श्रद्धा कुंभोजकर
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात जिथे मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडेवाडयाच्या जागी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. या स्मारकात फुले दाम्पत्याच्या माणसावरच्या निर्वैर प्रेमाचं खरं रूप प्रतिबिंबित व्हावं, म्हणून काय करता येईल, याविषयी..
‘‘..एक वेडेंवांकडे चमत्कारिक पत्र अण्णासाहेबांच्या नांवावर आलें..पत्रांतला सर्व मजकूर मला उद्देशून होता. हें पत्र कोणीं लिहिलें असावें याची कल्पना मुळींच करवत नाहीं. आंत ‘धर्मरक्षक’ अशी सही केली आहे.. पत्र लिहिणाराच्या सूचनेप्रमाणें मी न वागल्यास मला मारण्याचा त्याचा विचार आहे.. पण असो. मला त्याबद्दल भीती बाळगण्यास नको. सर्वांचा पाठीराखा परमेश्वर माझ्याजवळ असतां विनाकारण मला इजा करण्यास कोण समर्थ होणार आहे?’’
आवडाबाई भिडे (१८६९-१८८८) हिनं तिच्या लहानशा आयुष्यात लिहिलेल्या दैनंदिनीमधली ही नोंद आहे. वयाच्या सतराव्या वर्षी वैधव्य आलेल्या आवडाबाईला पुण्यात शिकत असताना किती सामाजिक दबावाचा सामना करावा लागत होता आणि तरीही तिचं धैर्य किती अविचल होतं, याची कल्पना या नोंदीवरून येते. समाजात बदल घडवणं, स्त्री-शूद्रांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणं या गोष्टींमुळे चिडलेल्या कर्मठांनी जोतिरावांवर मारेकरी घातले होते. त्याच कारणासाठी अनेक वर्षांनी आवडाबाईलाही अशी धमकी आली होती.
हेही वाचा >>> काश्मीरविषयक निकालात खुपण्यासारखे काय?
आवडाबाईचे वडील रावबहादूर विष्णू मोरेश्वर भिडे इंग्रजी राज्य असूनही मोठया हुद्दयावर काम करणाऱ्या थोडया ‘नेटिवां’पैकी एक होते. रत्नागिरी जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर, फर्स्ट क्लास सबजज्ज अशा पदांवर त्यांनी काम केलं होतं. सुधारणा आणि स्त्रीशिक्षणाबद्दल त्यांना तरुणपणापासूनच आपुलकी होती. १८५२ मध्ये मुंबई इलाक्याचा गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड याला जोतिराव फुले यांनी जो अर्ज केला होता, त्यावर केशव शिवराम जोशी, बापू रावजी मांडे, अण्णा सहस्रबुद्धे, जगन्नाथ सदाशिवजी आणि जोतिराव फुले यांच्याबरोबरीने पुण्यातल्या मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापन मंडळीचे सदस्य म्हणून भिडे यांची सही होती. कालांतरानं जोतिरावांनी चालवलेल्या अस्पृश्यांच्या शाळेत शिक्षक म्हणूनही विष्णू मोरेश्वर आणि रामचंद्र मोरेश्वर अशी नावं दिसतात.
मात्र हे भिडे आणि मुलींची शाळा सुरू करण्यासाठी १८४८ मध्ये बुधवार पेठेत ज्यांनी जागा दिली ते भिडे एकच नाहीत. बुधवार पेठेत (आजच्या फरासखाना पोलीस चौकीच्या आवारात) विश्राम रामजी घोले यांनी आपल्या लेकीच्या स्मरणार्थ उभारलेला बाहुलीचा हौद आहे. घोले यांच्या वाडयासमोर शंकरराव भिडे यांचा वाडा होता. त्यांनी किंवा त्यांचे दत्तक पुत्र रामचंद्र यांनी मुलींच्या शाळेसाठी पहिल्या मजल्यावर दोन खोल्यांची जागा उपलब्ध करून दिली होती आणि याच वाडयात दयानंद सरस्वतींची मिरवणूक संपल्यावर सभाही झाली होती. जोतिराव आणि सावित्रीबाई असे दोघंही याच शाळेत शिकवत असत, असा उल्लेख ‘सुबोध पत्रिके’सारख्या समकालीन वृत्तपत्रात आला आहे.
भिडेवाडयाची जीर्ण वास्तू इतिहासजमा करून तिथे आता स्त्री-शूद्रांच्या शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या विचारांचं स्मारक होईल अशी अपेक्षा आहे. या स्मारकातून आपल्याला नक्की कशाची आठवण जतन करायची आहे याबाबत स्पष्टता असायला हवी. समाजाच्या सर्व जातवर्गामधून आलेल्या माणसांनी आपापलं योगदान देऊन सत्यशोधनाचा आणि सार्वत्रिक शिक्षणाचा सुधारणावादी विचार अंगीकारला होता हे या स्मारकातून व्यक्त होणं गरजेचं आहे.
हेही वाचा >>> सांस्कृतिक सपाटीकरणाला विरोध!
‘धर्मरक्षक’ अथवा इतर नावांनी वावरणाऱ्यांनी गेली दीडशे वर्ष सत्यशोधक विचारांची एक विपरीत प्रतिमा समाजात रुजवण्याचे प्रयत्न केले आहेत. १८८४ मध्ये अलिबागमधून प्रकाशित झालेल्या ‘ब्रह्मद्वेष’ नावाच्या पुस्तिकेमध्ये सत्यशोधक विचारांवर यथेच्छ टीका करून ‘‘ब्रह्मद्वेष हा कोणत्याही देशात व कोणत्याही काळी श्रेयस्कर होणार नाही,’’ असं म्हटलं आहे. ‘‘साखरिलबाचे बीजापासून तज्जातीय झाड होणे जितके संभवनीय व सुलभ आहे तितकें इडीला मसाला घालून होणार नाही. हाच प्रकार जाती संबंधाने.’’ ईडिलबू आणि साखरिलबाच्या उदाहरणावरून गुणवत्तेच्या पदराआड लपून जातीच्या उतरंडीला योग्य ठरवण्याचा हा प्रयत्न एकमेव नव्हता. हेतू हा की, सत्यशोधक विचारांची बदनामी करायची आणि ‘ब्रह्मद्वेष’ नावाची काल्पनिक आपत्ती निर्माण करून तिचं खापर जोतिरावांवर फोडायचं.
अशा विपरीत मांडणीपायी सुधारणावादी विचारांना जातींच्या कुंपणात अडकवलं गेलं. सर्वच जातींची माणसं सत्यशोधक मार्गाने किंवा अन्य मार्गानी सुधारणेसाठी झटत होती, हे सत्य लपवलं गेलं. साधं जोतिरावांनी सुरू केलेल्या शाळांसंबंधीची कागदपत्रं जरी पाहिली तरी १८५७च्या कॅप्टन लेस्टर या शाळानिरीक्षकाच्या अहवालानुसार कुणबी, मोहमदी आणि अस्पृश्य मानलेल्या जातींमधल्या गुणवंत मुलांची आणि गरीब मुलांचीही शिष्यवृत्तीसाठी शिफारस केलेली दिसते. आजच्या समाजासमोर जोवर आपण या सगळया जातवर्गासाठी झटणाऱ्या जोतिराव आणि सावित्रीबाईंचं चित्र स्पष्टपणे चितारत नाही, तोवर काही विशिष्ट जातींसाठीच फुले दाम्पत्यानं काम केलं असा समज बळावतो. किंबहुना एकूणच सुधारणा ही धर्मविरोधी आणि पारंपरिक व्यवस्थेत उच्च मानलेल्या जातींच्या द्वेषावर उभारलेली होती असा गैरसमज जोपासला गेला. त्यामुळेच आवडाबाईचं शिक्षण धर्माविरुद्ध आहे असं ‘धर्मरक्षक’ मानत होता.
प्रत्यक्षात फुले दाम्पत्य, सत्यशोधक समाज आणि एकूणच समाजाच्या सुधारणेसाठी काम करणाऱ्या माणसांनी इथल्या सगळया उच्चजातवर्गीयांशी उभा दावा मुळीच मांडला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याकडे लक्ष वेधणारे, अस्पृश्य मानलेल्या जातीतल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही आपल्या शाळेत घेणारे, ब्राह्मण विधवांच्या बाळांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह काढणारे जोतिराव आणि सावित्रीबाई फुले हे द्वेषाचं नाही, तर प्रेमाचं मूर्त रूप म्हणावं लागेल. भिडेवाडयात होणाऱ्या स्मारकाच्या निमित्तानं त्यांची सर्वसमावेशक प्रतिमा आजच्या समाजासमोर ठेवून त्या काळाचा एक प्रातिनिधिक तुकडा लोकांपुढं मांडणं आवश्यक वाटतं.
यासाठी महात्मा फुले समग्र वाङ्मयात महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेल्या शाळांसंबंधीच्या कागदपत्रांचा उत्तम उपयोग करून घेता येईल. या शाळांच्या देणगीदारांची नावं, त्यातील विद्यार्थी शिकत असलेल्या अभ्यासक्रमातली पुस्तकं, दर वर्गाच्या शिक्षकांची नावं, शिष्यवृत्तीसाठी शिफारस केलेली नावं अशा सर्व गोष्टींची माहिती या स्मारकात इंग्रजी आणि मराठीत दृश्य स्वरूपात असायला हवी. त्या काळातल्या समाजापुढच्या अज्ञान आणि विषमतेसारख्या समस्यांचं ठोकळेबाजपणे नव्हे तर सहृदयपणे केलेलं चित्रण असावं, यासाठी आवडाबाई भिडे, काशीबाई घोले अशा मुलींच्या गोष्टी दाखवता येतील. मुक्ता साळवेंच्या निबंधातले उतारे तिथे देता येतील. आचार्य अत्रेंनी महात्मा फुलेंवर काढलेल्या नितांतसुंदर चित्रपटातले तुकडे विविध दालनांत दिसायला हवेत. फुले दाम्पत्यानं उच्चजातीय स्त्रियांसाठी सुरू केलेलं बालहत्याप्रतिबंधक गृह, मध्यमजातींतील लोकांना शेती आणि व्यावहारिक बाबतींत दिलेला सल्ला, शूद्र आणि अस्पृश्य मानलेल्या माणसांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून त्यांनी घेतलेले कष्ट दिसायला हवेत. इंग्रजी साम्राज्यातले अधिकारी असूनही इथल्या स्त्री-शूद्रांच्या शिक्षणाची तळमळ असणाऱ्या इंग्रज आणि भारतीय अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या मेमसाहिबांनी, मिशनऱ्यांनी या शाळांना केलेली मदतही स्पष्ट दिसायला हवी.
हे स्मारक पाहणाऱ्या आजच्या काळातल्या माणसाला जेव्हा या कहाणीचे हे पैलू समजतील, तेव्हाच फुले दाम्पत्याच्या माणसावरच्या निर्वैर प्रेमाचं खरं रूप त्यांच्या मनाच्या तळापर्यंत पोहोचेल. ‘धर्मरक्षक’ असल्याचा खोटा आव आणून समाजाची सुधारणा रोखू पाहणाऱ्यांची भीती बाळगू नये हे समजावण्यासाठी भिडेवाडा स्मारक ही उत्तम संधी आहे. जोतिराव-सावित्रीबाईंनी समाजाच्या सर्व जातीवर्गामधल्या लोकांना सोबत घेऊन स्त्रीशिक्षण आणि सुधारणेचा मार्ग प्रशस्त केला हे या स्मारकातून दिसायला हवं.
shraddhakumbhojkar@gmail.com