‘समाजमाध्यमांवर नियमनाबाबत कोणतीही यंत्रणा निर्माण करताना ‘सेन्सॉरशिप’ होणार नाही, याचा विचार करा’ अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला केली आहे. ही सूचना विशेषत: ‘यूट्यूब’च्या संदर्भात असली तरी, समाजमाध्यमांमुळेच समाजातली दुही उघडपणे दिसण्याचे प्रसंगी दररोज येतात. फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम… जिकडे तिकडे द्वेष पाहायला मिळतो. समाजमाध्यमांवर स्वत:चे मत सहजपणे, खुल्या मनाने मांडण्याच्या स्वातंत्र्यावरच मर्यादा येतात, कारण नापसंत असलेले मत व्यक्त करणाऱ्यावर ट्रोलिंगचा किंवा ‘वैयक्तिक द्वेषयुक्त टिप्पण्यां’चा- म्हणजेच ‘हेट स्पीच’चा वर्षाव होऊ शकतो. अशा द्वेषयुक्त टिप्पण्यांच्या विविध प्रकारांचा आकडेवारीनिशी आपल्या देशापुरता अभ्यास ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ ऑर्गनाइज्ड हेट’ ही संस्था करते. या संस्थेच्या २०२४ सालच्या अहवालात भारतात वैयक्तिक द्वेषयुक्त टिप्पण्यांच्या घटनांचा प्रसार आणि विस्तारामध्ये समाजमाध्यमांच्या खालोखाल वर्तमानपत्रे, नियतकालिके (प्रिंट आणि डिजिटल व्हर्जन) यांचेही विश्लेषण करण्या आले आहे. या अहवालाचे निष्कर्ष ‘आपण कुठे चाललो आहोत’ ही चिंता वाढवणारेच आहेत.
काही मुख्य निष्कर्ष असे : २०२४ मध्ये नोंदवलेल्या १,१६५ वैयक्तिक द्वेषयुक्त टिप्पण्यांपैकी ९९५ समाजमाध्यमांवरच प्रथम उमटल्या, त्याहीपैकी सर्वाधिक म्हणजे ४९५ द्वेषपूर्ण टिप्पण्या एकट्या फेसबुकवरच आहेत. त्यानंतर अनुक्रमे यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि टि्वटर (आता ‘एक्स’) यांचा क्रमांक लागतो. हिंसेला चिथावणी देणाऱ्या २५९ टिप्पण्या या संस्थेने अभ्यासल्या, त्याहीपैकी २१९ टिप्पण्या प्रथम समाजमाध्यमांवर केल्या गेल्या. यातही फेसबुक १६४ (७४.९ टक्के), यूट्यूब ४९ (२२.४ टक्के) असे प्रमाण दिसते. महिन्याभरापूर्वी- म्हणजे ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत, फेसबुकवर ज्या चिथावणीखोर व्हीडिओंची तक्रार केली गेली, त्यापैकी फक्त तीनच तिथून काढले गेले आहेत, तर उर्वरित ९८.४ टक्के व्हीडिओ किंवा लिखित टिप्पण्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन करूनसुद्धा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कायम आहेत.
‘हेट स्पीच’ किंवा द्वेषयुक्त टिप्पण्या/ मजकूर ही काही केवळ भारतीय समस्या नाही. ती जागतिक समस्या म्हणून मान्य झाली आहे आणि संयुक्त राष्ट्रांनीच ‘हेट स्पीच’ची व्याख्या केलेली आहे. ही व्याख्या अशी : ‘भाषण, लेखन किंवा वर्तनातील कोणत्याही प्रकारचा संवाद, जो एखाद्या व्यक्ती किंवा गटावर त्यांच्या धर्म, वांशिकता, राष्ट्रीयत्व, वंश, रंग, वंश, लिंग किंवा इतर ओळख घटकांच्या आधारावर, त्यांच्या संदर्भात अपमानजनक किंवा भेदभावपूर्ण भाषेवर हल्ला करतो ’. यामध्ये तीन महत्त्वाचे निकष अंतर्भूत आतहेत : एक म्हणजे द्वेषयुक्त टिप्पणी ही शब्द किंवा प्रतिमा/ व्यंगचित्रे, मेम्स, वस्तू, खाणाखुणा आणि चिन्हांसह कोणत्याही प्रकारे व्यक्त केले जाऊ शकते आणि ती ऑनलाइन किंवा ऑफलाइनही प्रसारित केली जाऊ शकते. दुसऱ्या निकषानुसार, द्वेषयुक्त टिप्पणी ही एखाद्या व्यक्ती किंवा समुदायासाठी ‘भेदभावपूर्ण’ (पक्षपाती, धर्मांध किंवा असहिष्णु) किंवा ‘अपमानजनक’ (पूर्वग्रहदूषित, तिरस्कारपूर्ण किंवा मानहानीकारक) असते. आणि तिसरा निकष म्हणजे द्वेषयुक्त टिप्पणी ही एखाद्या व्यक्तीचे किंवा समूहाचे ‘ओळख घटक’- उदाहरणार्थ धर्म, वांशिकता, राष्ट्रीयत्व, वंश, रंग, वंश, लिंग यांसह भाषा, आर्थिक किंवा सामाजिक मूळ, अपंगत्व, आरोग्य स्थिती किंवा लैंगिक अभिमुखता यांसारख्या घटकांची टिंगल करते वा त्याबद्दल द्वेष पसरवते.
पारंपारिक किंवा छपाई माध्यमांच्या तुलनेत ऑनलाइन द्वेषयुक्त मजकूर सहजपणे, कमी खर्चात तयार करून पसरविला जातो. तो परत परत तयार करता येतो आणि जगभर लोकाश्रयसुद्धा मिळवू शकतो. द्वेषयुक्त मजकुरावर जगभरात अनेक संशोधन प्रकल्प झाले आहेत (त्यांना भविष्यात तर जास्त संधी आहे). अभ्यासकांच्या मते द्वेषयुक्त मजकूर अचानक सुरू होत नाही किंवा नियम केले म्हणून बंदही होत नाही. एकमेकांशी आदरपूर्वक आणि माणुसकीने वागण्यासाठी आपणच सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. संशोधकांनी आणि विविध समुदायांनी वेगवेगळ्या प्रकारे द्वेषयुक्त मजकुरावरचे उपाय, योजना यांचा विचार आणि कृती केली पाहिजे. हे का गरजेचे आहे?
ऑनलाइन माध्यमांवर ज्यांना द्वेषयुक्त मजकूरांना किंवा द्वेषयुक्त विचारसरणीला सामोरे जावे लागते त्यांना अशाच द्वेषाच्या विचारसरणीच्या लोकांशी प्रत्यक्षातही गाठ पडेल अशी भीती वाटू लागते. ऑनलाइन द्वेषयुक्त मजकुरांचे मानसिक, भावनिक दुष्परिणाम (जे नंतर शारीरिक स्तरावरही पसरताना दिसतात) तर ऑफलाइन मजकुरांमुळे थेट मानसिक भीती, असुरक्षितता, चिंता आणि प्रत्यक्ष शारीरिक हल्ल्याची मोठी भीती निर्माण होते. जेव्हा दोन किंवा अधिक धर्मांमध्ये विशिष्ट मते मांडली जातात किंवा काही घटना घडतात तेव्हा त्या-त्या धर्माचे लोक एकत्र होऊन दुसऱ्या धर्माबद्दल असे मजकूर छापताना किंवा बोलताना दिसतात. परंतु अशाही घटना घडतात की एकाच धर्मामध्ये हा वितंडवाद निर्माण होतो, कारण त्या धर्मातले वेगवेगळे समूह – मग ते वेगवेगळ्या जाती असतील किंवा पंथ – दुसऱ्या धर्माच्या विरोधात असणारी त्यांची ‘धार्मिक एकी’ अशा वेळेस संपलेली दिसते. द्वेषयुक्त मजकूर आता आपल्याच धर्माच्या परंतु वेगळ्या जाती- पंथाच्या समूहाबद्दल वापरला जातो. असे मतभेद उत्तर-दक्षिण म्हणजेच भौगोलिक, मराठी-अ मराठी म्हणजेच भाषिक, स्त्री-पुरुष- पारलिंगी म्हणजेच लैंगिक, गरीब-श्रीमंत म्हणजेच वर्गीय, भारत-पाकिस्तान / भारत-चीन भारत-अमेरिका म्हणजेच आंतरराष्ट्रीय; अशा विविध घटकांमध्ये, घटकांवर दिसून येतात.
कुणी म्हणेल, ‘ही तर मानवी प्रवृत्तीच आहे आणि ती बऱ्याच पूर्वीपासून आहे’- पण आजघडीला द्वेषयुक्त मजकूर पसरविण्यात समाज माध्यमांचाच वाटा मोठा आहे. राजकारण्यांनी सगळ्या समाजमाध्यमांना आपल्या दाराशी बांधल्यामुळे त्या समाज माध्यमांवर किंवा त्यांचा दुरुपयोग करणाऱ्या राजकारण्यांवर कोण कारवाई करणार? शिवाय आजच्या काळात जिथे ‘माझ्या शेतातल्या शेवग्याच्या शेंगा तोडल्या’ म्हणून सख्ख्या भावाचा द्वेषातून खून केला जातो तिथे ‘अस्तित्व’, ‘अस्मिता’ या विषयांवरून द्वेषाचे युद्धामध्ये रूपांतर झालेले आपण बघतच आहोत. याला अधिकच चिथावणी देणाऱ्या समाजमाध्यमांवरल्या द्वेषाचे नियंत्रण कोण आणि कसे करणार, हा प्रश्न त्यामुळेच गंभीर स्वरूपाचा आहे.
द्वेषयुक्त मजकूर थांबविण्यात एक अडचण अशीही आहे की ‘ते’ थांबतील तेव्हा ‘आम्ही’ थांबू आणि हे ‘ते’-‘आम्ही’ दोघेही म्हणत असतात. त्यामुळे कोणीच थांबताना दिसत नाही. रामायणात दशाननाचा मोठा भाऊ सहस्त्रमुखीरावणाचा संदर्भ येतो. वाल्मिकी रामायणात हा संदर्भ आहे की नाही माहीत नाही पण सोनी सब वरच्या ‘श्रीमद् रामायणम्’ मालिकेत आहे. ते पात्र आत्ताच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. श्रीरामांना दहा तोंडी रावणाला (दशाननाला) मारणे सोपे होते कारण त्याचे प्रमाद शारीरिक होते, परंतु सहस्त्रमुखीरावण ही प्रवृत्ती दाखवली आहे – खोटे पसरविणे, सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करणे, त्यांचा बुद्धिभेद करणे, इत्यादी. या वृत्ती विरुद्ध लढाई अवघड होऊन बसते. द्वेषयुक्त मजकूर आणि समाज माध्यमे हे आत्ताच्या काळातले सहस्त्रमुखीरावण आहेत. त्यांच्या तावडीत आपण सापडणार नाही याची काळजी आपणच सजग राहून घेतली पाहिजे. द्वेषयुक्त भाषणांमधून किंवा लिखाणांमधून मूळ समस्या सुटणार नसतात. ‘द्वेषयुक्त मजकूर लिहू/ पसरवू नका, हा माध्यमाचा गैर वापर आहे’ हे तर सांगत राहिलेच पाहिजे; परंतु ज्यांच्याविरुद्ध या द्वेषयुक्त मजकुरााचा रोख आहे त्यांनी त्याला योग्यप्रकारे कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन करणे वर्तमानात आणि भावी काळातही मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांसारख्या विशेषज्ञांची जबाबदारी असणार आहे. लेखिका मुक्त पत्रकार आहेत. ujjwala.de@gmail.com