गिरीश टिल्लू

‘अल्माटी’ या शब्दाचा कझाक भाषेतील अर्थ आहे ‘सफरचंद’. सध्या कझाकस्थानात असलेले हे शहर पूर्वीच्या रशियात होते. त्याचे तेव्हाचे प्रचलित नाव होते अल्मा-आटा. हे ऐतिहासिकदृष्ट्या सुंदर शहर सांस्कृतिकदृष्ट्याही संपन्न आहे. याच गावाने वैद्यकीय क्षेत्रात एक इतिहासही घडवला आहे. 

Hezbollahs influence hasan nasarullah
“लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Sitaram Yechury pass away know about his important role in politics
येचुरींच्या जाण्याने आशावादाचा स्रोत गमावला!
narayan dharap horror books
भयकथा म्हणजे…
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!

अल्मा-आटा येथे १९७८ च्या सप्टेंबर महिन्यात डॉ. हाफडन् महालेर यांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या मनात खूप उत्सुकता व थोडी साशंकताही नक्कीच असणार. जागतिक आरोग्य संघटनेच्या कामाचा त्यांना सुमारे तीन दशकांचा अनुभव होता. संघटनेच्या महासचिव या पदाचा हा त्यांचा दुसरा कार्यकाळ. तरीही त्यांच्या मनात दडपण होते आणि त्याची कारणेही तशीच होती. अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध टोकाला पोहोचले होते. संरक्षणाबरोबरच विज्ञान व तंत्रज्ञानातही दोन्ही देशातील स्पर्धा टोकाला गेली होती व या शीतयुद्धाची दाहकता जग अनुभवत होते. त्यावेळी तिसऱ्या जगाचे नेतृत्व करू पहाणारा चीन उदयाला येत होता. चीनमध्ये अनवाणी-चिकित्सक (बेअरफूट डॉक्टर्स) ही मोहीम नुकतीच सुरू झाल्याने त्याचे प्रदर्शन करायला ते राष्ट्र तयार होते. तत्कालीन रशिया आपल्या देशातील स्वास्थ्यसेवेचे साम्यवादी प्रारूप जगाला दाखवण्याकरीता उतावीळ होते. विकसनशील राष्ट्रांनी रशियन व्यवस्था स्वीकारावी व या क्षेत्रातही आपणच जगाचे नेतृत्व करावी ही रशियाची महत्वाकांक्षा होती.

हेही वाचा >>> सर्वांसाठी आरोग्य : ‘या’ सर्वांमध्ये ‘ती’ कुठेय?

तो काळही जगातील बऱ्याच देशांना अनेक अर्थांनी आव्हानात्मक ठरला होता. रशिया, चीन, तसेच आशियातील अनेक देशांनी नुकताच मोठ्या दुष्काळांचा सामना केला होता. त्यात अनेक साथी, तोकडी सार्वजनिक व्यवस्था व विविध प्राधान्यक्रम असे चित्र होते. अमेरिकेची हिवताप ही प्राथमिकता, रशियाचा देवीरोगाच्या उच्चाटनाकडे कल, आशियात क्षयरोग तर आफ्रिकेत उपासमारीचे थैमान. साथरोगांच्या विविध देशांचे वेगवेगळे प्राधान्यक्रम व वैविध्यपूर्ण (अ)व्यवस्था असल्याने जगाचे स्वास्थ्य जणू हरवत चालले होते व जागतिक आरोग्य संघटना हतबल ठरल्याचे चित्र दिसत होते. जवळजवळ सर्वच देश ‘स्वास्थ्यसेवा यंत्रणा केंद्रीभूत असाव्यात की समाजाच्या तळागाळात व्यवस्था निर्माण कराव्यात’; प्रत्येक आजाराकरिता वेगवेगळा ‘उभा’ निर्मूलन कार्यक्रम असावा की विविध आव्हाने पेलू शकणारी ‘आडवी’ व्यवस्था असावी अशा वेगवेगळ्या द्वंद्वात सापडले होते. सर्वच घटकांची आणखी काहीतरी करायला हवे आहे, अशी मानसिकता तयार झाली होती.

या स्थितीत आवश्यकता होती ती समन्वयाची तसेच एका नव्या दिशेच्या शोधाची. तुकड्या-तुकड्याने विचार न करता एका समग्र चिंतनाची! डॉ. महालेर या काळात प्राथमिक स्वास्थ्यसेवा जागतिक आरोग्य संघटनेची प्राथमिकता व्हावी यासाठी अनेक वर्षे प्रयत्नशील होते. १९५१ मध्ये आपल्या कारकीर्दीची सुरुवात त्यांनी भारतात केली होती व एक दशकभराचा भारतीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा अनुभव गाठीशी बांधून ते जिनिव्हाला परतले होते. भारतातून आल्यानंतर त्यांनी जणू प्राथमिक स्वास्थ्यसेवा या विषयाला वाहूनच घेतले होते. महालेर यांनी याबद्दल खूप चिंतन केले होते. त्यांनी एक लेख १९७८ च्या एप्रिल महिन्यात इंटरनॅशनल हेल्थ या शास्त्रीय मासिकात लिहिला होता. स्वास्थ्य यंत्रणा लोकांच्या जीवनशैलीशी सुसंगत असाव्यात आणि जीवनाच्या विविध अंगांनी (कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, दळणवळण, संवादमाध्यमे इत्यादि) त्यांचे पोषण व्हावे; स्थानिक गरजा व साधने यांचा मेळ असावा; स्वास्थ्यसेवांमध्ये उपचारबरोबरच प्रतिबंध, स्वास्थ्यसंवर्धन व पुनर्वसन यांचा विचार असावा; स्वास्थ्यसंवर्धनाची साधने विकेन्द्रित स्वरूपात तळागाळापर्यंत पोहोचावीत अशा तत्वांचा उपयोग करून ‘चिकित्सा सेवा’ देण्याबरोबरच ‘स्वास्थ्यसेवा’ पोहोचवण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. याच लेखात निदानाकरिता केलेल्या तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे विषमता निर्माण होऊ नये हे त्यांनी बजावले होते. ‘इ. स. २००० पर्यंत सर्वांकरिता स्वास्थ्य’ हे परिषदेचे ध्येय या लेखात त्यांनी स्पष्ट केले होते. हे चिंतन अनेक देशातील विचारवंत शास्त्रज्ञ व नेते यांना मार्गदर्शक ठरले. याच लेखात त्यांनी १९३७ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत (लीग ऑफ नेशन्स) अशाच आशयाचा ठराव झाल्याचेही नमूद केले आहे.   

हेही वाचा >>> दुसऱ्या क्रमांकाचा जंगल विनाश घडवून आपण नेमका कसला विकास साधणार आहोत?

लोकांच्या स्वास्थ्याकरिता आवश्यक सेवा उपलब्ध असावी, स्वास्थ्यसेवा विविध क्षेत्रातील व्यवस्थांची प्राथमिकता व्हावी व त्याकरिता लोकांचे सक्षमीकरण करावे असा हा विचार कोणी नाकारण्याचे काही कारणच नव्हते. पण खरी मेख तर इथेच होती. रशियाचे केंद्रीभूत प्रारूप जगातील अनेक देशांना आकर्षक वाटत होते. याउलट लोक-कुटुंब-समाज केंद्रित व्यवस्था हा प्राथमिक स्वास्थ्य सेवेचा कणा आहे, याचे भान धोरणकर्त्यांना यावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न आवश्यक होते. याचवेळी डॉ. महालेर योग्य वेळी योग्य जागी एका ध्येयाचा ध्यास घेऊन कार्यरत होते.

प्राथमिक स्वास्थ्यसेवा या विषयावर जागतिक परिषद व्हावी व त्यात आपला ठसा उमटावा यासाठी अनेक देश तयार होतेच. या परिषदेचे महत्व कळल्यामुळे सुमारे दोन वर्षे तर परिषदेच्या ठिकाणाचीच चर्चा चालली होती. शेवटी रशियाची सरशी झाली तीसुद्धा काही अटींवर. त्यात मॉस्कोबाहेर ही परिषद व्हावी हीसुद्धा एक प्रमुख अट होती. वरवर पहाता या परिषदेचे आयोजन वाटले  तेवढे सोपे नव्हते. महालेर यांच्या सहकारी असलेले डॉ. तजेदा-दे-रीव्हेरो यांनी आवश्यक असणारे अर्थबळ व इतर पाठबळ उभे करण्याचे अवघड काम सिद्धीस नेले. त्यांना कझाकस्थानचे आरोग्यमंत्री डॉ. शर्मानोव्ह यांची साथ मिळाली. शर्मानोव्ह स्वत: एक उत्साही शास्त्रज्ञ होते.

मुख्य ठरावाचा मसुदा काय असावा, त्या मसुद्याला कोणाचा व कसा पाठिंबा मिळेल यांचा अंदाज बांधणे, त्यासाठी एकमत घडवणे हे मुत्सद्देगिरीचेच काम होते. विषयाचे महत्व पहाता महालेर यांना हा प्रस्ताव एकमताने मंजूर व्हावा असे वाटत होते. या प्रसंगी अमेरिकेचे प्रतिनिधी येतील की नाही व त्यांचा रोख काय असेल याबद्दल साशंकता होती. चीनचा सहभाग असेल का याबद्दल तेव्हाही अंदाज बांधता आला नव्हता. ‘इ. स. २००० पर्यंत सर्वांकरिता स्वास्थ्य’ या उद्दिष्टावर ‘आदर्शवादी, स्वप्नाळू, व अशक्यप्राय’ अशी टीकाही झाली. ही टीका होणार हे देखील महालेर यांनी आपल्या लेखात स्पष्टपणे नमूद केले होते, तसेच या उद्दिष्टाच्या पूर्ण प्राप्तीसाठी असणाऱ्या अडथळ्यांचीही त्यांना कल्पना होती. जगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी व त्वरीत सर्व घटकांसह (stakeholders) स्वास्थ्य सेवांमधील विषमतेची दरी एका पिढीच्या अंतरात भरून काढण्याचा निर्धार हे उद्दिष्ट व्यक्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

हेही वाचा >>> चॅट जीपीटी या नव्या आव्हानाचे शिक्षण क्षेत्रासाठी संधीत रूपांतर करता येईल…

परिषदेच्या प्रतिनिधींचा खास दौरा आयोजित करून नेत्रदीपक प्रगतीचे प्रदर्शन केले गेले. या परिषदेसाठी अनेक सुविधांनी अल्मा-आटा शहर सुसज्ज करण्यात आले. गावाचे नाव सार्थ ठरत होते. रशियाने मात्र या संधीचा आपली प्रतिमा उजळण्यासाठी या संधीचा पूरेपूर उपयोग करून घेतला. नवी अतिथीगृहे बांधण्यात आली व सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. ठरवलेले सभागृह मोठे होतेच, पण तिथे ध्वनिवर्धक व्यवस्था ‘रशियन’ पद्धतीची होती, म्हणजे मुख्य वक्ता वगळता इतरांना बोलण्याची सोयच नव्हती! तंत्रज्ञानात अव्वल असलेल्या रशियातील कुठल्याही संस्थेवर विश्वास न ठेवता ध्वनिवर्धक व्यवस्थेचे कंत्राट एका इटालियन उद्योगास देण्यात आले होते.

प्रत्यक्ष परिषदेमध्ये १३४ देशांमधून तीन हजार प्रतिनिधी व ६७ जागतिक संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. स्वास्थ्यसेवा हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून त्यासाठी प्रत्येकाने स्वत: व एकत्रित प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यही आहे हा विचार या परिषदेने दिला. सर्वांकरिता स्वास्थ्य या ध्येयाच्या प्राप्तीसाठी सामाजिक, आर्थिक व अन्य अनेक पैलूंचा विचार आवश्यक असून सर्व घटकांची प्राथमिकता स्वास्थ्य ही असावी अशी मांडणी या ठरावाने केली. जगाच्या स्वास्थ्यासाठी जागतिक शांतता व सुव्यवस्था यांची आवश्यकताही अधोरेखित करण्यात आली. उपचारांपलिकडे स्वास्थ्य संवर्धनाचा व्यापक विचार या निमित्ताने पहिल्यांदाच चर्चेला आला. स्वास्थ हे एक महत्वाचे मानवी मूल्य असल्याची आठवण या परिषदेनेच जगाला करून दिली.

या परिषदेतील ठराव भविष्यातील वैद्यकीय धोरण, सेवा, शिक्षण, संशोधनांचे आधारभूत ठरले. असलेल्या ज्ञानाबरोबरच आपल्या जबाबदारीचे भान आवश्यक आहे हे वैद्यकीय क्षेत्राला ठामपणे सांगणारी ही परिषद संपली तेव्हा आपण मानवाच्या इतिहासातील महत्वाचे काम केले आहे अशी कृतार्थतेची भावना प्रत्येक प्रतिनिधीच्या मनात होती, हे महालेर यांनी नमूद केले आहे. या परिषदेचे वर्णन ते एक ‘आध्यात्मिक घटना’ असे करतात. ही परिषद केवळ उत्तम ठराव करून संपली नाही, तर डॉ. महालेर यांनी या उदात्त ध्येयाच्या निमित्ताने विखुरलेल्या जगाला एकत्र आणले. रशिया व अमेरिकेने एकाच ठरावाला पाठिंबा दिल्याची त्या काळातील ही एक अपूर्व घटना होती. हा ठराव एका आफ्रिकन महिलेने या परिषदेत वाचला, तेव्हा विकसित व विकसनशील देशातील भेदभावही संपला होता.

हेही वाचा >>> कुलभूषण जाधव आणि ‘ते’ आठ अधिकारी कधी परत येणार?

७ एप्रिल २०२३ रोजी जागतिक आरोग्य संघटनेला ७५ वर्षे झाली आहेत व ‘इ. स. २००० पर्यंत सर्वांसाठी स्वास्थ्य’ या उद्दिष्टालाही ४५ वर्षे लोटली आहेत. आजही हे ध्येय तितकेच महत्वाचे राहिले आहे. किंबहुना अधिकच आवश्यक झाले आहे. २०१८ साली कझाकस्थानची राजधानी अस्ताना येथील परिषदेने याच ध्येयाचा पुनरुच्चार केला. द्रष्टा विचारवंत कसा असतो याचे हे उत्तम उदाहरण. या चौकस व संवेदनशील शास्त्रज्ञाने भारतात ‘सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः’ ही प्रार्थना दशकभरात कधीतरी ऐकली असेल का हे माहीत नाही, पण ते ही प्रार्थना खरोखर जगले. जिनिव्हात डॉ. महालेर यांच्या स्मृतिस्तंभावर लिहिले आहे ‘सर्वांसाठी स्वास्थ्य – स्वास्थ्यासाठी सर्व’!

(सार्वजनिक स्वास्थ्य सेवांबद्दलची मार्गदर्शक तत्वे व धोरणे बऱ्याचदा रूक्ष दस्तऐवज होतात, विस्मृतीत जातात. पण त्याबरोबरच डॉ. महालेर यांच्याकडचे ‘अजून काहीतरी’ असले तरच एखादी गोष्ट तयार होते. जगाला अजून एखादी गोष्ट आता हवी आहे.)

-लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आरोग्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

gtillu@gmail.com