श्रद्धा कुंभोजकर

महात्मा फुलेंची बदनामी केली जात आहे, हे पाहून हरी नरके यांनी खमकी भूमिका घेतली. निर्विवाद पुराव्यांसहित त्यांनी केलेल्या सत्यशोधनामुळे भारताच्या वैचारिक इतिहासात महात्मा फुले यांचं स्थान अढळ ठरलं. सामाजिक चळवळीत सक्रीय असणाऱ्यांना त्यांची उणीव कायमच जाणवत राहील..

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Success Story Of Nitin Shakya In Marathi
Success Story Of Nitin Shakya : डॉक्टर ते आयएएस अधिकारी, झोपडपट्टीतील मुलांची सेवा करताना मनात जागं झालं स्वप्न; जाणून घ्या नितीन शाक्य यांची गोष्ट
Teacher Teach The Arm Span To Height Ratio In Class
VIRAL VIDEO : विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनोखा अंदाज, उंची मोजण्यासाठी दाखवला हा जबरदस्त हॅक, एकदा पाहाच
vidya balan reveals kartik aaryan love life
कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”
video of school students hugging each other in classroom went viral on social Media obscene video viral
भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
Marathi Actress tejaswini pandit sister Poornima Pullan gave birth to a baby girl
“१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, अभिनेत्री तेजस्विनी पंडित झाली मावशी; म्हणाली, “लक्ष्मी आली”

‘‘आमच्या कंपनीत बरं का, हा मुलगा आत्ताआत्ता कामाला लागलाय. खूप कष्टातून वर आलाय, स्मशानात काम करून शिक्षण घेतलंय आणि टेल्को कलासागरच्या अंकात किती छान लिहिलंय ते वाचून बघ.’’ असं वडिलांनी मला सांगितलं, त्याला आता पस्तीसेक वर्ष झाली असावीत. हरी नरके या नावाशी झालेली ती पहिली छापील ओळख. काही वर्षांपूर्वी कपाळाला कुंकू लावण्यामधूनच बाईची आणि समाजाची ओळख ठरवण्याबाबत राळ उडत होती, तेव्हा कुंकू न लावणाऱ्या त्यांच्या आवडत्या स्त्रियांबाबत केलेल्या नोंदीत त्यांनी त्यांच्या आईसोबत माझं नाव पाहून मी हेलावून गेले होते.

प्राध्यापकांच्या उजळणी वर्गातली विद्यार्थिनी म्हणून मला त्यांची व्याख्यानं ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या वेळी महात्मा फुले अध्यासनात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. खैरलांजीचं हत्याकांड नुकतंच उघडकीला आलं होतं. जातवास्तव आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीविषयीचं त्यांचं व्याख्यान मी कधीही विसरू शकणार नाही. ‘या लोकांना त्यांचं आरक्षण असताना खुल्या गटात ते का येतात?’ अशी शंका कुणीतरी मांडल्यावर नरकेसरांनी एका वाक्यात आरक्षणाचं सारतत्त्व स्पष्ट केलं होतं- ‘‘ओपन मीन्स ओपन फॉर ऑल. खुला गट हा सर्वासाठी खुला असतो.’’ आणि मागोमाग हेही सांगितलं होतं, की ‘‘आरक्षण म्हणजे बेरोजगारी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. आरक्षण ही प्रतिनिधित्व देण्यासाठीची सोय आहे. ज्या गटांना विविध कारणांमुळे शिक्षण आणि रोजगारात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नाही, त्यांचं प्रतिनिधित्व जपण्यासाठी आरक्षण आहे. रोग गेला की आपण औषध घेणं हळूहळू थांबवतो. त्याप्रमाणे जातिव्यवस्थेपोटी येणारी विषमता संपली की आरक्षण थांबवता येईल.’’ आज १७ वर्षांनीही ते व्याख्यान कालच ऐकल्यासारखं आठवतंय. हे त्या मुद्देसूद आणि पोटतिडिकीतून आलेल्या मांडणीचं यश आहे.

संघर्षशील व्यक्तिमत्व

पोटतिडीक हा मुळात महात्मा फुले यांच्या लिखाणाचा गुण. ‘जिस तन लागे वही तन जाने बीजा क्या जाने गव्हारा रे’ असा दोहा जोतिराव उद्धृत करतात. आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक संघर्षांला प्रेरणा देणाऱ्या जोतिरावांचा जिव्हाळा, पोटतिडीक हा गुणविशेष नरकेसरांनी आत्मसात करणं स्वाभाविक होतं. त्यामुळे त्यांची मांडणी कधी कोरडी किंवा अलिप्त नसे. विषमतेच्या विरुद्ध आणि अन्यायग्रस्तांच्या बाजूनं ठाम भूमिका घेणारा हा माणूस सतत संघर्षशील राहिला. समाजात तेढ रुजावी यासाठी मुद्दाम केलेली महात्मा फुलेंची बदनामी पाहून नरकेसरांनी खमकेपणानं भूमिका घेतली. निर्विवाद पुराव्यांसहित त्यांनी केलेल्या सत्यशोधनामुळे भारताच्या वैचारिक इतिहासात महात्मा फुले यांचं स्थान अढळ ठरलं. आपल्याला दिसलेलं सत्य कदाचित आपल्या पाठीराख्यांना पटणार नाही म्हणून गुळमुळीतपणे मांडणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. हजारोंच्या संख्येने भाषणं देऊन महाराष्ट्रातलं गाव न् गाव वैचारिक घुसळणीत सामील करून घेण्याची त्यांची कामगिरी

अद्वितीय आहे.

डॉ. बाबा आढावांसारख्या संघर्षरत नेत्यासोबत राष्ट्र सेवा दलातून नरकेसरांनी सार्वजनिक कामाची सुरुवात केली, ही अभ्यासक कार्यकर्ता म्हणून पुढे निभावलेल्या भूमिकेची तालीम म्हणता येईल. महात्मा फुले समता प्रतिष्ठानसोबत य. दि. फडकेंसारखा जबरदस्त संशोधक काम करत होता. त्यांच्याकडून घेतलेलं संशोधनाच्या पद्धतीचं बाळकडू नरकेसरांना आयुष्यभर पुरलं. पुराव्याशिवाय एकही गोष्ट मांडायची नाही आणि पुरावे द्यायला कचरायचं नाही हे धोरण त्यांनी कायम सांभाळलं. पुढे आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नामविस्तार होण्यासाठी सरांची अभ्यासपूर्ण मांडणी खूप महत्त्वाची ठरली. गेल्या वर्षी शिवजयंती या विषयावर व्याख्यान द्यायला ते आमच्याकडे आले तेच मुळी किमान दहा पुस्तकं आणि निम्मं भरलेलं नोटपॅड घेऊनच. अशी साधार मांडणी केल्यामुळे त्यांचं म्हणणं खोडणं निव्वळ अशक्य होत असे. ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ अशी प्रत्यक्षार्थवादाची बैठक हे त्यांच्या प्रतिपादनाचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणता येईल.

प्रत्यक्षार्थवादामधला कर्मठ तथ्यनिष्ठ विचार आणि रोजच्या जगण्यामध्ये शोषितांच्या ऐतिहासिक पुराव्यांचे अभाव यांचा मेळ सरांनी कसा घातला असेल? सामाजिकशास्त्रांमध्ये ज्याला रीिडग अगेन्स्ट द ग्रेन म्हणतात, ती पद्धत त्यांनी अनेकदा वापरली असं दिसतं. म्हणजे प्रवाहाविरुद्ध किंवा धारेच्या उलटय़ा बाजूनं पुराव्यांना तपासायचं. दस्तऐवजात कोण हजर आहेत, त्यांच्या बरोबरीनं कोण गैरहजर आहेत, तेही विचारात घ्यायचं. ज्या जोतिरावांच्या मध्यस्थीमुळे सत्यशोधक रामशेट उरवणे यांनी टिळक-आगरकरांसाठी जामीन देऊ केला, त्या जोतिरावांच्या मृत्यूची बातमी केसरी किंवा मराठा वृत्तपत्रानं छापली नाही या तथ्याचं महत्त्व या पद्धतीमुळे ते अधोरेखित करू शकले.

अजोड कामगिरी

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा विविध दिशांनी घडलेल्या वैचारिक घुसळणीचा इतिहास आहे. तो समजून घ्यायचा तर फुले-शाहू-आंबेडकर या त्रिमूर्तीच्या विचारांना समजून घ्यावं लागतं. साहित्य संस्कृती मंडळ आणि विविध समाजसुधारकांच्या चरित्र साधन समित्यांच्या माध्यमातून सरांनी अनेक वर्ष महात्मा फुले समग्र साहित्याच्या कामासाठी संशोधन केलं. जोतिरावांच्या मृत्युपत्रासारखी अनेक समकालीन कागदपत्रं खुद्द त्यांनी शासकीय दफ्तरखान्यातली धूळ पचवून शोधून काढली. समग्र साहित्याची सध्याची आवृत्तीही त्यांनी संपादित केलेली आहे. याबरोबरच डॉ. आंबेडकरांच्या चरित्र साधनांच्या समितीचं काम सरांनी अनेक वर्ष सांभाळलं. नुसतं सांभाळलं नाही, तर त्यांच्या कारकीर्दीत बाबासाहेबांच्या साहित्याचे एकूण आठ खंड त्यांनी प्रकाशित केले. मूकनायक आणि बहिष्कृत भारत या बाबासाहेबांनी चालवलेल्या वृत्तपत्रांच्या खंडांचं देखणं प्रकाशन शासनाकरवी प्रत्यक्षात आणण्याची अवघड कामगिरीही त्यांनी साध्य केली. महाराष्ट्राचा वैचारिक वारसा सामान्य माणसापर्यंत मुद्रित माध्यमातून पोचवण्याची ही कर्तबगारी अजोड आहे.

सजग इतिहासभान

इतिहासात रमून वर्तमानाकडे दुर्लक्ष करण्याची सोयिस्कर भूमिका घेणं सध्या साहजिक मानता येतं. पण ‘तुका म्हणे झरा आहे मूळचाचि खरा’ असा जिव्हाळा शोषितवर्गाबाबत असणाऱ्या नरकेसरांनी जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली. ओबीसी आयोगासारख्या अनेक शासकीय प्रयत्नांमध्ये तर त्यांच्या अभ्यासातून त्यांनी भक्कम योगदान दिलंच. पण दडपलेल्या समाजघटकांनी आजवर निभावलेली निर्माणकर्त्यांची भूमिका सर आपल्या लिखाणातून आणि व्याख्यानांमधून ठामपणे अधोरेखित करत राहिले. जातिव्यवस्था ही संपूर्ण समाजाच्या बौद्धिक भांडवलाचा ऱ्हास करते हे जाहीरपणे बोलून तिचं अन्यायकारी स्वरूप ते मांडत राहिले. हे करताना कोणत्याही विशिष्ट जातीकडे सगळा दोष देणं किंवा त्या जातीत जन्माला आलेल्यांचा द्वेष करणं त्यांनी नामंजूर केलं. वेगवेगळय़ा जातींतल्या सुहृदांनी वेळोवेळी केलेल्या मदतीबाबतची कृतज्ञता ते जाहीरपणे मांडत. तितक्याच निर्भीडपणे त्यांना आलेले कटू आणि निराशाजनक अनुभवही ते मांडत असत. ‘सत्यशोधन किंमत मागतं’ ही जाणीव जागती ठेवून ते टीका सहन करत. ब्लॉग, फेसबुकसारख्या नवमाध्यमांना अगदी सहजपणे हाताळल्यामुळे त्यांच्या नोंदी आणि व्हिडीओंना लाखो प्रेक्षक असत. या नव्या तंत्रांच्या साहाय्यानं भविष्यासाठी इतिहासाच्या नोंदी करणाऱ्या सजग माणसासारखं इतिहासभान सरांनी दाखवलं.

असं सगळं करताना माणसं अनेकदा आपला समंजसपणा गमावतात. स्वत:बद्दलच्या भक्कम विश्वासापोटी इतरांचं म्हणणं ऐकण्याची कला विसरतात. नरकेसरांनी ते कधीही होऊ दिलं नाही. एखाद्या शब्दाच्या व्युत्पत्तीपासून ते ऐतिहासिक साधनाच्या अस्सलपणाबाबत समोरचा जे काही मत मांडेल ते ऐकून घेऊन, पटलं तर लवचीकपणे ते स्वीकारण्याचा आणि नाही पटलं तर तसं स्पष्टपणे सांगण्याचा त्यांच्या मनाचा मोठेपणा मी अनुभवलेला आहे. ‘महापंडित’ या त्यांनी सन्मानानं वापरलेल्या शब्दाला काहीसा कुचेष्टेचा अर्थ संस्कृतमध्ये अभिप्रेत असतो असं कळवल्यावर मनापासून कौतुक करत तो शब्द बदलला होता. आणि मराठीच्या अभिजात दर्जाबाबत आमची मतं वेगवेगळी आहेत हे माहीत असूनही ते मला नेहमी लालफितीच्या जंजाळातून वाट काढायला मदत करत राहिले.  

हरी नरके या मराठी जमिनीत रुजलेल्या अभ्यासक, कार्यकर्त्यांनं आपल्या उण्यापुऱ्या साठ वर्षांच्या जगण्यातून काय मिळवलं? तर मराठी संस्कृतीचे मानबिंदूअसणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती लेखन, भाषण आणि आचरणातून महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. वर्तमानकाळात समता आणि बंधुतेच्या आधारानं स्वातंत्र्याचा उपभोग सर्वाना घेता यावा यासाठी धोरणकर्त्यांपुढे अभ्यासपूर्ण मांडणी केली. ही मांडणी चार भिंतींत अडकवून न ठेवता समाजाच्या कानाकोपऱ्यात, सर्वाना समजेल अशा भाषेत लेख,  पुस्तकं, व्याख्यानं, व्हिडीओ, टीव्ही सीरिअल, ब्लॉग अशा वेगवेगळय़ा माध्यमांमधून पोचवली. ‘काय करू आता धरोनिया भीड’ अशा वृत्तीनं आपलं म्हणणं मांडलं. पण वेळ पडली तर आपल्या मतांना मुरडही घातली. ‘तुमच्याबद्दल मला सोयरेपणा वाटतो’ अशा निष्कपट भाषेत बोलणाऱ्या या माझ्या सोयऱ्याची सोबत कायम राहील.

shraddhakumbhojkar@gmail.com