उल्हास चोगले
भारताचा ‘राष्ट्रीय टपाल दिवस’ ९ ऑक्टोबर रोजी असतो आणि या दिवसापासून सुरू होणाऱ्या ‘राष्ट्रीय टपाल सप्ताहा’चा एक भाग म्हणून, १३ ऑक्टोबर रोजी आपण ‘राष्ट्रीय टपाल टिकट दिन’ पाळतो. या दिवशी टपाल तिकिटे (स्टॅम्प) आणि इतर टपाल तिकीट आधारित (फिलॅटेलिक) उत्पादनांवरील संग्रह, विविध संशोधन या क्रियांना मानसन्मानित केले जाते.
टपाल तिकिटाची कल्पना पहिल्यांदा मांडली गेली, त्याला नुकतीच १८५ वर्षे पूर्ण झाली. १३ फेब्रुवारी १८३७ रोजी ब्रिटनच्या पोस्ट ऑफिस चौकशी आयोगासमोर, सर रोलँड हिल यांनी ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांना फक्त छोट्या कागदाचा वापर आणि मागील बाजूस चिकट डिंक लावून करण्याची सशुल्क पोस्टेजची योजना सांगितली. आयोगाने ही कल्पना तत्त्वतः मान्य केली. या सुधारणेच्या परिणामी ६ मे १८४० रोजी एका बाजूला डिंक आणि दुसऱ्या बाजूला राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेले टपाल तिकीट पोस्ट ऑफिसच्या खिडकीवर पहिल्यांदा विकले गेले. इंग्लंड मध्ये या टपाल तिकिटांचा वापर करण्यास मिळालेल्या जनतेचा प्रतीसाद पाहून जगातील इतर देशांनीदेखील अशी टपाल तिकिटे वितरित करून आपापल्या देशांतील टपाल सेवा सुविहीत केली. सुरुवातीस सर्व देशांनी (इंग्लंड प्रमाणे) आपापल्या देशांच्या राजे अथवा राण्यांची छबी असलेली टपाल तिकिटे छापली. नंतर टपालाच्या वजनानुसार लागणाऱ्या वेगवेगळ्या मूल्यांच्या तिकिटांवर इतर म्हणजे आपल्या दिवंगत नेत्यांची, देशातील वन्य पशुपक्षांची इत्यादी चित्रे छापण्यास सुरुवात केली. याची परिणती अशा रंगीबेरंगी चित्र असलेल्या टपाल तिकिटांचा संग्रह करण्याकडे झाली. सग्राहक आपल्या आवडीचा विषय असलेल्या टपाल तिकिटांचा शोध घेऊ लागले त्यामुळे टपाल तिकिटांचा खप वाढू लागला. (मीदेखील अशाच भावनेने टपाल तिकिटांचा संग्रह करण्यास सुरुवात केली व अजूनही करत आहे)
हेही वाचा : चिंतनधारा: संतांच्या अनुयायांकडून जनतेची लूट?
विसाव्या शतकात टेलिफोनचा शोध लागला, संपर्कासाठी सुलभ व जलद सेवा उपलब्ध झाली. त्याचा काहीसा विपरीत परिणाम टपाल सेवेवर झाला व दूरान्वयाने टपाल तिकिटांच्या गरजेवर झाला. टपाल हशील भरल्याचा पुरावा म्हणून तिकीट लावण्याचा उद्देश तेव्हा मागे पडला. टपाल प्रशासनाने टपाल हशील नियंत्रित करण्याचे इतर अनेक मार्ग आता चोखळले आहेत. टपाल तिकिटांची परंपरा अर्थातच आजही- मोबाइल आणि ईमेल/ व्हॉट्सॲपसदृश तात्काळ संदेशवहनाच्या काळातसुद्धा- जिवंत राहिली आहे, याचे कारण टपाल तिकिटांना असलेल्या संग्रहमूल्यामुळे त्यातून होणारी कमाई आणि महत्त्वाचे म्हणजे, या वैविध्यपूर्ण टपाल तिकिटांतून दिले जाणारे संदेश! ईमेल वगैरेमुळे पत्र पाठवण्याची गरज मागे पडली हे खरेच, पण याच काळात प्रगत झालेले आधुनिक मुद्रण तंत्रज्ञान दृश्य प्रभाव निर्माण करण्यास मदत करते, त्यामुळे संदेश अधिक प्रभावीपणे प्रेषित केला जातो. त्यामुळेच ही परंपरा चालू रहावी म्हणून जागतिक टपाल संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टपाल तिकीटे आकर्षक करण्याचे उद्दिष्ट ठरवले.
हेही वाचा : अग्रलेख:‘बिबीं’चा ‘पुलवामा’
या आधुनिक तंत्रामुळे टपाल-तिकीट संग्रहाच्या (फिलॅटेली) क्षेत्राची आजही भरभराट होते आहे, नावीन्यपूर्ण टपाल तिकिटे येऊ लागली आहेत आणि येतच राहातील. टपाल तिकीट हा एक ‘कागदाचा तुकडा’ आहे असा जनसामान्यांचा दृष्टिकोनही आता बदलतो आहे. टपाल तिकीट छापण्यासाठी कागद हा एकमेव पर्याय न ठेवता विविध साहित्य वापरले जात आहे. जसे की कापड, (उदा: भारतीय टपाल खात्याने वितरीत केलेले खादीच्या कापडावर छापलेले महात्मा गांधींचे टपाल तिकीट). तसेच लाकडाची पातळ चिपाटी वगैरे. दुसरे असे की टपाल तिकिटाच्या डिझाइनमध्ये समाविष्ट केलेल्या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा पूर्ण फायदा घेता येतो. त्यासाठी सध्याची उपलब्ध तंत्रे पुढील प्रमाणे आहेत : ‘क्यूआर कोड’च्या साह्याने आभासी चित्रदर्शन, प्रतिमा ओळख, होलोग्राम, संग्रहित एकाधिक प्रतिमा आणि लेन्टिक्युलर (थ्रीडी/ चलत्) प्रतिमा.
होलोग्राम हे आता अन्यत्रही वापरले जातात, परंतु टपाल तिकिटांसाठी त्यापुढले तंत्रज्ञान – उदाहरणार्थ विशेष शाई (थर्मो क्रोमिक, ग्लो इफेक्ट, मेटॅलिक इफेक्ट), वार्निश, एम्बॉसिंग इत्यादी आज चलनात आहे. तुम्हाला टपाल तिकीट नुसते दिसणार नाही तर ते स्पर्शानेही अनुभवता येईल यासाठी फ्लॉक्ड पेपर स्टॅम्प्स (जे मउसूत फर, लोकर, त्वचा किंवा फुलांच्या पाकळ्यांच्या नाजूक पोत यांचा प्रभाव निर्माण करतात) अनेक देशांनी काढले आहेत. काही वेळा तिकीट तयार करण्यासाठी फक्त शाई पुरेशी नसते. तर त्यावर लावलेली सामुग्री तिकीटावर स्पर्शात्मक प्रभाव निर्माण करून संदेश पोहोचविण्यात मदत करते. ‘स्टॅम्प डिझायनर’चे महत्त्व आजही अबाधित आहे, नव्हे ते वाढलेच आणि ही डिझायनर मंडळी अधिकाधिक प्रयोगशील झाली आहेत.
हेही वाचा : व्यक्तिवेध: अॅन राइट
या सृजनशीलतेचा आविष्कार म्हणजे ‘टपाल तिकिटांचा सुगंध यावा’, ही कल्पना भारतातही प्रत्यक्षात आली आहे. (उदा.- भारतीय टपाल खात्याने वितरीत केलेली चंदन, कॉफी, गुलाब, जुही ही सुगंधित तिकिटे). टपाल तिकिटामध्ये चित्रित केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव हे तिकीट हाताळणाऱ्या व्यक्तीला यावा यासाठी डिझाइनर मंडळी आता झाडाचे बियाणे, टेनिस कोर्ट वरील माती किंवा वाळवंटातील वाळू, ज्वालामुखीची राख इ. अशा साहित्यांचा वापर करत आहेत. मुबलक संख्येने तिकिटांची छपाई होत असल्यामुळे संग्राहकाला अशा विशेष साहित्यासाठी तुलनेने फारच कमी रक्कम मोजावी लागते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्टॅम्प डिझायनर नवनवे संदेश, भावना आणि सर्जनशीलता टपाल तिकिटामध्ये अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यात मदत करतात. तिकिटाच्या आकारातही कल्पनेच्या भराऱ्या दिसतात, उदाहरणार्थ: फुलपाखराच्या आकाराचे, झाडाच्या आकाराचे, भौमितिक आकाराचे वगैरे.
हेही वाचा : आरोग्याचे डोही:अडकलेली रेकॉर्ड
आज अनेक संग्राहकांकडे रेझीन पासून बनविलेली टपाल तिकिटे आहेत, थर्मोग्राफीद्वारे पोतनिर्मिती (टेक्स्चर) केलेली आहेत, प्लास्टिककोटेड टपाल तिकिटे तर आहेतच पण प्लॅटिनम, सोने, चांदी, गन मेटलच्या फॉइलवर छापलेली तिकिटेसुद्धा आहेत. एम्बॉस्ड स्टॅम्प, ब्रेल स्टॅम्प, विनाइल रेकॉर्ड स्टॅम्प, ग्रामोफोनपासून सीडीप्लेअर पर्यंतच्या यंत्रांवर चालणारे ‘बोलणारे’ स्टॅम्प हे तर विसाव्या शतकाच्या अखेरच्या काही दशकांपासूनच आहेत. आता त्यांच्या जोडीला मल्टीमीडिया स्टॅम्प, किंवा इन्फ्रारेड रीडिंग सिस्टिम म्हणून काम करणारे खास पेन वापरणारे स्टॅम्प, ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) असलेले स्टॅम्प असेही प्रकार आले आहेत! या प्रकारातील टपाल तिकीट ‘ॲप’ किंवा क्यूआर कोडच्या साह्याने स्कॅन केल्यावर हाय डेफिनिशन फिल्म्स किंवा लपविलेल्या प्रतिमा दाखवतात, तिकिटावरील चित्र जिवंत होते. याचसारखी पण ‘ॲप’ किंवा संगणकीय साधनाची गरज नसलेला जादुई टपाल तिकिटे म्हणजे थर्मोक्रोमॅटिक शाईने छापलेले स्टॅम्प, जे स्पर्शाने गरम झाल्यावर, प्रतिमा किंवा शब्द प्रकट करतात.
हेही वाचा : लालकिल्ला: दिल्लीपुढे मान तुकवण्याची परंपरा..
तंत्रज्ञान प्रगत झाले, पण त्याचे सार्वत्रिकीकरण झाल्यामुळे नक्कल करणेही पूर्वीपेक्षा सोपे झाले- त्यामुळेच टपाल तिकीट छापताना सुरक्षा ही नेहमीच एक प्रमुख चिंता असते. परंतु होलोग्राम, यूव्हीलाईट मध्ये प्रकाशित होणारी शाई, मायक्रो- प्रिंटिंग वगैरे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही चिंता मिटवली जाते आहे. आज टपाल तिकिटे बोलताहेत, सुगंध देताहेत, स्पर्शातून जाणीवही देऊ लागली आहेत… नव्या पिढीच्या संग्राहकांना अशा नावीन्य पूर्ण टपाल तिकिटांचा संग्रह करणे हे एक आव्हानच आहे.
(लेखात नमूद केलेली सर्व प्रकारची तिकिटे लेखकाच्या संग्रही आहेत, त्यांचे प्रदर्शनही लेखकाने भरवले होते.)