निरंजन मेढेकर

पॉडकास्टची साधी-सोपी व्याख्या करायची झाल्यास मोबाइलवर किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या माध्यमातून ऐकता येईल असा आणि बहुतेकदा मोफत उपलब्ध होणारा श्राव्य मजकूर म्हणजे पॉडकास्ट. सुदैवानं पॉडकास्ट म्हणजे केवळ मुलाखती हे समीकरणही आता मागे पडत आहे. या माध्यमात मराठी पॉडकास्टर्सचा आणि श्रोत्यांचाही टक्का वाढत असून मराठी पॉडकास्टर्सचे सध्या या माध्यमात नवनवीन प्रयोगही सुरू आहेत.

ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
sonam wangchuck marathi news,
जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”
amaltash movie
सरले सारे तरीही…
The tiger reached the dog through the crowd of tourists
‘मरण थांबवणं कोणाच्या हातात आहे…’ पर्यटकांच्या गर्दीतून वाघाने श्वानाला गाठलं; घटनेचा थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ

पॉडकास्ट निर्मिती-व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत मुंबईतील आयडियाब्रू स्टुडियोजचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य कुबेर म्हणतात, “पॉडकास्टिंगमध्ये मराठी टक्का निश्चित वाढतोय. आमच्या प्लॅटफॉर्मचा विचार करता अगदी सहा-आठ महिन्यांपूर्वी एकूण श्रोत्यांपैकी मराठी श्रोत्यांचं प्रमाण हे पाच ते दहा टक्के असायचं, ते आज २० टक्क्यांपर्यंत वाढलंय. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या माध्यम समूहांबरोबरच वैयक्तिक मराठी पॉडकास्टर्सचं प्रमाणही आता वाढतंय. आमच्याकडे आज ५० च्या आसपास मराठी पॉडकास्ट्स आहेत. श्रोत्यांची सध्या सर्वाधिक पसंती ही बातम्यांच्या आणि कथांच्या पॉडकास्टना आहे.”

संपूर्ण देशाचा विचार करता गेल्या सहा वर्षांतला पॉडकास्टिंग क्षेत्राचा वाढीचा दरही अफाट आहे. २०१६ मध्ये पॉडकास्ट ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या ही ४० लाख इतकी होती. तर २०२२ मध्ये हा आकडा ९० दशलक्ष म्हणजेच नऊ कोटींपर्यंत वाढलाय. करोना आणि त्यानंतरचा प्रदीर्घ असा लॉकडाऊनचा काळ, घरोघरी पोहोचलेले स्मार्टफोन्स, स्वस्त झालेले मोबाइल इंटरनेट प्लॅन्स, लोकांना स्क्रीनचा आलेला उबग आणि भारतीय भाषांमध्ये सुरू झालेली आशयनिर्मिती अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पॉडकास्ट ऐकण्याकडे श्रोत्यांचा कल वाढत आहे. आजघडीला आपल्या देशात वेगवेगळी अशी ३५ ॲप्स उपलब्ध आहेत ज्यावरून पॉडकास्ट ऐकता येतात. रिलीज होणारा पॉडकास्टचा प्रत्येक एपिसोड हा आज स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक किंवा अगदी यूट्यूबसह असंख्य ॲप्सवर मोफत ऐकण्याचा पर्याय आज श्रोत्यांना उपलब्ध आहे.

पुण्यातील ‘मेनका प्रकाशना’ने यंदाच्या महाराष्ट्रदिनी ‘मेनका क्लासिक्स’ हा खास कथांचा पॉडकास्ट सुरू केलाय. ‘मेनका’चे प्रकाशक अभय कुलकर्णी म्हणाले, “माहेर, मेनका आणि जत्रा या आमच्या मासिकांत आणि दिवाळी अंकात गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या हजारो कथांपैकी काही निवडक कथा आणि लेखही ‘मेनका क्लासिक्स’मध्ये आम्ही श्राव्य रूपात रिलीज करत आहे. अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीवर प्रसिद्ध लेखक-मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांनी ‘गोनिदां मला जाणवले ते’ हा ‘मेनका’च्या १९९२ च्या दिवाळी अंकात लिहिलेला लेख आम्ही ज्येष्ठ कलाकार प्रभाकर वर्तक यांच्या आवाजात ‘मेनका क्लासिक्स’वर रिलीज केला. या लेखाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आजच्या तरुणाईपर्यंत त्यांच्या आवडीच्या माध्यमातून हे दर्जेदार साहित्य पोहोचत आहे याचं समाधान आहे.”

पॉडकास्टिंगमध्ये स्वतःची ‘क्रिएटर इकॉनॉमी’ निर्माण करण्याच्या दृष्टीनं मराठी पॉडकास्टर्सनं पावलं उचलायला हवीत, असं निरीक्षण नोंदवत स्टोरीटेल इंडियाचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ म्हणाले, “पॉडकास्टिंगच्या प्रवासाची सुरुवात हौस, छंद म्हणून होत असली तरी मराठी पॉडकास्टर्सनी अंतिमतः व्यावसायिक दृष्टीनं पॉडकास्ट निर्मितीचं उद्दिष्ट ठेवायला हवं. यामध्ये चांगल्या दर्जाचा आशय सातत्यपूर्ण देण्यावर भर हवा. क्रिएटर इकॉनॉमीचा विचार करता प्रत्येक पॉडकास्टरने स्वतःचा किमान हजार श्रोत्यांचा बेस तयार करण्याचं ध्येय सुरुवातीला ठेवायला हवं. या हजार श्रोत्यांनी अगदी माफक ऐच्छिक मानधन दिलं तरी पॉडकास्टिंग हा करिअरचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अमेरिका आणि स्कँडेनेव्हियन देशांमध्ये अशी क्रिएटर इकॉनॉमी आज अस्तित्वात आहे.”

पॉडकास्टिंग आणि एकूणच श्राव्य माध्यमातल्या वाढत्या संधी लक्षात घेत माध्यमविषयक अभ्यासक्रमांमध्येही आता पॉडकास्टिंगचा स्वतंत्र वैकल्पिक विषय म्हणून समावेश करण्यात येत आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख प्रा. विनय चाटी म्हणाले, “गेल्या दोन वर्षांपासून आमच्या अभ्यासक्रमात पॉडकास्टिंग हा ऐच्छिक विषय असून, यंदाही २० विद्यार्थ्यांनी प्रकल्प विषय म्हणून पॉडकास्टची निवड केली आहे. औरंगाबादमधील स्थापत्यकला आणि शहराच्या वेशीवर असलेल्या प्रवेशद्वारांचा इतिहास, लष्करातील करिअरसंधी, गुन्हेकथा, भगवद्गीता आणि हिंदी चित्रपटातील गीतं अशा वैविध्यपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पॉडकास्ट केले आहेत. यानिमित्तानं दृकश्राव्य आशयाची निर्मिती, रेकॉर्डिंग, संपादन, विपणन आणि या क्षेत्रात वेगानं विकसित होणारं तंत्रज्ञान शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे.”

दुसरीकडे करोना लॉकडाऊनच्या निमित्तानं हाती आलेला फावला वेळ सत्कारणी लावण्याच्या निमित्तानंही अनेकांनी पॉडकास्टिंगमधली आपली नवी इनिंग सुरू केलीय. उत्पादन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नचिकेत क्षिरे यांनी ऐन लॉकडाऊनमध्ये म्हणजेच एप्रिल २०२० मध्ये इन्स्पिरेशन कट्टा हा प्रेरणादायी लोकांच्या मुलाखतींचा आपला पहिला पॉडकास्ट सुरू केला, तो नवं काही करून बघण्याच्या ऊर्मीतूनच.

ते म्हणाले, “स्वतःचा पॉडकास्ट सुरू करण्याआधी दोनेक वर्षं मी पॉडकास्ट ऐकत होतो. पण ते सगळे मुख्यत्वे अमेरिकन आणि इंग्रजीच होते. त्या वेळी हिंदीतही फारसं कुणी पॉडकास्ट करत नव्हतं. त्यामुळे या नवीन माध्यमात आपल्या मातीतले विषय आणि तेही आपल्या भाषेत आले तर श्रोत्यांना ते नक्की आवडेल, या विचारातून मी पॉडकास्टिंगमध्ये उतरलो.”

नचिकेत आज मराठी-हिंदीत सहा पॉडकास्टची निर्मिती किंवा निर्मिती साहाय्य करत असून, त्यांच्या सर्वच पॉडकास्टना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

स्वतःची माहिती तंत्रज्ञानविषयक कंपनी असली तरी प्रकाशन व्यवसायाची आवड जोपासणाऱ्या द्वितिया सोनावणे यांनी गेल्या वर्षी ‘ग्रंथप्रेमी’ हा पॉडकास्ट सुरू केला. “मराठी पुस्तकं म्हटली की लोकांच्या डोळ्यांसमोर तीच ती ठरावीक नावं येतात. पण मराठी साहित्यविश्वाचा आवाका खूप मोठाय. त्यामुळेच वेगळ्या धाटणीच्या दर्जेदार मराठी पुस्तकांचं परीक्षण आणि अभिवाचन मी माझ्या पॉडकास्टमध्ये करते,” असे त्यांनी सांगितले.

नाटकाची आणि अभिवाचनाची आवड असणाऱ्या सुजाता साळवी यांनी लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच ऑगस्ट २०२० मध्ये ‘शब्दफुले’ हा कथा-कविता वाचनाचा पॉडकास्ट सुरू केला. आतापर्यंत त्यांच्या पॉडकास्टचे ५३ भाग प्रसिद्ध झाले असून, श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. “ऑडिओ हे माझ्या आवडीचं माध्यम आहे. पॉडकास्टिंगचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कुणावरही अवलंबून न राहता, घरच्या घरी स्वतःचा पॉडकास्ट सुरू करता येतो. यासाठी मी घरी छोटा रेकॉर्डिंग स्टुडिओचा सेटअपच करून घेतलाय. पॉडकास्टिंगमधून थेट उत्पन्न मिळत नसलं तरी ‘शब्दफुले’मुळे माझी स्वतःची ओळख तयार झालीय. नवीन कामं मिळवण्यासाठी याचा निश्चित फायदा होतो. आजच्या तरुणाईमध्ये हे माध्यम खूप लोकप्रिय आहे. माझ्या श्रोत्यांमध्ये तरुणाईचं प्रमाण खूप मोठंय.”

मराठी पॉडकास्टर्समध्ये सर्वच वयोगटातील महिलांचं प्रमाण हे लक्षणीय आहे. स्वतःच्या जुळ्या मुलींच्या संगोपनाच्या अनुभवातून शिल्पा इनामदार-यज्ञोपवीत यांनी ‘सेल्फलेस पॅरेंटिंग’ हा पालकत्वाला वाहिलेला आपला पॉडकास्ट दीड वर्षापूर्वी सुरू केला.

“पालकत्वाला असलेले विविध कंगोरे आणि त्यामध्ये काम करण्यासाठी असलेला वाव लक्षात घेत मी पालकत्वावरील माझा पॉडकास्ट सुरू केला. श्रुती पानसे, राजीव तांबे, मुक्ता पुणतांबेकर यांच्यासह पालकत्व आणि मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती मी आतापर्यंत घेतल्या आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

बाकी पॉडकास्टची निर्मिती ही अत्यंत कमी खर्चात आणि घरच्या घरी करता येते, हे प्रस्तुत लेखक स्वानुभवावरून खात्रीनं सांगू शकतो. बरोबर चार वर्षांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर २०१८ मध्ये निरामय लैंगिकतेवर आधारित ‘सेक्सवर बोल बिनधास्त’ हा पॉडकास्ट मी सुरू केला. तेव्हा पॉडकास्टिंग आणि त्याच्या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती नसल्यानं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती असं स्वरूप असलेल्या या पॉडकास्ट स्टुडिओत रेकॉर्ड करण्यावर भर दिला. याउलट २०२२ च्या सुरुवातीला सुरू केलेल्या ‘मराठी क्राइम कथा’ या माझ्या गुन्हेकथांच्या दुसऱ्या पॉडकास्टची निर्मिती मी घरच्या घरीच करत आहे.

पॉडकास्टच्या सुरुवातीच्या टप्प्यात तर महागड्या माइकमध्ये आणि अन्य उपकरणांमध्ये गुंतवणूक करण्याचीही आवश्यकता नसते. अगदी मोबाइलच्या हेडफोन्सद्वारे आणि ऑडॅसिटी, गराजबँड अशा मोफत सॉफ्टवेअर्सद्वारे पॉडकास्ट रेकॉर्ड आणि एडिट करता येतो. तसंच पॉडकास्टिंगसाठी अगदी सुरेल किंवा खर्जातलाच आवाज हवा हादेखील एक गैरसमज आहे. खुलवून गोष्ट सांगण्याचं कसब असलेला कुणीही मनुष्य स्वतःचा पॉडकास्ट सुरू करू शकतो. त्यासाठी व्हॉइस ओव्हरचे महागडे क्लासेस लावण्याची आवश्यकता नाही. पॉडकास्टिंग आणि डबिंग, अभिवाचन, नाट्यवाचन या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, हे समजून घ्यायला हवं. बाकी पॉडकास्टचं तंत्रज्ञान आत्मसात करणं ही तशी सरावानं जमणारी गोष्ट आहे. सगळ्यात मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे नेमका कोणत्या विषयात पॉडकास्ट सुरू करायचा हा. कारण त्या विषयात तुम्हाला गती आणि आवड दोन्ही असेल तरच तो पॉडकास्ट तुम्ही सातत्यानं सुरू ठेवू शकता. पॉडकास्टिंग आणि एकूणच श्राव्य माध्यमातल्या संधी दिवसागणिक वाढताहेत याची झलक लिंक्ड इन आणि फ्रिलान्सरसारख्या नोकरी-व्यवसायविषयक पोर्टल्सवरही सध्या बघायला मिळतीय. त्यामुळेच गोष्टीत रमण्याचा अन् गोष्टी सांगण्याचा तुम्हालाही नाद असेल तर अमाप संधींची पॉडकास्टिंगची वाट एकदा नक्की धुंडाळून पाहा!

पुणे, मुंबई, अहमदनगर, संगमनेर, सोलापूर, नागपूर आणि अमेरिकेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये धडपडणारे पण पॉडकास्टिंगच्या आवडीनं एकत्र आलेले १२ मराठी पॉडकास्टर्स लवकरच marathipodcasters.com ही नवी वेबसाइट सुरू करत आहेत. मराठी साहित्य, योगासनं, पालकत्व, वृद्धत्वाचं नियोजन, आरोग्य आणि प्रेरणादायी व्यक्तींच्या मुलाखतींपासून ते गुन्हेकथा आणि निरामय लैंगिकतेपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्ट या वेबसाइटवर एकाच क्लिकवर ऐकायला मिळणार आहेत.

niranjanmedhekar1@gmail.com

(लेखक मुक्त पत्रकार, कथाकार आणि पॉडकास्टर आहेत.)

Story img Loader