– महादेव ईश्वर पंडित
सेतू हा शब्दच मुळात सुंदर आहे. नदी, नाला, खाडी, डोंगर, दरी, समुद्र तसेच मानवनिर्मित अडथळे पार करण्यासाठी जे बांधकाम केले जाते, त्याला सेतू म्हणतात. सेतूंनी गावे, शहरे, माणसे, मने, संस्कृती जोडली जाते. सेतू अर्थात पुलांनी अनेक गावे जोडली आहेत, खडतर प्रवास सुकर केला आहे. २५ मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवडी-न्हावा शेवा या सागरी मार्गाचे चाचणी परीक्षण झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत शिवडी ते न्हावा-शेवा हे अंतर फक्त २० मिनिटांत पार केले. एरवी ते पार करण्यासाठी कमीत कमी एक तास खर्ची पडत असे. मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) हा अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील एक आदर्श नमुना आहे. हा सागरी सेतू नोव्हेंबर २०२३ अखेर लोकांच्या सेवेत रुजू होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
खरे तर मुंबई हे सुंदर नैसर्गिक बेट आहे. शीव, वांद्रे ते दक्षिणेकडील समुद्राच्या किनाऱ्यापर्यंतच्या भागाला मुंबई असे संबोधले जाते आणि याव्यतिरिक्त मुंबईच्या उरलेल्या भागाला उपनगर म्हणून ओेळखले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने वांद्रे ते बोरिवली, चुनाभट्टी ते मानखुर्द आणि शीव ते मुलुंडपर्यंतच्या भागाचा समावेश होतो. मुंबई व नवी मुंबई ही दोन्ही शहरे वाशी खाडीपूल व ऐरोली ब्रिज या दोन सेतूंनी पूर्वीच जोडली गेली आहेत, पण मुख्य मुंबई येत्या नोव्हेंबरअखेर शिवडी-न्हावा शेवा या सागरी सेतूने नवी मुंबईशी जोडली जाईल. हा सागरी सेतू लांबीच्या मापदंडानुसार जगात दहाव्या स्थानी आहे. देशातील हा सर्वांत लांब सागरी सेतू आहे.
हेही वाचा – मुलींनो, ‘लिव्ह-इन’मध्ये स्वातंत्र्य खमकेपणानं जपा…
सतरा आयफेल टॉवर… !
५०० बोइंग विमाने व १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर या सागरी सेतूसाठी करण्यात आला आहे. पृथ्वीच्या चार प्रदक्षिणा होतील इतक्या लांबीच्या केबल त्यात वापरल्या आहेत. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू एकूण २२ किमी लांबीचा असून त्यातील १६.५० किमी भाग समुद्रामध्ये तर उर्वरित ५.५० किमी भाग जमिनीवर आहे.
शिवडी-न्हावा शेवा या प्रतिष्ठित सागरी सेतूसाठी ऑर्थोट्रोपीक स्टील डेक तंत्रज्ञान वापरलेले आहे. ८४ हजार टन वजनाचे ७० डेक या सेतूमध्ये वापरले आहेत, त्यांचे वजन सुमारे ५०० बोइंग विमानांच्या वजनाइतके आहे. सुमारे १७ आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजेच सुमारे १७ हजार मेट्रिक टन वजनाच्या सळ्यांचा वापर यात करण्यात आला आहे. पृथ्वीच्या परिघाच्या पाचपट म्हणजेच ४८ हजार किमी लांबीच्या वायर वापरण्यात आल्या आहेत. अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ पुतळा उभारण्यासाठी जेवढे काँक्रीट लागले, त्याच्या सहापट म्हणजेच नऊ हजार ७५ घनमीटर काँक्रीटचा वापर या महासागरी सेतूमध्ये करण्यात आला आहे.
पुलाच्या एकूण लांबीच्या ७५ टक्के भाग खोल समुद्रात आहे आणि भरती- ओहोटीच्या वेळच्या कंपनांनी सेतूच्या खांबांना धक्का बसू नये म्हणून ३५ किमी लांबीच्या विशिष्ट पाइल लायनरचा वापर करण्यात आला आहे. हे सर्व पाइल लायनर जगप्रसिद्ध बुर्ज खलिफाच्या अंदाजे ३५ पट उंचीचे आहेत. हा सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा आहे.
हेही वाचा – फक्त गोसेवा की गोरक्षण?
समुद्र ओलांडून विकास…
शिवडी-न्हावा शेवा या सागरी सेतूमुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर जवळजवळ १५ किमीने कमी होऊन प्रवासाच्या वेळेत अंदाजे १५ ते २० मिनिटांची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे दळणवळण जलद होण्यास मदत होईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे देशाच्या आर्थिक राजधानीकडे पोहोचण्याच्या वेळेत कमीत कमी १५ ते २० मिनिटांची बचत होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला. या काळात अनेक तज्ज्ञ अभियंत्यांनी, सल्लागारांनी व कुशल कारागिरांनी अनेक आव्हानांवर मात केली. नोव्हेंबर २०२३ अखेर हा सेतू खुला होणे अपेक्षित आहे. ‘मे. एल अँड टी’ने हे काम केले आहे. आजवर नवी मुंबई फक्त वाशी खाडी पूल आणि ऐरोली पूल येथे सागरी सेतूच्या माध्यमातून मुंबईला जोडलेली होती. वाशी खाडी पुलामुळे मानखुर्द व वाशी जोडले गेले आणि ऐरोली पुलामुळे मुलुंड व ऐरोली जोडले गेले आहे. साधारणपणे १९७३ च्या सुमारास गॅमन इंडियाने बांधलेल्या वाशी खाडी पुलाच्या माध्यमातून मुंबई-नवी मुंबई हे भाग जोडले गेले. साधारणतः २५ वर्षांनंतर म्हणजेच १९९९ च्या सुमारास ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने ऐरोली पूल बांधला. ५० वर्षे झाली, तरीही नवी मुंबईला अद्याप मुंबईचा शेला पांघरता आलेला नाही. अद्याप नवी मुंबई मेट्रो रेल व आंतरराष्ट्रीय विमानउड्डाणापासून वंचित आहे. दोन्ही कामे प्रगतिपथावर आहेत. डिसेंबर २०२३ अखेर समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राची उपराजधानी देशाच्या आर्थिक राजधानीला जोडली जाणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे व यशवंतराव चव्हाण जलदगती महामार्गामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीसुद्धा आर्थिक राजधानीच्या जवळ आली आहे. यातून मुंबईवरील ताण कमी होण्यास हातभार लागणे अपेक्षित आहे.
१९७० च्या सुमारास राज्य सरकारने नवी मुंबईत सिडकोची स्थापना केली. सिडकोने गेल्या पाच दशकांत नवी मुंबईचा नियोजनबद्ध विकास साधला. औद्योगिक वसाहतीसुद्धा साकारल्या. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे तर नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या सर्व शहरांनी आपापसांत विविध क्षेत्रांत प्रगतीचा सेतू बांधल्यास विकासास वेग येईल.
(लेखक वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व मुंबईत स्थापत्य सल्लागार आहेत.)
(mahadevpandit04@gmail.com)