‘एक देश, एक कर’ या आग्रहातून देशभर लागू केलेला वस्तू व सेवा कर (जीएसटी) अमलात आणला जात असताना एकीकडे राज्यांची तिजोरी अजूनही रितीच आहे आणि दुसरीकडे केंद्राची दमछाक होत आहे. राज्यांच्या जवळपास सर्वच करांवर गंडांतर येणार, तेव्हा त्यांना जीएसटीचा लाभ मिळेपर्यंत स्थानिक करांवर पाणी सोडल्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भरपाई देण्याचे केंद्राने जीएसटी कायद्यानुसार कबूल केले होते. ही भरपाई जून २०२२पर्यंत दिली जाणार होती. मे २०२२पर्यंतची भरपाई राज्यांना देऊन झाल्याचे केंद्रातर्फे सांगितले जाते. प्रत्यक्षात अजूनही केंद्राकडून १५ हजार कोटी येणे असल्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिले आहे. आता त्या भरपाईसाठी थेट मार्ग न अंगीकारता, उपकर अर्थात ‘सेस’च्या मुदतवाढीचा मार्ग अवलंबण्याचे ठरले आहे. म्हणजे २८ टक्के स्तरातील काही वस्तू व सेवांवरील उपकर यापुढेही लागू राहील. अशा प्रकारे राज्यांना भरपाई मुदतवाढ देण्याच्या मूळ मुद्दय़ालाच केंद्राने बगल दिली आहे. त्याऐवजी कर्जफेड करण्यासाठी निधीची चणचण भासू नये यासाठी उपकरवाढीचा रस्ता खुला करण्यात आला. राज्यांचे समाधान यातून होण्यासारखे नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा