थॉमस फ्रीडमन
‘इस्रायलने गाझा पट्टीत युद्ध जरूर करावे, पण हजारो नागरिकांचे प्राण जाणार नाहीत एवढी जरा काळजी घ्यावी’ अशा सुरात बायडेन प्रशासन इस्रायली नेतृत्वाला सुनावते आहे! वास्तविक अमेरिकेने वेळ न दवडता गाझात पूर्ण युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला पाठिंबा द्यायला हवा, पण तसे झालेले नाही. हमासचा नायनाट करणे हे जर या युद्धातून इस्रायलला साध्य करायचे असेल, तर तसे अशक्य तरी आहे किंवा अमेरिका हे खपवून घेणार नाही, हेही इस्रायलला ठणकावून सांगायला हवे.  झाले एवढे बस झाले. इस्रायलने आता विजय जाहीर करावा आणि युद्ध थांबवावे. हे अमेरिकेनेच इस्रायलला सांगावे लागेल, कारण इस्रायलच्या सध्याच्या पंतप्रधानांची लायकी सिद्धच होते आहे- ते स्वत:च्या राजकीय कारकीर्दीला इस्रायलींच्या हितापेक्षा अधिक महत्त्व देताहेत. इस्रायलमित्र जो बायडेन यांच्या हिताची तर पर्वाच इस्रायली नेतृत्वाला नाही.

त्यामुळेच आता “सर्व (जिवंत)इस्रायली ओलिसांना हमासने मुक्त केल्यास इस्रायलही तातडीने युद्धबंदी करून सैन्यही मागे घेईल, पण इस्रायली तुरुंगांतून एकाही पॅलेिस्टिनीला सोडले जाणार नाही आणि हा समझोता कायमस्वरूपी टिकून राहावा यासाठी अमेरिका, नाटो देश अरब देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले आंतरराष्ऱ्रीय पर्यवेक्षक मंडळ स्थापन करावे” – असा स्पष्ट युद्धबंदी प्रस्ताव इस्रायलने द्यावा, यासाठी अमेरिकेने आपले वजन खर्च केले पाहिजे.

हेही वाचा >>>दहा मुद्दे : जरांगेंच्या आंदोलनातून ‘जातिअंताच्या लढाई’चे भले होणार का?

हा युद्धबंदी प्रस्ताव देण्यात इस्रायलचेही भलेच आहे, ते कसे? याची कारणे दोन.

पहिले कारण म्हणजे, इस्रायली जनमानसाचा जो कल गेल्या काही दिवसांत मला दिसला आहे तो ‘काहीही करून’ हमासच्या ताब्यातील त्या १२० ओलिसांना सोडवा, असा आणि इतकाच आहे. इस्रायल हा अखेर एक लहानसाच देश. तिथे त्या १२० ओलिसांचे अनेक परिचित- किंवा त्या परिचितांना ओळखणारे- असे अनेकानेक जण आहेत. आपल्या ओळखतल्या कुणालातरी ओलीस ठेवले गेले, ही भावना अस्वस्थ करणारीच आहे, पण त्यासाठी युद्धच लांबवले पाहिजे असे काही नाही.

उलट, ‘काहीही करून’ ओलिसांना सोडवा, या जनभावनेच्या रेट्यामुळेच इस्रायली लष्करापुढला पेचप्रसंग वाढू शकतो आणि तार्किक लष्करी निर्णयप्रक्रिया राबवणे अशक्यप्राय ठरू शकते. आजही अनेक तज्ज्ञांची अशी खात्री आहे की, हमासचा म्होरक्या येहिया सिनवर हा इस्रायली ओलिसांचा वापर स्वत:च्या बचावासाठी ‘मानवी ढाल’ म्हणून करतो आहे. हमासला संपवायचे तर हा म्होरक्या ठार व्हायला हवा आणि त्याला मारावे तर इस्रायली ओलिसांचेही जीव धोक्यात येण्याची भीती, अशी ही स्थिती. इस्रायलमध्ये कुणाचेही सरकार असले तरी आपल्या नागरिकांचे बळी जाऊ नयेत, हे पथ्य पाळावे लागेलच.

दुसरे कारण असे की, इस्रायलने गाझापट्टीतील महत्त्वाच्या शहरी भागांवर आणि हमासच्या भुयारी जाळ्यावर केलेल्या हल्ल्यांत या भागांची राखरांगोळी झालेली आहे आणि कैक हमास सैनिक मारले गेले आहेत. हमासचे सशस्त्र अतिरेकी हे गाझातील नागरिकांमध्येच राहून कुरापती करत असल्याने गाझामधील हजारो नागरिकही जिवानिशी गेले आहेत. हमास एक लष्करी संघटना म्हणून तिला अद्दल घडवणे हे ठीक, पण इस्रायलने हमासला शिक्षा म्हणून केलेल्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत हमासची शक्ती कमी झालेली आहे. दुसरीकडे, गाझामधील मारले गेलेल्या, जखमी आणि विस्थापित झालेल्या नागरिकांची संख्या प्रचंड वाढली असून त्यामुळे मानवतावादी आपत्ती निर्माण झाली आहे हे मान्य करावेच लागेल.  वाईट भाग म्हणजे इस्रायलकडे युद्ध सुरू झाल्यापासूनच कोणतीही योजना नाही – या मानवतावादी संकटाचे व्यवस्थापन आणि निराकरण कसे केले जाईल आणि हमासला न मानणाऱ्या पॅलेस्टिनी आणि अरबांनी इस्रायलशी समझोता कसा करावा, युद्धानंतरचे गाझा नेमके कसे असेल, परिस्थिती कशी निवळेल, याबद्दलचा कोणताही विचार इस्रायलने मांडलेला नाही.

 बेंजामिन नेतन्याहू यांच्या अतिउजव्या सरकारकडे गाझामधील युद्ध जिंकण्यासाठी आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी स्पष्ट असे राजकीय उद्दिष्टच नाही. इस्रायली लष्कराला वेळापत्रक किंवा यंत्रणेशिवाय लढण्यास सांगितले जात असल्याने इस्रायलच्या लष्करी नेतृत्वामध्येही अस्वस्थता वाढत आहे.

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Syria loksatta news
अग्रलेख : वाळवंटातले वालीहीन!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल

हेही वाचा >>>ग्राहक संरक्षणाचा खेळखंडोबा किती दिवस चालणार?

या पार्श्वभूमीवर माझे मत असे की,  इस्रायलने फक्त गाझातून बाहेर पडावे आणि ज्या व्यक्तीमुळे हे भयंकर युद्ध सुरू झालेले आहे, तो हमासचा नेता सिनवार याला त्याच्या भुयारी बिळातून बाहेर येऊ द्यावे. हाच सिनवारला बदनाम करण्याचा आणि नष्टही करण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरेल. सिनवारचे नेतृत्व मानणाऱ्या लोकांना आणि जगाला इस्रायलने सामोरे जावे, गाझाची पुनर्वांधणी इस्रायलने करावी, असे माझे मत आहे. इस्रायलपुढे आजघडीला दोन पर्याय आहेत . पहिला पर्याय म्हणजे गाझाच्या भूमीवर मालकीचा हव्यास धरण्यापायी अतिउजवे मंत्रिमंडळ आणि कोणत्याही अन्य सैन्याइतकाच परिणामांचा विचार करणारे सैन्य यांच्यातील बेबनावामुळे, धड गाझातल्या पॅलेस्टिनींना आपले नागरिकही मानायचे नाही आणि भूभाग तर हवा, अशी कसरत पुढेही करत राहाणे. या असल्या दुराग्रहामुळे इस्रायलला सर्वात वाईट मानवतावादी आपत्तींपैकी एकीस सामोरे जावे लागेल.

किंवा दुसरा पर्याय म्हणजे इस्रायल आत्ता गाझातून बाहेर पडू शकतो, त्याचे ओलिस परत मिळवू शकतो आणि सिनवार आणि त्याच्या टोळक्यामुळेच ही समस्या उद्भवली, हे जगाला इस्रायल उजळ माथ्याने सांगू शकतो.

अशा परिस्थितीत हमास जास्तीत जास्त काय करील? हमासच्या म्होरक्यांना गाझातील लोकांपुढे हे सांगावे लागेल की तेथे कोणतीही पुनर्बांधणी होणार नाही, फक्त ज्यूंचा नाश करण्यासाठी त्याचे अंतहीन युद्ध सुरू राहील…. ते किती काळ टिकते ते पाहूया! ‘आम्ही नाही, हमासच युद्धखोर आहे’ हा इस्रायलचा दावा खरा असेल तर हे घडू शकते.

जर हमासने तसा प्रयत्न केला, तर अमेरिकेने आणि त्याच्या सहयोगींनी संपूर्ण जगाला दाखवून द्यावे की गाझातील नागरिकांच्या जिवाला काहीही किंमत नसण्याचे एकमेव कारण म्हणजे हमास युद्धविराम स्वीकारणार नाही! अर्थात, त्यासाठी आधी युद्धविराम स्वीकारण्याची तयारी इस्रायलची हवी, आणि तीही तातडीने.

( ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मूळ लेखाचा हा अंशानुवाद, ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ आणि इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूह यांच्यातील करारानुसार वैधपणे करण्यात आलेला आहे)  

Story img Loader