ललिता कुलकर्णी

५० वर्षांपूर्वी वर्षप्रतिपदेच्या शुभदिनी दादर येथील वनिता समाजाच्या सभागृहात एका नव्या संकल्पाची आणि तो पूर्ण करण्यासाठी एका संघटनेची गुढी उभारली गेली. संकल्प होता ग्राहकांना संघटित करून सक्षम बनवण्याचा आणि ही गुढी उभारणारे समर्थ हात होते स्मृतिशेष बिंदुमाधव जोशी, बाबूजी (संगीतकार सुधीर फडके), मधु मंत्री आणि त्यांचे सहकारी यांचे. ग्राहकांना संघटित करण्याचा मार्गही आगळावेगळा, सभासद कुटुंबांच्या थेट स्वयंपाकघरात पोहोचणारा होता.

किमान २५ ग्राहकांचा एक संघ बनवून संस्थेच्या मागणीपत्रकानुसार त्यांच्याकडून आगावू मागणी व पैसे घ्यायचे. घाऊक बाजारातून एकत्रित माल खरेदी करून त्यांना ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर मागणी केलेला माल संघपोच पुरवायचा असे या उपक्रमाचे स्वरूप होते. १९७४-७५ च्या सुमाराचा तो काळ हा जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचा आणि परिणामी काळ्या बाजाराच्या चलतीचा होता. यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी सणासुदीच्या काळात पुण्यातील एका साठेबाज व्यापाऱ्याचे गोदाम जाळल्याची बातमी होती. ग्राहकांच्या या संतापाला विधायक वळण देण्याची गरज या त्रयींना जाणवली आणि ह्यातून मुंबई ग्राहक पंचायतीच्या अभिनव वितरण व्यवस्थेचा जन्म झाला. काळाच्या ओघात तंत्रज्ञानाच्या मदतीने ही व्यवस्था अधिकाधिक ग्राहकस्नेही झाली आहे- आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे अशा विविध वितरण केंद्रांद्वारे सुमारे ३० हजार समाधानी ग्राहक या वितरण व्यवस्थेचा लाभ घेत आहेत. मात्र ग्राहक सबलीकरण हे आपले साध्य आहे. वितरण व्यवस्था हे त्याचे साधन आहे, हा कानमंत्र संस्थापकांनी कार्यकर्त्यांना दिलेला होता. त्यामुळे ग्राहक हिताचे विविध उपक्रम पुढच्या काळात त्यांनी हाती घेतले.

ज्या वस्तूंच्या खरेदीमध्ये वैयक्तिक आवडनिवड महत्त्वाची असते अशा वस्तूंच्या उदा. कपडे, भांडी, प्रसाधने इ. ची खरेदी ग्राहकांना रास्त दरात करता यावी यासाठी विविध ठिकाणी पंचायत पेठा भरवल्या जातात. या पेठांच्या माध्यमातून अनेक छोट्या उद्याोजकांना, तसेच अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांना आपल्या पायावर उभे राहण्यास आधार मिळालेला आहे- या पेठांमध्ये ग्राहक जागृतीसाठी एक गाळा राखीव असतो हे उल्लेखनीय आहे.

ग्राहकांना संघटित करत असताना व त्यांना त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या यांची जाणीव करून देणे गरजेचे असते. या दृष्टीने वृत्तपत्रांमध्ये स्तंभ, प्रासंगिक लेखन, विविध व्यासपीठांवर व्याख्याने, पथनाट्ये, प्रदर्शने, आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रम इ. मार्गांचा अवलंब संस्थेचा ग्राहक शिक्षण विभाग नियमितपणे करतो. गेल्या वर्षी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने संस्थेच्या सहकार्याने ‘जागो ग्राहक’ या शीर्षकाखाली ५३ साप्ताहिक कार्यक्रमांची मालिका सादर केली. वृत्तपत्रीय सदरांमध्ये ‘लोकसत्ता’मध्ये फेब्रुवारी १९८५ पासून दर मंगळवारी सतत २० वर्षे प्रसिद्ध होणाऱ्या ‘ग्राहकांशी हितगुज’ या सदराचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. या सदरामुळे मुंबई ग्राहक पंचायत दूरवरच्या ग्राहकांशी जोडली गेली. तसेच संस्थेच्या विविध मोहिमांना प्रसिद्धीचे बळ मिळाले. अनेक उदयोन्मुख कार्यकर्ते लिहिते झाले. संस्थेचे दरमहा प्रसिद्ध होणारे ‘ग्राहक तितुका मेळवावा’ याचाही ग्राहक प्रबोधनासाठी उपयोग होतो. शालेय वयापासूनच ग्राहक कौशल्ये आत्मसात केल्यास त्यातून जबाबदार ग्राहक निर्माण व्हावेत या दृष्टीने कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी शाळांमध्ये ग्राहक मंडळे स्थापन केली आहेत.

संस्थेच्या ग्राहक संरक्षण विभागातर्फे ठिकठिकाणी मोफत ग्राहक तक्रार मार्गदर्शन केंद्रे चालवली जातात. काही प्रकरणात संबंधित पक्षांच्या संमतीने ‘समेट’ (Conciliation and Mediation Centre) या अलीकडेच संस्थेने निर्माण केलेल्या व्यवस्थेची मदत ग्राहकांना घेता येते.

अनेक ग्राहकांच्या समान तक्रारींच्या निवारणासाठी संरक्षण विभाग वेळोवेळी मोहिमा हाती घेतो. दिशाभूल करणाऱ्या व अनुचित जाहिराती, रिक्शा-टॅक्सी यांची बेहिशेबी दरवाढ, केबलचालकांची मनमानी इ. विषयांवर यापूर्वी कार्यकर्त्यांनी मोहिमा आखून त्या धडाडीने यशस्वी केल्या. अलीकडच्या काळात संस्थेने हाती घेतलेल्या मोहिमांमध्ये रेस्टॉरंट्समध्ये आकारले जाणारे सेवाशुल्क, बँकांमधील ठेवींना १०० विमा संरक्षण मिळण्याचा हक्क असे काही विषय आहेत.

काही प्रकरणांमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागतो. अशा वेळी ग्राहक संरक्षण कायदा, रेरा कायदा इ. चा उपयोग संरक्षण विभाग करून घेतो. किंबहुना ग्राहक संरक्षण कायदा १९८६, अंमलात आल्यावर केस लॉ तयार करण्याच्या दृष्टीने संस्थेने विविध प्रकारच्या तक्रारी ग्राहक न्यायालयांकडे दाखल केल्या. त्यातील लोहिया मशिन्स या प्रकरणामध्ये चार लाख ग्राहकांना त्यांनी स्कुटरसाठी भरलेल्या रु. ४० कोटींच्या रकमा सव्याज परत मिळवून देऊन ग्राहक चळवळीत इतिहास निर्माण केला. नवीन ग्राहक संरक्षण कायद्यातील सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथोरिटीकडे संस्थेने करोनाकाळात रद्द झालेल्या सहलींच्या पैशांचा पूर्ण परतावा ग्राहकांना मिळावा यासाठी काही सहल कंपन्यांविरुद्ध केलेल्या तक्रारी न्यायप्रविष्ट आहेत.

रेरा कायद्याअंतर्गत तडजोडीने तक्रारी सोडवण्यासाठी ग्राहक व बांधकाम व्यावसायिक यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या सलोखा मंचांची स्थापना करण्याची मुंबई ग्राहक पंचायतीची महारेराने कार्यान्वित करून यशस्वीही करून दाखवली. राज्यात ५२ सलोखा मंच आज कार्यरत आहेत.

अलीकडच्या काळात ग्राहक बरीचशी खरेदी ऑनलाइन करतात. यामध्ये वेगवेगळ्या देशातील पुरवठादार, विक्री मध्यस्थ व ग्राहक हे संबंधित असल्याने ग्राहक तक्रार निवारणात भौगोलिक कार्यकक्षेचा तांत्रिक अडथळा निर्माण होतो. यावर तक्रार निवारणाची जागतिक ऑनलाइन व्यवस्था निर्माण करण्याचा संस्थेचा प्रस्ताव UNCTAD च्या व्यासपीठावर विचाराधीन आहे. जागतिक स्तरावर मुंबई ग्राहक पंचायतीने आपल्या सखोल अभ्यास/संशोधनावर आधारित प्रतिनिधित्वाने स्तत:ची अशी एक खास ओळख निर्माण केली आहै.

मुंबई ग्राहक पंचायतीच्या गेल्या ५० वर्षांच्या काळात प्रा. गंगाधर गाडगीळ, एम.आर.पै, डॉ. रामदास गुजराथी, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. बाळ फोंडके, अनुराधा गोरे इ. अध्यक्ष व उपाध्यक्षांचे मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित कार्यर्त्यांची एक सक्षम फळी ग्राहकहिताचे नवनवे विषय हाती घेत आहे. संस्थेच्या यशाचे श्रेय या नेतृत्वाइतकेच वर्षानुवर्षे निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांचेही आहे. महिला कार्यकर्त्या यात अधिक संख्येने आहेत हे उल्लेखनीय आहे. विद्यामान कार्याध्यक्षांच्या समर्थ नेतृत्वाखाली संस्थेने मोठीच झेप घेतली आहे. यापुढेही त्यांनी असेच धडाडीने कार्य करीत राहावे आणि एक दिवस असा यावा की व्यवस्थेत सुधारणा (System Correction) हे ग्राहक चळवळीचे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे चळवळीची गरजच वाटू नये ही सुवर्णमहोत्सवानिमित्त शुभेच्छा!

विश्वस्त – मुंबई ग्राहक पंचायत