प्रा. उपिंदर सिंग या इतिहासाच्या अभ्यासक आणि प्राचीन भारताविषयीच्या विविध पुस्तकांच्या लेखिका. त्यांनी इतिहासाबद्दल नुकतंच केलेलं हे प्रकट चिंतन- विशेषत: ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकांमुळे इतिहास- पुनर्लेखनाचा वाद पुन्हा उफाळला असताना आवर्जून वाचण्याजोगं…
‘संत नामदेव पुरस्कार’ हा महाराष्ट्र आणि पंजाब यांना जोडण्याचं कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातील ‘सरहद’ या संस्थेतर्फे दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्राचीन भारताच्या ख्यातकीर्त अभ्यासक प्रा. उपिंदर सिंग यांनी श्रोत्यांसमोर मांडलेल्या चिंतनाचा संपादित अंश –
‘‘ मी आपल्यासमोर इतिहासाची शिक्षक म्हणून उभी आहे. हा सन्मान मी माझ्या व्यवसायाचा आणि अभ्यासकांचा आहे असं मानते. इतिहासाच्या शिक्षकाचा धर्म काय असावा याबाबत दोन कल्पना दिसतात. पहिली अशी की इतिहासाच्या शिक्षकानं परीक्षा पास करण्यासाठी मदत करावी. परीक्षा महत्त्वाच्याच असतात. पण एकूण आयुष्यात त्यांचं स्थान मर्यादित असतं. दुसरी अशी इतिहासाच्या शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या क्षमतांचा पूर्ण विकास करायला बळ द्यायला हवं. या कल्पनेशी मी स्वत: सहमत आहे. इतिहास शिकवायला सुरुवात केल्यावर मी असं अनुभवलं की मुलांना इतिहास शिकण्यात रसच नव्हता. मग माझ्या लक्षात आलं की ही सगळीच मुलं पुढे जाऊन इतिहाससंशोधक होणार नव्हती. इतिहासाची प्राध्यापक म्हणून माझी जबाबदारी होती की या सगळ्यांना ज्यातून काही घेता येईल असा इतिहास शिकवायचा. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हवेत, वेगवेगळ्या दिशांनी विचार करायला हवा. दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा आणि आपलं म्हणणं नीट लिहून काढायला हवं या दिशेनं मी प्रयत्न करत गेले. मला उत्तरं माहीत नव्हती तिथे मला माहीत नाही हे सांगायला मी लाजले नाही.
मी शिकवत आणि शिकत गेले, तसतसं लक्षात आलं की लिहून ठेवलेले विचार हे अधिक काळ टिकून राहतात आणि जास्त प्रभावीपणे जास्त लोकांपर्यंत पोचतात. या विचारातूनच मी अश्मयुगापासून ते मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरचं माझं पहिलं पुस्तक लिहिलं. मला पुरातत्त्वशास्त्र आणि इतिहासाचा मिलाफ साधणारं, दडपलेल्या लोकांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारं, धर्म, तत्त्वविचार, सौंदर्यशास्त्र यांचा विचार करणारं पुस्तक लिहायचं होतं. खरं तर प्राचीन भारतातले पुरातन अवशेष, शिलालेख, ग्रंथ ही तरुण विद्यार्थ्यांना आकर्षून घेऊ शकेल अशी सामग्री असतानाही प्राचीन भारताच्या इतिहासाची पुस्तकं इतकी रटाळ का असतात कुणास ठाऊक?
नीट प्रयत्न केला तर प्राचीन भारतातल्या बहुविध पुराव्यांचा अर्थ लावताना समोर उभे ठाकणारे विविध पर्यायी अन्वयार्थ सहजपणे विद्यार्थ्यांसमोर मांडणं शक्य आहे. विद्यार्थ्यांना प्राचीन ग्रंथ, शिलालेख, कला यांचं जग दाखवलं तर नक्कीच रोमांचकारी वाटेल. इतिहासाच्या विषयातले विविध वादविवाद हे विद्यार्थ्यांना खुल्या मनानं अर्थ लावायला बळ देत असतात. त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित करतात आणि त्यांना चिकित्सक पद्धतीने तथ्यांचा ऊहापोह करायला उद्याुक्त करतात. कारण इतिहासाचा शोध ही न संपणारी प्रक्रिया आहे.
हेही वाचा >>>‘पेट्रो डॉलर्स’ बासनात; पुढे काय?
माझा इतिहासाचा शोध माझ्यासाठी नवी क्षितिजं खुली करत गेला. मला जाणवलं की भारतीय उपखंडाचा अभ्यास करायचा असेल तर इथल्या वेगवेगळ्या प्रदेशांचा अभ्यास करायला हवा. भारतातले वेगवेगळे भाग आणि आशिया, आफ्रिका आणि इतर जागतिक समुदाय हे कसे जोडले गेले होते, त्यांच्यात देवाणघेवाण आणि नातीगोती कशी निर्माण होत गेली हे अभ्यासणं गरजेचं आहे. भारतीय संशोधकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्या ज्ञानाची निर्मिती करण्यात वाटा उचलायचा असेल तर त्यांनी या सगळ्यांचा अभ्यास करायला हवा. तरुणांनी निर्भयपणे स्वतंत्र आणि नवे प्रश्न विचारायचे, नवी तंत्रं शिकायची आणि नव्या पद्धती आत्मसात करायची गरज आहे. त्यांना इतिहासाच्या पद्धतिशास्त्राचं उत्तम प्रशिक्षण दिलं तर ते नवी उत्तरं शोधतील आणि नव्या वाटा निर्माण करतील. चांगला आणि वाईट इतिहास कसा वेगळा असतो, इतिहास आणि जाहिरातबाजीत कसा फरक असतो हे त्यांना समजेल.
पण इतिहासकाराचा आणि शिक्षकाचा धर्म नवे विद्यार्थी घडवण्यातच कृतकृत्य होतो का? त्याव्यतिरिक्तच्या इतिहासात रस असणाऱ्या सर्वसामान्यांचं काय? आजकाल इंटरनेटवर इतिहास असल्याचा दावा करणाऱ्या अनेक गोष्टी सापडतात. त्यातला बहुतांश भाग हा धड इतिहास नसतोच. इतिहासकार नसणारी माणसं ते रचतात. त्यातला काही भाग बराही असतो. पण बहुतांश भागाला इतिहास म्हणता येत नाही.
इतिहासात अनेकांना रस असतो, पण त्यांना खरा आणि खोटा इतिहास यांतला फरक माहीत नसतो. साध्यासुध्या गोष्टींमधले नायक आणि खलनायक यांच्या चित्रणालाच ते इतिहास मानून मोकळे होतात. इतिहासकारांनी इतिहास या विषयाची पद्धत आणि त्यातली गुंतागुंत ही सामान्य माणसांना समजावून सांगायला हवी. त्यांना याची जाणीव करून द्यायला हवी की गतकाळ हा गुंतागुंतीचा असतो आणि त्याला अनेक पदर असतात. शास्त्रीय इतिहास आणि कुणा एखाद्याचं मत यांतील फरक त्यांना समजावून द्यायला हवा. गतकाळाबद्दलची सगळीच विधानं ही वैधतेच्या दृष्टीनं सारखी नसतात हेही समजावून द्यायला हवं. काही अन्वयार्थ हे उत्तम पुरावे, त्यांचं विश्लेषण आणि योग्य प्रतिपादनाच्या आधारे भक्कम उभे असतात. आणि तसं नसणारे तकलादू अन्वयार्थदेखील असतात. पण जोवर इतिहासकार आपल्या शास्त्राच्या पद्धती, त्यातली मतमतांतरं ही स्पष्टपणे उलगडून दाखवत नाहीत, तोवर हे सगळं इतिहासाचं प्रशिक्षण नसणाऱ्या सामान्यांना आणि विद्यार्थ्यांना समजणारच नाही.
हेही वाचा >>>एक होता गझलवेडा संगीतकार!
याचाच अर्थ असा की, अधिकाधिक इतिहासकारांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला हवं. ते तसं पोहोचवायचं तर फक्त इंग्रजीत लिहून चालणार नाही. वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधून हे करायला हवं. भाषांतरंही या बाबतीत महत्त्वाची ठरतात.
या दृष्टीनं मी प्रयत्न करत आले आहे. माझी पुस्तकं स्थानिक इतिहासाशी निगडित आहेत. प्रशिक्षित इतिहासकारांबरोबरच सामान्य वाचकालाही रस वाटेल अशा विषयावरचं प्राचीन भारतातल्या राजकीय हिंसेवरचं पुस्तकही मी लिहिलंय. माझं ‘प्राचीन भारत – विरोधाभासांची संस्कृती’ हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालंय. प्राचीन भारताबद्दलच्या गैरसमजांचं निराकरण करणारं हे पुस्तक पाच प्रमुख विरोधाभासांचा अभ्यास मांडतं. पहिला विरोधाभास म्हणजे प्राचीन भारतातल्या वास्तवातली विषमता आणि आध्यात्मिक पातळीवर मोक्षाच्या बाबतीत दर्शविली जाणारी समता. तर काम या भावनेचा एकीकडे केला जाणारा गौरव आणि दुसरीकडे विरक्तीचं गुणगान हा दुसरा विरोधाभास. तिसरं म्हणजे देवतांची पूजनीयता आणि स्त्रियांचा द्वेष या गोष्टींचं एकत्र नांदणं. चौथा विरोधाभास म्हणजे हिंसा आणि अहिंसेचं अस्तित्व आणि पाचवा म्हणजे धार्मिक मतमतांतरांची परंपरा आणि संघर्षाचीही परंपरा. हे विरोधाभास नाण्याच्या दोन बाजूंसारखे आपल्याला समजून घ्यायला हवेत. म्हणजे गेल्या अनेक शतकांत इतके बदल होऊनही बऱ्याच गोष्टी अजून तशाच का आहेत याचं उत्तर शोधता येतं. असं पाहिलं तर इतिहास आपल्याला एकीकडे उदोउदो आणि दुसरीकडे धिक्कार या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन विरोधाभासी संस्कृती समजून घेण्याचं बळ देतो.
या पाच विरोधाभासांतल्या हिंसा आणि अहिंसेच्या उदाहरणापुरतं बोलायचं झालं तर बऱ्याच भारतीयांना असं वाटत असतं की आपल्या प्राचीन इतिहासाला अहिंसेची परंपरा आहे. पण साधं रोजचं वर्तमानपत्र वाचेल त्यालाही कळेल की हे खरं नाही. हा प्रश्न मला पडला की साध्या पाठ्यपुस्तकातदेखील इतक्या लढायांची वर्णनंच्या वर्णनं असतानाही आपल्या सर्वांना हेच कसं काय वाटत आलं की आपला इतिहास अहिंसेचा आहे. मग लक्षात आलं की अहिंसा ही आपल्या गतकाळाचं नव्हे, तर स्वातंत्र्याच्या चळवळीचं वैशिष्ट्य आहे. आणि हे वर्तमान आपल्या गतकाळाला रेखीव अशी मुरड घालत आलं आहे. जगातल्या इतर सर्व सत्तांसारख्याच भारतीय सत्तांनीदेखील समाजाला आदर्श रूप देण्याच्या नावाखाली शासन करणं आणि जनतेचे जीव घेणं अशा रूपातल्या हिंसेला वैध ठरवलं आहे. प्राचीन भारतीय ग्रंथ नीट वाचले तर लक्षात येतं की राजसत्तेचा विस्तार आणि प्रभाव वाढतो, तसतसं ती आपल्या हिंसेला रोजचं स्वरूप देते, पद्धतशीरपणे दिसेनाशी करते आणि तिला सुंदरशा स्वरूपात पेश करत जाते. हिंसा आणि हिंसेच्या धमक्या या सर्वच उतरंडीच्या व्यवस्थांमध्ये अनुस्यूत आहेत. प्राचीन भारतात या संदर्भात सामील असणाऱ्या व्यवस्था म्हणजे वर्ण, जाती, अस्पृश्यता, गुलामगिरी आणि पितृसत्ता. एकंदर प्राचीन भारत हा अहिंसेचा महामेरू असल्याचा विचार हा भूतकाळाच्या टप्प्यांवरून उड्या मारत मारत महावीर, बुद्ध, अशोक, आणि गांधींपर्यंत येतो. मधल्या विस्तृत हिंसक गतकाळाची तो दखल घेत नाही. याला चांगला इतिहास म्हणता येणार नाही.
पण प्राचीन भारत हा संपूर्णतया अहिंसक नसला तरीही हिंसा आणि अहिंसा यांच्यातल्या तणावांचे दस्तऐवज मात्र प्राचीन राजकीय ग्रंथांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात हे त्याचं अनन्य असं वैशिष्ट्य आहे. जगात असं इतकं कुठेच आढळत नाही. महाभारत अहिंसा आणि नृशंसतेच्या अभावाची चर्चा करतं. पण राजसत्तेला काही प्रमाणात हिंसा गरजेची असल्याचंही मान्य करतं. जैन आणि बौद्ध धर्मातही असाच विचार आहे. अशोकानंही हिंसा आणि अहिंसेचा समतोल साधायचा प्रयत्न केला आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही राजानं दंडाचा उपयोग मर्यादित प्रमाणात करावा असं प्रतिपादन केलं आहे. एकूण हिंसा आणि अहिंसेच्या दुहेरी विचारांच्या सोबतीनं भारताचा वैचारिक इतिहास घडत गेला आहे. असंच इतर द्वंद्वांच्या सहअस्तित्वाबाबतही सांगता येतं.
एकंदरीत, इतिहासाच्या अभ्यासकांनी समाजाच्या सोबत राहून, समाजातल्या विविध घटकांना जोडून घेत आणि सत्याची साथ न सोडता इतिहास लिहिला तर आपल्या इतिहासाविषयीची सामुदायिक समजूत निकोप राहील.
(या मजकुराच्या संकलन संपादनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील काहींनी व्यक्तिगत रस घेऊन साह्य केले, त्यांचे आभार)