हरियाणामधील पराभवाने काँग्रेस पक्ष हैराण झालेला आहे. आपण जिंकता-जिंकता अचानक हरलो कसे, हे त्यांना कळलेलेच नाही. खरे तर गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपने निवडणुकांचे राजकारण कमालीचे बदलून टाकले आहे. आणि ते समजून न घेताच काँग्रेस निवडणुका लढवत आहे. हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिक्कार्जुन खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये एकमेकांवर दोषारोप केले गेले. राहुल गांधी हे भूपेंद्र हुड्डा वगैरे नेत्यांवर प्रचंड वैतागलेले होते. काँग्रेसच्या नेत्यांना पक्षाच्या विजयापेक्षा स्वत:चे हितसंबंध महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे काँग्रेसचा पराभव होतो, असा आरडाओरडा राहुल गांधींनी केला. जिंकणारी निवडणूक हरल्यामुळे राहुल गांधींनी वैफल्यग्रस्त होणे साहजिकच आहे. पण, काँग्रेसच काँग्रेसला हरवतो असे नेहमी म्हटले जाते. काँग्रेसमधील सुभेदार आपापली जहागीरदारी टिकवण्यासाठी पक्षाचा बळी देतात असे अनेकदा पाहायला मिळाले आहे. हरियाणामध्येही तसेच झाले असेल असे म्हणता येईल. काँग्रेसच्या समस्या हाताळण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार समिती नेमली जाणार आहे. त्यातून काही होणार नाही हे प्रत्येकाला माहीत आहे. संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल हे राहुल गांधींचे निष्ठावान असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल का, याचे उत्तर नकारार्थीच असेल. काँग्रेसमध्ये कुठल्याच गोष्टी बदलत नसतात, काँग्रेसमध्ये शस्त्रक्रिया होत नाही, मलमपट्टी होते. हरियाणाबाबतही फारसे काही वेगळे होईल असे नव्हे! पण, इथे मुद्दा काँग्रेस कोणावर काय कारवाई करेल हा नाहीच. काँग्रेसला भाजपचे निवडणुकीचे राजकारण कळलेले नाही ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरू लागली आहे. काँग्रेसची निवडणूक लढवण्याची पद्धत कदाचित कालबाह्य झाली असे म्हणताही येऊ शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा