बॉम्बे हाऊसमध्ये- म्हणजे टाटा समूहाचं मुंबईतलं मुख्यालय- इथं काम करणारे सांगतात- भारतातल्या सगळय़ात मोठय़ा उद्याोगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा जेव्हा या इमारतीत आपल्या कार्यालयात येण्यासाठी शिरतात..

तेव्हा काहीही वेगळं होत नाही!

म्हणजे एरवी एखाद्या छोटय़ा-मोठय़ा उद्योगपतीच्या कार्यालयात त्याच्यासाठी स्वतंत्र लिफ्ट असते. तो यायच्या आधी त्याचे भालदार-चोपदार ‘बाजू व्हा.. बाजू व्हा’ असं म्हणत तिथे असलेल्या इतरांना उगाचच लहान वाटायला लावत असतात. पण रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये शिरतात तेव्हा यातलं काहीही होत नाही. त्यांची गाडी आली की पहिल्यांदा दारात बसलेल्या कुर्त्यांना आनंद होतो. आता एवढय़ा मोठय़ा उद्योगपतीच्या दारी कुत्रे असणं नवीन नाही. पण बॉम्बे हाऊसमधले कुत्रे म्हणजे खरे कुत्रे. चार पायांचे. समस्त टाटा कुटुंबियांना त्यांचं प्रचंड प्रेम. रतन टाटा यांची गाडी आली की हा सारमेय संप्रदाय त्यांच्या गाडीभोवती जमतो. गाडीतून उतरले की लोक काय म्हणतील वगैरे विचार न करता रतन टाटा त्यातल्या काहींना थोपटतात. लाड करतात. ‘दीज इंडियन डॉग्ज..’ वगैरे शब्द त्यांच्या तोंडात काय, मनातही येत नाहीत. आणि मग ते लिफ्टच्या रांगेत उभे राहतात. इतर कर्मचाऱ्यांसारखे. म्हणजे त्यांच्यासाठी लिफ्ट राखून वगैरे ठेवली जात नाही. आपण कोण आहोत, काय आहोत, हे हा माणूस कधीही मिरवत नाही. पेज-थ्रीच्या उथळ आणि उठवळ पार्ट्यांत पाचकळपणा करताना दिसत नाही. आणि उद्योगपतींच्या मतलबी गराडय़ातून स्वत:ला अलगद वेगळं ठेवू शकतो. स्वत:च्या घरासाठी २०-२५ मजल्यांचा इमला उभारणं टाटांना सहज शक्य आहे. पण ज्या शहरात ६५ टक्के जनतेच्या डोक्यावर आभाळाशिवाय काहीच नाही, त्या शहरात असं राहणं बरं नाही, हे त्यांना जाणवतं. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यासारखे ते फ्लॅटमध्ये राहतात. आणि शनिवारी आपले दोन जर्मन शेफर्ड कुत्रे आणि ते स्वत:च्या छोटय़ा यंत्रहोडीतून अलिबागला जातात.

local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
Executive Trustee of Bharatiya Unit Trust and apex body of mutual funds A P Kurian
बाजारातली माणसं : फंड उद्योगाचा पायाचा दगड, ए. पी. कुरियन
minister of energy
महाराष्ट्राचे ऊर्जामंत्रीपद कुणाला मिळणार… सलग दहा वर्षांपासून नागपूर…
Rashtriya Swayamsevak Sangh on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होताच संघ स्वयंसेवकामध्ये आनंद…..
Congress and farmers organizations in Rajura need new leadership like arun dhote and adv deepak chatap
राजुऱ्यात काँग्रेस, शेतकरी संघटनेला नव्या नेतृत्वाची गरज! अरुण धोटे, ॲड. दीपक चटप यांची नावे चर्चेत

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात टाटा उद्योगसमूहाचा कंठहार असलेल्या ताज हॉटेलला लक्ष्य करण्यात आलं होतं. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर असलेल्या या हॉटेलच्या व्यवस्थापकाचं कुटुंबच्या कुटुंब या हल्ल्यात बळी पडलं. त्यांना तर टाटा यांनी मदतीचा हात दिलाच; पण या हॉटेलच्या परिसरातले जे जे जायबंदी झाले वा बळी पडले, त्या सगळ्यांच्या घरी जाऊन रतन टाटा यांनी जातीनं त्यांना मदत केली. हे करायची त्यांना काहीच गरज नव्हती. आणि ते केलं नसतं तरी त्यांना कोणी काहीही म्हणालं नसतं. पण तरी त्यांनी ही मदत केली. हे खास टाटापण! त्यांचे पूर्वसुरी जेआरडी हे बेस्टच्या रांगेत आपल्या कार्यालयातलं कोणी उभं असलेलं दिसलं तर त्याला चक्क आपल्या गाडीतूनच घेऊन यायचे बरोबर. त्यात कोणी ओशाळं वाटून म्हणालंच की, तुमच्या गाडीत कशाला? त्याला जेआरडींचं उत्तर असायचं : गाडी माझी नाहीए. कंपनीची आहे. तेव्हा कंपनीतल्याच कोणाला बरोबर घेतलं तर बिघडलं काय?

जेआरडी किंवा रतन टाटा यांच्या दृष्टीनं त्यात काही बिघडलेलं नाही. बिघडलेलं असलंच, तर आपल्याकडचं वातावरण! ज्या देशात नियम, कायदेकानू वगैरे न पाळणं हे पुरुषार्थाचं, सामर्थ्यांचं लक्षण मानलं जातं, त्या देशात टाटा यांच्यासारखे उद्योगपती हे अल्पसंख्याकांत जमा असतात. आणि ज्या देशात उच्च विचारसरणीसाठी साधी राहणी हा अत्यावश्यक घटक ठरतो, त्या देशात टाटा हे गौरवशाली अपवाद ठरतात. १४४ वर्षीय उद्योग घराण्याची ही पाचवी पाती!

रतन टाटा यांनी १९९१ साली कंपनीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. टाटा समूहाच्या परंपरेप्रमाणे तसे ते आधीपासून- म्हणजे १९६२ पासूनच कंपन्यांच्या विविध शाखांत काम करीत होते.. अनुभव घेत होते. लोभस, राजस जेआरडींचा तो काळ. टाटा समूह अनेकांगांनी वाढला होता आणि या प्रत्येक वळणावर एकेक ढुढ्ढाचार्य आपापली मठी सांभाळत होता. ही सगळीच मोठी माणसं होती. परंतु ती सगळी मिळून समूहाला मोठं करण्याऐवजी स्वत:च्या मोठेपणातरंगली होती. एखादा उद्योग हा समूह म्हणून जागतिक पातळीवर वाढू इच्छित असेल तर नुसत्या फांद्या मजबूत होऊन चालणार नाही, त्याचं खोडही तितकंच सशक्त आणि निरोगी असायला हवं.. हे पहिल्यांदा रतन टाटा यांनी ओळखलं. त्यामुळे सूत्रं हाती घेतल्यावर त्यांनी पहिल्यांदा काय केलं, तर या बेढब प्रमाणात वाढलेल्या फांद्या छाटायला सुरुवात केली. तसं करताना अगदी रूसी मोदी यांच्यासारख्या मजबूत फांदीची कापणी करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. मोदी त्यावेळी इतके सटकलेले होते, की रतन टाटांविरोधातल्या लढाईत त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या ओवाळून टाकलेल्याचीही मदत घ्यायचा प्रयत्न केला होता. हे पाहिल्यावर मग रतन टाटा किती बरोबर होते, याची जाणीव अनेकांना व्हायला लागली. तेव्हा मोदी यांना टाटा स्टीलची जमीनदारी अखेर सोडावी लागली. परंतु रतन टाटा यांचा मोठेपणा हा, की त्यांनी एका चकार शब्दाने कधी मोदी यांचा अपमान केला नाही, की आपण जिंकल्याचा आनंद साजरा केला नाही.

त्यानंतरचं त्यांचं दुसरं पाऊल म्हणजे टाटा हा ब्रँड म्हणून अधिक कसदार आणि सकस कसा होईल, यासाठी त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. टाटा सन्स ही टाटा समूहातल्या अनेक कंपन्यांची मूळ कंपनी. त्यामुळे टाटा सन्सचा जो अध्यक्ष असतो, तोच टाटा समूहाचाही अध्यक्ष होतो. या कंपनीत टाटा यांची आणि समूहाची म्हणून अशी फार कमी मालकी होती. म्हणजे एखाद्यानं टाटा समूहाचे समभाग बाजारातून मोठय़ा प्रमाणावर विकत घेतले असते तर त्याला या समूहाचं नियंत्रण करता आलं असतं. हा धोका रतन टाटा यांनी ओळखला. त्यामुळे त्यांनी प्रथम टाटा सन्सची तटबंदी मजबूत केली. नंतर त्यांच्या आणखीन एका निर्णयावर त्यावेळी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तो निर्णय होता- ‘टाटा’ हे नाव वापरत असल्याबद्दल इतर कंपन्यांनी टाटा सन्सला स्वामित्व हक्क शुल्क देण्याचा! त्यालाही सुरुवातीला विरोध झाला. ज्या देशात घराण्याचं नाव फुकटात वापरायची सवय आहे, त्या देशात हे असं शुल्क वाजवून घेण्याची कुणालाच सवय नव्हती. ती टाटा यांनी लावली. ब्रँडिगसाठी भारतीय कंपन्या तशा कधी ओळखल्या जात नव्हत्याच. ब्रँडचं व नावाचं महत्त्व आपल्याला होतं. परंतु त्याचं बाजारपेठीय मूल्य आणि शास्त्र आपण कधी लक्षात घेतलं नव्हतं. ते टाटांनी भारतीय बाजाराला दाखवून दिलं. शेवटी नावातच सगळं काही असतं.

१९९१ नंतर भारतात आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले. आज ना उद्या भारताला हे करावंच लागेल, याची रतन टाटा यांना जाणीव होती. त्यासाठी ते सज्ज होते. जागतिकीकरणाच्या काळात परदेशी कंपन्या भारतीय बाजारपेठेत शिरत असताना हीच वेळ त्यांच्याही बाजारात मुशाफिरीसाठी जाण्याची- हे फक्त आपल्याकडच्या रतन टाटा यांनीच ओळखलं. या सगळय़ाच्या आधारे रतन टाटा यांनी भारतीयपणाच्या म्हणून ज्या काही मर्यादा अप्रत्यक्षपणे असतात, त्या त्यांनी सहजपणे ओलांडल्या आणि मग त्यांच्या रस्त्यानं जाणाऱ्यांची रांगच लागली.

अर्थात या काळातली रतन टाटा यांची सगळीच खरेदी काही योग्य होती असं म्हणता यायचं नाही. कोरसचा व्यवहार आतबट्टय़ाचा ठरला असं आता म्हणता येईल. त्यामागाने जग्वार लँड रोव्हर हा आतबट्टय़ाचा ठरेल असं वाटूनही तो तसा ठरला नाही. पण हे असं होणारच. यशस्वी व्हायचं असेल तर माणसानं थोडं धोकादायकच जगायला पाहिजे, असं जेआरडी म्हणायचे. रतन टाटा यांनी तेच केलं. पण तसं करताना धोकादायक म्हणजे नियम तोडून नाही, याचीही जाणीव ठेवली. त्याचमुळे इतर उद्याोगपतींच्या मागे- आणि पुढेही- वेगवेगळे भ्रष्टाचार चिकटले तसे रतन टाटांच्याबाबत झालं नाही. एक नीरा राडिया बाईंचं टेप प्रकरण सोडलं तर टाटा कधी वादग्रस्त झालेत असं झालं नाही. त्याही प्रकरणात तपशील पाहिला तर लक्षात येईल की, दूरसंचार क्षेत्र अनेकजण लुटून नेत असताना नियमाप्रमाणे जगू पाहणाऱ्यांची मोठी कुचंबणा होत होती. टाटांच्या कृतीनं त्या कुचंबणेलाच एक प्रकारे वाट फुटली.

या सगळय़ा काळात या उद्याोगसमूहाचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ नोंदवायलाच हवं. ते म्हणजे ‘दुनिया मुठ्ठी में’ घेऊ पाहणारे नवोद्याोगी या काळात आले, भराभरा वाढले ते सरकारधार्जिण्या, परवानाप्रेमी उद्याोगांमुळे! अशा उद्याोगांत सरकारची भूमिका महत्त्वाची असते आणि हात ओले करून ती आपल्या सोयीनं बदलता येते. अनेक उद्याोगांनी तशी ती बदलली. परंतु टाटा वाढले, विस्तारले ते सरकारी वरदहस्त नसलेल्या उद्याोग आणि सेवाक्षेत्रांत! आणि हेच त्यांचं मोठेपण आहे.

अशा धोरणाचे काही तात्कालिक तोटेही असतात. फायद्या-तोटय़ाच्या रहाटगाडग्यात बऱ्याचदा तोटा पदरी येतो. आपण मागे पडलो आहोत की काय, असं वाटायला लागतं. कारण अन्य काही अफाट, धोकादायक अशा वेगाने पुढे जात असतात. अशावेळी थांबायचं असतं आणि स्वत:वरचा विश्वास ढळू द्यायचा नसतो. जेआरडी यांनी तेच केलं. त्यांना जेव्हा- एका दुसऱ्या उद्याोगाची खूप प्रगती होतेय, तुम्ही मागे पडला आहात, याबद्दल विचारलं होतं तेव्हा जेआरडी उत्तरले होते : फॉर्म इज टेंपररी, क्लास इज पर्मनंट.

रतन टाटा यांनी हे सिद्ध केलं. एरवी मोठमोठी कर्तबगार, विक्रमी मंडळी कधी पायउतार होणार, असा प्रश्न पडतो. रतन टाटा यांनी ती वेळ स्वत:वर येऊच दिली नाही.

समर्थ रामदासांनी आदर्श राजा हा उपभोगशून्य स्वामी असायला हवा असं म्हटलं होतं. रतन नवल टाटा यांची कारकीर्द ती उपाधी आठवणारीच आहे.

Story img Loader