हरिहर कुंभोजकर
भारतात मध्ययुगात जे लोक बाहेरून आले त्यांनी, येथील समाजाच्या धर्माचे त्यांना प्रथमदर्शनी जे आकलन झाले त्यावरून, इथल्या लोकांच्या धर्माला त्यांनी हिंदू म्हटले. सिंधू नदीच्या पलीकडच्या लोकांचा धर्म हिंदू. या धर्माची योग्य व्याख्या करायची असेल तर अन्य धर्मीय येथे येण्यापूर्वी येथील लोक आपल्या धर्माची व्याख्या कशी करत होते ते पाहावे लागेल. अशी व्याख्या, सुदैवाने महाभारतात सापडते. ती महाभारतातील वनपर्वातील अध्याय ३१२-१३ मध्ये येते.
श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना:।
नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम् ।।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् ।
महाजनो येन गत: स पंथ:।।
वेद अनेक आहेत. स्मृती अनेक आहेत. ज्याचे वचन प्रमाण मानावे असा कोणी एकच एक मुनी नाही. धर्माचे तत्त्व गुहेत लपलेले आहे. (गुहेत ध्यान-धारणा किंवा चिंतन करून धर्म-तत्त्व स्वतः जाणून घ्यायचे असते.) महाजन ज्या मार्गानी गेले तो (धर्म)पंथ.
ध्यान करण्यासाठी गुहेत जाण्याचीही आवश्यकता नाही. “ठायींच बैसोनि करा एक-चित्त” असे तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे हिंदुधर्माची पुढीलप्रमाणे व्याख्या करतो :हिंदुधर्माची व्याख्या : जो कोणत्याही विविक्षित ग्रंथाला अथवा ग्रंथसमूहाला एकमेव आणि सार्वकालिक प्रमाण मानत नाही, जो कोणात्याही व्यक्तीला शेवटचा प्रेषित मानत नाही, जो स्वतःच्या चिंतनातून योग्य वाटलेल्या विचारानुसारच आचरण करतो त्याचा धर्म हिंदू.
भगवान बुद्ध, महावीर, शंकराचार्य, नानक, बसवेश्वर, इत्यादी महाजन ज्या मार्गानी गेले त्या मार्गांचे पंथ झाले.
मी ‘हिंदू’च्या वरील व्याख्येला व्यासप्रणीत व्याख्या म्हणतो. ही व्याख्या बऱ्याच, किंबहुना, सर्वच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देते. टिळक, सावरकर आणि भारतीय राज्यघटना यांच्या व्याख्येप्रमाणे जे हिंदू होतात ते या व्याख्येप्रमाणेही हिंदूच राहतात. ही व्याख्या पूर्णपणे इहवादी आहे. ती कोणत्याही परातत्त्वाला आवाहन करत नाही. ती स्थलकालनिरपेक्ष आहे. त्यामुळे “ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।” असा सल्ला देणारा आणि ‘तत्त्वमसि।’ अशी ग्वाही देणारा दोघेही हिंदू असू शकतात. हे अगदी शक्य आहे की, मी जो माझा मार्ग शोधला आहे तो आधी कोणीतरी सांगितला असेल. माझा मार्ग शोधण्यात महाजनांच्या अनुभवांची, कदाचित, मला मदतही होऊ शकते. पण, तो मार्ग सांगणारा माणूस मोठा आहे म्हणून मी त्याच्या मागून जाणार नाही. तो विचार माझ्या मननातून, चिंतनातून आला आहे, मला तो मार्ग पटला म्हणून मी तो निवडला आहे. तो माझा मार्ग आहे. चिंतन ही प्रक्रिया असते, घटना नसते. चिंतनात कोणताही विचार अंतिम असत नाही. अधिक चिंतन केले, इतरांशी चर्चा केली, दुसरे ग्रंथ वाचले तर विचार बदलू शकतात. त्यामुळे हिंदुधर्मात सतत सुधारणा झालेल्या दिसतात. पाखंड (blasphemy) ही कल्पना हिंदुधर्मात नाही. येशू मसीहाला परमेश्वराचा पुत्र मानण्यास हिंदूची हरकत नसते. फक्त त्यालाच एकमेव पुत्र मानण्यास हरकत असते. हजरत पैगंबरांना ईश्वराचा प्रेषित मानण्यास त्याची हरकत नसते. फक्त त्यांना तो शेवटचा प्रेषित मानणार नाही. “शेख महंमद अविंध, परी त्याचे हृदयी गोविंद” ! केरळच्या हिंदू राजाला अरबस्तानातून आलेल्या व्यापाऱ्यांसाठी मशीद बांधून देण्यात आपण धर्म-कृत्य करतो असेच वाटते, कारण “नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम्” यावर त्याचा विश्वास असतो. वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता हे हिंदूंचे धर्म-ग्रंथ समजले जातात. पण ज्या अर्थाने बायबल अथवा कुराण हे धर्मग्रंथ आहेत त्या अर्थाने हे धर्मग्रंथ नाहीत. ते ईश्वराचे आदेश नाहीत. धर्मनिष्ठ हिंदू वेदांना अपौरुषेय मानतो. ते मानवनिर्मित नाहीत. पण ते ईश्वराचे शब्दही नाहीत. (यासंदर्भात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दिलेली विश्वकोशातील टिप्पणी पाहावी.) वेद हा शब्द विद् शब्दापासून येतो. विद् म्हणजे जाणणे. तुकाराम महाराज “वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची जाहला” असे आत्मविश्वासाने सांगतात आणि तरीही ते हिंदूंना वंद्यच राहतात. कारण ज्यांना जो अर्थ ‘दिसला’ तो त्यांच्यासाठी खरा असतो. यासाठी हिंदूंच्या धर्मग्रंथाना दर्शने म्हटले आहे, ईश्वराच्या आज्ञा नाही. वेदप्रामाण्य इतपतच आहे. सर्व गीता सांगून झाल्यावर कृष्ण अर्जुनाला विचारतो “तुझे सर्व संशय फिटले?” अर्जुनाने होय म्हटल्यावर कृष्ण म्हणतो, “यथेच्छसि तथा कुरु।”- आता तुला योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घे. कृष्णाने कोणतीही ‘कमांडमेंट’ दिलेली नाही. हिंदू परंपरा गीतेला सर्व उपनिषदांचे सार समजते. तीच गोष्ट इतर पंथांची आहे. भगवान बुद्धांचा निर्वाणकाळ जवळ आला तेव्हा त्यांचा शिष्योत्तम आनंद बुद्धांच्या निर्वाणानंतर आपण मार्गदर्शनासाठी कुणाकडे पाहायचे या विचाराने व्याकुळ होतो. त्या वेळी बुद्ध म्हणतात, “अप्प दीपो भव।” स्वतःच स्वतःचा मार्गदीप हो. मी सांगितलेल्या मार्गाने जा असे बुद्ध सांगत नाहीत. जैनांचा अनेकांतवाद सत्याला अनेक पैलू असतात असेच सांगतो. आदिशंकराचार्य परापूजा स्तोत्रात म्हणतात, आपले नेहमीचे काम ईश्वराचे काम आहे असे स्मरून वागणे म्हणजे ईश्वराची पूजा. (यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम् ।) हा विचार सर्वसामान्य हिंदूपर्यंत पोहोचलेला आहे. “कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी।” असे संत सावता माळी म्हणतो. पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत असतो. या त्याच्या उपासनेने प्रसन्न होऊन “पुंडलिकाचे भेटी परब्रह्म” येते. संत कबिराचे पुढील दोहे आदिशंकराचार्यांच्या परापूजेच्या शेवटच्या श्लोकाचे अर्थानुवादच आहेत.
जहं जहं डोलौं सो परिकरमा जो कुछु करौं सो सेवा ।
जब सोवौं तब करौं दंडवत,पूजौं और न देवा ॥
कहौं सो नाम सुनौं सो सुमिरन खावं पियौं सो पूजा ।
(जिथे, जिथे मी जाईन (डोलू) ती माझी परिक्रमा, जे काही कर्म मी करीन ती तुझी सेवा; जेव्हा मी झोपी जाईन तेव्हा तुला दंडवत; आणखी कोणतीही पूजा मी करत नाही. जे बोलतो तो तुझा जप; जे ऐकतो ते तुझे स्मरण; मी खातो, पितो त्या वेळी मी तुझीच पूजा करत असतो.)
इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. गोष्ट गमतीदार आहे; पण ती बरेच काही सांगून जाते. साठच्या दशकाच्या मध्यावर इंडोनेशियात साम्यवाद्यांविरुद्ध प्रतिक्रांती झाली. नव्या लष्करशहाने प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म कोणता आहे हे शासनाला सांगणे गरजेचे केले. त्या वेळी कित्येक साम्यवाद्यांनी आपला धर्म हिंदू असल्याचे जाहीर केले होते. कारण कोणतेही औपचारिक धार्मिक कृत्य न करता माणूस हिंदुधर्मात राहू शकतो. आपल्या धर्माचा शोध तो आपणच घेत असतो.
मध्ययुगानंतर युरोप आणि मध्य-आशियातून आलेल्या अन्य धर्मीयांच्या धर्मसंकल्पनेच्या पूर्णपणे विरोधात हा धर्म-विचार जातो. त्यामुळे त्यांच्या चष्म्यातून हिंदुधर्माची व्याख्या करताना अडचण येते.