कायद्यात स्त्री- पुरुषांना समान हक्क दिले गेले आहेत ना? मग पुरुष म्हणून एकेरी वर्चस्व का गाजवले जाते? स्रियांची अवस्था ही हरणांसारखी झाली आहे. सिंह, वाघ कधी झडप घालतील हे सांगता येत नाही. बालवाडीतील कोवळ्या मुलीही वासनेला बळी पडत आहेत. समाज म्हणून आपण आणखी किती रसातळाला जाणार आहोत? रोज एक नवीन बलात्कार, क्रूर मरण समोर येत आहे. असे किती काळ चालणार? भारताचे, येथील संस्कृतीचे कौतुक करणाऱ्या पोस्ट, कविता, लेख पुरे झाले. इतिहास माहीत आहे सर्वांना. रोज त्याचीच पारायणे करून सत्य परिस्थिती बदलणार आहे का? ‘माझा भारत महान’, ‘शूरवीर, संत जन्मले’ वगैरे वगैरे… खूप झाले गोडवे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या देशात आजही महिला बळी का? पडत आहेत? अन्य देशांत महिलांच्या सुरक्षेची किती काटेकोर काळजी घेतली जाते आणि भारतात मात्र जागोजागी, गल्लोगल्लीत रोडरोमीओ, छपरी, टपोरी टपून बसलेले असतात. त्या कोलकात्यातील डॉक्टर तरुणीची काय चूक? १ जुलैपासून नवीन भारतीय न्याय संहितेची अंमलबजावणी सुरू झाली, त्याने किती फरक पडेल? आजकाल टेबलावरून आणि टेबलाखालून खिसा भरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कायदे कितीही कठोर केले तरीही फरक पडेल असे वाटत नाही. या प्रकारांमुळेच नागरिकांचा सुरक्षा यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही.
बदलापुरमध्ये झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आता तीन- चार वर्षांच्या मुलींवर असे अत्याचार होणार असतील, तर माणुसकी नामशेष झाली आहे, असेच म्हणावे लागेल. नालासोपाऱ्यातही शिक्षकाने एका विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे वृत्त आहे. अशा वेळी पालकांनी मुलांना शाळेत तरी कसे पाठवायचे. शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. तिथे मुले सर्वाधिक सुरक्षित असतात, असे मानले जाते, मात्र या मंदिरातही मुली असुरक्षित असतील, तर धन्य माझा देश आणि धन्य माझे सरकार…
हेही वाचा…‘चीन प्लस वन’ हे धोरण भारतासाठी फायद्याचे कसे आहे?
बदलापुरामध्ये झालेल्या घटनेप्रकरणी साधा एफआयआरही नोंदवून घेण्यास पोलीस तयार नव्हते. असे का झाले? परिसरातील रहिवाशांनी आंदोलन केले, मध्य रेल्वेची सेवा बंद पाडली, तेव्हा या विलंबास जबाबदार असलेल्या पोलिसांना, शाळेच्या मुख्यध्यापिकेला निलंबित करण्याचे आश्वासन दिले गेले. बदलापूरचे आंदोलन तीव्र आणि सरकारला आरसा दाखविणारे, जागे करणारे होते.
इतके पोलीस कर्मचारी होते तिथे, मंत्री येऊन गेले, राजकीय नेते येऊन गेले, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला, आम्ही मुलींच्या पाठीशी आहोत असे सांगण्यात आले. काही दिवसांनी हा सारा असंतोष निवळेल पण ही प्रकरणे थांबणार नाहीत. पुण्यात एका अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला गेला होता. मुंबईत नागपाडा येथे आठ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. या बालिकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. याला जबाबदार कोण? मुलींना जन्म द्यायचा की नाही हे सांगा आता.
हेही वाचा…मंदीच्या कृष्णछाया दिसत आहेत?
आज मुलगी / स्त्री ना शाळेत सुरक्षित आहे, ना महाविद्यालयात, ना कार्यालयात ना मंदिरात. इतकेच काय ती स्वतःच्या घरात सुद्धा सुरक्षित राहिलेली नाही. दारुडा बाप किंवा भाऊ किंवा अन्य कोणी तथाकथित जवळचा नातेवाईक तिचे शोषण करत असल्याची वृत्ते रोज वृत्तपत्रांत येतात. नालासोपारा येथे घडलेली घटनाही याच वर्गातली. मुलींनी कोणाची मदत मागावी? खरे सांगायचे तर मेणबत्ती मोर्चा, मूक मोर्चा, आंदोलने याने काही साध्य होईल, असे आता वाटेनासे झाले आहे. कारण हे सर्व आपण कितीतरी वर्षांपासून करत आलो आहोत. फायदा काहीच झाला नाही. घोषणा दिल्या जातात, पोस्टर दाखवून निषेध केला जातो, माध्यमे थेट प्रक्षेपण करतात, दोन दिवस चर्चा होते आणि नंतर सर्वजण आपापल्या कामात मागचे सारे विसरून जातात.
कायदा हातात घेणे योग्य नाही. मात्र तारीख पे तारीखमुळे आरोपींना जी सूट मिळते, त्यामुळे सर्वांनाच तातडीने न्याय मिळवा, आरोपीला गर्दीच्या स्वाधीन करावे, असे वाटू लागले आहे. आपल्याला कोणीतरी सोडवेल किंवा आमचे फार काही बिघडणार नाही, हा विश्वास घातक ठरतो. यातून नवीन गुन्हे घडत जातात. फाशी विषयीचे नियम एवढे वेळखाऊ आहेत की फाशीची शिक्षा झाल्यानंतरही आरोपी प्रदीर्घकाळ तुरुंगात त्यांचे दैनंदिन जीवन जगत असतात.
हेही वाचा…शेखर खांबेटे : एक कलंदर तबलावादक…
हे पाहून प्रश्न पडतो की मुलींना जन्म द्यायचा की नाही? दिला तर त्यांना शाळा, महाविद्यालयात, शिकवणीला पाठवयाचे की नाही? त्यांना नोकरी करून द्यायची की नाही? आता पाणी डोक्यावरून गेले आहे. असेच सुरू राहिले पुढे तर पुढचा काळ मुलींसाठी अधिक भयानक होत राहील. बाकी बेटी बचाओ बेटी पढाओ हे आता फक्त पुस्तकी वाचनापुरतेच उरले आहे, हेच खरे.