काही दिवसांपूर्वी नागपूर व्हीएनआयटी येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलीपुरी पंडित यांनी ‘इतिहासा’बद्दल आणि इतिहासातील काही घटनांबद्दल विधाने केली. त्यांचे म्हणणे असे की ब्रिटिशांनी आपल्यावर खोटा किंवा चुकीचा इतिहास लादला. मागेही अडीच-तीन वर्षांपूर्वी भारताच्या गृहमंत्र्यांनी ‘काहींनी इतिहासाचे विकृतीकरण केले. पण, आता सत्य इतिहास लिहिण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही.

या विधानाचा थोडा परामर्श घेण्याकरिता हा लेखप्रपंच.

‘इतिहास’ या विषयाच्या सर्वांगीण अभ्यासामध्ये तीन घटक प्रमुख असतात. इतिहासलेखन, इतिहाससंशोधन आणि इतिहासमीमांसा अथवा इतिहासाचे विश्लेषण हे ते तीन.

इतिहासलेखन

यापैकी पहिल्या म्हणजे इतिहासलेखन या प्रकारात घडलेल्या गोष्टींचे यथातथ्य वर्णन म्हणजे झालेल्या अथवा सभोवताली होत असलेल्या प्रसंगांची विश्वसनीय हकीकत देणे हा उद्देश प्रामुख्याने असतो. इतिहास या शब्दाची व्युत्पत्तीच ‘इति ह आस’ म्हणजे असे झाले, याप्रमाणे घडले अशी आहे. अर्थात सत्यकथन हा इतिहासाचा आत्मा असतो. यात थोडा जरी असत्याचा अथवा कल्पिताचा अंश आला तर तो ‘इतिहास’ या पदवीला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणूनच सर्वात श्रेष्ठ सत्यवाङ्मय अशी इतिहासाबद्दल ख्याती आहे.

इतिहाससंशोधन

यानंतर पुढचा घटक आहे इतिहाससंशोधन. ही सदैव चालणारी प्रक्रिया असते. इतिहाससंशोधनाची अनेक साधने असतात. प्राचीन कोरीव लेख, ताम्रपट, शिलालेख, देवालये, मूर्ती, पुतळे, बखरी, कागदपत्रे, पोथ्या वगैरे. ही साधने नव्याने प्रकाश टाकला की उपलब्ध इतिहास बदलावा लागतो अथवा दुरुस्त करावा लागतो.

इतिहास विश्लेषण

इतिहासाभ्यातील तिसरा घटक आहे इतिहास विश्लेषणाचा. हा अत्यंत  महत्त्वाचा घटक असतो. मतभेद अथवा वादविवाद येथेच जास्त होतात. यात इतिहासातील घडलेल्या घटनांकडे पाहून काही निष्कर्ष काढले जातात. एकाच घटनेकडे  निरनिराळ्या व्यक्ती आपापल्या दृष्टिकोनातून पाहून निरनिराळे अर्थ सांगू पाहतात. १८५७ च्या उठावाकडे सावरकर ‘स्वातंत्र्यसमर’ म्हणून पाहतात. न.र. फाटक त्याला ‘शिपाईगर्दी’ हे नाव देतात तर आणखी काहीजण त्याला ‘बंड’ म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे’ असे म्हणतात तर सावरकरांनी तो विजयाचा इतिहास आहे हे सांगण्याकरिता ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ लिहिला.

भारतात इतिहासलेखनाचे प्रयत्न ब्रिटिशांच्या सत्तास्थापनेबरोबर सुरू झाले. तिथपर्यंत आम्ही आमच्या इतिहासाकडे फारसे लक्षच दिले नव्हते. आपल्याकडे इतिहासाची विपुल साधने उपलब्ध होती. परंतु त्यातील बव्हंशी धूळ खात पडून होती. इंग्रजांचे या अनमोल साधनसामुग्रीकडे लक्ष गेले आणि त्यांच्या शास्त्रीय दृष्टिकोनाचा परिणाम म्हणून भारतात प्राच्यविद्या-संशोधन होऊ लागले. मेकॉले, गिबन, ग्रीन या नामांकित इतिहासकारांचे नाव कोणी ऐकले नाही? मॅक्समुल्लरचा ‘वेदां’वरचा अधिकार तर सर्वविदितच आहे. या इतिहासकारांनी भारतातील शास्त्री-पंडित-विद्वानांनाही इतिहासलेखनात सामील करून घेतले होते. सारांश आम्हाला आमचा इतिहास इंग्रजांमुळेच कळला यात संशय नाही.

आता काही संशोधकांचे जर असे म्हणणे असेल की इंग्रजांनी चुकीचा इतिहास लिहिला, तर तो चुकीचा आहे हे सिद्ध करणारे कोणते पुरावे त्या संशोधकांनी समोर आणले आहेत? कुठल्याही प्रकारचे ऐतिहासिक पुरावे समोर न करता इंग्रजांनी चुकीचा इतिहास लिहिला या म्हणण्याला म्हणूनच काही अर्थ उरत नाही. इतिहासातील सत्यासत्याचे खंडन केवळ संशोधनाच्या पातळीवरूनच झाले पाहिजे. केवळ स्वत:चा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी इतिहासाचा दुरुपयोग होता कामा नये.

कुलगुरूंनी आपल्या भाषणात आर्य, संस्कृत भाषा, मुगल, औरंगजेब, ब्रिटिश. पं. नेहरू यांसारख्या अनेक विषयांना स्पर्श केला आहे. स्थलाभावी दोन-तीन मुद्यांचाच याठिकाणी विचार करू. सध्या औरंगजेब हा विषय फार चर्चेत आहे. औरंगजेबाने हाल हाल करून संभाजीला ठार मारले हे इतिहासप्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे संभाजीराजांना  पकडून देण्यात कोणाचा हातभार होता हेही प्रसिद्ध आहे. औरंगजेबाचे आणि  मुगलांचे धर्मविषयक धोरण हे हिंदूविरुद्ध होते हे वादातीत आहे. त्यांनी हिंदूंची अनेक देवळे पाडली हेही सत्य आहे. त्यांनी मशिदी उभारल्या हेही कोणी नाकारत नाही. पण या प्रश्नाला दुसरीही एक बाजू आहे हे निष्पक्षपाती इतिहासकारांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

मुस्लिमांची राजवट ही भारतात हिंदूंच्याच आश्रयाने उभी राहिली. त्यांच्या काळात हिंदूंच्या तीर्थयात्रा, त्यांचे विधी आणि कर्मकांड, त्यांचे धर्मशास्त्रानुसार वर्तन हे अव्याहतपणे चालू होते. त्यांनी किती देवळे पाडली याबरोबरच त्यांनी किती असंख्य देवळे शिल्लक ठेवली हेही बुद्धिवंत इतिहासविश्लेषकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. असा काहीही विचार न करता मुस्लीम राजे देवळे पाडून मशिदी उभारत गेले असे दृश्य निर्माण करून अनेक मशिदींचे उत्खनन करून त्याखाली शिवलिंग आहे का, अशा तपासाचा अट्टाहास धरणे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून हिंदू-मुस्लीम वादाची एकही संधी न सोडता हा वाद धगधगत ठेवण्याचे राजकारण आहे, हे स्पष्ट होते.

 पंडित नेहरूंमागे तर आजचे सत्ताधारी हात धुवून लागले आहेत. त्यांना गांधी-नेहरू घराणे इतिहासातून पुसून टाकायचे आहे. राहुल गांधींची तर त्यांनी इतकी धास्ती घेतली आहे की त्यांचे नाव दिवसातून कितीदा त्यांचे प्रवक्ते घेत असतील याची गणनाच नाही. अनेक प्रकरणांत त्यांना ओढूनताणून आणून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येत आहेत. पं. नेहरूंना जाऊन आता अर्धशतकाहूनही जास्त काळ लोटला. असे असूनही आपल्या अपयशाचे खापर अजूनही पं. नेहरूंवर फोडणे ही गोष्टच सत्ताधाऱ्यांसाठी फार हास्यास्पद आणि लाजिरवाणी.

गेल्या १०-११ वर्षात सत्ताधाऱ्यांना पं. नेहरू सोडून काँग्रसमधील अनेक नेत्यांच्या थोरवीचा आणि महानतेचा अचानक साक्षात्कार व्हायला लागला. नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, प्रणव मुखर्जी वगैरे त्यातील काही नावे. सरदार पटेलांशी तर त्यांनी एवढी जवळीक साधली, की ते संघ-स्वयंसेवक होते, एवढेच कानावर यायचे बाकी आहे.

संस्कृत भाषेबद्दलही तीच स्थिती. संस्कृत ही प्राचीन भाषा आहे हे खरे. परंतु संस्कृत आधी की प्राकृत आधी, हा वाद आहेच.
इतिहासाचे एक वैशिष्ट्य असते. ते म्हणजे इतिहासलेखन अथवा इतिहासविश्लेषण हे ज्यावेळी होते त्यावेळी ते त्या काळच्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेले असते. सत्ताधाऱ्यांचे तत्कालीन व्यवस्थेवर प्रभुत्व निर्माण झाल्यामुळे बहुतांशी तेच इतिहासातून कोणत्या गोष्टी समोर आणायच्या आणि कोणत्या विस्मरणात पाठवायच्या हे ठरवत असतात.

साहजिकच अशाप्रकारच्या मांडणीमागे आपला राजकीय स्वार्थ साधणे हा उद्देश असतो. हा स्वार्थ साधण्याकरिता ते इतिहासातील स्वमतानुकूल दाखले काढून दाखवतात. आपले पूर्वग्रह, अहंकार, विशिष्ट विचारांशी निष्ठा यांच्या प्रभावामुळे ते ऐतिहासिक घटनांना व व्यक्तींना हवा तसा आकार देण्यात गढून जातात. चित्रकार आपल्या चित्रात त्याला हवी असलेली गोष्ट ठळकपणे दिसेल व इतर गोष्टी गौणत्वाने दिसेल, याची जशी पुरेपूर काळजी घेतो, तसेच इतिहासकारांचेही असते. या प्रकाराचा अनेक क्षेत्रात परिणाम होतो. परंतु धार्मिक आघाडीवर त्याचा होणारा परिणाम हा महाभयंकर असतो. आपल्या पुरातन इतिहासाची आठवण देऊन लोकांची धार्मिक अस्मिता जागृत करण्याचा सत्ताधारी प्रयत्न करतात. याचा परिणाम म्हणून मानवजातीत अधिक द्वेष, अधिक भेद, अधिक मत्सर निर्माण होतो हे लक्षात घेणे आवश्यक.

असे व्हायला नको. म्हणून इतिहासाची मांडणी ही सर्व बाजूंचा आणि देश-काळ-स्थिती व समाजातील सामंजस्य लक्षात घेऊन केली पाहिजे. पूर्वग्रह, संस्कार, अभिमान, पक्षपात, परद्वेष आदी बाबींचा प्रभाव पडू न देता इतिहासमीमांसा करणे आवश्यक. इतिहासविश्लेषकांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की इतिहास हा भूतकाळ असतो आपण वर्तमानात जगत असतो. असे असताना आपण भूतकाळाला किती महत्त्व द्यायचे? आपण वर्तमानाचे धनी आहोत. भूतकाळाचे धनी असलेले लोक गेले, मेले, संपले. अशा परिस्थितीत वर्तमानाचे भान ठेवून इतिहासाची मांडणी झाली पाहिजे. आजचे जीवन सुखी होण्यासाठी भूतकाळातील जे कण स्वीकारार्ह आहेत तेवढेच स्वीकारायचे. बाकीच्यांकडे दुर्लक्ष करायचे हाच शहाणपणा ठरतो. “आपल्याला जर प्रगती साधायची असेल तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देण्यात काही अर्थ नाही. त्यापासून योग्य तो बोध घेऊन नवा इतिहास घडवण्याची आपण उमेद बाळगली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी जो वारसा आपल्या हवाली केलेला आहे त्यात लक्षणीय भर आपण घातली पाहिजे” असे महात्मा गांधींचे म्हणणे आहे.
 
rajendradolke@gmail.com

Story img Loader