– तुषार अशोक रहाटगावकर

गेल्या सहा महिन्यांत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अनेक मुलींची त्यांच्याच प्रियकरांकडून हत्या झाल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. यापूर्वीही आपल्या पसंतीच्या मुलासह आयुष्य घालवण्याचा निर्णय घेणाऱ्या मुलींना त्यांच्या पालकांनी किंवा नातेवाइकांकडून मारले गेल्याच्या बातम्या सर्रास येत असत. आता ज्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं तो सहकारीच तिला मारत आहे. समोर येणारी प्रत्येक घटना पहिल्यापेक्षा जास्त भयावह आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. प्रेमात म्हणजेच सहजीवनात (लिव्ह इन रिलेशनशिप) दोन व्यक्ती कोणत्याही सामाजिक बंधनाशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे या नात्यात समानता आणि आदर असेल, अहिंसा असेल आणि प्रेम असेल अशी अपेक्षा असते आणि हा जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. पण आता ही नातीही कलंकित होत आहेत. तथापि, यातील काही घटनांमुळे लिव्ह-इन च्या कल्पनेच्या विरोधात वातावरण निर्मिती करणे फारच सोपं ठरेल आणि लिव्ह इन नाकारणं हा तर पुरुषप्रधान व्यवस्था टिकवणाराच जुना मार्ग! अशा वेळी प्रश्न पडतात ते, ‘लिव्ह इन’चा गैरफायदा घेणाऱ्या आणि हिंसक होणाऱ्या पुरुषांबद्दल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरुषांना या हत्या करणं इतकं सोपं का आहे? त्या पुरुषांनी कधी प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीचे डोळे पाहिले आहेत का? जर असं असेल तर ते प्रेम आणि विश्वासाने भरलेल्या डोळ्यांना कसे फसवतील? त्या पुरुषांनी याचा कधीतरी विचार केला आहे का की ते किती मोठा गुन्हा करत आहेत ?

हेही वाचा – भ्रष्टाचार – विषमता यांचे दुष्टचक्र थांबवण्यासाठी नवा आयोग हवा…

खरं तर बहुतेक पुरुषांना प्रेम कसं करावं हेच कळत नाही. ते प्रेमात अस्वस्थ आणि गर्विष्ठ बनतात. त्यांना कोणत्याही किंमतीत प्रेम जिंकायचं असते आणि ते मिळाल्यावर ते स्वतःला विजेते समजतात. पण त्यांना हे माहीत नसतं की प्रेमात सर्वस्व गमवावं लागतं. लग्न विधीशिवाय राहणाऱ्या सर्वसामान्य मुलींना सामाजिक मान्यता मिळणार नाही, याचीही मुलांना चांगलीच कल्पना आहे. सार्वजनिक लज्जा आणि सन्मानाच्या नावाखाली त्या गप्प राहणं पसंत करतात. पुरुष या मन:स्थितीचा चांगलाच फायदा घेतात आणि इथूनच हिंसाचाराचा पाया रचला जातो. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आणि भूतकाळात मारल्या गेलेल्या बहुतेक मुली अशाच परिस्थितीतून जात असाव्यात. म्हणूनच त्यांच्यापैकी बहुतेकांच्या नातेवाईकांना त्यांच्याबद्दल माहिती नव्हती किंवा त्यांना माहित असल्यास त्यांनी त्यांच्या मुलींशी संबंध तोडले होते.

आपल्या समाजात, मुलीसाठी लग्न हे केवळ सामाजिक संरक्षणाचं छत्र नाही, तर सामाजिक आदर आणि नातेसंबंधाची मान्यता मिळवण्याचा तोच एक मार्ग मानला जातो. बहुतेक मुली अशाच पद्धतीने वाढवल्या जातात जिथे लग्न हा त्यांच्या अस्तित्वाचा किंवा त्यांच्या जीवनाचा उद्देश बनविला जातो. म्हणूनच मुलीचे लग्नाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं ही काही सर्वसाधारण गोष्ट नाही. एखाद्या मुलीने असं जगणं हे आजही भारतीय समाजात धाडसाचे कृत्य आहे. सहसा लिव्ह इनचा निर्णय घेणाऱ्या मुलींच्या पाठीशी तिचे कुटुंबीय उभे राहत नाहीत. जेव्हा या मुलींचे साथीदार त्यांच्याशी गैरवर्तन करतात, तेव्हा त्यांच्याकडे असा कोणताही खांदा नसतो जिथे त्या त्यांच्या वेदना आत्मविश्वासानं व्यक्त करू शकतील किंवा ते वाईट वागणाऱ्या जोडीदाराशी नातेसंबंध तोडू शकतील. अशा वेळी ती तिच्या जुन्या मित्रांनादेखील गमावते आणि तिच्याजवळ अशी कोणतीच जागा नसते जिथे ती अशा जोडीदारापासून बिनदिक्कत दूर जाऊ शकेल.

दुसरीकडे, पुरुषांसाठी असं नातं सोडणं नेहमीच सोपं असतं. त्यांचे कुटुंबीय सहसा त्यांना सहजासहजी सोडत नाहीत, उलट हे त्याच्या पुरुषत्वाचे गुण मानले जातात. म्हणूनच सर्वात आधी हे महत्त्वाचं आहे की जर एखादी मुलगी तिचा जोडीदार निवडत असेल तर तिचा दृष्टिकोन जाणून घेतला पाहिजे. तिला एवढा विश्वास दिला पाहिजे की ती कधीही न घाबरता आपले मत मोकळेपणानं मांडू शकेल. मग कदाचित आपल्या मुली निर्भयपणे विषारी दबंग पुरुष साथीदारांच्या हिंसेविरुद्ध लढू शकतील.

हेही वाचा – इंटरनेट बंदीच्या ‘राजधानी’ला वेसण कशी घालणार?

साधारणपणे नोकरदार मुलींना असं वाटतं की त्या आता असे निर्णय घेऊ शकतात आणि त्या घेतातसुद्धा… पण स्वतःच्या पायावर उभं राहाणं म्हणजे केवळ नोकरी करणं किंवा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं नव्हे. मानसिकदृष्ट्या स्वतंत्र व्यक्तिमत्व किंवा मानसिक गुलामगिरीतून मुक्त जीवन ही सशक्त असण्याची पहिली अट असावी. जेव्हा कुटुंबाचा विरोध सहन करूनही मुली स्वतःच्या हिताचे निर्णय घेतात तेव्हा हे स्वातंत्र्य त्या जबाबदारीनं वापरत असतीलही, पण हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम पुढे असतंच… ते स्वातंत्र्य पुढल्या प्रत्येक निर्णयात खमकेपणानं जपलं पाहिजे. एकदा सन्मान आणि स्वातंत्र्याशी तडजोड केली की नेहमी तडजोडीचा मार्ग अवलंबला जातो. या तडजोडीत जी गोष्ट संपेल ती म्हणजे मुलींचं स्वतंत्र व्यक्तिमत्व. अशा कोणत्याही हिंसेला अहिंसक मार्गानं विरोध करणं आवश्यक आहे. अहिंसा हे दुर्बलतेचं लक्षण नाही.

एवढंच नाही तर मुलींनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी लिव्ह इन सारखा धाडसी निर्णय स्वतः घेतला आणि त्यासाठी लोकांशी संबंध तोडले याचा अर्थ प्रेमात कोणत्याही प्रकारची हिंसा सहन करण्याची सक्ती त्यांच्यावर झालेली नाही. कोणत्याही परिस्थितीत हिंसा सहन न करण्याची सवय आपल्याला लावली पाहिजे. एकदा नात्यात हिंसेला स्थान मिळाले की ते पसरतच राहील. अशा नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं आहे हे मुलींनाही कळायला हवं.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls should save their freedom in live in relationship ssb