डॉ. मृदुल निळे

सध्या मोबाइल आणि इंटरनेटच्या जगामध्ये वाचनालये आणि वाचन संस्कृती लोप पावत आहे. मिलेनिअल आणि जेन-झी (जेनेशन-झेड) पिढी वाचन संस्कृती पासून दूर गेली आहे. पुस्तक हाताळणे म्हणजेच पुस्तक हातात घेऊन वाचणे, नवीन पुस्तकांचा सुगंध घेणे, इत्यादी गोष्टी नवीन युगामध्ये कमी झालेल्या आढळतात. या दोन पिढ्या वाचत नाहीत, असे नाही. परंतु आता वाचनाच्या संज्ञा बदलत चालल्या आहेत. ही पिढी वाचन करण्यासाठी, मोबाईलेचा मोठ्या प्रमाणावर वापर करते. मोबाईल आणि इंटरनेट क्रांतीने वाचनाचे प्रकार देखील बदललेले आहेत. आज बरेच वाचक ई-बुक्सच्या माध्यमातून आपला वाचनाचा छंद जोपासतात. तसेच आपल्यापैकी बरीच मंडळी पुस्तके, कादंबऱ्या, गोष्टी, इत्यादी ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून मोबाइलवर ऐकतात (वाचतात).

ऑडिओबुक्स हा प्रकार एका विशिष्ट सामाजिक घटकामध्ये अत्यंत लोकप्रिय देखील आहे. इतर पुस्तकांप्रमाणे ही पुस्तके देखील विकत घ्यावी लागतात. परंतु हे वाचन खूप एकांगी आणि व्यक्तिकेंद्रित किंवा व्यक्तिवादी स्वरूपाचे असते. पुस्तक वाचून त्यावर होणाऱ्या चर्चेतून सामाजिक जडणघडणीला हातभार लागतो, ती संपूर्ण प्रक्रिया अशा स्वरूपाच्या व्यक्ति केंद्रित वाचनातून होतांना दिसत नाहिये. प्रत्येक शहरांमध्ये ‘सार्वजनिक वाचनालये’ असतात. मुंबईमध्ये कित्येक लोकांना नेहरू सेंटर, वरळी येथील असेच एक वाचनालय माहीतही नसेल. टाऊन हॉल किंवा एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया हे आता दुर्दैवाने फोटो काढण्याचे ठिकाण झाले आहेत. मुंबई शहर सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू राहिले आहे आणि त्यामध्ये साहित्याचा खूप मोठा वाटा आहे.  

government to stop tendering process in midday meals
शालेय पोषण आहार योजनेत महत्त्वाचा बदल… आता काय होणार? 
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
eligible candidates in agricultural services exam finally get appointment letter
कृषी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना अखेर नियुक्ती पत्र मिळाले, विद्यार्थी म्हणाले धन्यवाद देवाभाऊ….
20 thousand rupees grant to Nashik municipal employees nashik news
नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान; प्रशासकीय राजवटीत दिवाळी गोड
cancer pain suicide marathi news
‘कॅन्सर’च्या वेदना असह्य; ‘त्यांनी’ घेतला गळफास, आईने दरवाजा…
Student Support Committee Pune  organization working for needy students
स्कॉलरशिप फेलोशिप: ‘विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे’; गरजू विद्यार्थ्यांचा पुण्यातला हक्काचा आधारवड
amravati teachers protest marathi news
अमरावती : “आम्हाला शिकवू द्या, शाळा बनल्या उपक्रमांच्या प्रयोगशाळा”; शिक्षकांचा उस्फूर्त मोर्चा
RTO Maharashtra, RTO employees, RTO Nagpur,
राज्यभरातील ‘आरटीओ’चे कामकाज ठप्प, संपकर्ते कर्मचारी म्हणतात…

हेही वाचा >>>लेख : शेतकरीहिताची ‘चित्रफीत’; राष्ट्रहित की मित्रहित?

वाचन संस्कृती म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या  वाचनाची आवड निर्माण होणे, आणि त्याच बरोबर संयुक्तिक वाचन करणे. संयुक्तिक वाचनाचे देखील प्रकार असू शकतात. त्यापैकी एक महत्वाचा प्रकार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी (विश्व ज्ञान दिन) बरीच मुले किमान १४-१८ तास एखाद्या वाचनालयामध्ये किंवा आपापल्या घरी ठरवून बाबासाहेबांचे साहित्य किंवा सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या लेखांचे आणि पुस्तकांचे वाचन करतात. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठामध्ये अशा प्रकारची वाचन संस्कृती जयकर लायब्ररीमध्ये निर्माण झालेली दिसते. या प्रकारच्या बाबी वाचनाप्रति गोडी निर्माण करतात आणि यातून व्यक्तीची वैचारिक जडण-घडण होते.

आजवर वाचन संस्कृती रुजवण्यात वाचनालयांचा मोठा वाटा राहिला आहे. महाराष्ट्रामध्ये वाचनालये स्थापित करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ हा कायदा करण्यात आला आहे. सदर कायद्यान्वये राज्यात वाचनालयांची रचना आणि त्यांची कार्ये अधोरेखित केली आहेत. सदर कायदा लक्षात घेता अगदी ग्राम पंचायत पातळीवरसुद्धा वाचनालये अस्तित्वात असावेत, अशी योजना महाराष्ट्रात आहे. त्यामुळे खेडो-पाडी देखील वाचनालये कार्यरत होती. सध्या ही वाचनालये किती कार्यशील आहेत, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. मुळात वाचनालय आता शाळा आणि विद्यापीठांमध्येदेखील दुर्लक्षित  आहेत.  वाचनालयांना पुस्तक विकत घेण्यासाठी ‘वाचनालय नोकरशाही’ अस्तित्वात आली आहे, जिथे प्राध्यापकांपेक्षा ग्रंथपाल विषयांच्या पुस्तकासंबंधी निर्णय घेतांना आढळतात. ही पुस्तके अकाउंट आणि ऑडिट प्रक्रियेमध्ये अडकून पडतात.  

या सर्व बाबी लक्षात घेऊन वाचनाप्रती प्रेम असणाऱ्या लोकांनी आपापल्या क्षमतेनुसार ही वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील दोन महत्वाचे उपक्रम म्हणजे ‘लेट्स रीड इंडिया’ आणि ‘ज्ञान विकास प्रतिष्ठान, विसरवाडी (नंदुरबार)’. हे दोन वाचनालयांचे प्रारूप किंवा केस स्टडी सामाजिक जडणघडणीच्या परीपेक्षातून अतिशय महत्वाचे आहे. ‘लेट्स रीड इंडिया’ हा उपक्रम उद्योगपती आणि ‘गोष्ट पैश्यापाण्याची’चे लेखक प्रफुल्ल वानखेडे चालवतात. त्यांनी अत्यंत निस्वार्थ भावनेने ‘लेट्स रीड इंडिया’च्या माध्यमातून १०० हून अधिक वाचनालये आणि काही मोबाइल वाचनालये विकसित केले आहेत. ही वाचनालये मुळात मुंबई, नवी मुंबई मधील झोपडपट्ट्यामध्ये आणि इतर ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत. ही वाचनालये लोकांपर्यंत पुस्तके पोहोचवितात आणि लहान मुलांना वाचण्याच्या सवयी निर्माण व्हाव्यात या दृष्टीकोनातून ती कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये असणारे वाचनालय देखील ‘लेट्स रीड इंडिया’च्या माध्यमातून तयार झाले आहे. मुंबईच्या कोविड सेंटरमध्येदेखील ‘लेट्स रीड इंडिया’ने पुस्तके उपलब्ध करून दिली होती. या प्रारूपाचे वैशिष्ट्य, ‘बौद्धिक प्रगल्भतेसाठी वाचन अपरिहार्य आहे’ असे आहे.

हेही वाचा >>>हिंदी भाषा सक्तीचा हा कसला दुराग्रह?

ज्ञान विकास प्रतिष्ठान, नंदुरबार हे आदिवासीबहुल जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील, या दृष्टिकोनातून डॉ. रवी गावित यांनी विकसित केले आहे. आदिवासी भागामध्ये दारिद्रय आणि शिक्षणाचा थेट संबंध असल्यामुळे वाचनालयाच्या माध्यमातून क्षमता विकासाचे हे प्रारूप आहे. या प्रारूपात नोकरीच्या आकांक्षेने हे वाचनालय वाचक-तरुण स्वतःच  चालवतात. हा उपक्रम सुरू केला तेव्हा डॉ. रवी मुंबईच्या एका महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते आणि ते तेव्हा मुंबईहून पुस्तके आणि पुस्तकांसाठी जेमतेम पैसे पुरवायचे. आताही भाडेतत्त्वावर दोन खोल्यांमध्ये हा उपक्रम चालतो. याच सोबत आपल्या वाचनालयातील विद्यार्थी चालू घडामोडींच्या बाबतीत अवगत असावेत, तसेच नंदुरबार सारख्या दुर्गम भागात उपलब्ध नसणाऱ्या वर्तमानपत्रांच्या ई-आवृत्ती विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी तेथे संगणक आणि इंटरनेटची देखील उपलब्धता करून दिली गेली आहे. या सर्व प्रयत्नांचे फलित असे झाले की, आजवर या वाचनालयामुळे किमान ४० युवांना शासकीय नोकरी मिळाली आहे.

मुंबई विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी ‘लेट्स रीड इंडिया’साठी नवी मुंबई आणि मुंबई मधील झोपडपट्ट्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांना शाळाबाह्य वाचनाची साधने उपलब्ध आहेत का, याचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान प्रफुल्ल वानखडे आणि रवी गावित यांची भेट झाली. वानखेडेंसारख्याच पण रोजगार संधी निर्माण करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या छोटेखानी उपक्रमाची चर्चा झाली. या चर्चेतून तिसरे प्रारुप निर्माण झाले, ज्याचा मुख्य भर ‘वाचनातून  आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज निर्माण करण्या’वर आहे. यामध्ये ‘लेट्स रीड इंडिया’च्या मदतीने, ज्ञान विकास प्रतिष्ठानला सक्षम करण्यासाठी मदतीचा हात देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये असे कित्येक लोक आपआपल्या परिने गावांमध्ये, शहरांतील झोपडपट्ट्यांमध्ये असे उपक्रम राबवत असतील, ते उपयुक्तता आणि सामाजिक गरज म्हणून वाचनालयाकडे पाहत असतील. या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी पैसे, वेळ, प्रयत्न आणि वानखेडे यांच्यासारख्या लोकांची मदत मिळाली तर तरुण वर्ग खऱ्या अर्थाने सक्षम होऊ शकेल. तसेच एका ‘शृंखला प्रक्रिये’सारखी ही चळवळ पुढे जाईल. समृद्ध समाज निर्माण करण्याचा दृष्टिकोणातून, वाचनाची सवय व्यक्तीची विवेकी आणि चिकित्सक वैचारिक जडण घडण करते. पोस्ट-ट्रुथ (ज्या परिस्थितीत भावना आणि वैयक्तिक मतांना तथ्यांपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते) सारख्या भीषण प्रवाहांना आळा घालण्यात वाचनालये महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे सदर लेखात नमूद केलेल्या तिसऱ्या प्रारूपाच्या अनुषंगाने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

nilemrudul@mu.ac.in
लेखक मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत.