डॉ. अजित जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असं म्हणतात की कोऽहम, अर्थात ‘मी कोण’ हा हिंदू तत्त्वज्ञानातील एक अनादी प्रश्न आहे. पण गेल्या एखाद- दोन दशकांमधील सामाजिक, सांस्कृतिक, अगदी आर्थिकही आणि मुख्यत: राजकीय वातावरण पाहिलं तर मुळात ‘हिंदू कोण’ हाच एक जटिल प्रश्न होऊन बसला आहे. पुराणांना आधारभूत मानणारा सनातन धर्म, ते चार्वाकापासून सर्वांचा समावेश करणारी पुरोगामी जीवनशैली असा लंबक हिंदू धर्माच्या अस्मितेचा शोध लावण्यासाठी हेलकावे खातो आहे. या पार्श्वभूमीवर मनु पिल्लई या अवघ्या तिशीतल्या लेखकाने लिहिलेलं ‘गॉड्स, गन्स अँड मिशनरीज… द मेकिंग ऑफ मॉडर्न हिंदू आयडेंटिटी’ हे पुस्तक अत्यंत लक्षवेधी ठरतं. युरोपीय साम्राज्यवादी सत्तांचं भारतावर आक्रमण, त्यांची धर्मांधता आणि त्यांच्या प्रभावाने उदयाला आलेल्या शिक्षित भारतीय वर्गाची स्वत:च्या धर्माकडे पाहण्याची बदललेली नजर, यातून एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हिंदू धर्मात वाहू लागलेले नवनवीन वारे, असा या पुस्तकाचा पट आहे.

अर्थात इथे त्याच्या वयाचा उल्लेख करण्याचं कारण त्यातला नवखेपणा सांगणं हे नाही. किंबहुना आत्तापर्यंत हे चौथं पुस्तक लिहिणाऱ्या मनुला भारतीय इतिहासाच्या मांडणीत कोणी नवखं म्हणूही शकत नाही. अत्यंत ओघवत्या शैलीत आणि सविस्तर अभ्यास करून लिहिण्यासाठी मनु प्रसिद्ध आहे. त्याचं हे कसब या पुस्तकातही दिसतं. पण त्याच्या वयाचा उल्लेख करण्याचं दुसरं एक कारण आहे. प्रदीर्घ काळ भारताच्या इतिहासाची मांडणी एका वर्तमानातील राजकीय परिप्रेक्ष्यातून झाली. डावी, हिंदुत्ववादी, समाजवादी अशा भूमिकांतून इतिहासाकडे पाहिलं गेलं. यात पुन्हा जातीय संदर्भ आले ते वेगळेच. या पार्श्वभूमीवर मनु पिल्लई अशा काही आधुनिक इतिहासकारांच्या यादीत बसतो, जे संपूर्ण त्रयस्थपणे इतिहास मांडू पाहतात. शक्य तेवढी भावनिक मांडणी टाळणारी, भारतीय संदर्भांसहित जागतिक लिखाणात आलेले भारताचे उल्लेख समजून घेणारी आणि स्थापत्यशास्त्र, कला वगैरेंना इतिहासाच्या आकलनात ठळक स्थान देणारी ही शैली आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक मनुच्या स्वत:च्या कारकीर्दीसाठीच नाही तर भारताच्या इतिहासाच्या मांडणीसंदर्भातही एक मैलाचा दगड ठरतं. त्याच्या या शैलीतली परिणामकारकता युरोपीय सत्ता येण्यापूर्वीच्या हिंदू धर्माच्या स्थितीबद्दलच्या त्याच्या पहिल्याच प्रकरणात दिसते. आर्यांपासून मुघलांपर्यंत भारतात आलेल्या वेगवेगळ्या समूहांचा इथल्या स्थानिकांशी संघर्ष नंतर सहजीवनात कसा बदलला, याचा हा प्रवास आहे. वैदिक निराकार पूजा, बौद्ध जैनांची लोकप्रियता, त्यातून उदयाला आलेली पौराणिक हिंदू मांडणी हे त्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. इस्लामी आक्रमकांचे वेगळेपण, तरीही त्यांच्याशी नंतर झालेला सामोपचार, पण त्याच वेळी रुजण्यासाठी लागलेले हिंदू अस्मितेचे अंकुर याची त्यात दखल आहे. अंतिमत: वेगवेगळ्या चालीरीती, भिन्नभिन्न देवता यांना एकाच हिंदू (?) चौकटीत कसं बसवण्यात आलं, त्यात ब्राह्मणांचं चातुर्य (किंवा लबाडी!) याने काय भूमिका बजावली, त्याचा लेखाजोखा मांडला आहे. स्वतंत्रपणे हे प्रकरणही भारतीय इतिहासासंदर्भात एक मौल्यवान निबंध ठरू शकतो.

पोर्तुगीज आणि खास करून कॅथॉलिक आगमनानंतर ही परिस्थिती बदलली. मूलत: अडाणी आणि धर्मांध असलेल्या ख्रिास्ती प्रचारकांनी भारतीय संस्कृती समजून घेण्याऐवजी तिचं वेगळंच चित्र मांडण्यास सुरुवात केली. यात एका बाजूला भारतीय देवतांचं विकृतीकरण होतं, त्याचप्रमाणे भारतात प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीतीही होत्या. (अर्थात त्या होत्या त्यापेक्षा कितीतरी जास्त वाढवून सांगण्यात आल्या, हेही लक्षात घ्यायला हवं.) बहुतेक वेळा धर्माच्या प्रसारासाठी सत्तेची जबरदस्ती, सत्ताधाऱ्यांची जवळीक याचे फायदे घेतले गेले. अनेकदा हिंदू धर्मातल्या खऱ्या-खोट्या त्रुटी, जातिव्यवस्था यांच्याकडे बोट दाखवून लोकांना आकर्षित केलं गेलं, डी नोबिलीसारख्या धर्मगुरूंनी तर स्वत: ब्राह्मण बनून लोकांना ख्रिास्ताची महती सांगितली. पण कॅथॉलिक धर्मप्रचारकांचे हे आक्रमक प्रयत्न हे त्यांच्या साम्राज्यविस्तारालाच अडथळा ठरू लागले. पुढे इंग्लिश आणि प्रोटेस्टंट आल्यानंतर या दृष्टिकोनात काहीसा बदल घडला. बंदुकीऐवजी मिशनरी कार्यातून धर्मप्रसार करण्यास जोर आला. एका बाजूला भारतीय समाजव्यवस्थेत ढवळाढवळ करून व्यापार, महसूल वसुली आणि सत्ताविस्तार यात अडथळा बनता कामा नये, असा युक्तिवाद काहींनी केला, तर दुसरीकडे बुरसटलेल्या भारतीयांचं उत्थान ही आपली नैतिक आणि धार्मिक जबाबदारी असल्याचा मतप्रवाहही प्रबळ होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या शतकभराच्या राजवटीत कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये या दोन प्रवाहांमध्ये मोठा संघर्ष झाला. मात्र यात दोन गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. एक तर भारतीय समाजात ढवळाढवळ करू नये, असं म्हणणाऱ्या वर्गाचं त्यामागचं कारण व्यावहारिक होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शतकातच भारतीय संस्कृती, वेद, पुराण वगैरेंचा अर्थ लावण्याची एक मोठी लाट युरोपात आली. या ‘इंडोलॉजिस्ट्स’चा भारताविषयीचा दृष्टिकोन मात्र पाश्चिमात्य होता. तो १६-१७ व्या शतकाएवढा कलुषित नसला, तरी त्या काळातल्या लिखाणाचा त्यावर नक्कीच प्रभाव होता. त्याहून महत्त्वाचं म्हणजे धर्माचा स्राोत एक पुस्तक, एक परमेश्वर आणि चालीरीतींचा एक मुख्य संच असाच असू शकतो या नजरेने पाश्चिमात्यांनी भारताकडे पाहिलं. मात्र हे वास्तव नव्हतं. या देशात अनेक परमेश्वर, त्यांची वेगवेगळी पुस्तकं आणि प्रत्येक समूहाच्या वेगवेगळ्या चालीरीती प्रचलित होत्या. वेद, उपनिषद, गीता यांसारखे ग्रंथ पवित्र मानले गेले असले तरी सामान्य जीवनात त्यांचा फारसा प्रभाव नव्हता. एवढंच काय परंतु ते जाणणाऱ्या ब्राह्मणांनीही पाठांतरापलीकडे त्यांचा वापर केल्याचं दिसत नसे. प्रत्येक जातीची अंतर्गत वर्तणूकही भारतभरातल्या वेगवेगळ्या राज्यांत, भाषिक समूहांत वेगळी होती. अगदी मुस्लीम किंवा सुरुवातीच्या काळात परिवर्तित झालेले ख्रिाश्चनही आपल्या वागण्यात स्थानिक चालीरीती, देवता, काही वेळा अगदी जातिव्यवस्थाही स्वीकारत होते. भारतातलं हे विविधांगी वास्तव समजून न घेता, अब्राहमिक धर्मांच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्माचा अर्थ लावण्याचा युरोपीय प्रयत्न आधुनिक हिंदूंच्या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरतो. कारण हिंदू धर्माचा उद्गम हा एका पुस्तकात (उदाहरणार्थ वेद किंवा मनुस्मृती) आणि एकजीव अशा तत्त्वज्ञानात (उदाहरणार्थ गीता किंवा उपनिषद्) आहे ही मांडणी पाश्चिमात्य शिक्षण मिळवणाऱ्या सुरुवातीच्या काळातल्या भारतीय विद्वानांनीही स्वीकारण्यास सुरुवात केली. यातून भारतीयांनी हिंदू धर्म नाकारून जाणीवपूर्वक ख्रिाचन धर्म स्वीकारण्याच्या तुरळक घटनाही घडल्या. मात्र मोठ्या प्रमाणावर लाट आली ती हिंदू अस्मितेच्या प्रतिकाराची. हा प्रतिकार मूलत: हिंसक नव्हता (क्वचित त्याला हिंसक वळणही लागलं). अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतीय पंडितांनी मिशनरीजसोबत वादविवाद सुरू केले, हिंदू धर्माची महती सांगणारी पुस्तकं येऊ लागली. हिंदू धर्माला दोष देणारे आरोप ख्रिाश्चन धर्मालाही लागू होत असल्याची पत्रकं निघू लागली. पण या साऱ्यात लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे हिंदू धर्मातून उभ्या राहणाऱ्या या प्रतिवादाची पार्श्वभूमीही पाश्चिमात्य शिक्षणात होती. मूळ हिंदू धर्माचा स्राोत हा कोणत्या तरी प्राचीन संस्कृतीत अगर ग्रंथात आहे आणि मधल्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे तो अपभ्रंशित झाला. त्या स्राोताकडे परत जाणं म्हणजेच हिंदू धर्माचं उत्थान आणि तसं घडलं तर हिंदू धर्म कोणत्याही पाश्चिमात्य धर्माहून कमी नाही, असलाच तर काकणभर सरस आहे अशी मांडणी हिंदूंमधून पुढे येऊ लागली. थोडक्यात मनुने आधुनिक हिंदू धर्मातल्या मुख्य प्रवाहांचा उगम अशा प्रकारे अठराव्या, एकोणिसाव्या शतकातल्या युरोपीय आकलनात शोधला आहे.

या दृष्टीने तीन प्रवाह अतिशय महत्त्वाचे ठरले. सर्वांत आधी राजा राममोहन रॉय यांनी मार्टिन ल्युथरच्या धर्तीवर हिंदू धर्मातल्या रेनेसांसचा प्रयोग त्यांच्या ब्राह्मो समाजातून केला. उपनिषद हा स्राोत मानून हिंदू धर्मात प्रचलित झालेल्या चालीरीतींवर त्यांनी कठोर प्रहार केले. ते नाकारून विवेकवादाकडे जाणं म्हणजेच खरा हिंदू धर्म अशी त्यांची धारणा होती. पुढच्या काळात उदारमतवादी हिंदूंसाठी रॉय हे महत्त्वपूर्ण समाजसुधारक ठरले. त्याच वेळी दुसरीकडे दयानंद सरस्वती आणि त्यांचा आर्य समाज यांनी वेदांच्या सार्वभौमत्वाचा आग्रह धरला. वैदिक तत्त्वज्ञान आणि आचार-विचार यांचा अंगीकार याला प्रमाण मानून आर्य समाज एका अर्थाने आधुनिक उजव्या हिंदुत्वाला आधारभूत ठरला. तिसरीकडे हे सर्व स्राोत स्पष्टपणे नाकारून, हिंदू धर्माच्या सर्व पारंपरिक बंधनांना झुगारत, ब्राह्मणांपेक्षा वेगळी नवी मांडणी करणारे महात्मा फुले हे नंतरच्या पुरोगामी हिंदूंचे उद्गाते ठरले. मात्र या तीनही प्रवाहांमागे असलेल्या युरोपीय प्रेरणा या पुस्तकातून स्पष्टपणे अधोरेखित होतात. पुस्तकाचा प्रवास येऊन पोहोचतो आधुनिक उजव्या हिंदुत्वाचे जनक मानले गेलेल्या सावरकरांपाशी. त्यांचा टिळक परिवारातून झालेला उदय, मुस्लीमद्वेष, आधुनिक शास्त्राविषयीचे प्रेम, इतिहासाशी सोयीनुसार केलेला खेळ या सर्वांत उभं राहिलेलं जहाल हिंदुत्व याचा वेध घेत लेखक समारोप करतो.

या शेवटच्या कालखंडाबद्दल विपुल साहित्य उपलब्ध आहे आणि वर्तमानातील अनेक मंचांवरून वादविवादही होत असतात. खरं तर या सर्वांना पूर्ण आणि पुरेसा न्याय देता आलेला आहे, असं म्हणता येणार नाही. शिवाय ३७ सालच्या हिंदू महासभेच्या उदयापासून बाबरी मशीद पतनापर्यंतचा हिंदुत्ववादाचा प्रवास आणि त्यानंतरचा मोदी उदय हे सारे कालखंड या पुस्तकात लक्षात घेतलेले नाहीत. खरं तर ही या पुस्तकाची मर्यादाही म्हणता येईल. कदाचित त्या प्रयत्नांत नक्की उभे राहणारे वाद (किंवा चिखलफेक!) इतिहासाच्या निखळ अभ्यासाला प्रतिकूल ठरतील असाही युक्तिवाद केला जाऊ शकतो. शिवाय आधुनिक कालखंडात उदयाला आलेली हिंदू अस्मिता कॉन्टेम्पररी किंवा समकालीनसंदर्भात कशी घडत गेली, हा एक वेगळा विषयही असू शकतो. मात्र आधुनिक हिंदू धर्माच्या संदर्भात विवेकानंदांचे विचार, त्यांचा अपभ्रंश आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गांधींचं अनन्यसाधारण स्थान आणि त्यांच्या धार्मिकतेमागचे कार्यकारणभाव हे संपूर्णत: दुर्लक्षित का व्हावेत, हा काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. गांधींचं हिंदुत्व हे या देशातल्या हिंदू धर्मीयांवर किमान ६० वर्षं राजकीय प्रभाव टाकत होतं आणि आजही ते संपलं असं म्हणण्याला अजिबात वाव नाही हे लक्षात घेता त्यांना टाळणं फारसं न्याय्य म्हणता येणार नाही. मात्र असं असलं तरी या पुस्तकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या म्हटल्या जाणाऱ्या हिंदू धर्मीयांच्या अनेक गोष्टी कशा प्रकारे पाश्चिमात्यांनी हिंदूंकडे पाहिलेल्या नजरेतून आकाराला येत गेल्या याचं अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन लेखकाने केलं आहे. कथॉलिक आणि प्रोटेस्टंट, संस्थानिक आणि स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे, सनातनी आणि पुरोगामी, कर्मठ आणि समाजसुधारक, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या सगळ्यांचं विश्लेषण करत असताना यांच्यापैकी कोणाच्याही भूमिकेत फसून न जाण्याचं कसब, हे या पुस्तकाचे सर्वात मोठे श्रेय म्हणता येईल.

गॉड्स, गन्स अँड मिशनरीज… द मेकिंग ऑफ मॉडर्न हिंदू आयडेंटिटी’

लेखक – मनु पिल्लई

प्रकाशक – पेन्ग्विन रॅण्डम हाऊस इंडिया

किंमत – ९९९ रुपये

पृष्ठे – ६६४

meeajit@gmail.com