प. पू. धर्म व संस्कृतिरक्षक हो,
जय सियाराम!
जुन्या सवयी जात नाहीत म्हणून माफी असावी! आम्ही जुन्या शिरस्त्याप्रमाणे सिया व राम दोघांचे नाव घेतले. आपण श्रीरामाला त्याच्या जन्मस्थानी पुनर्वसित केल्यानंतर सियाबाईना भूमिगत करून (माहेरी पाठवून?) फक्त ‘जय श्रीराम’ म्हणण्याचा दंडक घातला हे आम्ही विसरूनही गेलो होतो. इतिहासातल्या गैरसोयीच्या गोष्टी विसरण्याइतके ‘कडवट’ हिंदू आम्ही अद्याप झालो नाही ना! दर वर्षी व्हॅलेंटाइन डे आला की तुमची आठवण हमखास येते. कारण गेली दहा वर्षे आपण म्लेंच्छांनी या भूमीत आणलेल्या या बाजारू प्रेमदिनाला विरोध करीत आहात. पण पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखालील स्वाभिमानशून्य भारतीय (पुन्हा चुकलो, हिंदू) ते अजूनही मनावर घेत नाहीत. या संदर्भात मला दहा वर्षांपूर्वी आपल्यापैकी एका महनीय व्यक्तीने – श्री चंद्रप्रकाश कौशिकजी, अध्यक्ष, हिंदू महासभा – ह्यांनी केलेल्या एका घोषणेची तीव्रतेने आठवण होते. ते केवळ म्लेंच्छ संस्कृतीतील व्हॅलेंटाइन डेला विरोध करून थांबले नाहीत; त्यांनी त्याला एक समर्थ पर्यायही दिला. ते म्हणाले होते की ‘त्याऐवजी आपल्या संस्कृतीला अभिप्रेत असलेली वसंत पंचमी साजरी करा.’
त्यांचे हे विधान ऐकल्यावर मला त्यांचे अतिशय कौतुक वाटले होते. हिंदुत्ववाद्यांची संस्कृतीची संकल्पना तुळशी वृंदावन, वटसावित्री, फक्त पुरुषांसाठी असणाऱ्या संघटना व वीर पुरुषांभोवती पंचारती ओवाळणाऱ्या स्त्रिया इथपर्यंतच मर्यादित आहे, असा आमचा समज होता. आमच्या जाणिवांच्या कक्षा रुंदावण्याचे कार्य आपण झपाट्याने करत आहात. कोणी कडक ब्रह्मचारी हिंदू स्त्रियांनी किमान चार पुत्ररत्नांना जन्म द्यावा असा फतवा, नव्हे प्रेमळ आदेश देतो. कोणी आधुनिक विदुषी ‘नो बिंदी, नो बिझनेस’ अशी घोषणा देऊन स्त्रिया संस्कृती रक्षण कार्यात पुरुषांच्या पुढे असल्याचे सिद्ध करते. या जाणीव- रुंदावणी प्रकल्पात रंग, उत्सव, क्रीडा, प्रणय अशा बाबींना स्थान नसेल असा आमचा गैरसमज झाला होता. परंतु, अलीकडच्या काळात वसंत पंचमीविषयी जे काही आमच्या वाचनात आले, त्यावरून तो दूर झाला व इतक्या बहुरंगी, प्रणयरम्य परंपरेचे आपण वारसदार आहोत ह्या विचाराने आमचे ऊर अभिमानाने भरून आले. वसंत पंचमी म्हणजे माघ शुक्ल पंचमी. आंग्ल कालमापनाप्रमाणे ती यंदा २ फेब्रुवारी २०२५ ला साजरी झाली. कौशिकजींच्या प्रस्तावाची आपण दाखल घेऊन १४ फेब्रुवारीच्या आधीच आपला अस्सल भारतीय प्रेम दिन साजरा केला असता तर व्हॅलेंटाइन डेची हवा पार निघून तिची प्लास्टिकची हृदये पार फुटून की हो गेली असती!
हे अगदी खरे आहे की युरोपात व्हॅलेंटाइन डेची सुरुवात होण्याच्या कितीतरी शतके अगोदर आपल्याकडे वसंत पंचमी म्हणजेच कामोत्सव किंवा मदनोत्सव साजरा होत असे. हिवाळा संपून नुकतीच ऋतुराज वसंताची चाहूल लागलेली असते. पानगळ संपून कोवळ्या पानांनी व रंगीबेरंगी फुलांनी सृष्टी नटलेली असते. भ्रमरांचा गुंजारव, कोकिळेचे कूजन ह्या साऱ्यामुळे वातावरण रोमॅंटिक झालेले असते. अशा वेळी वसंतपंचमीच्या दिवशी तरुणतरुणी पिवळी-केशरी बसंती वस्त्रे धारण करून हाता-पाया-गळ्यांत फुलांच्या माळा घालून वनविहारासाठी जात, मनातील प्रिय व्यक्तिप्रती आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करीत व निसर्गाशी एकरूप होत बेधुंदपणे प्रियाराधन करीत. पुढाकार घेऊन मनातील प्रेम असे व्यक्त करण्याची मुभा तेव्हा तरुण व तरुणी दोघांनाही समान प्रमाणात होती. विवाह हासुद्धा त्यातील अडसर मानला जात नसे. अगदी ब्रिटिशांचे आगमन होईपर्यंत भारतात ग्रामीण व नागरी वस्त्यांजवळ घनदाट जंगले, उद्याने, आमराया, सरोवरे अशी समृद्ध निसर्गसंपदा होती. तेथे साजऱ्या होणाऱ्या जलक्रीडा, यौवनोत्सव अशा गमतीची वर्णने अनेकांनी पंडित राहुल सांकृत्यायन ह्यांच्या ‘व्होल्गा ते गंगा’ ह्या पुस्तकात, तसेच विविध भारतीय भाषांतील लोकसाहित्यात, वाचली असतीलच. तुम्ही निदान प्राचीन संस्कृत वाङ्मयातली तरी वाचली आहेत ना?
‘मृच्छकटिकम्’ या संस्कृत नाटकात वसंतोत्सवात निघणाऱ्या कामदेवाच्या मिरवणुकीचे सुंदर वर्णन आहे. सम्राट हर्षलिखित ‘रत्नावली’ व ‘नागानंद’ ही नाटके, वाल्मीकी रामायण… किती उदाहरणे द्यावीत? वसंतोत्सव किंवा मदनोत्सव हा प्राचीन काळातील सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग होता, हेच यावरून सिद्ध होते. ‘काम’ हा पुरुषार्थ आहे, असे मानणारी आपली परंपरा. लैंगिकता व यौनिकता – दोघांचाही विचार करणारे व मंदिरांच्या कळस-स्तंभ-मंडपात त्यांचे आविष्करण करणारे आपले पूर्वज. साहित्य- संगीत-नृत्यादी ललित कलांमध्ये शृंगाराला उच्च स्थान देणारे त्यांचे कलाभान. याच समृद्ध वारशाची गोष्ट तुम्ही करीत आहात ना?
महाभारत तर तुम्ही वाचले असेलच. त्यातील कोळ्याची मुलगी मत्स्यगंधा व पाराशर ऋषी हे नदीच्या प्रवाहावर तरंगणाऱ्या खुल्या नौकेत प्रणय करतात व तोही तिने घातलेल्या अटी मान्य करून. वनवासातील भीम हिडिंबा राक्षसीच्या प्रेमात पडतो व तिच्यापासून जन्मलेल्या घटोत्कच या मुलाचे पितृत्व स्वीकारतो. ईशान्य भारतातील मातृसत्ताक समाजातील शूरवीर राजकन्या चित्रांगदा व उत्तर भारतातील हस्तिनापूरचा राजपुत्र अर्जुन यांचे प्रेमप्रकरणही त्याच काळात बहरलेले दिसते. त्या काळातील हे आंतरधर्मीय, आंतरवंशीय संबंधच की हो! पण महाभारतकारांनी त्याबाबतीत ‘लव्ह जिहाद’सारखी भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही. म्हणजे भिन्न संस्कृती मानणाऱ्या मानव समूहांतील प्रेमसंबंध किंवा विवाहसंबंध त्या काळी समाजमान्य होते, हे निश्चित. खरोखर याच समृद्ध वारशाची गोष्ट तुम्ही करीत आहात ना? तुमच्यातील एका संघटनेने म्हणे व्हॅलेंटाइन डेला हातात हात घालून जाणाऱ्या जोडप्यांना पकडून त्यांना थेट लग्नाच्या बेडीत अडकविण्याचा निर्णय जाहीर केला होता. (१४ फेब्रुवारी २०१५ रोजी दिल्लीत तुमच्या मांडवात लग्न करण्यासाठी बँडबाजासकट आलेल्या तरुण-तरुणींना मात्र तुम्ही थेट पोलीस ठाण्यात पाठवले होते.)
पण लग्न करायचे की नाही, असल्यास केव्हा, कधी, कोणाशी करायचे हा निर्णय कोणाचा? विवाहबाह्य संबंधांविषयी आपण इतके सोवळे केव्हापासून झालो? तुम्ही ज्या म्लेंच्छांचा इतका तिरस्कार करता, ज्या पाश्चात्त्य संस्कृतीच्या नावाने खडे फोडता, तिचाच प्रभाव आहे हा! इंग्रज भारतात आले तेव्हा इथल्या समाजात चालीरीती, परंपरा यांचे इतके वैविध्य होते की ते बापडे इंग्रज त्यामुळे बावचळून गेले. बहुपतित्वाची परंपरा असणारा हिमाचल प्रदेश, मातृवंशिक नायर, सोबत राहण्यासाठी व मुले जन्माला घालण्यासाठी लग्नबंधन महत्त्वाचे न मानणारे आदिवासी… टेबलाचेही कमनीय पाय दिसू नयेत म्हणून त्यावर गवसणी – टेबलक्लॉथ – घालणाऱ्या व्हिक्टोरियन सोवळेपणात वाढलेल्या इंग्रजांना केवढा मोठा सांस्कृतिक धक्का होता तो! त्यांनी मग आपल्याला त्यांच्याप्रमाणे ‘सुसंस्कृत’ करण्याचा विडा उचलला व आपण त्यांच्या मेंदुधुलाईला बळी पडलो. एरवी आपल्या संस्कृतीत राधा-कृष्णाचे नाते केवळ समाजमान्य होते इतकेच नव्हे, तर भारतीय परंपरेने कृष्णासोबत राधेलाही देवत्व बहाल केले आहे, हे आपण विसरूनही गेलो. कृष्ण-सत्यभामा किंवा कृष्ण-रुक्मिणी अशी मंदिरे कुठे दिसत नाहीत. राधा-कृष्णाची मंदिरे सर्वत्र आढळतात, हे ‘कडवट’ समर्थकांनाही माहीत हवे.
तुम्हाला ‘गाथा सप्तशती’ माहीत आहे का हो? नाही, सप्तशतीची धार्मिक पोथी आहे ती वेगळी. मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ हा गौरव प्राप्त होण्यासाठी ज्या ग्रंथाने मोलाची कामगिरी बजावली, तो हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा महाराष्ट्री प्राकृत भाषेतला व महाराष्ट्रात रचला गेलेला आद्या ग्रंथराज. त्यातील विविध वयाच्या, जातीच्या ग्राम-नागर संस्कृतीतील प्रणयाचे वर्णन वाचले तर तेव्हाचा ‘हिंदू’ समाज लैंगिक संबंधांच्या बाबतीत किती मोकळा होता ते कळते. गाथा सप्तशतीतील मदनोत्सवाचा एक नमुना तर पाहा-
प्रियकरामुळे विस्कटलेले केस आणि मद्यामुळे धुंद झालेले मुख,
या उत्सवात एवढाही शृंगार तरुणींना बास होतो…
कामसूत्र, ऋतुसंहार, खजुराहोची शिल्पे ह्यांपासून ते विविध भाषेतले लोकसाहित्य पाहिले तर आपल्या महान संस्कृतीत प्रेमाला फारसा मज्जाव केलेला दिसत नाही. प्रेमाचे प्रगटन, आविष्करण ही एक सुंदर बाब आहे असेच येथे मानले गेले.
आता तुमच्यासमोर व तुमच्यासारख्या स्वत:ला हिंदुधर्मरक्षक म्हणविणाऱ्यांसमोर दोनच पर्याय आहेत – एक तर हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या या परंपरेची बहुविधता मान्य करा. या बहुविधतेतून सातत्याने दिसणारे प्रेमाचे माहात्म्य, कामभावनेचा सहज, मोकळा, गंडरहित स्वीकार, जाती-धर्म-वय इ. बंधनापलीकडचे संबंध यांचे स्वागत करा. या संस्कृतीला आपली म्हणा. आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरवंशीय विवाहांचे स्वागत करा. त्यापैकी कोणालाच विशिष्ट धर्म स्वीकारण्याची सक्ती करू नका… मग खुशाल वसंतपंचमीचा आग्रह धरा. सगळी तरुण पिढी व आमच्यासारखे असंख्य प्रेमयोगी येतील तुमच्यासोबत. ते जमत नसेल तर प्राचीन संस्कृती, महान धर्म हे बोलणे बंद करा. राधा-कृष्ण, शंकर-पार्वती यांची नावेही घेऊ नका. ब्रिटिशांनी दोन शतकांपूर्वी टाकून दिलेली व्हिक्टोरियन संस्कृतीच आम्हाला प्राणप्रिय आहे, असे जाहीर करा.
बघा तुम्हाला काय जमते ते!
आपला एक सुहृद,
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ