी ‘विनाशायच दुष्कृताम्’साठीही गीतासुद्धा कुठेही वैर-द्वेषापोटीची हिंसा ही गरज म्हणून सांगत नाही; उलट ‘मी’ मुक्तीबरोबरच ती ‘दैवी संपत्ती’चा आदर्श सांगते : ‘अभयं सत्त्वसंशुद्धि:…’, ‘अहिंसा सत्यम्…’ (१६.१/२/३) ‘शुद्ध अंत:करण, तप, सरळपणा, अहिंसा, सत्य, भूतदया, परनिंदावर्जन, लोभराहित्य, क्षमा, वैराचा अभाव’ इत्यादी.
तू ‘मत्कर्म…निर्वैर: सर्वभूतेषु’ (११.५५) व ‘संन्नियम्य:… सर्वभूतहितैरत:’ (१२.४) : असं जीवनभर अनासक्तपणं प्राणिमात्राच्या कल्याणासाठी स्वधर्म- कर्म करीत जगलास की मोक्ष तर याची देही तळहातावरच : ‘अव्योक्तोऽक्षर… यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम’ (८.२१/१५/१६)! ‘युगायुगात एखादाच महात्मा तिथं पोहोचतो म्हणून ‘अव्यवहारी, स्वप्नाळू’ वाटणारे असे सारेच आदर्शवाद हे आपण पोहोचू न शकणारे ध्रुव तारेच असतात : प्रवासाची दिशा तरी चुकू नये म्हणून! रागलोभ, अस्मिता, सर्व-मांगल्याची अधिरता इत्यादींपोटी हे नाकारावं तर उरेल काय? लाखो वर्षं मानव चालत असलेला तोच तो ‘डोळ्याला डोळा’चा रस्ता!
मात्र नव्या काळात आपणा सामान्य धार्मिकांत अखंड व अत्यंत तटस्थ सावधानता हवी : नाही तर कलियुग म्हणजे काय याचं रोज ज्वलंत दर्शन घडवणारं सत्ताकारण ‘धर्म संस्थापनार्थाय’चा बुरखा घेऊन धर्मालाच आपली दासी कधी बनवून टाकील याचा पत्ताही लागणार नाही!
rajadesai13@yahoo.com