गणेश मतकरी
भयपट अनेकांना आवडतात, खिळवून ठेवतात. ते पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांसमोरून त्यातलं प्रत्येक दृश्य गेलेलं असतंच. पण थरारापलीकडे जाऊन त्यातली प्रतीकं, मानसशास्त्र, त्यामागची सामाजिक पार्श्वभूमी याचा विचार किती प्रेक्षक करतात? नजरेतून सुटणाऱ्या अशा अनेक घटकांचा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या कादंबरीविषयी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
धिस मूव्ही इज नॉट फॉर एव्हरीवन.
धिस मूव्ही इज फॉर सम ऑफ अस.
– पॉल ट्रिम्ब्ली, हॉरर मूव्ही
महत्त्वाच्या आधुनिक भयकथाकारांची नावं काढायची झाली, तर पॉल ट्रिम्ब्लीचं नाव त्यात अग्रणी येईल. त्याच्या दोन कादंबऱ्या मला विशेष महत्त्वाच्या वाटतात. त्यातली पहिली ‘अ हेड फुल ऑफ घोस्ट्स’ (२०१५) ही भयसाहित्याचा पारंपरिक आवडता- ‘झपाटलं जाणं’ हा विषय वापरते, पण त्याला काळाशी सुसंगत असं नवं परिमाण देते. गरीब घरातल्या मुलीचा बाप आल्या प्रसंगाचा फायदा घेत एका निर्मात्याला घरातच भयरिअॅलिटी टीव्ही शो चित्रित करण्याची परवानगी देतो. या शोचं चित्रीकरण आणि एका ब्लॉगरने कालांतराने त्याचं केलेलं विश्लेषण, हा या कादंबरीचा महत्त्वाचा भाग आहे. त्याची दुसरी लक्षणीय कादंबरी होती ‘सर्व्हायवर साँग’ (२०२०), जी आपल्या साऱ्यांच्या आयुष्याचा करोनाकाळात जो वास्तववादी भयपट होऊन बसला होता, त्याचा माग घेणारी होती. साथीच्या काहीच महिने आधी लिहिलेली ही कादंबरी साथकाळातला एका दिवस चित्रित करते. आज ती हातात घेणाऱ्याचा ती साथपूर्व काळात लिहिली गेली यावर विश्वासच बसणार नाही, इतकी ती या दु:स्वप्नाचं अचूक दर्शन घडवते. ‘हॉरर मूव्ही’ ही ट्रिम्ब्लीची नवी कादंबरीही आधीच्या दोन कादंबऱ्यांशी सहजच दर्जात्मक तुलना होण्याजोगी सशक्त आहे.
ट्रिम्ब्लीच्या साहित्यात नेहमी दोन वैशिष्ट्यं आढळतात. पहिलं म्हणजे हॉरर हा तो वापरत असलेला मुख्य साहित्यप्रकार असूनही तो अमानवी घटकांचा वापर क्वचित आणि मोजका करतो, आणि केला तरीही त्यासाठी अनपेक्षित मार्ग वापरतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भयसाहित्यात/ भयपटात यशस्वी असलेल्या सूत्रांमध्ये कालसुसंगत फेरफार घडवून त्यांची नवी मांडणी करून दाखवतो. वर उल्लेख केलेल्या सर्व कादंबऱ्या याची चांगली उदाहरणं आहेत.
‘हॉरर मूव्ही’मधलं कथासूत्र आहे ते माणसाच्या राक्षसात होणाऱ्या परिवर्तनाचं. ‘सायको’सारख्या अभिजात स्लॅशरपासून पुढल्या काळातल्या ‘हॅलोवीन’, ‘नाइटमेअर ऑन एल्म स्ट्रीट’ वा ‘फ्रायडे द थर्टीन्थ’सारख्या भयमालिकांमधले मानवी रूपातले राक्षस आपल्या लक्षात असतील. या सर्वांच्या रूपांतरामागे काही ना काही, बहुधा सामाजिक स्वरूपाची कारणं असल्याचं आपल्याला दिसतं, तरी त्या चित्रपटांमध्ये हे अपरिहार्य बॅकस्टोरीचा भाग म्हणून येतं. कथानकाचा भाग म्हणून क्वचितच हा तपशील दाखवला जातो. हा बदल होण्याचा तपशील ट्रिम्ब्लीच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. एकाच वेळी वास्तववादी, तसेच प्रतीकात्मक पद्धतीने त्याचा वापर इथं केल्याचं आपल्याला दिसतं.
शीर्षकातला ‘हॉरर मूव्ही’ हा एक त्याच नावाचा लो बजेट भयपट आहे, १९९३ मध्ये चार टीनएजर्सनी एकत्र येऊन बनवलेला. क्लिओ आणि व्हॅलेन्टिना या मुली अनुक्रमे पटकथाकार आणि दिग्दर्शक आहेत आणि चित्रपटात कामही करतायत, तर कार्सन आणि कादंबरीचा निवेदक यांना फक्त अभिनय करायचा आहे. निवेदक सोडून इतर तिघांच्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखांची नावंही तीच आहेत, तर निवेदक करत असलेल्या भूमिकेचं नाव आहे ‘थिन गाय’. त्याला कास्ट करण्यात आलं आहे, त्यामागे त्याची व्हॅलेन्टिनाशी असलेली जुजबी ओळख हे एक कारण आहे, तर त्याचं काहीसं विक्षिप्त दिसणं, कृश असणं, याचाही त्यात वाटा आहे. त्याचा चेहरा महत्त्वाचा नाही, कारण तो चित्रपटात दिसणारच नाही.
कादंबरी वर्तमानात सुरू होते तेव्हा हा भयपट बनवून बराच काळ लोटलेला आहे, पण निवेदक सोडून तेव्हाचं कोणीच आता हयात नाही. हा भयपट कधीच प्रदर्शित झालेला नाही, मात्र व्हॅलेन्टिनाने कधी तरी ऑनलाइन रिलीज केलेल्या तीन प्रक्षोभक दृश्यांमुळे त्याचं नाव लोकांच्या कल्पनेतच मोठं होत गेलंय. कधीच प्रकाशात न येऊ शकलेल्या शापित चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट समाविष्ट झाला आहे. त्या तीन दृश्यांनी निवेदकालाही ‘थिन किड’ म्हणून लोकप्रियता मिळाली आहे आणि आता त्याचा परिणाम म्हणून फिल्मचा रिबूट/ रिमेक करण्याचा विचार सुरू आहे. ही कथा आपल्यापुढे उलगडते, ती वेगवेगळ्या काळांत, अरेषीय पद्धतीने आणि सोबत त्या अप्रदर्शित चित्रपटाची पटकथा घेऊनच.
ज्यांनी ‘अ हेड फुल ऑफ घोस्ट्स’ वाचलं असेल त्यांना ट्रिम्ब्लीची माध्यमांची जाण किती अचूक आहे हे लक्षात आलं असेल. तिथे रिअॅलिटी शोचे तपशील आणि त्याची ब्लॉगवरची समीक्षा या मार्गाने तो एकूण भयपटांच्या समीक्षेचं दालन आपल्यापुढे उघडतो. इथल्या निवेदनातही तो ऑडिओबुक म्हणून केलेलं निवेदन आणि पटकथा, असे दोन आकृतिबंध वापरतो. (कादंबरी म्हणून वाचताना यामुळे मुख्य निवेदनात खूप फरक पडत नाही, ते ऑडिओबुक असण्याला कथानकात कारण असलं तरी. शिवाय प्रत्यक्ष कादंबरीचं खरोखरचं ऑडिओबुक ऐकून पाहिलंत, तर तिथं पटकथेच्या भागाची एक वेगळी ट्रीटमेन्ट जाणवेल.) इथंही ट्रिम्ब्लीचा भयपटांचा अभ्यास सतत दिसत राहतो. भयपटांचा इतिहास, त्यांचे प्रकार, शैलीतले फरक, प्रतीकात्मकता आणि वास्तववाद यांचा त्यात दिसणारा वापर, प्रेक्षकांपुढे कधीच न आलेल्या शापित चित्रपटांच्या (कर्स्ड फिल्म्स) दंतकथा, हॉरर माध्यमाचे चाहते, त्यांची कन्व्हेन्शन्स, या चित्रपटांभोवतालचं आणि व्यक्तिरेखांमागचं वलय, पटकथाकार आणि दिग्दर्शक यांच्या दृष्टिकोनातले बारकावे, व्हिज्युअल आणि मेकअप इफेक्ट्स, अशा अनेक गोष्टींची ‘हॉरर मूव्ही’मध्ये रेलचेल आहे.
या कादंबरीच्या उत्तरार्धात एक प्रसंग आहे ज्याचा म्हटलं तर कथानकाच्या घटनाक्रमाशी थेट संबंध नाही, पण म्हटलं तर तो या संपूर्ण कादंबरीचं केंद्र असल्यासारखा आहे. त्याही पलीकडे जाऊन असं म्हणता येईल, की प्रेक्षकांना भयपटांबद्दल (किंवा भयकथांबद्दल) सुप्त आकर्षण का असतं, यावरची ही एक प्रदीर्घ कमेन्ट आहे. हा प्रसंग येतो तो त्यात दिलेल्या पटकथेचा भाग म्हणून. एका महत्त्वाच्या प्रसंगाचं, किंबहुना एका शॉटचं, हे वर्णनयुक्त विश्लेषण आहे. क्लिओने लिहिलेली इथली पटकथा ही बरीचशी एरवीच्या पटकथांसारखीच आहे, एक फरक सोडून. प्रसंगात काय घडतं याचं वर्णन आणि संवाद देण्याबरोबरच त्यात प्रेक्षकावर त्या त्या जागी काय परिणाम अपेक्षित आहे किंवा एखादी गोष्ट अमुक प्रकारे घडण्यामागचं कारण काय, याबद्दल टिप्पणीदेखील दिसून येते. ही मोजकी टिप्पणी, हा या कादंबरीचा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे, जो भयपटांची शैली, वृत्ती, आकलन आणि आकर्षण या सर्व गोष्टींबद्दल जागरूक आहे. हा विशिष्ट प्रसंग कार्सनच्या घरातला आहे. तो थिन किडपासून पळत आपल्या घरात, आपल्या खोलीपर्यंत आला आहे. आत प्रवेश करणारा थिन किड दिसेल या अपेक्षेने तो वळून दाराच्या कमानीकडे पाहतो, पण कमान रिकामी राहते. तो ती भरण्याची वाट पाहतो, तसे प्रेक्षकही वाट पाहत राहतात आणि कादंबरीचे वाचक म्हणून आपणही वाट पाहत राहतो, पण कमान रिकामीच राहते.
यापुढचा भाग हा अधिकाधिक काळ रिकाम्या राहणाऱ्या कमानीचा आणि त्याच्या प्रेक्षकावर पडणाऱ्या प्रभावाचा अतिशय विस्तृत असा आढावा आहे. हे दृश्य निर्माण करत असलेला ताण आणि त्यातून प्रेक्षकांवर होणारा संभाव्य परिणाम याचं वर्णन करताना ट्रिम्ब्लीने या चित्रपट प्रकारालाच डीकोड केलं आहे. भयपटाचा प्रत्यक्ष, करमणुकीच्या पातळीवर, मानसशास्त्रीय आणि सामाजिक अंगाने असा विविध प्रकारे विचार करत तो भयजाणिवेच्या अंतरंगात जाऊन पोहोचला आहे. भयपट का वर्क होतात याबद्दलचं हे एक सखोल चिंतन आहे, जे आपल्याला भरपूर वैचारिक खाद्या पुरवतं. पटकथेतला हा प्रसंग सर्वात परिणामकारक असला, तरी क्लिओची संपूर्ण पटकथाच या प्रकारच्या विचारप्रक्रियेचा एक भाग आहे. सिनेमाच्या गतीत सापडून एरवी ज्या गोष्टी आपल्या नजरेतून सुटतात, अशा अनेक गोष्टींचा ती जागोजागी विचार करते. ती एकाच वेळी पटकथा आणि तिच्यामागे असलेल्या विचारांचा उलगडा, या दोन्ही आघाड्यांवर काम करते.
‘हॉरर मूव्ही’ची अखेर हा त्यातल्या कथानकाच्या दृष्टीने पारंपरिक पद्धतीचा ट्विस्ट नाही, जरी कोणत्याही चांगल्या कथेचा शेवट हा जसा आपल्याला त्याबद्दल विचार करत ठेवतो, तसा हादेखील ठेवतो. पॉल ट्रिम्ब्लीने ज्या रीतीने तो मांडलाय ते एखादी ‘फाउंड फुटेज’ फिल्म पाहिल्यासारखं आहे. सारं खरं वाटणारं, काहीसं अस्वस्थ करणारं, काहीसं अपूर्ण, मात्र हे अपूर्ण असणं निव्वळ सीक्वलची सुरुवात म्हणून योजलेलं नाही, तर या अपुरेपणालाही अर्थ आहे. ट्रिम्ब्लीने सूचित केलेल्या अनेक गोष्टींचा विचार आपण वाचक म्हणून करणं अपेक्षित आहे. आपण जे वाचतोय, जे पाहतोय त्याकडे आपण पुरेशा खोलात जाऊन पाहतो का, हा अनुत्तरित प्रश्न या शेवटाआड दडलेला आहे.
हॉरर मूव्ही
लेखक- पॉल ट्रिम्ब्ली
प्रकाशक- टायटन बुक्स
किंमत- ६९९ रुपये
पृष्ठे- ३६४
ganesh. matkari@gmail. Com