निश पाटील

चरस, गांजा, कोकेन या सारख्या अमलीपदार्थांची जागा आता रासायनिक अमलीपदार्थ व प्रतिबंधित गोळ्यांनी घेतली आहे. विशेषत: मेफेड्रोनचा (एमडी) वापर सर्वाधिक केला जातो. मुंबई पोलिसांनी दोन वर्षांत पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे एमडी जप्त केले आहे. त्यापूर्वी २०१८ मध्ये मुंबई पोलिसांनी १० कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. २०१९ मध्ये तीन कोटी, २०२० मध्ये पाच कोटी २१ लाख, २०२१ मध्ये ३२ कोटी २९ लाख रुपये किमतीचा एमडी जप्त केले होते. अल्पवयीन मुले, मध्यमवर्गीय व्यक्ती असे अनेक जण एमडीच्या व्यसनाच्या गर्तेत अडकले आहेत.

उच्चभ्रू पार्ट्यांसाठी कोकेन

कोकेन हा पदार्थ सर्वात महागडा असून उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणत कोकेनचे सेवन केले जाते. कोकेन तस्करीत दक्षिण अमेरिकेतील टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. कोकेनच्या तस्करीसाठी पूर्वी आफ्रिका खंडातील गरीब देशांमध्ये नागरिकांचा वापर व्हायचा. पण सध्या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, व्हेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया आणि सुरीनाम या देशांतील गरीब नागरिकांचाही कोकेनच्या तस्करीसाठी वापर होतो. कोकेनच्या तस्करीसाठी अदीस अबाबा ते दुबई व मग दुबई ते मुंबई हा हवाई मार्ग कुख्यात आहे. याच मार्गाचा वापर करून भारतात कोकेन येते. बनावट कोकेनही विकले जाते. त्याला चायना व्हाइट असा सांकेतिक शब्द आहे. कोकेनला मुख्यत: ओजी व्हाइट किंवा व्हाइट आइस म्हटले जाते. या सांकेतिक नावांत स्थळ-काळानुसार बदल होतो. पूर्वी ड्रग्ससाठी चित्रपट अभिनेत्रींच्या नावांचा वापर केला जायचा.

अफगाणिस्तानातून येणारे हेरॉइन

हेरॉइन हे अफूपासून तयार केले जाते. ते मानवनिर्मितही असते. अफगाणिस्तानातून देशात हेरॉइनचा साठा येतो. पण त्यात आता घट झाली आहे. हेरॉइन पाकिस्तान, आखाती देशांच्या मार्गे येत असल्यामुळे समुद्र अथवा विमान मार्गे मुंबई व पश्चिमेकडील किनारपट्टी भागात उतरवले जाते. राजस्थानातूनही राज्यात हेरॉइनची तस्करी होते.

केटामाईन, एम्फेटामाईन

रासायनिक अमली पदार्थांपैकी केटामाईन व एम्फेटामाईन यांची निर्मिती भारतीय तस्कर करत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये केटामाईन तर दक्षिणेकडे एम्फेटामाईनची निर्मिती होते. केटामाईन कॅनडा व अमेरिकेत पाठवले जाते. त्यात प्रतिबंधित संघटनांचा सहभाग आहे. दुसरीकडे एम्फेटामाईनची ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंडसारख्या देशांमध्ये तस्करी केली जाते. भारतात या पदार्थांना फारशी मागणी नाही.

चरसची तस्करी घटली

फार वर्षांपासून राज्यामध्ये चरसची तस्करी होत आहे. काश्मिरी आणि डेहरादुनी असे दोन प्रकारचे चरस उपलब्ध असते. काश्मिरी चरस उच्च प्रतीचे असून त्याला जास्त मागणी आहे. त्यातही दोन प्रती आहेत. एकाला काला पत्थर आणि दुसऱ्याला काला साबण म्हणतात. डेहरादूनमधून येणाऱ्या चरसला रबडी असा सांकेतिक शब्द आहे. पण गेल्या काही वर्षांत चरसच्या तस्करीत कमालीची घट झालेली दिसत आहे. एमडीमुळे चरसच्या सेवनात घट झाल्याचे अधिकारी, यातील जाणकार सांगतात.

एलएसडी पार्टी ड्रग्स

रेव्ह पार्ट्यांमध्ये एलएसडीला मागणी असते. कारण एलएसडीच्या सेवनानंतर काही तासांनंतर रक्तात त्याचा अंश सापडत नाही. एलएसडी अॅसिड पेपर पार्टी ड्रग्स म्हणून ओळखला जातो. त्यात हाय इंटेसिटिव्ही, नॉर्मल आणि लो इंटेसिटिव्ही हे तीन प्रकार मिळतात. मोठ्या पार्ट्यांमध्ये त्याला खूप मागणी असते.

आंतरराष्ट्रीय टपालातून येणारा वीड

परदेशातून गांजावर रासायनिक प्रक्रिया करून तयार केला जाणारा उच्च प्रतीचा गांजा वीड म्हणून प्रचलित आहे. डार्कनेटवरून कुट चलनाद्वारे त्याची खरेदी केली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कुरिअर अथवा टपालाद्वारे वीड भारतात पाठवला जातो. गेल्या काही वर्षांत केंद्रीय यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात असा गांजा जप्त केला आहे.

नक्षलग्रस्त परिसरात गांजाची शेती

देशातील नक्षलग्रस्त भागांत गांजाची निर्मिती केली जाते. त्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये त्यांची विक्री करण्यात येते. पुणे आणि मुंबई गांजा विक्रीचे प्रमुख केंद्र झाले आहे. रस्ते मार्गाने गांजा मुंबई व पुण्यातून आणला जातो. गांजाला घास, मेथी असे सांकेतिक शब्द आहेत.

नागाच्या विषाचा वापर

नशेसाठी नागाचे विषही वापरले जाते. एका मडक्यात नागाची पिल्ले ठेवली जातात. त्यानंतर सेवनकर्ता छोट्या छिद्रातून मडक्यात जीभ घातलो. पिल्लांनी दंश केल्यावर काही प्रमाणत त्याचे विष शरीरात भिनते. हा प्रकार खूप घातक आहे. आणखी एका प्रकारात नशेसाठी सापाचे विष काढले जाते. त्यानंतर, या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी ते इतर घटकांमध्ये मिसळले जाते. जेणेकरून ते शरीराला घातक ठरू नये. अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थांपेक्षा सापाचे विष अधिक प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

मॅजिक मशरुम

तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी रासायनिक पदार्थांसह परदेशातील पारंपरिक पदार्थ भारतात आले आहेत. त्यात अळंबीच्या एका प्रजातीचा म्हणजेच मॅजिक मशरूम्सचाही समावेश आहे. दक्षिण अमेरिका, मेक्सिको व इंडोनेशियात प्रचलित असलेले हे प्रतिबंधित मशरूम बाळगणाऱ्या एका डिस्क जॉकीला नुकतीच अटक करण्यात आली होती. भाजीच्या अळंबीपेक्षा याची चव थोडी कडू लागते. त्यामुळे इतर खाद्यापदार्थ अथवा चॉकलेट सिरप त्यावर टाकून त्याचे सेवन केले जाते. त्याची नशा आठ तास राहते. रासायनिक पदार्थांपेक्षाही ती जास्त काळ राहते. अळंबीच्या दोन हजार जातींपैकी १४४ जातींमध्ये नशा देणारा घटक असतो. पूर्वी अमेरिकेत प्रचलित असलेल्या या पदार्थाची काही वर्षात पूर्व आशियातही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. अमेरिका, युरोपीय देश, कॅनडा यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मॅजिक मशरूमवर बंदी आणली आहे. भारतात त्यावर बंदी नाही, पण त्यातील नशेच्या घटकांवर बंदी आहे.

तरुणाईला स्पाईसचे वेड

युरोपात अनेक तरुण-तरुणींना आपल्या विळख्यात ओढल्यानंतर सध्या स्पाईस नावाचा पदार्थ राज्यात प्रचलित झाला आहे. गांजावर विशिष्ट रसायनिक प्रक्रिया करून हा पदार्थ तयार केला जातो. कृत्रिम गांजा असलेला हा पदार्थ वैद्याकीय चाचणीत सापडत नसल्यामुळे तरुण त्याच्या अधिक आहारी गेले आहेत. पोलिसांकडे सध्या याबाबत एकही गुन्हा दाखल नसला, तरी त्याचे सेवन करणारे तरुण-तरुणी वैद्याकीय उपचारासाठी तज्ज्ञांकडे येत आहेत. स्पाईस, के टू, ब्लॅक मांबा, ब्लॅक झोंबी या नावाने प्रचलित असलेले हे पदार्थ युरोपीय देशांत फार प्रचलित झाले होते. काही महिन्यांपूर्वी एका सनदी अधिकाऱ्याची मुलगी या पदार्थाच्या आहारी गेली होती. तिच्या आईला संशय येऊन आईने विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची नशा करत नसल्याचे तरुणीने सांगितले. पण, मुलीची वागणूक संशयास्पद असल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत मुलगी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची लक्षणे आढळली. मात्र, तिच्या चाचण्यांमध्ये अमली पदार्थांचे अंश सापडले नाहीत. अनेक वेळा त्या मुलीची तपासणी करण्यात आली. पण, काहीच सापडले नाही. समुपदेशनानंतर स्पाईस ड्रग्ज घेत असल्याची कबुली तिने दिली. भायखळा येथेही एका तरुणीला तिच्या कुटुंबीयांनी नशा सोडवण्यासाठी दाखल केले. ती मुलगीही स्पाईसच्या आहारी गेली होती.

स्पाईस हा गांजासारखा पण अधिक प्रभावी पदार्थ आहे. त्याचे दुष्परिणाम फार भयानक आहेत. त्याच्या अतिसेवनामुळे माणूस निर्जीव वस्तूसारखा पडून राहतो. त्याचे मानसिक संतुलन बिघडते. चाचणीत त्याचा कोणताही अंश सापडत नसल्यामुळे गांजा सेवन करणारे अनेक जण याला आहारी जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

झोंबी ड्रग फ्लॅक्का

सर्वात भयानक ड्रग म्हणून प्रचलित असलेला फ्लॅक्का हा पदार्थ झोंबी ड्रग्स म्हणूनही प्रचलित आहे. त्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तीचे भान हरपते, ती आक्रमक होते म्हणून त्याला झोंबी ड्रग्स म्हणतात. फ्लॅक्काचे रासायनिक नाव अल्फा-पीव्हीपी आहे. पावडर किंवा गोळ्यांच्या स्वरूपात ते मिळते. धूम्रपान किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून ते घेतले जाते. काही देशांत त्याच्यावर समाज माध्यमांचे संकेतचिन्ह असते. त्यामुळे हा पदार्थ समाजमाध्यमांच्या नावेही ओळखला जातो. याचे सेवन केलेल्या अनेक तरुणांना त्या सेवनानंतर रुग्णालयात भरती करावे लागले होते. झोंबीचेे सेवन करणाऱ्या व्यक्तीला त्या वेळेपुरती प्रचंड शक्ती मिळाल्याचा भास होतो. हा अमली पदार्थ डार्कनेटच्या माध्यमातून सहज मिळतो.

anish.patil@expressindia.com