निनावी देश-निनावी शहर आणि माणसांच्या जात-धर्म-देशाच्या तपशिलालाही उघड न करता तणाव-प्रश्नांचा पसारा जगातील कोणत्याही कोपऱ्यात सारखाच कसा असू शकतो, याचा बोध करून देणारी हुआन पाब्लो विझालोव्होस या मेक्सिकोच्या लेखकाची ही कादंबरी. आपल्या गल्लीतल्या गोष्टींना अधिकाधिक ग्लोबल करणारी..

पंकज भोसले

Loksatta book batmi John Baxter Paris
बुकबातमी: जॉन बॅक्स्टरचे पॅरिस…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
jj hospital stipend
जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांचे विद्यावेतन रखडले, निवासी डॉक्टर मानसिक तणावाखाली
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis should become heir of pm Narendra Modi and lead country says vijay wadettiwar
मोदींचे वारसदार होऊन देशाचे नेतृत्व करा… वडेट्टीवारांच्या फडणवीसांवरील स्तुतीसुमनांमुळे…
Jean Marie Le Pen the founder of the National Front in France passed away
फ्रान्सच्या अतिउजव्या नेत्याचे निधन; स्थलांतरितांना कठोर विरोध करणारे ज्यँ मारी ल पेन कालवश
vinay hiremath post (1)
Vinay Hiremath: “खूप श्रीमंत झालोय, पण आता या आयुष्याचं करू काय?”, ८ हजार कोटींना कंपनी विकणाऱ्या विनय हिरेमठ यांच्यासमोर यक्षप्रश्न!
Loksatta lokrang Love Pictures Poet Relationship PWD Engineer
अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…

हुआन पाब्लो विझालोव्होस (विलालोबोस, विलालोस) हा मेक्सिकोचा कादंबरीकार स्पेनच्या बार्सिलोना शहरात काही वर्षे राहिला. त्या काळात त्याने त्याच्यापासून पूर्णपणे तुटलेल्या मेक्सिकोतल्या उपनगरांतील गल्ल्यांत महाल बांधून राहणाऱ्या ड्रग माफियाच्या मुलाला निवेदक करणारी सत्तर पानांची ‘डाऊन द रॅबिटहोल’ ही कादंबरी लिहिली. हे सात-आठ वर्षांचे ड्रग माफियाचे आईविना वाढत असलेले पोर समाजीकरणाच्या प्रक्रियेपासून पूर्णपणे वंचित असलेले. अवती-भवतीच्या पंधराएक माणसांच्या गोतावळय़ात त्याची भावनात्मक जडण-घडण झालेली. पण इंटरनेट आणि एनसायक्लोपीडियाच्या माध्यमातून त्याची ग्लोबल होण्याची प्रक्रिया मात्र निर्धोक सुरू राहणारी. ‘घृणास्पद’, ‘विनाशकारी’, ‘निष्कलंक’, ‘दयनीय’, ‘आपत्तीजनक’ ही त्याची स्वत:ची कठीण शब्दांची संपत्ती. योलकॉट नावाचा ड्रग माफिया वडील आणि मिझ्टली नावाचा शिक्षक अधिक सुरक्षारक्षक या दोन सर्वाधिक जवळच्या व्यक्तींचा तपशील तो सर्वाधिक देतो. त्यासह आपल्या महालातील खोल्यांसह वाघ-सिंह असणाऱ्या खासगी प्राणीसंग्रहालयाची, महालातील निवडक माणसांची, ज्यात तांबडा-पांढरा-हिरवा रस्सा असलेले कोंबडीचे पक्वान्न बनवणारी आचारी व्यक्ती आणि शरीराचा उत्तम बांधा असल्याने वडिलांच्या इच्छेनुसार बोलावली जाणारी सुंदर तरुणीही येते.

आपल्या गल्लीतल्या ऐषारामात त्याने जपानी सामुराईवरचा चित्रपट पाहिल्यामुळे या जपानी लढवय्यांचे तत्त्वज्ञान तो रोजच्या जगण्यात अनेकदा अंगीकारतो आणि विश्वकोशातील दैनंदिन माहितीच्या आधारे स्वत:च्या खासगी प्राणीसंग्रहालयात पश्चिम आफ्रिकेतल्या लायबेरिया या देशात सापडणारे बुटके हिप्पोपोटामस आणण्याची गळ वडिलांकडे आणि जगभराचे ज्ञान देणाऱ्या मिझ्टली या शिक्षकाकडे घालतो. देशाच्या राष्ट्राध्यक्षासह पोलीस यंत्रणा ड्रग माफियाच्या खिशात असल्याने बुटके हिप्पोपोटामस आणण्यासाठी लायबेरियातील जंगलातला प्रवास अवघडविनोदी वळणांनी सुरू होतो. मग या माफियापोराची गल्लीत राहून ग्लोबल होण्याची प्रक्रिया उमजायला लागते. ड्रगमाफिया वडिलांच्या पंटरांकडून धंद्यात दगाबाजी करू पाहणाऱ्यांना बळी देण्याचे, वेश्यांना बोलावून त्यांच्यासह काही काळासाठी गायब होण्याचे नित्यकर्म लहानगा निवेदक रंगवून सांगतो. त्याच्या बालजाणिवेतील शब्दसंपत्तीच्या आधारे त्यामुळे उडणाऱ्या भाषिक तरलचेष्टा वाचकाला आवडू लागतात.

बाराएक वर्षांपूर्वी मेक्सिकोमध्ये अवतरलेली ‘डाऊन द रॅबिटहोल’ ही कादंबरी ‘अ‍ॅलिस इन वण्डरलॅण्ड’ या बालपुस्तकातील सुप्रसिद्ध वाक्प्रचाराचा आधार घेऊन लिहिली गेली. पण अ‍ॅलिस किंवा जगातील कोणत्याही लोकप्रिय बालनिवेदकाच्या शैलीचे थेट विडंबन त्यात झाले. ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्युतवेगात इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाली. याचे कारण त्याला असलेले जागतिक संदर्भमूल्य. दोन हजारोत्तर काळातील दुसऱ्या दशकात जगाच्या सपाटीकरणाची प्रक्रिया बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाली होती. इंटरनेटच्या माहितीस्फोटातून ज्ञानघुसळणाची परिसीमाही गाठली गेली होती. गल्लीत बसून ग्लोबल होता येऊ शकणारा असा हा काळ होता. (सिनेमा, संगीत मिळविण्यापासून खाद्यपदार्थ अनुभवण्याचा, देशात बसून परदेशातील नोकरी करण्याचा आणि पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या भागात काय चालले आहे, हे कळून घेण्याचा परीघ अनेकायुधांमुळे या काळात शक्य झाला.) तर या कादंबरीतला आठेक वर्षीय निवेदक आपल्यासाठी तुलना करायला घेतला तर भाऊ पाध्येंच्या वालपाखाडीत चुकून बेळगावातून येऊन वसलेला प्रकाश नारायण संतांचा लंपन आहे. ज्याच्या तरलतम सुंदर भावना व्यक्त होताना वालपाखाडी संगतीमुळे तरलतुंद होत जातात. विझालोव्होसच्या दुसऱ्या कादंबरीचा नायक अशाच तरलचेष्टा करीत मेक्सिकोतल्या एका वालपाखाडीहून भकास असलेल्या वस्तीची ओळख करून देतो. पुढल्या एका कादंबरीत विझालोव्होस आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांचे विडंबन करून दाखवतो. त्यातही व्यक्तीच्या जागतिक असण्याचे संदर्भ सापडतात आणि आपल्याला त्याच्या पुढल्या कादंबरीत काय हाती लागेल, याचा शोध घेण्याची असोशी तयार होते.

विझालोव्होस आता अनुवादित साहित्य वाचणाऱ्या जागतिक वाचक वर्तुळात बऱ्यापैकी प्रस्थापित झालेला लेखक असून त्याची प्रत्येक कादंबरी ही तातडीने भाषांतरित होऊन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसाठी स्पर्धा करीत आहे. मेक्सिकोचा त्याच्या जन्माआधी आणि नंतरचा पन्नास-साठ वर्षांचा इतिहास-भूगोल- राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडणी आणि बिघडणीचा काळ या कादंबऱ्यांमध्ये उतरलेला आहे. एका कादंबरीत मेक्सिकोतल्या अतिगरीब कुटुंबातील मुलाचे नाव अ‍ॅरिस्टॉटल आहे. पहिल्या कादंबरीत लायबेरियातील प्रवासात मुख्य पात्रांच्या बदललेल्या पारपत्रांवरची नावे फ्रँकलिन गोमेझ, विन्स्टन लोपेझ आणि ज्युनिअर विन्स्टन लोपेझ होतात. त्यांना भेटणारा जंगल वाटाडय़ा जॉन केनडी जॉन्सन या अजब नावाचा आहे. या जॉन केनडीचा मित्र मार्टिन ल्यूथर किंग टेलर आहे. जपानी लेखक हारुकी मुराकामीच्या कथनसाहित्यात मांजरींचा सातत्याने तपशील येतो, तसा विझालोव्होसच्या कादंबऱ्यांत कुत्र्यांचा आणि परग्रहवासीयांच्या त्रोटक तपशिलांचा अंतर्भाव असतो.

या लेखकाची आणि त्याच्या आधीच्या कादंबऱ्यांची विस्तृत ओळख यासाठी की या लेखकाने दक्षिण अमेरिकेतून युरोपात आठ वर्षे राहून रंगविलेल्या मेक्सिकोच्या काल्पनिकांची पुस्तके गेल्या दहा वर्षांमध्ये नावाजली गेली. आत्तापर्यंत दक्षिण अमेरिकी साहित्याला अ-ज्ञात असलेल्या प्रदेशाची जागतिक नजरेतून केलेली ही प्रादेशिक पडताळणी या कथांमधून उतरत असल्यामुळे तो वाचकांसाठी सुखद धक्का होता. पुरस्कार वगैरे मिळवून झाल्यानंतर आणि ‘ग्रॅण्टा’ या प्रतिष्ठित मासिकात कथा-लेख वगैरे सन्मानाने येऊ लागल्यानंतर विझालोव्होस हे नाव पुरेसे जागतिक झाले. हा लेखक पुन्हा मायदेशी परतल्यानंतर त्याने बार्सिलोनामधील जगण्याचा आधार घेत करोना आरंभीच्या काळात ‘इन्व्हेजन ऑफ द स्पिरिट पीपल’ या नावाची आणखी एक कादंबरी पूर्ण केली. काही महिन्यांपूर्वी तिचा इंग्रजी अनुवाद (त्याच्या सगळय़ा कादंबऱ्यांचे भाषांतर करणाऱ्या) रोझालिण्ड हार्वी हिने केला. वरवर विज्ञान कादंबरीचा तोंडवळा घेऊन अनेकार्थी जागतिक जगण्यात शिरलेल्या अस्मितावाद-वंशद्वेष या प्रश्नांना या कादंबरीत स्पर्श केला आहे. याशिवाय एकटेपणा, दु:ख, हाताशी असलेल्या गूगलद्वारे अति माहितीचा वाढत चाललेला सोस, परग्रहवासीयांच्या आगमनाच्या कल्पनांची गंमत-संगतीही रंगवली आहे. अति-पूर्वेकडच्या लोकांकडून भूमिपुत्रांचा व्यवसाय काबीज होत असल्याच्या जाणिवांतून तयार होत जाणाऱ्या हिंसेच्या मानसशास्त्राचीही येथे दखल घेण्यात आली आहे.

‘इन्व्हेजन ऑफ द स्पिरिट पीपल’चा बेभरवशी निवेदक वाचकांना कादंबरीच्या सुरुवातीच्या परिच्छेदात सांगतो की, ‘ही गॅस्टन नावाच्या व्यक्तीची आणि त्याच्या मॅक्स या मित्राची कहाणी आहे. ही गॅस्टनच्या ‘किटन’ असे नाव ठेवलेल्या कुत्र्याचीही गोष्ट आहे आणि पोल हे नाव असलेल्या मॅक्सच्या शास्त्रज्ञ मुलाचीही कथा आहे. यात नंतर खूप लोक येत असले, तरी प्रामुख्याने कादंबरीत आपण गॅस्टनला, त्याच्या विचारांना आणि जगण्याला सोबत करीत पुढे जाणार आहोत.’ या कहाणीला शेवटच्या परिच्छेदापर्यंत वाचकांना पोहोचवण्याची जबाबदारी निवेदक आपल्या अंगावर घेतो आणि आपल्या लक्षात येते की नामोल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आलेल्या देशातील शहरात निवेदकामुळे आपलाही शिरकाव झालेला आहे.

इथला गॅस्टन पन्नाशीपुढे वय गेलेला आधुनिक शेतकरी. कांद्याची पात आणि जगात लोकप्रिय असलेल्या फुटबॉलपटूला लागणारे विशिष्ट प्रकारचे बटाटे तो पिकवतो. त्या शेतीचे आणि तिथल्या मातीचे संदर्भ कादंबरीत कमी सापडतात. पण त्याचे व्हॉट्सअ‍ॅपसारख्या संदेशवहन अ‍ॅप्सवर सतत सक्रिय असण्याचे तपशील अंमळ अधिक जाणवतात. या गॅस्टनचा तीसेक वर्षांपासूनचा मॅक्स हा हॉटेलमालक मित्र पुरता कर्जात बुडालेला असताना आपला व्यवसाय बंद करून मोबाइलवरील गेम्स खेळण्याच्या नादात आकंठ बुडालेला आहे. बंद केलेल्या हॉटेलची जागा मूळ मालकाला हस्तांतरित करण्यासाठी काही दिवस उरलेले असतानाही मॅक्स आपल्या छंदो-व्यसनाला सोडण्यास तयार नाही. त्याची चिंता वाहणारा गॅस्टन आपल्या किटन नावाच्या कॅन्सरने जर्जर झालेल्या कुत्र्याचे शेवटचे दिवस सुखाने जावेत यासाठी डॉक्टरांसह इतर वैदू-बुवांचा उपचारांसाठी शोध घेत आहे. मॅक्सचा शास्त्रज्ञ मुलगा पोल टुंड्रा प्रदेशात गहन विषयावर संशोधन करण्यासाठी गेला असल्याने मॅक्स दैनंदिन स्वच्छतेपासून इतर अनेक गोष्टींना तिलांजली देत हॉटेल आणि घर मूळ मालकाकडे हस्तांतरित करायचा लवकरच येऊ घातलेला शेवटचा दिवस येण्याची वाट पाहत आहे.

कादंबरीत या काही दिवसांच्या कालावधीत घडणाऱ्या वेगवान घटनांचा तपशील सादर होतो. त्यात गॅस्टन मूळ मालकाकडून मॅक्सच्या बंद हॉटेलची जागा ताब्यात घेऊन भागीदारीत ते पुन्हा उभारण्याची तयारी सुरू करतो. त्यामुळे शहरातील साऱ्या मोक्याच्या जागा पटकावण्याची मनीषा बाळगणारे (चिनी की कोरियाई ते स्पष्ट नाही) अतिपूर्वेकडचे लोक गॅस्टनच्या या निर्णयाने हतबुद्ध होतात. या अतिपूर्वेकडच्या लोकांना हॉटेलची जागा विकत घेता येऊ नये म्हणून, दुसरा गटही सक्रिय होतो. याच दरम्यान गॅस्टनच्या कुत्र्याची प्रकृती अधिकाधिक बिघडत जाते. त्याला शांत झोप लागावी म्हणून तात्पुरता उपचार देणाऱ्या तज्ज्ञ भूलेश्वरीचा शोध लावतो. कुत्र्याला भूल देण्याच्या तिच्या कसबानंतर त्यांच्यात रोज गप्पा आणि बीयर रिचवण्याचा कार्यक्रम रंगूू लागतो. इतक्या साऱ्या गोष्टी घडत असताना टुंड्रा प्रदेशात संशोधन करणारा पोल तिथून पळून पुन्हा शहरात दाखल होतो. काही दिवसांनी टुंड्रा प्रदेशातील संशोधनप्रमुख पोलच्या मागावर धडकतो. गॅस्टनचा या सर्वाशी आणि आणखी किती तरी घटनांशी संबंध असल्याने कादंबरी रहस्याच्या तीव्रतम बिंदूवर येऊन पोहोचते. संशोधन टाकून पळून आलेला पोल टुंड्रा प्रदेशातील आपल्या शोधातील धक्कादायक बाब गॅस्टनपुढे सादर करतो, त्यानुसार ‘पृथ्वीवरची सारी माणसे ही परग्रहवासीयांनी केलेल्या वसाहतीचा भाग असून ती इथल्या घटना घडवत आहेत. अन् त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ती लवकरच पृथ्वीवर अवतरणार आहेत.’ हा पोलने काढलेला सिद्धांत गॅस्टनसमोर येतो. पुढल्या काही दिवसांत शहरभर पोलचे डोके बिघडल्याची चर्चा पसरते आणि घडणाऱ्या गोष्टींवरचा गॅस्टनचा ताबा निसटायला सुरुवात होते.

या कादंबरीच्या कथानकातील परग्रहवासीयांच्या संदर्भाचे रहस्य, पोल आणि गॅस्टनशी संबंधित नातेवाईकांचा अ‍ॅपवरील संदेशांपुरता उरलेला कोरडा भावबंध आणि किती तरी विचित्र घटनांचा तपशील विझालोव्होसने छोटय़ा छोटय़ा प्रकरणांतून फुलवला आहे. इथले सर्वात छोटे प्रकरण वाचायसाठी एक मिनिटाचे एकपानी तर सर्वात मोठे प्रकरण दहा मिनिटे इतका कालावधी घेणारे.

निनावी देश-निनावी शहर आणि माणसांच्या जात-धर्म-देशाच्या तपशिलालाही उघड न करता तणाव-प्रश्नांचा पसारा जगातील कोणत्याही कोपऱ्यात सारखाच कसा असू शकतो, याचा या काल्पनिकेतून बोध होऊ शकतो. आपल्या गल्लीतल्या गोष्टींना अधिकाधिक ग्लोबल करण्याच्या हुआन पाब्लो विझालोव्होसच्या कौशल्याला जाणून घेण्यासाठी त्याच्या साऱ्या कादंबऱ्या मिळवून वाचायला हव्यात. हे नाव पुढल्या काळात अधिकाधिक लोकप्रिय होण्याची वाट न पाहता.

Story img Loader