बापू राऊत

देशातील महत्त्वाच्या घटनांचे कालक्रमानुसार तथ्यात्मक वर्णन व तिचे स्पष्टीकरण म्हणजे इतिहास होय. इतिहास हा कल्पनांचा बाजार नसतो, तर त्याची निर्भरता ही पुराव्यांवर आधारित असते. जिथे पुरावे नसतात तिथे ‘असे म्हटले जाते’, ‘अशी प्रथा आहे’ अशा वाक्यांनी पडदा टाकला जातो. असे कांगोरे इतिहासाच्या चौकटीत बसणारे नसतात. परंतु आपल्या देशात असेच चालत आले आहे. यालाच मिथके म्हणतात. या मिथकांना पुराव्यांची, प्रत्यक्ष चाचपणीची व सत्यस्थितीची गरज नसते.

National Institute of Nutrition, Dietary Guidelines,
‘योग्य तेच खा’ सांगणारे धोरण अपुरे…
voting compulsory, Citizens who do not vote, vote,
मतदान न करणाऱ्यांना शिक्षा हवीच! हक्क बजावणे बंधनकारकच…
mahavikas aghadi
‘संविधान बचाव’ आणि ‘गद्दारी’ कालबाह्य?
environmentally sustainable alternatives sustainable
पर्यावरणातील शाश्वत पर्याय खरोखरच शाश्वत आहेत का?
Women Founder of Religion Dominant Personality
स्त्रियांनी धर्म संस्थापक व्हावे…
dhangar reservation loksatta article
धनगर आरक्षणाच्या पल्याड…
Sri Lankan parliamentary election 2024
लेख : ‘एक असण्या’चा श्रीलंकेतला ‘अर्थ’
India relations with other countries considerations of national interest side effects
भारताचा शेजार-धर्म ‘खतरेमें’ असणे बरे नव्हे!
How to save society from perilous summation
घातक सुमारीकरणापासून समाजाला कसे वाचवायचे?

आपल्या देशात ‘इतिहासाचे पुनर्लेखन’ या नावाखाली शालेय अभ्यासक्रम बदलण्यात येत आहे. जुने न काढता त्यात अधिक भर घालणे समजण्यासारखे आहे. इतिहासाचे पुनर्लेखन याचा अर्थ आजपर्यंत शिकविला जाणारा इतिहास खोटा होता का? नवी उत्खनने, स्मारके, अभिलेख व शिक्के अशी जुनी तथ्यात्मक साधने सापडल्यास त्यांची इतिहासात भर घालून इतिहास अधिक समृद्ध करता येतो. परंतु इतिहास मिटवून त्याचे पुनर्लेखन करता येत नाही. तसे झालेच तर अशा इतिहास पुनर्लेखनात काल्पनिक, असत्य घटनांचा अंतर्भाव करून आपल्या सोयीची मांडणी केली जाण्याचा धोका संभवतो.

इतिहासाचे लेखन करण्याची सुरुवात सुमेर (दक्षिण मेसोपोटेमिया) येथे इ.स.पूर्व ३१०० मध्ये झाली. भारतात कल्हणलिखित ‘राजतारांगिनी’च्या पूर्वार्धात ऐतिहासिक ग्रंथांचा अभाव दिसतो. ज्या काळात लेखनकलाच अवगत नव्हती, त्या काळाच्या आधारहीन घटनांना इतिहास म्हणून स्वीकारणे ही अयोग्यतेच्या शेऱ्यात मोडणारी बाब आहे. पाषाणकाळापासून इसवी सनपूर्व चौथ्या शताब्दीपर्यंत भारतात लेखनकला व तिच्या साधनांचा अभाव होता. भारतात सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा जसा उत्खननातून मिळतो, तसा आर्य संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दिसत नाही. बऱ्याच काळानंतर तो लिपिबद्ध केला गेल्यामुळे आर्य संस्कृतीचे पुरावे भूगर्भात दिसत नाहीत.

भारतातील प्राचीन अभिलेख हे दगडावर कोरलेले असून ते मुख्यत: ब्राह्मी व खरोष्ठी भाषेत आहेत. भारतात असे अभिलेख (शिलालेख, स्तंभलेख, गुहालेख इत्यादी) लिहिण्याची परंपरा सम्राट अशोकाच्या काळापासून सुरू झाली. एशिया माईनरच्या बोगाज कोई अभिलेखावरून (Bogaz-Koi inscription) इ.स.पूर्व १४०० च्या आसपास आर्यांचे क्षेत्र व वैदिक वेदाची माहिती मिळते. तसेच डेरीयसच्या (इ.स.पूर्व ५२२-४८६) नक्ष-ए-रुस्तम अभिलेखावरून आर्य पुढे सरकत उत्तर पंजाबमध्ये आल्याचे कळते. मिश्रमधील एल-अमरना येथे मिळालेल्या मातीच्या मोहोरांवर कोरलेल्या बॅबिलोनिया शासकांची नावे आणि आर्यांच्या नावांत साम्य दिसते. यावरून आर्यांच्या मूळ स्थानांचे अनुमान काढता येते.

राष्ट्रीय दृष्टिकोनातून इतिहास पुनर्लेखन हवे, असा हव्यास सध्या सुरू आहे. इतिहास हा केवळ राष्ट्रीय दृष्टिकोनातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातूनही विद्यार्थी व समाजापुढे मांडला पाहिजे. कारण हे स्पर्धेचे जग आहे, म्हणून इतिहास हा प्राचीन व अर्वाचीन स्थितीत शिकविला गेला पाहिजे. हे खरेही आहे की, इतिहास ही सत्य घटनेची परिभाषा असते; परंतु तथ्य व ऐतिहासिक साधनांशिवाय काही गोष्टींना इतिहास म्हणून बळजबरीने समाविष्ट करणे व खऱ्या ऐतिहासिक दस्तावेजांना बाहेर फेकून देणे हे इतिहासाच्या मापदंडात बसणारे नसते. खरा संघर्ष तो इथे आहे.

भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारतीय इतिहासकारांनी इतिहास लेखन केले. या इतिहास लेखनात साधने म्हणून ब्रिटिशांनी केलेले संशोधन (उत्खनन, सर्वेक्षण, अभिलेख, शिक्के) व पाश्चात्त्य देशांतून आलेले युनानी तथा रोमन लेखक, चिनी लेखक (इत्सिंग, फाह्यान, ह्यूनत्सांग) व अरब लेखक अल्बेरुनीसारख्या प्रवासी लेखकांच्या दस्तावेजांचा वापर झाला. याबरोबरच वैदिक, बौद्ध व जैन धार्मिक साहित्याचासुद्धा साधने म्हणून वापर झाला; परंतु या धर्माच्या साहित्यातील संपूर्ण लेखदर्शनाला इतिहास म्हणता येत नाही. कारण यात अतिरंजित, काल्पनिक व स्थितीवीरपेक्ष घटना आहेत. बौद्ध व जैन धर्माशी निगडित वास्तू जमिनीखालील उत्खननात सापडतात; परंतु वैदिक धर्मासंबंधी तसे कुठेही दिसत नाही. त्यामुळे वैदिक साहित्यापैकी काहींची निर्मिती आर्यांच्या मूळ वसतिस्थानी झाली असावी, तर उर्वरित साहित्य भारतप्रवेशानंतर लिहिले गेले असावे. काही वैदिक साहित्यात तर्काधित गोष्टी सापडत नसून त्या अतिरंजित, अवैज्ञानिक व विश्वास न बसण्यासारख्या काल्पनिक वाटतात.

ज्या राष्ट्रवादाच्या नावे इतिहासाचे पुनर्लेखन घडवून आणायचे आहे, तो राष्ट्रवाद धर्मसंकल्पनांवर आधारित व्यवस्था नसावी, तो दैवीपणाचे पुनरुज्जीवन करणारा नसावा. एकाच राष्ट्रात राहणाऱ्या अनेकविध लोकांच्या सांस्कृतिकरण प्रक्रियेतून समभावनेने एकमेकांत रमण्याची, सहजीवनाची आणि एकोपा कायम राखण्याची व्यवस्था म्हणजे राष्ट्रवाद होय. अशा राष्ट्रवादाचे प्रतिबिंब राष्ट्रीय शिक्षणात उमटले पाहिजे. ज्या राष्ट्रवादाच्या नावाखाली द्वेष, विषमता, पूर्वगौरव व दैवीकरण, हिंसा घडविली जाते, तो निश्चितच राष्ट्रवाद नसतो. तर ती राष्ट्रवादाचा द्वेषपूर्ण ‘शब्दच्छल’ करून सतत सत्ताधारी बनून राहण्यासाठीची किमया असते. सत्तेच्या हव्यास्यापोटी जनतेची फसवणूक करीत राहणे हे छद्म राष्ट्रवाद्यांचे अंतिम ध्येय असते. छद्म राष्ट्रवादी हे सुधारणांचे, समतेचे व बहुविध संस्कृतीचे शत्रू असतात.

इतिहास हा छद्म राष्ट्रावादाने प्रभावित न होता, तो सत्य घटना, तथ्य, तर्कशील व खऱ्या मूल्यांकनाशी संबंधित असला पाहिजे. हल्लीचे युग विज्ञानाचे, नवनव्या अभियांत्रिकीचे, सूचनांचे व कृत्रिम बुद्धिमत्तेचे (Artificial Intelligence) आहे. जगातील इतर देश आधुनिक विचार स्वीकारून उन्नत होऊ लागले आहेत. आपला देश व जनतेनेही यात मागे राहता कामा नये, याचा विचार व्हावयास हवा. तरुण पिढीला मागासलेपणात ढकलण्याने देश प्रगत व सुधारणावादी कसा होईल, याचा विचार झाला पाहिजे. त्याऐवजी संपूर्ण भारतीय राज्यघटनेचे विविधांगी भाग, विवेक व विज्ञानवाद अभ्यासक्रमातून तरुण पिढीला व जनतेला शिकविल्यास ते त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक होतील. त्यातील दंडसंहिता व शिक्षेचे प्रावधान वाचून देशातील गुन्हेगारी कमी होत देशात आनंददायित्व वाढेल.

ब्रिटिशांनी आपल्या शिक्षणपद्धतींतून भारताच्या इतिहासाची मोडतोड केली आणि त्यात विकृती, विसंगती, मिथके आणि तथ्यहीन घटनांचा समावेश केला. या आरोपात तथ्य नाही. याउलट भारतीय संस्कृतीने विवेकवादावर पडदा टाकत मिथके, विकृती, विसंगती, अंधविश्वास, वर्णव्यवस्था, जातीयवादाचा पुरस्कार करत स्त्रिया व बहुजनांना खालच्या दर्जाचे मानून हीन वागणूक दिली. त्यांच्या शिक्षणाच्या संधी हिसकावून घेतल्या. हे सर्व बघूनच जेम्स मिल व विलियम आर्चरसारख्या लेखकांनी भारतीय संस्कृतीवर टीका केलेली दिसते. या विसंगतीवर मात करण्यासाठी रानडे, जोतीराव फुले, लोकहितवादी, आगरकर व रा. गो. भांडारकर यांनी विषमतापूरक पूर्वगौरववादी संस्कृतीला तिलांजली देत तथ्य, तर्कशील व सुधारवादी इतिहासाचे रोपण केले.

टिळक, सावरकर, ए. सी. दास, अरविंद घोष यांनी एका नव्याच राष्ट्रवादी विचारधारेला समोर ठेवले. परंतु ही विचारधारा शोषणाधिष्ठित समाजव्यवस्थेची पाठराखण करणारी होती. ती पूर्वगौरववादी होती. आणि हा पूर्वगौरव चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातीयता, स्त्रीशोषण व संस्कृतिरक्षणाच्या गोंडस नावाखाली धर्मांधता वाढविणारा होता. शहराची व रस्त्यांची नावे बदलणे हा क्रांतिकारी विचार नसून तो इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याचा प्रकार होय. इतिहासच बदलायचा आहे, तर मग भारताचे पूर्वीचे नाव असलेले ‘जम्बुद्वीप’ हे नाव ठेवण्यात आले पाहिजे. सनातनवादी व पूर्वगौरववाद्यांना राष्ट्रवादाचे प्रवक्ते संबोधणे हा येथील बहुजन जनतेचा अपमान करण्यासारखे आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली रामजन्मभूमीचे आंदोलन उभे केले, परंतु अयोध्येत झालेल्या उत्खननात रामजन्माचे काय पुरावे मिळाले हे अजूनही जनतेला कळू दिलेले नाही. उत्खननात मिळालेल्या वस्तूचे प्रदर्शन का नाही भरविले? याला विवेकवाद म्हणावे की मिथ्यावाद हे जनतेला कळले पाहिजे.

भारत हा आक्रमित देश आहे. भारतावरील आक्रमणाची सुरुवात आर्यांपासून होत ती शक, हूण, इस्लाम व ब्रिटिशांपर्यंत पोहोचते. यातील प्रत्येक शासनकर्त्याने येथे आपली प्रतीके रोवली. मात्र या प्रक्रियेमध्ये मूळ भारतीयांची ओळख हरवली आहे. तिला शोधायचे झाल्यास जंगलात, दऱ्यांत, डोंगरांत, लेण्यांत, गुहेत, जमिनीखालील उत्खननात शोधले पाहिजे. तीच खऱ्या aभारतीय इतिहासाची कहाणी आहे. हेच खऱ्या इतिहासाचे पुनर्लेखन ठरेल. हे करण्यास तथाकथित इतिहासबदलू आपला बुद्धिप्रामाण्यावाद दाखवतील काय?

लेखक ‘मानव विकास संस्था’चे अध्यक्ष आहेत.

bapumraut@gmail.com